Wednesday, February 16, 2011

होडी

करडा समुद्र,
पार दूरवर दिसणारा 
जमिनीचा एकच तुकडा,
पिवळट कोरडा चंद्र
नुकताच झोपून उठल्यासारखा..
लाटासुद्धा हिरवट निळ्या,
काडेपेटीची काडी कशी 
क्षणभर लकाकते तशा..
एक होडी पुढे पुढे येतेय, 
बंदरात नांगर टाकतेय,
आपला आधीचा वेग 
काबूत आणायचा प्रयत्न करतेय.
या चिखला-मातीच्या गाळातून
सरकण्यासाठी आधीचा वेग विसरणं
भाग आहे तिला.
आधी खूप त्रास,वेदनाही.
आधी घाबरली होडी थोडीशी. 
पण मग हळूहळू जाणवणारी 
किनाऱ्याची हवा,सुगंधी.
आतून आवडणारी..
एक थंडगार,निळं आलिंगन..
होडी कल्पनेतही मोहरली! 
त्याच आवेगात भान सुटलं,
एका बर्फाच्या कड्याला टोक घासलं..
होडीत आता निळाशार प्रपात,
प्रचंड आवेगाने धावत आत,
पण बुडतानासुद्धा होडीला
आता भीती वाटत नाहीये,
बुडण्याचं दुःख तर त्याहून नाहीये;
मूकपणे तिने झोकून दिलंय स्वतःला
तिच्या उत्कट समर्पणात..
आता तिथल्या लाटांना
रोज एक धडधड ऐकू येते,
तिच्या आणि सागराच्या 
हृदयाची.. 

-स्पृहा.
    

6 comments: