Wednesday, January 6, 2016

'कोsहम्'चा शोध..

मनात येणारे अनेक प्रश्न. पॉझिटिव्ह..निगेटिव्ह, अनेक वाटांनी जाणारे. 'कोsहम्' चा हा शोध वयाच्या कोणत्याही पायरीवर न चुकणारा. 
आपण जगत असतो ते कोणासाठी? नेमकं काय घडतं-तुटतं आपल्या आत? स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणारा सगळ्यात जेन्युइन माणूस का खंगत जातो एका एका क्षणाला? 
'आपले' म्हणून जे कोणी असतात त्यांच्या जगण्याची त्यांची एक बाजू. त्याला त्यांची त्यांची परिमाणं. ते बघत असतात त्यांना जेवढे दिसतं 
तेवढंच. मग हे 'त्यांच्यासाठी' म्हणून जे काही लादलं जातं ते झेपणार कसं? ते निभावून पार कसं जायचं? या तगमगीत ना त्यांच्यापर्यंत पोहचता येतं ना स्वतःच्या आत पुरेपूर उतरता येतं. मग काहीतरी 'सापडायचा' अट्टाहास का करत राहतो आपण?
कोणत्या गोष्टींशी नाळ जोडलेली असते नेमकी? बालपण, सभोवताल, आई-बाबा, खाणंपिणं? पुस्तकं, गाणं, अंगाई, कविता? देवळं, प्रसाद, उत्सव, निसर्ग, शाळा? मित्र, शिक्षक, गोधडी, आजीच्या आजोबांच्या गोष्टी, पत्रं? जुन्या जागा ? हा drive असतोच मागे धरून ठेवणारा.
तरीसुद्धा कुठल्यातरी अनामिक फरफटीत आपण होऊन उडी घेतली जाते. आपोआप कुणी न सांगता. काही न ठरवता. आपण फक्त सरकल्यासारखं करतो. लोकलच्या गर्दीत शरीर नुसतं ठेवून दिल्यावर आपण आपोआप जसे कुठल्यातरी स्टेशनावर उतरतो, तसेच ढकलत जाऊन कुठे तरी जाऊन पोचतो आपण.
इथेच यायचं होतं का? माहीत नाही? मुळात कुठेही जायचं होतं का? माहीत नाही? ते मला माहीत नाही. पण समोरच्याला? त्या चौथ्याला, पलीकडे एक्यांशिव्याला, पासष्ट हजार पंचाहत्तराव्याला, लाख.. कोटी.. अगणित गर्दीला?? त्यांना माहीत्येय हे? आणि जर कुणालाच माहीत नसेल तर कसं चाललंय मग हे सगळं? वेगळ्या वेगळ्या दिशेने काहीच माहीत नसताना चालणारी ही माणसं...आपटत कशी नाहीत एकमेकांवर, कुठली गती म्हणायची ही?? माहीत नाही!!
असं म्हणतात, काही माणसं जात्याच संवेदनशील असतात. ती खूप विचार करतात, हे विचार मावत नाहीच कुठेच. आणि वेड लागतं म्हणे त्याना. हो.. लागत असणारंच. वेड लागत असणारंच. कारण या गतीत थांबायला, थबकायला स्कोपच नाहीये. ही वेडी माणसं म्हणजे तीच, आपटणारी माणसं असावीत... वेग सहन न होणारी. वेग न झेपणारी... पण मग म्हणजे 'इथेच यायचं होतं' हे त्यांना कळत असेल का त्या पॉइंटला?? माहीत नाही... हां, बहुतेक आपल्याला 'कुठेच जायचं नाही' हे कळून चुकत असावं.
तेवढं कळलं तरी वेडाचं सार्थक व्हायचं. नाहीतरी त्या निरर्थक शहाणपणानं कुणाचं भलं झालंय? माहीत नाही !!

