Saturday, December 5, 2015

लोपामुद्रा घडताना...


‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ : कविवर्य मंगेश पाडगावकरांचा दिवाणखाना. प्रचंड दडपणाखाली धडधडत्या हृदयाने हातात ‘चांदणचुरा’ची रफ कॉपी घेऊन बसलेली मी... माझं टेन्शन थोडं थोडं आईच्याही चेहर्‍यावर उतरू लागलेलं. माझ्या हातात भाऊ मराठ्यांनी दिलेली चिठ्ठी- ‘‘या मुलीच्या काव्यसंग्रहाला आपण शुभाशीर्वादपर काही लिहून द्यावे, ही विनंती.’’ त्या चिठ्ठीला घामेजलेल्या हातात सतरा वेळा खेळवून चुरगळून पुन्हा उघडून पाहून झालेलं. इतक्यात दस्तुरखुद्द मंगेश पाडगावकर हळूहळू पावलं टाकत आले, चक्क समोर बसून म्हणाले, ‘‘बोला... मी काय करू तुमच्यासाठी???’’ मी blank... संपूर्ण पाटी कोरी. देवळात गेल्यावर अचानक मूर्तीच तुमच्याशी बोलायला लागली तर??? जवळपास तशीच अवस्था. ततपप!!! माझ्याकडून जुजबी माहिती कळल्यावर पाडगावकरांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. ‘‘कविता करते म्हणत्येस, पण वाचतेस का? आवडता कवी कोण? त्याची एखादी कविता म्हणून दाखव. छंद, वृत्तांचा अभ्यास केलायस?’’ बाऽऽऽऽप रे!! मला काही सुधरेच ना. मला म्हणाले, ‘‘मी वाचतो तुझं हे बाड, पण कविता आवडल्या नाहीत तर मी खोटं लिहिणार नाही हां...’’ जाड चष्म्याच्या आतून त्यांचे प्रेमळ मिश्कील डोळे मला लुकलुकताना दिसले. अचानक हुश्श वाटलं.

आठ दिवसांनी जेव्हा पुन्हा त्यांच्याकडे गेले, तेव्हा मनोगत लिहून तयार होतं. ‘‘छान लिहितेस तू; पण वाच, आणखी खूप वाच. शब्दांशी खेळायला शिक. त्यांच्याशी झटापट करू नकोस, ते आपणहून येऊ देत तुझ्यापाशी. लिहीत जा रोज नेमाने. सवय लावून घे लिहिण्याची. कुसुमाग्रज वाच, बोरकर वाच, इंदिराबाई वाच, खूप वाच. आणि बघ, जमल्यास हा पाडगावकर पण वाच...’’ पुन्हा एकदा हसर्‍या मिश्कील डोळ्यांची लुकलुक... या वेळेस मात्र मला भीती नाही वाटली. मीसुद्धा खदखदून हसले. जवळपास नाचत नाचत घरी आले होते, ते ‘शुभाशीर्वाद’ घेऊन. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक भाव मी खरंच कानात प्राण आणून ऐकला होता. ‘चांदणचुरा’चा भाग्ययोग म्हणायचा की, यांच्या शब्दांचं त्या पुस्तकाला कोंदण मिळालं. कवी प्रवीण दवणे यांनी प्रस्तावना लिहिली, ‘धुक्यातून कोवळे किरण यावेत तशी कविता...’ किती सुंदर वाट दाखवली दवणे सरांनी पुढच्या प्रवासासाठी. किती सहज. किती सोपी... आमचे निसर्गकवी नलेशदादा पाटील स्वत: प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि कवितेची उत्तम जाण असलेले ज्येष्ठ नाटककार, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष सुरेश खरे... माझे खरे आजोबा... जातीने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहिले, माझ्या कवितांचं रसग्रहण करायला... ‘अक्षरग्रंथ’च्या डॉ. रामदास गुजराथी सरांनी किती कौतुकाने केलं हे पुस्तक. सगळ्यात कहर म्हणजे माझे अत्यंत आवडते, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांनी कौतुकाचं पत्र पाठवलं होतं, ‘चांदणचुरा’ वाचून. हर्षवायू... वेळ खरंच किती भराभर निघून जातो... पाच वर्षं झालीसुद्धा...

आत्ता हातात ‘लोपामुद्रा’ची प्रुफं घेऊन बसले आहे. आणि या सगळ्या आठवणींनी कोंडाळं केलंय. झरझर किती गोष्टी गेल्या नजरेसमोरून. आता माझा दुसरा काव्यसंग्रह तयार होताना बघतेय. खूप म्हणजे, खूप मजा वाटतीये मला. पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तीच उत्सुकता, पुन्हा तशीच धडधड. कुठून सुरू झालं बरं? ‘चांदणचुरा’नंतर कविता करत होतेच जेव्हा जमतील तशा. ‘उंच माझा झोका’च्या सेटवर अचानक एक दिवस आमच्या प्रा. नितीन आरेकरांसोबत ‘तारांगण प्रकाशना’चे मंदार जोशी आले होते. गप्पा मारता मारता अचानक ते म्हणाले, ‘‘आपण करूया की तुझं पुस्तक...’’ मी चकित. माझ्या ढिम्म स्वभावाप्रमाणे मी आधी निवांतच घेतलं ते बोलणं; पण मंदार सरांनी मात्र त्यांचा शब्द खरा करून दाखवला. अगदी माझ्या सगळ्या कविता गोळा करून, त्यांना हा आजचा आकार येईपर्यंत. कित्येक वर्षांपूर्वी सुमित पाटील नावाचा माझा गुणी चित्रकार मित्र मला म्हणाला होता की, तुझ्या पुस्तकाचं डिझायनिंग मी करणार. आज ‘लोपामुद्रा’ त्याच्या अर्थवाही चित्रांनी सजून नटून माझ्या हातात आहे.

