Sunday, January 3, 2016

छोटासा ब्रेक

खूप जीव लावलेल्या गोष्टी जेव्हा सरतात, तेव्हा मनात इतकी कळ उठते. सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी विचित्र कळ. पूर्तीचं समाधान आणि आपण अशा अतुलनीय गोष्टीचा भाग आहोत, याचा अभिमान, असं दोन्ही मनात असतानाच ही कळ पुन्हा एकदा मनाचा ताबा घेते. परवा "नांदी‘च्या शेवटच्या प्रयोगाला असंच काहीसं झालं माझं. खरं तर माझंच नाही, आमच्यापैकी प्रत्येकाचंच! कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागे काम करणारे रंगकर्मी सगळेच विलक्षण भावूक झाले होते. पडदा पडताना "नांदी‘चे सूर घुमत असताना गच्च भरलेले प्रेक्षागृह... कधी सुन्न, स्तब्ध... कधी अपार कौतुकाने टाळ्यांचा गजर करणारं... आता "हे‘ पुन्हा कधीच नाही! हा क्षण असाच्या असा गोठून जावा, असं आमच्यापैकी प्रत्येकाला वाटत होतं त्या क्षणी. मागे वळून या दोन वर्षांच्या प्रवासाकडे बघताना काय जाणवतंय मला? 
माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली माधवी उभी करणं, हे माझ्यासमोरचं आव्हान होतं. तिचा आवाज, तिचं कम्पोजर, हावभाव... हळूहळू तिला पडणारे प्रश्न, तिने घेतलेला स्वतःचा आणि नात्याचा शोध... आणि सगळ्यात शेवटी तिला गवसलेलं तिचं स्वत्व.... माधवीचे अनेक रंग होते.. वेगवेगळे पदर होते... पैलू होते. माझ्यासाठी खूप कठीण होतं हे सगळं... 
सगळ्यात मजा आली ती "एकच प्याला‘मधल्या "गीता‘ची सोलोलोकी करताना. राम गणेश गडकऱ्यांची भाषा... त्या भाषेचं वजन, गीताचा उद्वेग, त्या काळात आश्‍चर्यकारक वाटणारी तिची ठाम भूमिका... या सगळ्या गोष्टी समजावून घेणं मला थोडं कठीण गेलं. मास्तरांनी या स्वगतातलं वाक्‍यन्‌ वाक्‍य माझ्याकडून घोटून घेतलं... प्रत्येक शब्दावरचा जोर, उतार-चढाव... अगदी बारकाईने... मला म्हणाला, "या सोलोलोकीला प्रत्येक प्रयोगाला टाळी पडते का नाही बघच तू..!!!‘ मला मिळाला तो अनुभव... सलग पाच मिनिटं ताकदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा... स्वतःला आजमावण्याचा..."आणि दारू पितो तो कसला हो नवरा; माणसातसुद्धा जिम्मा व्हायची नाही त्याची,‘ हे गीताचं शेवटचं वाक्‍य झाल्यानंतर आज प्रत्येक प्रयोगात थिएटरभर पसरत जाणाऱ्या, कडकडून वाजणाऱ्या टाळ्या ऐकण्याचा!!! 
शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित, हृषिकेश जोशी... या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात लहान... वयाने, अनुभवाने... सगळ्याच दृष्टीने... 
