Wednesday, September 2, 2015

गुणवत्तापूर्ण सातत्याचा सृजनाविष्कार !

आर. के. लक्ष्मण गेले. त्यांच्या ‘कॉमन मॅन’ने सगळ्यांपेक्षा ‘अनकॉमन’ बनवलं होतं, त्यांना. आठवडाभर त्यांच्याबद्दलचे उत्कृष्ट अग्रलेख वाचताना, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या बाजूंचा परिचय होत होता. या सगळ्यातून माझ्यापर्यंत पोहोचला तो पैलू म्हणजे सातत्य- कन्सिस्टन्सी. शिळेपणा न येऊ देता, सतत उच्च श्रेणीचा परफॉर्मन्स देत राहणं, कसं काय साध्य केलं असेल त्यांनी‌? की साध्य झालं असेल त्यांना आपोआप?

काही गुण, काही कला या जन्मजात एखाद्याला साध्य असतात. अगदी दैवदत्त म्हणतो, तशा. पण कितीही झालं, तरी स्वतःला घासूनपुसून लख्ख करणं कुठे चुकलंय कुणाला? हल्लीच्या आमच्या पिढीला पूर्वीच्या कलाकारांची ‘साधने’ची ही व्याख्या तशी जरा कमीच झेपते. बदलणार्‍या काळाचा परिणाम असेल कदाचित; पण पूर्वी एका गुरूने आपल्या शिष्याला सहा महिने केवळ ‘यमन’ राग घोटायला लावला होता, या आणि अशा सगळ्या कथा (खरोखर घडलेल्या... रचलेल्या नव्हेत!) अमानवी वाटतात. ही माणसं, कलेप्रती त्यांची असलेली ही झोकून देण्याची वृत्ती हे सगळंच वेगळं वाटतं...
म्हणजे त्यांच्याबद्दल आदर असतोच; या अशा गोष्टी ऐकल्या की दुप्पटही होतो... पण, त्या मानसिकतेशी आम्ही जोडून घेऊ शकत नाही, हेही तितकंच खरं. ‘फास्ट फूड’ युगातल्या आम्हाला सगळंच खूप फास्ट मिळतंय, म्हणून असेल का हे?? यश, प्रसिद्धी, ग्लॅमर, पैसा सगळंच.

‘डेली सोप’मधून घराघरांत पोहोचल्याचा आनंद, स्पर्धेत स्वतःला सिद्ध केल्याचा आनंद... प्रत्यक्ष ‘मेहनती’पासून थोडा लांब घेऊन चाललाय आम्हाला सगळ्यांनाच, असं सतत वाटत राहतं. फार लांब कशाला जा, अगदी सहा-सात वर्षांपूर्वीपर्यंत कलाकार एकाच नाटकाचे दोन दोन हजार प्रयोग करत होते, ही गोष्ट आमच्या पचनी नाही पडत... कशी जपली असेल त्यांनी ‘कमिटमेंट’? नेमक्या काय भावनेने ते काम करत असतील? हे समजून घेणं आज अवघड जातं आम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. प्रयोगाला गेल्यावर ‘आज बुकिंग किती आहे?’ हा प्रश्न पहिला मनात येतो. मग कमी प्रेक्षक आहेत का, मग आज उरकूनच टाकू, कशाला फार ‘एनर्जी’ लावा! अशा चर्चा अगदी सहज होतात. तेव्हा बालगंधर्वांनी एकदा फक्त आठ प्रेक्षक समोर असतानाही ‘हाउसफुल’च्या एनर्जीने, त्याच तन्मयतेने प्रयोग कसा केला असेल, हा विचार मनात आला तरी झटकून टाकला जातो... अगदी नकळतपणे. आम्ही चुकतोय... खूप चुकतोय... याची जाणीव या सर्वथा मोठ्या असणार्‍या माणसांना वाचून, ऐकून होत राहते.

राधा राजाध्यक्ष यांना ‘टाइम्स’मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आर. के. लक्ष्मण म्हणाले होते, ‘मी एक गोष्ट सांगतो, मी इतकी वर्षं चित्र काढतोय, म्हणजे असं होत नाही की, मी खोलीत शिरलो आणि त्या क्षणी मला कार्टून सुचलं किंवा ती आयडिया माझ्यावर येऊन आदळली... प्रत्येक नवा दिवस हा पहिल्या दिवसासारखाच असतो. त्याच वेदना... तेच कष्ट. तुम्ही स्वतःला हे नाही सांगू शकत, की आज मी पहिल्या दर्जाचं काम केलंय. उद्या मी दमलोय, मग दुय्यम दर्जाचं केलं तरी चालून जाईल...नाही! त्याबद्दल तुम्हाला कदाचित कोणीही जाब विचारणार नसेलही; पण सातत्याने सर्वोत्कृष्ट ठरायचं असेल, तर तुमच्या स्वतःला, तुमच्या सदसद््विवेकबुद्धीला तुम्हाला उत्तर द्यावंच लागतं. ‘काळ’ नावाचा लुटारू प्राणी (predatory animal) सतत तुमच्या पाठलागावर असतो आणि ‘डेडलाइन’ नावाची टांगती तलवार सतत तुमच्या डोक्यावर लटकत असते.’

हे वाचलं आणि लक्षात आलं, मोठी माणसं उगाच ‘मोठी’ होत नाहीत. कलाकार म्हणून ती स्वत्वाशी तडजोड करत नाहीत आणि सदसद्विवेक बुद्धीला गहाण टाकत नाहीत. काय वाट्टेल ते झालं, तरी स्वतःशी खोटं बोलत नाहीत... ती ताजी राहतात, कारण कलेच्या प्रांतात स्वैर फिरताना, इतर कोणाची नाही तर स्वतःची भीती त्यांना सगळ्यात जास्त वाटत असते. आजच्या सादरीकरणानंतर आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाला मी नजर देऊ शकेन का, याची भीती वाटत असते. तिथे ‘उरकणं’ नसतंच... आपल्याच परिघाच्या, आपल्याच अवकाशाच्या बाहेर झेप घेणं असतं. हा ‘अनकॉमन’ गुण स्वतःला ‘कलाकार’ म्हणवून घेणार्‍या आम्हा सगळ्यांच्या स्वभावात मुरावा, एवढीच नटराजाचरणी प्रार्थना!!

- स्पृहा जोशी

4 comments:

  1. एक चाहता म्हणून नाटक बघत असताना मला नेहमी प्रश्न पडतो . कलाकार त्यांचे संवाद विसरत कसे नाहीत ? कस लक्षात राहत सर्व ? दोन तीन नाटक करत असताना संवादांची सरमिसळ कशी होत नाही ?कलाकार भूमिकेत एवढे एकरूप झालेले असतात की , ते फक्त संवाद बोलत आहेत अस वाटतच नाही . ते Character रंगमंचावर फिरत आहे अस वाटत . "समुद्र" मधील नंदिनी खूप अवघड भूमिका आहे. म्हणजे रुचायला, समजायला अवघड . परंतु रंगमंचावरील नंदिनी विश्वसनीय वाटते . हे मुरणच तर आहे .

    ReplyDelete