स्पृहा जोशी 
(Some thoughts after reading 'सेतू' by 'आशा बगे')




8 comments:

  1. विश्लेषण करणे ,चित्र काढणे , संशोधन , खेळ , कविता करणे, संगीत इ. गोष्टी काही लोकांनाच कशा जमतात ? याचे मला नेहमी आश्चर्य वाटत असे.मला का नाही जमत याचेही वैषम्य वाटे . देवाने मुळात दोन व्यक्तीत इतका भेदभाव का केला आहे ? संशोधकांचाही यावर शास्त्रीय अभ्यास सुरु आहे . म्हणजे albert einstein सापेक्षतेबाबत किवा इतर गुंतागुंतीच्या विषयावर विचार करू शकला परंतु इतरांना ते जमल नाही. अस का व्हाव ?त्याच्या मेंदूचा अभ्यास केला असता त्यात काही वेगळ आढळल नाही फक्त त्याच्या मेंदूचा काही भाग इतरांपेक्षा थोडा मोठा होता . मग फक्त त्याच्यातच हे वेगळेपण का इतरात का नाही याबाबत संशोधन सुरु आहे .अच्युत गोडबोले याचं "मनात " हे पुस्तक वाचल्यानंतर स्वत:बद्दल असलेला inferiority complex थोडा कमी झाला . प्रत्येकात काहींतरी वेगळेपण आहे त्याचा शोध स्वत:ला घ्यायचा आहे . ते असेल तर त्याचा गर्वही नको . कारण ते मुळात त्याच्यात आल कुठून? अभ्यास , परिश्रम या पूरक गोष्टी आहेत . मुळात जी सर्जनशीलता आहे ती कशी प्राप्त झाली याच उत्तर मिळण कठीण आहे . जे आहे त्याला फुलवत मार्गक्रमणा करायची आहे .
    ललितलेखनाच्या अंगाने , कुठे जायचं आहे याचा विचार केल्यास उत्तर सापडणे कठीण आहे . फक्त विचाराच्या वावटळीत सापडण्याखेरीज काही साध्य होईल अस वाटत नाही . आपण स्व:तासाठीच, स्व:आनंदासाठीच जगत असतो . इतरांसाठी जगणाऱ्यांची संख्या तुरळक आहे . स्व:त्वचा विचार करण्याची निदान दिलेली कुवत हे आपण सर्व देवाची लाडकी बाळे असल्याच निदर्शक आहे . या शिदोरीवर निदान पुढच्या दिशा निश्चित करता येतील . बरेच जण इतकाही विचार करू शकत नाही , देवाने का हा भेदभाव केला आहे कोण जाणे ?

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लिहिलय स्पृहा!प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या या थिजल्यापणाला छान शब्दरूप दिलय:)_/\_

    ReplyDelete
  3. वाह! अगदी विचारप्रवर्तक...

    ReplyDelete
  4. khupch bhari nakki vachav lagel book aata

    ReplyDelete
  5. Mahit nahi... Hech uttar khupada ka sapadata... Shodh ghyayacha asato... Kadachit sapadatahi ...pan... Uttar mahit nahi hech ka asata.. Kharach nahi mahit...

    ReplyDelete
  6. अन्य व्यक्तिमत्वाच्या मनाचा शोध घेत भावनांच्या आंदोलनांचा कॅनव्हास रंगविणे तसे अवघडच आहे . (कारण स्वत:च्या मनाचा तळ सापडणे कठीण ) लेखामागची मनोभूमिका समजून घेण्यासाठी "सेतू " कादंबरी वाचली . शब्दांचा पट उलगडला . त्यातले अर्थ थोडे स्पष्ट झाले . कादंबरीतील "दादा " जितक्या तटस्थपणे आयुष्याकडे बघतायत ते भावलं . आपण स्वत:पुरती स्वत:च्या आयुष्याची जी मर्यादा आखून घेतली आहे व जे आपण आपल ठरविल आहे , त्यातून संघर्ष घडतायत . याकरिता कादंबरीत संदर्भ म्हणून घेतलेल्या उत्तर व दक्षिण भागातच हे घडेल अस नाही . माणसाने आपली मनोवृत्ती "आपल्यातला " या सुरक्षित परिघात कोंडल्यामुळे हे पावलोपावली घडू शकत . कादंबरी वाचल्यानंतर, आयुष्य प्रत्येकवेळी आपल्याच नजरेतून बघण्याचा अट्टाहास योग्य नव्हे हे जाणवलं . "गुंता सोडवायचा कशाला ? अनुभवायचा " हे कादंबरीतील विधान पटल कारण काहीवेळेला आपल्याकडे फारच कमी पर्याय असतात . धन्यवाद madam एका सुंदर कादंबरीची ओळख करून दिल्याबद्दल .

    ReplyDelete