Friday, September 30, 2011

नैतिकतेचे डांगोरे

'गॉसिपिंग'  हा आपला राष्ट्रीय आवडता छंद आहे. कोणीही उठून कोणाबद्दलही  काय वाट्टेल ते बोलू शकतो. 'भाषणस्वातंत्र्य' ही तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेली खास देणगी आहे. जिचा चोख फायदा घेत आपल्या दुधारी जिभेचे धारदार दांडपट्टे सतत चालूच असतात. बरं आपल्याला सगळ्या विषयांतलं सगळं कळतं, आणि त्यावर अजिबात लायकी नसतानाही ठाम मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असा एक विशेष समज आपल्या मनीमानसी रुजलेला आहे. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीपासून ते कतरीनाच्या बिकीनीपर्यंत, आणि अण्णा हजारेंच्या उपोषणापासून ते ओसामा बिन लादेनपर्यंत कुठल्याही गोष्टीवर सर्व लहानथोर प्रचंड अधिकारवाणीने बोलत असतात. त्यातून 'नीतिमत्ता' हे तर राखीव कुरण! तिथे जर कोणी घसरलं, की मग तर समस्त संस्कृतीरक्षक बाह्या सरसावून उभे ठाकलेच. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे, सध्या चालू असलेला (माझ्या मते) नॉनसेन्स वितंडवाद.



'मणिपूरची लोहकन्या' म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं, की "डेझमंड कुटीन्हो नावाच्या गोव्यात जन्मलेल्या ब्रिटीश लेखक, सामाजिक कार्यकर्त्यासोबत माझं अफेअर चालू आहे." झालं. वादाचा प्रचंड धुरळा उडाला. तिचे विरोधकच  नाही, तर समर्थक सुद्धा हडबडले. ही बातमी खरी नसून ती शर्मिलाविरुद्ध कसलीतरी भयानक 'स्टेट कॉन्स्पिरसी' आहे, असंही बोलून झालं. 'एलिट' वर्गाने नेहमीप्रमाणे "तिच्या आयुष्यात तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे", असं म्हणून सोयीस्करपणे विषय झटकून टाकला. म्हणजे यांच्या 'ड्रिंक पार्टीज' मध्ये चघळायला विषयही झाला, आणि सामान्य मध्यमवर्गीयांच्या नीतीमत्ताविषयक कचकड्याच्या कल्पनांना भूकंपाचे धक्केही बसायला नकोत !
माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? गेली दहा वर्ष ही एकटी बाई कोणतेही मिडिया स्टंट न करता मणिपूर मधून 'आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट (AFSPA) हा अन्यायकारक कायदा रद्द व्हावा म्हणून उपोषण करते आहे, सरकार नामक अजस्त्र राक्षसाशी एकटी हिंमतीने झुंजते आहे, अनन्वित छळाला सामोरी जाते आहे, तिच्या कार्याच्या जोरावर तिथल्या लोकांच्या गळ्यातली ती ताईत बनली आहे, ही सत्य परिस्थिती केवळ वरच्या एका घटनेमुळे आपण नाकारायची??

तिचं आयुष्यभराचं सगळं कर्तृत्व या एका घटनेने कस्पटासमान ठरवायचं?? का कोणाला तिच्या बचावासाठी हे म्हणण्याची गरज पडावी, की "अहो, हे कसं शक्य आहे, कारण शर्मिला तर कडक बंदोबस्तात पोलीस पहाऱ्यात होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यावर इतकी कडक नजर होती, की तिचे कुटुंबीयही तिला भेटू शकत नसत. मग हे अफेअर वगैरे कसं शक्य आहे?" का वेळ यावी हे बोलायची? किंवा हे क्लॅरिफिकेशन घाईघाईने द्यायला लागावं, की "ते दोघं आता 'एंगेज्ड' आहेत, त्यामुळे अफेअर करून गमावलेलं(?) सिव्हील सोसायटी मधलं स्थान आता शर्मिलाला परत मिळालं आहे!!!" कुठल्या नैतिकतेचे डांगोरे पिटणं चालू आहे आपलं? बाकी सगळं सोडून देऊ, पण एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून शर्मिलाचा 'प्रेमात पडण्याचा अधिकार' हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?



