Thursday, September 24, 2015

करड्या रंगावरली श्रद्धा

मला ‘व्हिलन’ लोक बर्‍याचदा आवडतात. काय माहीत; पण सरधोपट ‘पांढर्‍या रंगावर’ भक्ती आणि ‘काळ्या रंगावर’ राग धरण्यापेक्षा मला ‘करड्या’ रंगाचं, किंबहुना प्रवृत्तीचं जास्त आकर्षण आहे.

सगळ्या देवांमध्ये मला कृष्ण आपलासा वाटतो, तो म्हणूनच! कारण त्याच्यामध्ये खूप जास्त ‘माणूस’ असण्याचं लक्षण आहे. हाडामांसाचा, तुमच्या-आमच्यासारखाच एक माणूस. मौखिक परंपरेतून आपल्यापर्यंत आलेल्या त्याच्या चमत्कारांवर माझी कधीच फारशी श्रद्धा नव्हती. मला भावायचा तो त्याचा शृंगार, त्याचं लाघव आणि सगळं राज्य हातात येऊनही शेवटी त्यावर सहज तुळशीपत्र ठेवायची त्याची अलिप्तता. राधा, रुक्मिणी आणि द्रौपदी या तिघींसोबत वेगळ्याच पातळीवर त्याने जुळवलेलं नातं आणि त्याचे असंख्य मोहक पदर. ते कुठेतरी विलक्षण भुरळ घालतात. पण या सगळ्यातसुद्धा ‘महाभारत’ हा इतिहास आहे, हे गृहीत धरलं तर या सगळ्यावर मात करून उरतं ते त्याचं राजकारणपटुत्व. आणि मग तो एकदम कावेबाज, चलाख, आणि काही अंशी निर्दयीसुद्धा दिसायला लागतो. ‘माणूस’ म्हणून थोडासा मनातून उतरतोसुद्धा. आणि याच क्षणी त्याची जागा घेतं, एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. तुमच्या मनाला वेढून उरतो तो दुसरा-तिसरा कोणी नाही, तर दुर्योधन...!!! मला माहितेय, अनेकांच्या भुवया हे वाचून उंचावल्या असतील, अनेकांच्या मनात प्रश्नचिन्हांनी गर्दी केली असेल. मला स्वतःलाच किती आश्चर्य वाटलं होतं..! पण दुर्योधन माझा ‘हीरो’ झालाय, काका विधाते यांचा सुंदर ग्रंथ वाचता वाचता. महाभारतातली माझ्या सर्वाधिक आवडीची व्यक्तिरेखा म्हणजे कर्ण. त्याचं मनातलं स्थान अढळ! मग अर्थात, काजळमाया करणारा कृष्ण. माझ्या लेखी ‘दुर्योधन’ ही सर्वाधिक पराभूत व्यक्तिरेखा. कधीच स्वतःच्या कोतेपणातून बाहेर न पडू शकलेली. दुर्गाबाई भागवतांनीसुद्धा ‘व्यासपर्वा’मध्ये असंच तर म्हटलंय, त्याच्याबद्दल.

पण हे पुस्तक वाचताना मात्र मला काहीतरी वेगळंच गवसत होतं. एक संपूर्ण नवी बाजू. अत्यंत न्याय्य. एक संपूर्ण नवा चेहरा. भेसूर मुखवटे मुद्दाम लादलेला. त्यावरचे मुखवटे जेव्हा टराटरा फाटले, तेव्हा मला एक वेगळाच दुर्योधन दिसला. स्वाभिमानी, देशभक्त, उमदा, न्यायशील, धर्मपरायण, कर्तृत्ववान, राजबिंडा, राजस असा ‘जाणता राजा’!!!!
एक असा राजा ज्याला इतिहासाने नेहमी काळ्या रंगात रंगवलं. ज्याने न केलेल्या चुकांचं मापही कायम त्याच्या पदरात घातलं. इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो. त्यामुळे अर्थात दुर्योधन खलनायक ठरला, यात काही नवल नाही. पण खोटे चमत्कार आणि बेगडी मूल्यं यात वाहवत जाणारे आपण सगळेच खर्‍याखुर्‍या रसरशीत माणसांना किती सहज काळ्या रंगात रंगवून हद्दपार करून टाकतो, या विचाराने सरसरून आत कुठेतरी खुपलं मला.

इतिहास म्हणूनच पाहायचं झालं, तर दुर्योधनाची एकही मागणी चुकीची नव्हती, कधीच! “मी राज्याचा औरस वारस सर्वदृष्ट्या समर्थ असताना ज्यांचा माझ्या वंशाशी काहीही संबंध नाही, अशा कौन्तेयांना (‘पांडव’सुद्धा नव्हे!!!) मी माझं राज्य देणार नाही. मी राजा असताना भूमी विभाजनाचं पातक कधीही माझ्या हातून घडू देणार नाही,” असं म्हणणारा दुर्योधन. त्यापायी ‘भारतीय युद्धाचा’ प्रणेता, घोर विनाशक अशी विशेषणं स्वतःला कायमची चिकटवून घेऊन स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याची पुरेपूर किंमत चुकवणारा दुर्योधन. लहानपणापासून अंधपुत्र म्हणून हेटाळणी सहन करत, मायेला पारखा झालेला, दरबारी कारस्थानांना बळी पडत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणारा, युद्ध-शास्त्र-विद्यानिपुण मानी युवराज दुर्योधन. तत्कालीन परंपरा, मूल्यं, समाज, शासनपद्धती यांना एक नवा आयाम देऊ पाहणारा उत्कृष्ट प्रशासक, दुर्योधन.