आपलं काही चुकलं तर? आपण कुठे कमी पडलो तर? हे सगळे जण आपल्याला सामावून घेतील का? पण तीन दिवसांच्या तालमीतच या सगळ्या शंका निघून गेल्या आणि त्या परत कधी फिरकल्याही नाहीत... इतका जीव सगळ्यांनीच एकमेकांना लावला... हक्काने सगळे एकमेकांना "चुकलं तर चुकलं‘ सांगतात, मनापासून एकमेकांचं कौतुक करतात... तिथे हिशेबी गणितं नाहीयेत... तिथे या सगळ्यांसोबत असताना "अरे बापरे! आता मी कशी वागू!!‘चे व्यावसायिक प्रश्न पडत नाहीत... वेगवेगळ्या स्वभावांचे, टेंपरामेंटचे आम्ही दहा जण "खरेखुरे‘, "जसे आहोत तसे‘ एकमेकांसोबत असतो. "नांदी‘चं अर्ध्याहून अधिक यश या टीममध्ये आहे... आज जवळपास दोन वर्षांत दहा प्रथितयश कलाकार नाटकात असताना प्रयोग एकही "रिप्लेसमेंट‘शिवाय होतात, यातच सगळं काही आलं! 
शुभारंभ झाला आणि पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला... "हाऊसफुल्ल‘चे बोर्ड आम्ही बहुतेक सगळ्या ठिकाणी पाहिले. सामान्य प्रेक्षकांपासून ते मान्यवरांपर्यंत सगळ्यांनीच मनापासून कौतुक केलं... माझ्या भूमिकेलाही नावाजलं. 
प्रत्येक प्रयोगागणिक नवंनवं काहीतरी सापडत गेलं. "ऑन स्टेज‘ची ही गंमत... तर बॅकस्टेजच्या असंख्य आठवणी... अजयदादाच्या गाण्याला "वन्स मोअर‘ मिळावा म्हणून सगळ्यांनी विंगेत केलेला आरडाओरडा, सगळ्या टीमचा हेडमास्तर असल्यासारखा शरदकाकाचा दरारा, दुसऱ्या अंकात काम सुरू होणार असतानाही त्याचं पहिल्या बेलपासून नाटकात "असणं‘.. त्याचा कमालीचा "नटसम्राट‘... आणि पहिल्या अंकात काम संपूनसुद्धा पडदा पडेपर्यंत मेकअप न उतरवणारा अविकाका... "अश्रूंची...‘ स्टायलाईज्ड अभिनय समर्थ पेलणारा... प्रसादचा "रुक्‍मिणी‘ ते "बुद्धिबळ...‘ हा सहज परकाया प्रवेश... सीमामावशीची साक्षात कारुण्यमूर्ती सिंधू, अश्विनी मावशीची "या वेडालाच कोणी कोणी प्रेम म्हणतात विद्यानंद‘, असं कळवळून म्हणणारी सुमित्रा... अजयदादाचं दैवी गाणं... तेजूने अभ्यासपूर्वक आत्मसात केलेली "कीचकवध‘ची कठीण भाषा आणि नयनताराचे मोहक विभ्रम... चिन्मयसोबत "चाहूल‘ प्रवेश प्रत्येक प्रयोगात वेगळावेगळा करून बघणं, त्यातली मजा... आणि साक्षात दिग्दर्शकांनी, हृषिकेश जोशी यांनी साकारलेले अद्वितीय भरतमुनी!!! पूर्ण नाटक आम्ही एकमेकांसोबत स्टेजवर असतो. तेव्हा झालेल्या गंमती... कधी विसरणं, कधी ब्लॅंक होणं, कधी सांभाळून घेणं... हा सगळा अनुभव खूप खूप संपन्न करणारा आहे. अभिनेत्री म्हणून तर आहेच... पण त्यापेक्षा कित्येक पटीने माणूस म्हणूनसुद्धा आहे. 
आज आम्ही शंभर प्रयोगांचा टप्पा गाठलाय... आणि विराम घेतलाय... "थांबतोय‘ असं नाही म्हणणार... कारण माझी खात्री आहे... अशाच काहीतरी आणखी भव्यदिव्य प्रकल्पाची "नांदी‘ आमच्या मास्तरांच्या डोक्‍यात तयार असणार आहे... त्यामुळे माधवीच्याच शब्दांत... "अकल्पित कल्पिताना‘मध्ये आता घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर लगेचच पुन्हा भेटू या...!!!

- स्पृहा जोशी

2 comments:

  1. वाह! काम कुठलंही असो, मनापासुन केल्यावर असाच आनंद मिळतो. कलाकारांबद्दल तर हे तंतोतंत खरं आहे.

    ReplyDelete
  2. वाह! काम कुठलंही असो, मनापासुन केल्यावर असाच आनंद मिळतो. कलाकारांबद्दल तर हे तंतोतंत खरं आहे.

    ReplyDelete