तिचं 'बाईपण' ही गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवतं. कारण कुठल्याही 'आदर्श स्त्री'ला आपल्याकडे 'देवी माँ' होऊनच राहावं लागतं, जगावं लागतं. तीही कालीमातेसारखी कठोर नाही, तर मध्यमवर्गीय पितृसत्ताक मानसिकतेला आवडेल, झेपेल, पचेल इतकीच साधी, सोज्वळ, पतिपरमेश्वरपरायण 'सीता' म्हणून. त्यामुळे ही मणिपूरची लोहकन्या शर्मिला; शक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा, आणि त्यागाचं प्रतीक असणारी शर्मिला, हिने प्रेमाबिमासारख्या क्षुद्र मानवी भावनांमध्ये अडकून कसं चालेल? तिने असा विचारही करणं, ठार चुकीचंच नाही का! अब्रह्मण्यम!! आपल्याकडच्या चॅनल्सनाही त्यांचा TRP वाढवायला, हे असले विषय चघळायला बराच वेळ असतो, त्यामुळे त्यांनी तर साधारण, "जिला आपण सर्व आदर्श मानतो, अशा एका कमकुवत मनाच्या स्त्रीने आपल्या भाबड्या निष्ठावंतांची केलेली घोर फसवणूक..!!" इतक्या हीन पातळीला शर्मिलाचा विषय आणून ठेवलाय. एका पेपरने तर 'शर्मिलाला तिच्या प्रियकराने अॅपलचं मॅकबुक भेट दिलं' अशीही बातमी छापली. पण दुर्दैवाने कुठल्याही पेपरने त्यावर, 'सो व्हॉट?' , 'मग काय?' असा स्टॅंड घेतलेला नाही. आपल्याकडे राज्यकर्ते आणि सेलिब्रिटीज यांची असंख्य वेळा घडणारी- तुटणारी अफेअर्स आपल्याला चालतात. त्या गोष्टीवर त्यांचं 'ग्लॅमर' आणि आपली 'क्रेझ' सहज पांघरुण घालते. मग हाच न्याय त्या मणिपूरच्या 'आयर्न लेडी' ला का नाही? तिच्यावर 'नीतीमत्ताहीन' असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी हा विचार का नाही? 'प्रेमात पडण्याचा अधिकार' तिच्या नशिबी का नाही..??!!


10 comments:

  1. आवडला लेख... आणि पटलाही.. पूर्णतः सहमत.. !!

    ReplyDelete
  2. kharach khup tuzi kalkal talmal pohochate lekhaatun ,,, ya 21 vya shatakaat sudhha strine tichya strisulabh bhavanana tilanjali dili tarach ti mahaan aadarsh manali jaavi yasarakhi kleshdayak gosht nahi.

    ReplyDelete
  3. खरं आहे... कायम हातात भिंग घेऊन लोकांची ‘डागाळलेली' आयुष्य तपासणाऱ्यांना तू इथे भिंगाखाली घेतलं आहेस...

    ReplyDelete
  4. मला असं काही आहे हे आत्ताच इथेच कळलं. म्हणजे अफेअरचं... इरॉम शर्मिला यांच्या कार्याबद्दल प्रचंड आदर आहेच...

    मुळात कुणी कुणाच्या प्रेमात पडणं ह्याला आपण गडबड घोटाळा लफड्याच्या रांगेत नेऊन बसवतो इथेच चुकतो आपण... अर्थात काही प्रेमप्रकरणं लफडं ह्याच कॅटेगरीतली असतात पण इरॉम शर्मिला ह्यांच्या आयुष्यातला संघर्ष पहाता त्यांच्यावर प्रेम करणाराही ग्रेटच म्हटला पाहिजे!

    पुन्हा स्त्री ही अनंतकाळची माता असते वगैरे!... आपल्याकडे बेसिकमधे लोचा आहे तो असा!

    ReplyDelete
  5. नक्कीच वेदनादायी आहे हे पण हे असाच असतं, सगळे कायदे, नितीमत्ता वगैरे चांगल्या लोकांसाठीच असतात. त्यांनी चांगलं काम केलं तर ते त्यांचं कामच आहे आणि थोडं जरी चुकलेत तर घोर पाप आणि बाकीच्यांनी नंगा नक्कीच वेदनादायी आहे हे पण हे असाच असतं, सगळे कायदे, नितीमत्ता वगैरे चांगल्या लोकांसाठीच असतात. त्यांनी चांगलं काम केलं तर ते त्यांचं कामच आहे आणि थोडं जरी चुकलेत तर घोर पाप आणि बाकीच्यांनी नंगा नाच केला तरी त्याची वाच्यता देखील नाही. पण हे बदलायला हवं.केला तरी त्याची वाच्यता देखील नाही. पण हे बदलायला हवं.

    ReplyDelete
  6. माझ्या मताशी आपण सगळे सहमत आहात..हे वाचून बरं वाटलं!!

    ReplyDelete
  7. @Spruha: Irom Sharmila, ya na prem karnyachya, aapli mate mandnyacha purn adhikar ahe, tyat prashnach nahi.

    pan mi tuzya matashi purn sahmat nahi ahe. AFSPA kayda ha tyach statesmadhe ka ahe, yacha kadhi wichar ka nahi karat aapan? Irom Sharmila tyanchya jagi barobar asatil, pan Govt che officers pan barobarach ahet. AFSPA ha kaydya tya statesna tyanchya ithlya bhougolik ni rajkiya sthiti mule ahe. So ya kaydya baddal je kahi khup bhaynkar, anyaykari ahe ase tula watate te mala watat nahi

    ReplyDelete
  8. तुझ्या संवेदनाक्षम मनाची पुन्हापुन्हा प्रचीती येते तुझ्या लेखांमधून..:) खूप अभिनंदन..

    ReplyDelete
  9. Read this
    http://tanmaykanitkar.blogspot.in/2011/11/blog-post.html

    ReplyDelete