भानुमती आणि पौरवी या आपल्या दोन्ही राण्यांसोबत समरसून आयुष्य घालवणारा राजस पती... दुर्योधन. अशा वेगवेगळ्या प्रसंगांतल्या दुर्योधनाच्या लोभसवाण्या रूपांनी मला जिंकून घेतलं. अगदी भानुमतीला जसं जिंकून घेतलं होतं त्याने, तसंच. तो न्याय शोधत राहिला, आयुष्यभर. पण खोटं वागला नाही कधी. अपमानाने जळून जाताना फक्त एकदाच त्याचा तोल सुटला, जेव्हा द्यूतप्रसंगी पांचालीची बेअब्रू केली गेली तेव्हा. आणि त्या पश्चात्तापाच्या आगीतही त्याने स्वतःला जाळून घेतलंच. माणूस म्हणून वागला, हसला, रडला, चिडला, आणि मनापासून आपल्या माणसांवर प्रेमही केलं त्याने! अधर्मयुद्ध तो नाही लढला कधीच. धर्मपरायण पांडवांनी कृष्णाच्या साथीने, किंबहुना सल्ल्यानेच कौरवांकडच्या प्रत्येक वीराला खोटेपणाने मारलं. क्रूरपणे हत्या केली. भीष्म, द्रोण, कर्ण, आणि दुर्योधन स्वतःदेखील! पण दुर्योधनाच्या लेखी युद्ध हा असला बाजार नव्हता. त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि राजा म्हणून त्याने घेतलेल्या जबाबदारीसाठी प्राणपणाने निभावण्याचं परमकर्तव्य होतं. लाचार जगणं मान्यच नव्हतं त्याला, म्हणून सर्वस्व उधळून देत लढला, आणि कृतार्थ वीरमरण पत्करलं त्याने...

आता माझ्या मनात कृष्ण आणि कर्णाहून काकणभर सरस प्रतिमा आहे, ती मरणसुद्धा स्वधर्माला शोभेलसं पत्करणार्‍या त्या मानी राजाचीच! मला इतकी वेगळी दृष्टी दिलीये या पुस्तकाने... इतिहासाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहण्याची दृष्टी. फक्त जेत्यांचा नाही तर ‘जीतां’चा आपलेपणाने विचार करण्याची दृष्टी... फक्त पांढर्‍यावर नाही, तर माणूसपणाच्या ‘करड्या’ रंगावर प्रेम करण्याची दृष्टी!!!

- स्पृहा

9 comments:

  1. स्पृहाताई, या ग्रंथाचे नाव सांगशील का? मलासुद्धा आवडेल वाचायला..

    ReplyDelete
  2. Thanx for introducing us to some interesting perspective the grey shade. May be this is one of the finest examples of unbiased thinking..and how we judge ppl too quickly. But I think its more about the empathy we feel towards such villains bcoz of what they suffer at the end of story rather than what mistakes they made in their prosperity. Afterall it is always our " karma" which decides our fate..and no one can run from it..even the king like Duryodhana..

    ReplyDelete
  3. स्पृहा ताई , आपण मनुस्मृती वाचली असेल तर कळेल, ज्या स्त्रीचा पती पुत्र उत्पन्न करण्यात अक्षम असेल ती स्त्री नियोग पद्धतीने १० पुत्र प्राप्त करू शकत होती. पहिल्या तीन पुत्रांना देव पुत्रांचा दर्जा मिळत असे. (धर्मराज, भीम आणि अर्जुन). नियोग पद्धतीने प्राप्त मुलांना सर्वाधिकार मिळत असे. त्या काळच्या शास्त्रानुसार युधिष्ठिर ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे गादीचा खरा वारसदार होता.

    ReplyDelete
  4. Krishna cha devatva bajula thevun tyacha fakta maanus mhanun vichar kela - tyala ani Duryodhanala number system chya line var place karaycha mhatla tar Krishna +infinity la asel ani Duryodhan -infinity la.

    Apan baki sagle ya number line var sarkhe mage pudhe hoat asto. Kahi prasangat Duryodhanachya side (-infinity) kade palto ani kadhi Krishna kade (+Infinity) kade. Tyanchya jaagi kadhich pohachat nahi (+infinity tar nahich nahi!)... Zoplelo asto tevha kadachit 0 var asu :)

    I feel Krishna 'Maanus kasa asava' he shikavto ani Duryodhan 'maanus kasa nasava' he!

    (Me pustak vachlela nahi, pan Pandavanni tyala per bhau ek ashi 5 gaava magitli hoti, ti hi tyane dili nahit. So rajya vibhajan hou naye mhanun to asa wagla he somehow mala digest hoat nahi. Ani Draupadi vastraharan ha tar akshamya aparadh watato!).

    -Chinmay

    ReplyDelete
  5. खरंच …. तुझा प्रमाणे मी सुद्धा फार वाचन वेडी आहे पण घरसंसार सांभाळताना होणारी थोडी फुरसत मध्ये जे काही वाचायला मिळते ते वाचते.
    "महाभारत" तर माझे आवडते आहेच, त्यामध्ये पण जिथून काही माहिती भेटेल ती वाचते. तुझा कडून दुर्योधन बद्दल थोडी अजून माहित मिळाली.

    त्यामधिल प्रत्येक वक्तिरेखा हे खरंच अप्रतिम आणि न उलगडलेली कोडी सारखी आहे. कर्ण, पितामह भीष्म, कुंती, कृष्ण , अर्जुन, पांचाली, नावे घ्यावी तेवढी कमी आहे.

    ReplyDelete