आज या सगळ्याकडे जरा बाजूला होऊन पाहताना मला जाणवतंय की, आपलं एक पुस्तक येतंय, हा आनंद तर आहेच; पण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हा प्रवास करत असताना जे संचित गाठीशी आलंय, ते केवळ अवर्णनीय असं आहे.

माझी एक हक्काची मोठ्ठी मैत्रीण आहे. तिला मी कधीही उठून माझ्या मनातली शंका विचारू शकते, तिचं नाव कवयित्री अरुणा ढेरे. ‘लोपामुद्रा’चा अर्थ समजावताना मला अरुणाताई मागे म्हणाल्या होत्या, ‘‘समोरच्याच्या अस्तित्वात जिची मुद्रा लोप पावली आहे, अशी स्त्री. प्रत्येक भारतीय स्त्री ही त्या अर्थाने खरं तर लोपामुद्राच आहे. with choice or without choice...’ या संकल्पनेने त्या दिवशी खर्‍या अर्थाने माझ्या मनात आकार घेतला. आणि मग अशा कित्येक ‘लोपामुद्रा’ घरी-दारी, शेजारी-पाजारी नव्याने दिसायला लागल्या. त्यांचं भावविश्व खुणावायला लागलं. साखरजाग, जाग, माध्यान्ह आणि निरामय असे त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे ‘माझे’ होऊन आपलेसे वाटायला लागले. ‘लोपामुद्रा’ घडू लागली होती... आणि आज तिचं देखणं, साजरं मूर्त रूप माझ्या हातात आलंय. माझ्या आत काही तरी लकाकतंय. मला खरंच भरून येतंय. या प्रवासाने माझ्या आतल्या लोपामुद्रेला सुखावलंय. नवं पाऊल टाकायला मला नवं बळ दिलंय...

- स्पृहा जोशी 

6 comments:


 1. Hi
  I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

  ReplyDelete
 2. लोपामुद्रा साठी अभिनंदन. चांदणचुरा वाचल नाहिये अजुन. माझ्या एका मैत्रिणी कडून तुमच्या कवितेबद्दल सतत चांगले ऐकायला मिळत असते. तुम्ही या ब्लॉग वर देखील खूप सहज सुंदर व्यक्त होता. छान.
  सुमेधा नाईक

  ReplyDelete
 3. "लोपामुद्रा" ,"चांदणचुरा " दोन्ही कवितासंग्रह उपलब्ध होत नाहीत . एका प्रसिद्ध ठिकाणी पुस्तके केव्हा मिळू शकतील याची चौकशी केली . इतक्या मख्ख चेहऱ्याने उत्तर मिळाले , "माहित नाही " . प्रश्न पडतो ज्यांना पुस्तकांची आवड नाही अशी माणस अशा ठिकाणी का असतात ? नेट वरच्या काही कविता वाचून तहान भागवली . "स्वप्न " ही कविता खूप आवडली .

  ReplyDelete
 4. त्याच दुकानात रविवारी सहज पुस्तक चाळत होतो . आणि काय जादू . "लोपामुद्रा" ,"चांदणचुरा " दोन्ही कवितासंग्रह समोरच . पुन्हा डोळे चोळून पहिले तर खरोखर कवितासंग्रह समोर होते. एखाद्या लहान मुलाला एकाही गोळीची अपेक्षा नसताना दोन गोळ्या मिळाल्या तर जितका आनंद होईल तितका आनंद झाला . झडप घालून प्रथम पुस्तके ताब्यात घेतली . अधाशासारखी प्रवासात वाचून काढली . अप्रतिम कविता . मनाची सूक्ष्म आंदोलन इतक्या तरलतेने, सहजतेने उमटली आहेत की , त्यात आपण नकळत गुंगून जातो . .
  "लोपामुद्रा" या कवितासंग्रहातील रेखाचित्रे अप्रतिम आहेत . दुसऱ्याच्या शब्दांना , अनुभवांना समजून घेणं अवघड असत परंतु पाटील यांनी शब्दामागची भावना चित्ररूपाने जिवंतपणे समोर साकार केली आहे . कवितेतून चित्र स्फुरले आहे की , चित्रातून कविता . इतका सहजपणा दोन्हीत आहे . कवितेबद्दल पाटील यांनी नेमका शब्द वापरला आहे , कविता शब्दबंबाळ नाहीत . हो मी सहमत आहे . विचारांची स्पष्टता असल्यामुळे शब्द संभ्रम निर्माण करत नाहीत . आपलेच अनुभव वाचतो आहे अस वाटत . अप्रूप वाटत एवढ्या लहान वयातील सामाजिक जाण , संवेदनशीलता , प्रगल्भता या वाढत्या वयातही, अभावानेच आढळणाऱ्या दुर्मिळ गुणांचं . शब्दांच्या प्रवाहाला नेमस्तपणाचा बांध घालून आशय उलगडण्याच्या नैसर्गिक कौश्यल्यामुळे कविता प्रवाही झाल्या आहेत .
  धन्यवाद madam . "लोपामुद्रा" ,"चांदणचुरा " हे दोन्ही कवितासंग्रह दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिल्याबद्दल . कधी धन्यवाद देतो अस झाल होत.

  ReplyDelete