Tuesday, August 25, 2015

घालतो पाऊस अवेळी धिंगाणा...

गेले काही दिवस अचानक पाऊस पडतोय. सगळे संकेत मोडून, रूढ अर्थाने अगदीच चुकीच्या वेळी. आत्ता नकोच आहे तो यायला. पण तरीही थैमान घालतोय... आसपास.. सगळीकडे.. मनातसुद्धा... आणि अशा वेळेला कडकडून भेटते इंदिराबाई संतांची कविता. पावसासारखीच...

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली...
नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून?

....अवचित आलेला पाऊस.. करायचं तेवढं नुकसान करून जायचाच तो! काय आठवण बिठवण यायची ती यायचीच अशा वेळेस. पळून पळून पळणार तरी किती? कशासाठी? आणि कोणापासून? तसं तुझ्या-माझ्याबद्दलचं काहीच लपलेलं नाही त्याच्यापासून. पण तरी...अगदी जवळच्या मैत्रिणीपासून लपवून ठेवतोच की आपण एखादं गुपित. तसंच हे. वाटत असतं की याला काहीच कळू नये. पण पोचतं ते त्याच्यापर्यंत. आणि मनात ते दडवून ठेवायच्या ऐवजी, काळ्या काळ्या ढगात मिटून दूर घेऊन जाण्याऐवजी हे वेड मात्र आवेगाच्या भरात सगळंच मोकळं करून टाकतं. कसलं गुपित, आणि कसलं काय! आपलं आपल्यालाच काही सुधरत नसताना, हा आणखी नवा लपंडाव कुठे खेळायचा त्याच्यासोबत! त्यालाही हे पक्कं ठाऊक असतं म्हणा...

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून..

...तशी बरीच साम्यं आहेत तुम्हा दोघांमध्ये. अंगावर येईल इतकं प्रेम करायचं, आपल्याच मस्तीत खुशाल राहायचं.. बेहोश व्हायचं, आणि करायचंही समोरच्याला. आपल्या आवेगात समोरचा चुरगळून जाईल, इतकं गुदमरून टाकायचं त्याला... आणि या सार्‍याचा परिणाम पाहायला डोकं ठिकाणावर ठेवायचंच नाही. आपल्या कलंदरीच्या कैफामध्ये निघून जायचं दूर दूर.. पार पल्याड.. या खोडी अगदी सारख्या आहेत तुम्हा दोघांच्याही...
तुम्ही निघून जाता तुमच्या तुमच्या विश्वात.. पार रमून जाता.. इथे आमच्यासारख्यांनी काय करायचं असतं अशा वेळेस? नको असलेल्या चक्रात गुरफटून घ्यायचं? आधी घडून गेलेल्या आणि पुढे घडू शकणार्‍या शक्यतांचा विचार करत?? रंग उडून गेल्यासारखं, फिकट मातीच्या रंगाचं जगणं ढकलत राहायचं? तुला माघारी आणण्यासाठी पुन्हा त्यालाच साकडं घालणं आहेच न शेवटी! त्याच्यावर चिडता येत नाही, ते म्हणून!
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना..
...कुठे तरी मनाला वाटत असतं, की माझं नाही पण त्याचं तरी ऐकशील तू.. त्याच्या हक्काच्या दटावणीपुढे तरी नमतं घेशील,
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत,
विजेबाई, कडाडून मागे फिरव पांथस्थ..
...हे चुकून जर जमवून आणलं नं त्याने, माझ्यासाठी.. आपल्यासाठी, तर इतकी कोडकौतुकं करीन मी त्याची, की काही विचारायला म्हणून नको! मला हवायस तू माझ्या जवळ.. अगदी जवळ.. काहीशा जरबेने, नसलेल्या अधिकाराने आणि पुष्कळशा कळकळीने थोडा वेळ का होईना, पण तुझ्यातल्या वादळाला मला बांधून ठेवायचंय, माझ्यापाशी! आणि ते वादळही तोच अलगद आणू शकेल माझ्यापर्यंत...
आणि पावसा, राजसा नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन..
...अवेळी त्याला नको येऊ म्हणता म्हणता, तो तुला घेऊन येतोय म्हटल्यावर माझंच मला राहवणार नाहीये, तू दिसेपर्यंत चित्त थार्‍यावर राहणार नाहीये, तुझ्या कुशीत शिरून मन निवेपर्यंत चैन पडणार नाहीये. त्यामुळे आता त्याने लवकरात लवकर यावे, म्हणून बघ...
पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन...!!!
...तुझ्या डोळ्यातली वीज पाहायला पावसाशी या वाटाघाटी मला मंजूर आहेत! हे तुलाही माहितीये आणि त्या पावसालाही माहितीये. एवढं कळतं आपल्याला एकमेकांच्या मनातलं, म्हणून तर! लोक उगाच वेडं नाही म्हणत काही; तुला, मला.. आणि ‘त्या’लाही!!

- स्पृहा

3 comments:

  1. Kitti divsanni bhari vachayala bhetal ...... Thanks

    ReplyDelete
  2. स्पृहा खूपच सुंदर लेख. अशीच लिहीत रहा .

    ReplyDelete
  3. Thank uu Yashodip, Nilesh, pappu.

    ReplyDelete