Saturday, December 5, 2015

एक अनामिक ओझं

मुक्तछंद - प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. 

प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच. आपल्याला आवडो किंवा न आवडो. सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो मला?

प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसं, नवी नाती. गुंत्यात न गुंतता निर्लेप राहून शेवट गोड करण्याची अटळ धडपड. पण हे न गुंतणं साधत मात्र नाही. प्रत्येक वेळी तीच ओढाताण, आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणारं कसलं तरी अनामिक ओझं.

मीच अवघड करून घेते, माझ्या प्रवासाचा रस्ता. खाचखळगे, काट्याकुट्यांचा रस्ता ओढवून घेते, स्वत:वर बहुतेक. कारण माझ्या बरोबरच्या सहप्रवाशांना इतका त्रास होतोय, असं जाणवत का नाही मग! त्यांच्यासाठी का सोपं असतं, हे ‘न गुंतणं’?? कसं जमतं त्यांना असं कमळावरचा थेंब होण्याइतकं मोकळं राहणं? मला शिकायचंय हे असं, पाण्यात राहूनही न भिजत पोहणं. मलाही हवाय हा सहजपणा. खूप अंतरावर असल्यासारखं वाटतं, लोकांच्या अगदी जवळ असूनसुद्धा. पुसून टाकायचंय ते अवघडलेपण. एक संशोधक म्हणायचा म्हणे, ‘आपल्या प्रत्येकात एक आदिम माकड दडलेलं असतं.’ माझ्या आतलं माकड हल्ली मला जास्त जास्त जाणवायला लागलंय. माझ्या अशा दुहेरी वागण्याला कंटाळून थकून गेलं असावं बहुतेक. त्याचं आतल्या आत वाढत चाललेलं वजन जाणवतं मला अलीकडे रोज. ते मला झेपत नाहीये, हे जाणवत असावं बहुधा, त्यालाही! माझा शून्य वेग त्याच्या उतावीळ धडपडीला पाहवत नाही. आसपासच्या कशानेच माझं रक्त उसळत नाही, म्हणून ते उसळत असतं आतल्या आत. इतक्या जोरात की, हृदयाची धडधड वाढते आणि आतलं माकड या क्षणी बाहेर पडेल की काय, अशीही भीती वाटायला लागते मला, बर्‍याचदा... मी त्याला थोपवून धरते, माझ्या पूर्ण शक्तीनिशी. मग ते आणखी चिडतं, चेकाळतं. आतल्या आत गुरगुरायला लागतं. ते गुरगुरणं वाढतं, वाढतंच जातं, माझ्या खांद्यावरचं प्रवासाचं ओझं वाढतं, वाढतंच जातं... प्रवासात गवसलेला आनंद मागे पडत जातो प्रत्येक पावलागणिक, आणि हे दु:ख सामोरं येत राहतं उरलेल्या वाटेला लगडून.

पण अशीही एक वेळ येईल कदाचित, सगळं इतकं ‘खरं’ होईल, ही वरवरची ‘मी’ पार भेदून आतलं माकड वर येईल. अस्तित्वाचे हे असले भुक्कड प्रश्न त्याला पडणार नाहीत. नुसत्याच फिजूल विचारांनी त्याच्या कपाळावर आठ्यांची जाळी पडणार नाहीत. ते जगत राहील निरुपयोगी विचार न करता, त्याला हवं तसं. मोकळा श्वास घेईल त्याला हवा तेव्हा. डोळ्यातल्या काजव्यांची चमक हरवू देणार नाही, हृदयातल्या निखार्‍यांची धग विझू देणार नाही. नुसतंच ‘जगाला’ लायक न होता ते ‘जगायला’ लायक होईल... कदाचित...

...आज या गोष्टीच्या शेवटाकडे पुन्हा एकदा मी एकटी उभी आहे. माझ्या माझ्या विचारांच्या वाळवंटात... माझे सगळे सहप्रवासी प्रवासाच्या सुखद आठवणी सांगतायत, एकमेकांना आनंदाने. आणि मी हातात घट्ट धरून ठेवू पाहते आहे, त्याच प्रवासाची निसटणारी वाळू. मृगजळ शोधत माझा हा समांतर प्रवास असाच चालू राहणार बहुधा, कायमचा... कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो, असायला हवा, हे मान्यच करत नाही माझ्यातलं वेडं माकड...!!!

- स्पृहा जोशी

6 comments:

  1. माझ्या मते, कुठलीही गोष्ट सरळ नसून बर्याचदा वर्तुलाकार असते. तिला न सुरुवात असते ना शेवट, आपण जेथून ती गोष्ट बघायला सुरुवात करू तीच सुरुवात आणि ज्या बिंदुस त्या गोष्टी बद्दल विचार करने थांबवतो तो तिचा शेवट " मानतो". so its all subjective and not objective,and also non-linear in time. जेथे आपणास जाणवले की आपण ह्या गोष्टीतून पुरेसे मिलवले तेथे तीला अलविदा म्हननेच योग्य. बाकी आपल्या आतल्या माकडाला योग्य वेळी योग्य प्रमाणात व्यक्त होउ दिले तर माणसात रहाणे नक्कीच सोपे होइल .
    keep it simple.. :)

    ReplyDelete
  2. Every deep thinker is more afraid of being understood than of being misunderstood...Friedrich Nietzsche

    ReplyDelete
  3. Maharashtrach favourite kon madhla to vinodi mms video baghitala ani tumhi lihta as kalal mhanun tumchya poems search kelya tya kahi bhetlya nahit ha blog bhetla mast khupach mast lihta tumhi eka confused vicharancha ha lekh nice

    ReplyDelete
  4. speechless, kamaal 👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. माणसाने आपल्या आतल्या माकडाला थोपवुन न ठेवता उधळु द्याव.. स्वच्छंदी जगावे शेवटाचा विचार न करता..

    ReplyDelete