Wednesday, February 24, 2016

‘डूडल डायरी’

मध्यंतरी ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ला गेले होते. मला आवडतं अशा ठिकाणी. खूप वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या कल्पना.. सुंदर संमेलन असतं.. तऱ्हेतऱ्हेचे लोक दिसतात.. त्यांच्या गप्पांचे विषय.. त्यांचे कपडे.. मध्येच अतिशय सुंदर अशा शिल्पकृती, पेंटींग्ज, आणि मोकळी हवा! मस्त मजा आली.. आपलं रुटीन बदलावंसं वाटत असेल न, तर मधूनच अशा एखाद्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.. फार ताजंतवानं वाटायला लागतं. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे खरेदी!! ती मनसोक्त करता येते..आणि गोष्टी तरी किती वेगवेगळ्या.. साड्या, कुर्ते हे नेहमीचं झालंच, पण छोटे छोटे दिवे, बिलोरी आरसे, कोरीव बांगड्या, छोटेसे बुकमार्क्स, हाताने रंगवलेली कानातली, सुवासिक साबण, वॉल हँगिंग्स कितीतरी गंमतीच्या गोष्टी.. कितीतरी वेळ हे सगळं नुसतं बघण्यातच मजेत  निघून जातो. या वेळेस माझ्या खजिन्यात किती नव्या नव्या गोष्टी आल्या.. ‘मधुबाला’चं चित्र असलेली सुंदर बॅग, एक राखाडी निळं जॅकेट, आदिवासी बायका घालतात तसलं डोरलं, शेरलॉक आणि गँग्ज ऑफ वासेपूर मधल्या फैझलची चित्रं.. मजा नुसती.. आणि या सगळ्या खजिन्यात मला सगळ्यात आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे एक डायरी. ‘डूडल डायरी’.
मस्त आहे ही डायरी.. फिरता फिरता एका स्टॉलवर सहज हाताला लागली. आता खरंतर डायरी सारखी डायरी. तिचं काय एवढं कौतुक.. पण हिची स्पेशालिटी म्हणजे, या डायरीच्या प्रत्येक पानावर एक शब्द दिलाय. अगदी साधासा. म्हणजे उदाहरणार्थ, ‘फ्लॉवर’, ‘लिब्रा’, ‘गार्डन’, ‘शिप’... असं काहीही.. रोजच्या तारखेला एक नवा शब्द. आता आपण काय करायचं, रोज त्या शब्दाबद्दल आपल्या मनात जे काही येतंय, ते नोंदवून ठेवायचं.. हवं तर चित्र काढा, हवं तर कवितेच्या ओळी लिहा, हवं तर त्या शब्दावरून एखादी व्यक्ती आठवली तर तिच्याबद्दल लिहा.   काहीही करा. ती ‘स्पेस’ तुमची. लिहित जायचं, सुसाट सुटायचं! गेले दोन महिने या डूडल डायरीने एक नवा छंद लावलाय मला..
मित्रांनो वरवर वाचताना हे साधंसं वाटेल कदाचित. ‘त्यात काय एवढं’ असंही वाटून जाईल कोणाला.. पण यातली गंमत खरंच खूप जास्त आहे. एक मजेशीर लहानपणाचा अनुभव देते ही डायरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मेंदू भरकटत असतो आपला, एकाच वेळेला हजार ठिकाणी धावत असतो. त्या नाठाळ चोराला कान धरून एकाच शब्दावर थांबायला लावते. पण तोही शहाणा.. त्यातून वाट काढू पाहतो.. आणि मधल्यामध्ये आपल्याला सापडतात एकाच शब्दाशी जोडल्या गेलेल्या कितीतरी डायमेंशन्स.. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी कल्पना... आणि मग आपल्यासमोर आपल्याच बालिश चित्रांतून, चार दोन कवितांच्या ओळीतून फुललेला दिसतो रंगीबेरंगी कोलाज.. ओबडधोबड.. पण सुरेख..! गेले काही दिवस मी ही मजा अनुभवते आहे. रोज स्वतःच स्वतःला शाबासकी देते आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे त्या डायरीच्या पानांतून पुन्हा पुन्हा फिरताना खळखळून हसते आहे..   
आजच्या ‘गुड मॉर्निंग’ला तुम्हीही ही सुरुवात नक्की करून पहा.. आणि सांगा मला तुमची ‘डूडल डायरी’ तुम्हाला काय देतेय ते!!

-    स्पृहा जोशी.


14 comments:

  1. मस्त पोस्ट. तुझ्या 'डूडल डायरी’ वरून माझ्या धाकट्या मुलाच्या प्रिस्कूलमध्ये असं चित्र काढून मुलांना व्यक्त व्हायची संधी देतात त्या वहीबद्द्ल आठवलं. ही मुलं अजून लिहायला शिकली नसल्यामुळे त्यांना ते करत असलेल्या एखाद्या activity बद्दल काय वाटतं ते चित्ररूपी पाहताना मजा येते. शाळा आम्हाला रोज मेलमध्ये याबद्दल एक छोटं प्रेझेन्टेशन पाठवत असते :)

    ReplyDelete
  2. kharach superb ahe..mi pan baghto Dombivli la aamchyakade milte ka Doodle Diary..n wil start ASAP..hey vaachun mala Salil Kulkarninchya Lapavlelya Kaachaa ya story chi athavan aali from the book Lapavlelya Kaachaa :)

    ReplyDelete
  3. खरंच छान कल्पना आहे.करायला हवं....
    रोज एक 'शब्द'घ्यायचा, आणि त्याच्याभोवती गुंफण करायची .....😊👌

    ReplyDelete
  4. खरंच छान कल्पना आहे.करायला हवं....
    रोज एक 'शब्द'घ्यायचा, आणि त्याच्याभोवती गुंफण करायची .....😊👌

    ReplyDelete
  5. असंच लिहत रहा शुभेच्छा

    ReplyDelete