Thursday, January 28, 2016

शरीराचं 'म्हणणं'

परवा एक फार दुर्दैवी घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात काही तरुण मुलं बोट उलटून त्यात मृत्युमुखी पडली. फार दुर्दैवी. सगळ्यांसाठी एक अलार्मिंग सिग्नल म्हणावा अशी गोष्ट आहे ही. यानिमित्ताने एका चॅनेलवर झालेल्या चर्चेत मी सहभागी झाले होते. हिरीरीने माझी मतं मांडली. “कुठलीच टेक्नोलॉजी ही वाईट नसते. ‘सेल्फी’च काय, पण कुठल्याही टेक्नोलॉजीचा अतिरेक करणं हे वाईटच. प्रत्येकाने आपल्यापुरती लक्ष्मणरेषा पाळलीच पाहिजे,” हे सगळं अगदी मनापासून आणि ठासून सांगितलं मी.
आज जिममध्ये एक नवा धडा मिळाला. सायकलिंग करता करता मी गाणी ऐकत होते. तेवढ्यात तिथे आमचे परुळेकर सर आले. आणि गोड शब्दात ओरडलेच मला. मला म्हणाले, की  “आपल्या जिममध्ये टी.व्ही. आहे, उत्तम अशी महागडी म्युझिक सिस्टीम आहे. पण मी ती बंद ठेवतो. व्यायाम करताना तुम्हाला म्युझिक कशासाठी लागतं? तुम्ही नुसता केल्यासारखा व्यायाम करता खरा. पण तुम्ही तुमच्या शरीराचं म्हणणं ऐकतच नाही. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट.. अहो हेसुद्धा एक प्रकारचं मेडीटेशनच आहे. पूर्ण फोकस त्यावर करून पहा. इथे आहात तोवर ही बाहेरची गाणी-बिणी काही काही नको. शंभर टक्के इथे राहून पहा बरं! बघा तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स कुठच्या कुठे असतील.”
हा विचारच केला नव्हता मी कधीच. या अशा पद्धतीने. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. सतत आसपास ती सुरु लागतात. पण ही आवड कुठेतरी माझा शांतपणाच व्यापून टाकते आहे की काय असं पहिल्यांदाच वाटलं मला.. गाडी चालवताना, इस्त्रीचे कपडे टाकायला जाताना, भाजी चिरताना, फोडणी करताना, पुस्तक वाचताना, लेख लिहिताना .. इतकंच काय, पण अंघोळ करताना, झोपताना.. सगळीकडे सतत.. सतत.. एक आवाज सोबत लागतो. का? आज सरांनी ही गोष्ट दाखवून दिल्यानंतर मला अचानक लख्ख जाणवलं. यामध्ये कोणत्याच एका गोष्टीला पूर्ण न्याय देताच नाही आपण! ना भाजी चिरण्याला, ना पुस्तक वाचण्याला, आणि ना धड गाणं ऐकण्याला. सगळंच अर्धंमुर्ध. कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर करायला किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. मागे एकदा योगाच्या क्लासमध्ये तिथल्या बाईंनी शवासन करताना दिलेल्या ‘शिथीssssssल करा...’ या सूचना आठवल्या. शरीराचा एकेक स्नायू पुसट होत गेल्याची आठवण सरसरून जागी झाली. आणि तो अनुभव गेल्या कित्येक वर्षात आपण घ्यायचेच विसरलोयत, हेही लक्षात आलं.
आणि जाणवून गेली ती कमालीची अस्थिरता. लक्षात आलं, की हे फक्त माझ्यासोबत नाही घडते. माझ्या आसपासच्या सगळ्यांची हीच स्थिती आहे. ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता!” असंख्य विचारांची भाऊगर्दी.  सतत ‘काहीतरी’ गाठायचं असणं! आणि ते नेमकं ‘काय’ आहे, हे माहितीच नसणं. नातेसंबंध, गुंतागुंत, वाढती टेन्शन्स... आणि हरवून, निसटून चाललेली शांतता. ती नेमकी आपल्याला नको असते, कारण आपल्याला ती मूलभूत प्रश्न पाडते. चुका दाखवते. फटकारते. हे टाळायला ही गोंधळाची पळवाट बरी वाटते. आणि मग आपण ती जगण्याची पद्धत म्हणूनच आपलीशी करतो. स्वीकारून टाकतो.
पण मी मात्र आता बदलायचं ठरवलंय. त्या वेळेला ‘ते’ कामच मनापासून करायचं ठरवलंय. या गोंधळी आव्हानाचा सामना मी करणार आहे. माझी खात्री आहे. ‘लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट’ हा परुळेकर सरांचा मंत्र मला नक्की लाभेल..!

स्पृहा जोशी 

9 comments:

  1. vah! vicharpravartak lekh. Aavadla. "Listen to your body; listen to your heart." ha mantra kharatar saglyannich shikayla hava.

    Chhan lekh .

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अगदी मनातल खरच गोंधळाची पळवाटच फोलोव करतोय

    ReplyDelete
  4. Kharach aaj kaan dole ani mann yanna ektra karan kitti kathin houn baslay...

    ReplyDelete
  5. हे खर आहे. प्रत्येक जण गोंधळाची पळवाट शोधत असतो.

    ReplyDelete
  6. हे खर आहे. प्रत्येक जण गोंधळाची पळवाट शोधत असतो.

    ReplyDelete
  7. खूप छान लेख आहे स्पृहा.पण हे खरं आहे की मनाला बांद नाही घालू शकत,त्याचे अनंत तरंग आहेत जितकं त्यापासून दूर जाल तितकं ते तुम्हाला सतावत राहील ,फरफटत नेहील म्हणून नेहमी त्याला विचारा की तुला काय हवयं. त्यावेळी ते तुमच्या अगदी जवळ आलेले असेल.... believe me

    ReplyDelete