Wednesday, December 22, 2010

तो अणि ती...

माणसांच्या समुद्रात 
हातात हात घालून एक छोटीशी लाट फुटली.
ते दोघं...इतर कोणाही सारखे..
डोळ्यांत भविष्याची स्वप्नं,
आजूबाजूला कोरडं वास्तव.
तिचं स्वप्नरंजन,
तो सतत जमिनीवर..
तसे खूष आहेत दोघंही,
हातामध्ये एकमेकांचे हात घेऊन.
तो तिला पेपर वाचून दाखवतोय;
तिच्या स्वप्नांची वास्तवाशी
सांगड घालू पाहतोय....
तिला एक छोटंसं घरकुल दिसतंय(पेपरात!!)
निसर्गरम्य वगैरे.. 
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर.
"नवं घर ठाण्यापेक्षा खारघरला घेऊ!
नव्या एअरपोर्टमुळे आता तिथे सगळं
'हायरक्लास ' होणारे..!!"
तेवढ्यात चौकोनी कुटुंबाची
गाडीची जाहिरात पाहते ती..
गोजिरवाणी मुलं वगैरे..
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर.
"अगं 'अल्टो' पेक्षा 'NANO' घेऊ;
सध्या तीच एकदम 'इन' आहे!"
स्वतःचीच समजूत घालतोय..
हल्लीच रोजच्या खर्चाचा 
ताळेबंद मांडू लागलाय तो.
म्हणूनच  हबकलाय..जरा जास्तच..
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर
तशा तिच्या विशेष काही अपेक्षा
नाहीयेत त्याच्याकडून...
समुद्राच्या किनारी मऊशार वाळूत 
दोघांच्या पावलांचे ठसे बघताना
रमून जाते ती..
हळुवार वगैरे..स्वप्नरंजन!!
तिच्या आवाजाच्या लाटा 
खळखळत येत राहतात त्याच्यावर.
आता मात्र विसरतो तो 
जमिनीवर उतरणं सुद्धा..
पाझरत राहतो..आतून..
तसा खूष आहे,तोसुद्धा;
हातामध्ये तिचे हात घेऊन..!!!

-स्पृहा.
  

7 comments:

 1. शेवटचे कडवे खूपच सुंदर लिहिले आहेस.
  येउद्या अजून!

  ReplyDelete
 2. बढिया!

  हलकं फुलकं पण मस्त!

  ReplyDelete
 3. व्वा छान आहे कविता. जीवन जगताना स्वप्नांचे आकाश आणि वास्तवाची भूमी या दोहोंची सांगड घालणारे ते "क्षितीज" ज्यांना गवसते ते खरच भाग्यवान. कारण नुसते वास्तवात जीवन जगायचे, काहीच स्वप्न नाहीत अशा जगण्यात मजा नाही . तसेच केवळ स्वप्नरंजन, कर्तृत्व काहीच नाही अशा जगण्यालाही अर्थ नाही.

  ReplyDelete