Thursday, December 31, 2015

कविता त्यांची ऋणी...

माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला, "चांदणचुरा‘ला मंगेश पाडगावकर यांनी प्रस्तावना दिली होती. त्या वेळी त्यांच्या-माझ्या बऱ्याच भेटी झाल्या होत्या, बरंच बोलणं झालं होतं. माझ्यासाठी हा खूपच मोठा अनुभव होता. कारण, एका अशा मान्यवर कवीकडून आपल्याला कवितेच्या पुढच्या प्रवासाची दिशा मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते नेहमी खरेपणाने वागायचे. म्हणजे तोंडावर कौतुक केलं, असं त्यांचं नव्हतं. तुमचं चुकलं असेल तर ते अगदी कान पकडून सांगायचे. ही गोष्ट फार महत्त्वाची असते. त्या वयात अशा व्यक्तीचा सहवास मिळणं आणि आपण त्यातून काहीतरी शिकणं, ही माझ्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. त्यांचा जो सहवास त्या काळात मिळाला, तो फार मोलाचा आहे माझ्यासाठी. 

पाडगावकर प्रतिभावंत कवी होते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या होत्या. प्रेमकविता, तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता... कवितेचा एकही ऍस्पेक्‍ट शिल्लक नाही, ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. पॉलिटिकल सटायर, हास्यकविता, व्यंगकविता असेल आणि सगळ्यावर कडी म्हणजे "श्रावणात घन निळा बरसला‘ हे त्यांचं अप्रतिम गाणं! आजतागायत पावसाची गाणी म्हटलं की, हे गाणं डोळ्यांसमोर येतं... कानांत घुमत राहतं... आणि अलगद मनातही उतरतं. खरंच, ते वेगळ्याच प्रतिभेचे कवी होते. 

कविता करणं हा प्रतिभेचा भाग आहे. खरंय; पण या कवितेला लोकाभिमुख करणंही महत्त्वाचं असतं. लोकांच्या घराघरांत नेऊन पाडगावकरांनी कविता रुजवली. वसंत बापट आणि विंदा करंदीकर यांच्यासोबत त्यांनी अक्षरश: जगभर फिरून कवितांचे कार्यक्रम तर केलेच; पण नंतर जग बदललं, तंत्रज्ञान बदललं, तशा त्यांच्या कवितावाचनाच्या अनेक सीडीज निघाल्या आणि त्या घरोघरी वाजू लागल्या. लोकांच्या तोंडी रुळल्या आणि आपसूकच "कविता म्हणजे काहीतरी कठीण...‘ असा कवितांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कवितेशी लोक जोडले गेले. पुस्तकाच्या बाहेर जाऊन त्यांनी केलेलं हे काम कवितांसाठी खूप मोठं आहे. मराठी कविता त्यांची त्यासाठी नेहमी ऋणी राहील. 

आपण कालातीत आहोत, असा पाडगावकरांचा दृष्टिकोन नव्हता. त्यांचं आयुष्य ते सुंदर पद्धतीने आणि भरभरून जगले आहेत. त्यांची आठवण मला नेहमीच येईल; पण मला नाही वाटत की त्यांना त्यांच्यामागे कोणी अश्रू गाळलेले आवडलं असतं. आयुष्यभर त्यांनी जो हसरेपणा जोपासला, त्याची आठवण काढत राहणं आणि कवितेशी प्रामाणिक राहणं, ही त्यांना सर्वांत सुंदर श्रद्धांजली असेल. 

- स्पृहा जोशी

No comments:

Post a Comment