Monday, January 18, 2016

कलाकृतीचे ऋण

एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून. वरवर पाहता आपण आपले सगळे व्यवहार करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सरावाने आपली सगळी कामं होत राहतात. सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण त्या विचारांकडे. पण या सगळ्यातून जेव्हा स्वतःशी थांबायला वेळ मिळतो तेव्हा मात्र त्या कलाकृतीपासून पळून नाही जाऊ शकत आपण. अक्षरशः हाताला धरून आपल्याला त्यातल्या प्रश्नांना सामोरं जायला लावते ती.
सध्या एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पर्व’ने माझी ही अशी अवस्था केलीये. महाभारताचा महापट आपल्यासमोर मांडणारी ही महाकादंबरी. हा विषयच मनोव्यापारांची गुंतागुंत मांडणारा. पण सगळे धागे सुटे करून एका वेगळ्याच दृष्टीने भैरप्पा आपल्याला पाहायला लावतात, आणि आपण अडकत जातो. बुडत जातो त्या सगळ्या भीषण अशा, कधीही न बदलता येणाऱ्या कथेमध्ये. महाभारतातल्या सगळ्याच पात्रांना ते देव, चमत्कार, शाप वरदान, यांची सालं सोलून रसरशीत माणसं म्हणून रंगवतात आणि आपण हादरतो. त्यावेळची समाजशास्त्रीय परिस्थिती, भूगोल, सांस्कृतिक वातावरण, आहारविहार या चौकटी मोडून काढत काही हजार वर्षांपूर्वीची ती माणसं कधी ‘आजची’ होऊन जातात कळतच नाही. कारण ती आपल्याला भेटतात ती माणसं म्हणून नाहीत, तर कालातीत असलेल्या ‘प्रवृत्ती’ म्हणून.
मला सगळ्यात अंगावर आली ती त्यातली स्त्री-पात्रं. खरीखुरी. स्वतःशी इमान राखणारी. कुंती आणि द्रौपदी. सुभद्रा आणि गांधारी. हिडींबा आणि उत्तरा. सत्यवती आणि गंगा.. या बायकांची म्हणणी इतक्या थेटपणे ऐकताना गाढ अंधारातून अचानक जळजळीत उन्हात आल्यासारखं वाटलं. त्रास होतो उन्हाचा डोळ्याला, सहन होत नाही त्याचा जळजळीतपणा. पण प्रकाशाला दुसरा पर्याय हा ‘अंधार’ कधीच नसतो, शेवटी स्वीकारावंच लागतं आपल्याला ते दाहक वास्तव. तसच काहीसं झालं. त्या बायका कादंबरीत हाडामांसाच्या बनून येतात. कुठेच अतिरेकी उदात्तीकरण नाही, त्यांना संस्कृतीच्या दडपणाखाली ‘हिरोईन’ करणं नाही. भावनांचं नाटकी प्रदर्शन करणं नाही. काही नाही. आहे त्या त्यांच्या इच्छा, वासना, भोग, मोह, आसक्ती आणि जीवाचं अडकून राहणं. शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत. दबल्या, दडपल्या गेलेल्या या सगळ्या इच्छांचं अखेरचं स्वरूप आहे विनाश! संपूर्ण विनाश. अप्राप्य असलेलं सुख..
आपल्या आसपास आज बघताना अशा कित्येक द्रौपदी, कुंती, आपल्याला दिसतायत की. पिचलेल्या, हबकलेल्या.. सुख शोधत थकलेल्या.. आणि आसपास घास घ्यायला टपलेली व्यवस्थेची राक्षसी रूपं आहेतच. समूळ विनाशाकडे नेणारी !!
आनंद आणि कुतूहल फक्त एकाच गोष्टीचं. बाईपणाच्या या झळा एका पुरुषाने कल्पनातीत शब्दबद्ध कराव्यात.. भैरप्पांचं हे ऋण कधीही न फिटणारं असंच आहे.

स्पृहा जोशी.

6 comments:

  1. Asalakhit marathi shabdancha wapar..����

    ReplyDelete
  2. Asalakhit marathi shabdancha wapar..����

    ReplyDelete
  3. वाचले पाहिजे लवकरच.मालवणच्या वैशाली पंडित यांच्याकडून तुमच्या कवितांबद्दल आणि तुमच्या बद्दल ऐकले.छान वाटले.

    ReplyDelete
  4. काही दिवसाआधी लोकसत्ता मध्ये अरुणा ढेरे यांचा द्रौपदी वर सुंदर लेख आला होता. http://www.loksatta.com/lekh-news/speech-in-durgabai-bhagwat-smruti-vyakhyanmala-1194656/

    ReplyDelete
  5. लेखक हा अनेकांगी असला तरच कलाकृति सुंदर होते.

    ReplyDelete
  6. लेखक हा अनेकांगी असला तरच कलाकृति सुंदर होते.

    ReplyDelete