Friday, April 8, 2016

सोन्याचे सूर..

काल कुमार गंधर्व यांची जयंती होती. मी त्यांच्या गाण्याची प्रचंड मोठी फॅन आहे. एक अबोल हुरहूर लागून राहते त्यांच गाणं ऐकत असताना. तो मध्येच सुटणारा श्वास अपूर्ण गोष्टी किती सुंदर असू शकतात याची जाणीव करून देणारा. आणि मग एक अगम्य आश्चर्य, गाण्याची ही कमाल या माणसाने फक्त एका फुफ्फुसाच्या आधारे दाखवलीये. एका जीवघेण्या आजारातून उठल्यावर. माळव्यातल्या लोकसंगीताचा प्रचंड अभ्यास आणि त्यातून केली स्वतःची नवनिर्मिती. नवे राग, नव्या बंदिशी. नवा अनवट विचार. सृजनशीलतेचा परिपूर्ण आविष्कार.
यानिमित्ताने आमच्या एका ग्रुपवर अवंती कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीने कवी वसंत बापटांनी कुमारजींवर लिहिलेली एक नितांतसुंदर कविता पाठवली.
कुमार
सकाळच्या उन्हासारखे एकदा याने काय केले,
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले,
टिंबाटिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले,
वडिलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले.
एवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली,
तशी हा जो सावध झाला
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला.
सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक जसे तप करते,
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते,
तसा तोही इमानदार एकाग्र, उग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला,
तशी हा जो तडक उठला
मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला,
खजुरीच्या बनामध्ये संध्याकाळची सावली झाला.
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला
मग म्हणे कोणीतरी ह्याच्यासाठी ‘हाय’ म्हणले,
तशी ह्याने काय केले?
कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले.
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला,
कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला.
एवढ्यामध्ये काय घडले
महाकाल मंदिरात सनामत डमरू झडले
कण्यामधल्या मण्यामधून मल्हाराची नागीण उठली,
चंद्राच्या तळ्यामधून ओम्-काराची तहान मिटली.
आता तसा कुशल आहे
पण स्वप्नात दचकून उठे, म्हणे
माझा सप्तवर्ण, श्यामकर्ण घोडा कुठे?
-    वसंत बापट.
वादळाला शब्दात बांधणं शक्य नाही म्हणतात. पण कविवर्य बापटांनी ते शक्य करून दाखवलंय या कवितेतून. आमच्या पिढीने कुमारांना पाहिलंही नाही. आम्हाला ते भेटले फक्त त्यांच्या सुरांतून. या सुरांनी अचंबित केलं असतानाच या कवितेचे शब्द अवतरले आणि त्या सुरांनी घातलेलं गारूड अधिकच गहिरं करत गेले. कुमारांची अज्ञाताला कवेत घेण्याची ओढ, गाण्याच्या सात स्वरांतून त्यांना त्याच्या पलीकडचं जे काही सांगायचं असेल ते सारं काही आपल्याला ही कविता सांगते. प्रस्थापित वाटेला ठोकरणारा, तसल्या फिजूल चौकटी नाकारणारा त्यांच्यातला मनस्वी कलाकार, कौतुकाच्या चार शब्दांनंतर तिथेच रमून रेंगाळता आपला पुढचा प्रवास सुरू करणारा पांथस्थ. या सगळ्या भूमिका त्यांचं विशेष स्थान अधोरेखित करणाऱ्या आहेत. आपल्या साधनेने, तपस्येने निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या आभाळाएवढ्या माणसांकडे नुसतंच थक्क होऊन पहायचं आणि आपल्या तोकड्या शब्दांत आपल्या जगण्यात त्यांनी उधळलेलं चांदणं मांडत राहायचा एक प्रयत्न करत राहायचं. हे सप्तवर्ण, श्यामकर्ण शुभलक्षणी घोडे त्यांच्या सुरांतून आपल्याला दिसले, यातच आनंद मानायचा.

 स्पृहा जोशी.

2 comments:

  1. Listen to this if you already haven't. Pu.La. introducing Kumarji in the program 'Mala Umajlele Balgandharva'.. overload of awesomeness :)

    https://www.youtube.com/watch?v=JrL37c5evVs

    ReplyDelete