Sunday, October 30, 2016

आठवणीतील दिवाळी...

दिवाळीच्या दिवसांत मी एका वेगळ्याच झोन मध्ये असते. वर्षातला हा माझा सगळ्यात आवडता सण. रंग, प्रकाश यांची झिलईदार सरमिसळ असलेला, कुठलेही अवडंबर नाही, नको त्या भावना, अस्मितांना चुचकारणं नाही, पूजा असेलच, तर ती वातावरणातल्या सौंदर्याची, सौहार्दाची.. फराळाचा तिखट गोड वास, चकलीच्या भाजणीचा, बेसन खमंग भाजल्याचा, चिरोट्याच्या पाकाचा, चिवड्याच्या फोडणीचा, सगळ्या संवेदनांना जागं करणारा हा माहौल, अभ्यंगस्नानाचं गरम पाणी, सुगंधी तेल, उटणी...

आम्हा चौघी-बहिणींना माझी आजी दर दिवाळीत 'मोती' साबण द्यायची गिफ्ट म्हणून, माझ्या आठवणीतील दिवाळी म्हटली की 'मोती साबणा'चा सुवास अजूनही गंधित होत जातो. मी कधीच फटाके उडवले नाहीत. एखादी फुलबाजी, भुईचक्र आणि डोक्यावरून पाणी म्हणजे अनार. त्यापलीकडे कधी जाताच आलं नाही. तडतडी फुलबाजी सुद्धा हातावर ठिणग्या उडतात म्हणून चार कोस लांब धरायची. केपाची बंदूक सुद्धा नाही. त्यातून उलट्या बाजूने टिकल्या फुटतील ही भीती मला अगदी सातवी आठवीपर्यंत वाटत राहिली, फटाक्यांची भीती वाढायला मला वाटतं, दोन तीन गोष्टी असाव्यात, एक तर पहिली भीती, खूप मोठ्या आवाजाची. दुसरी, माझ्या आईच्या हातावर ती दुसरी तिसरीत असताना अनार फुटला होता. ही गोष्ट कधीच डोक्यातून गेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला अनार फुटताना उडणाऱ्या कारंज्या आधी 'हा आपल्या हातावर फुटला तर काय'? ही भीती मला पोखरून काढायची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची भीती एक मराठी सिनेमा पाहताना डोक्यात बसलेली, सविता प्रभुणे आणि सतीश पुळेकर आहे त्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात त्यांची दोन मुलं फटाक्यांनी भाजून मरतात असं काहीसं दृश्य होतं त्या सिनेमात. ते मी कधीच नाही विसरू शकले. अगदी आताही..

माझा आवडता प्रकार होता रांगोळ्या. माझी आई आणि  काकू नक्षत्रासारख्या रांगोळ्या काढतात.  आजी तर नुसत्या हाताने मोर, लक्ष्मी काढायची. आम्ही बघत बसायचो.. आई आणि काकूच्या मोठाल्या ठिबक्यांच्या रांगोळ्या.. बारीक रेषा, टोकदार कोन आणि सुरेख सारखे रंग. रोज नवी रांगोळी. पुढे मग मी आणि क्षिप्रा त्यात वाटेकरी झालो. दाराच्या दोन बाजूंना आम्हाला एक एक चौकोन मिळायचा. वाण्याकडून ठिबक्यांचा कागद, रांगोळी, चमकी, रंग आणि गेरू आणायचा. अर्धा तास गेरुत हात बरबटून आपापला चौकोन सारवायचा. मग शंभरदा तो वाळेपर्यंत बोट लावून बघायचं आणि घाईने कडेचा गेरू ओला असतानाच ठिबक्यांचा कागद पसरून रांगोळी भुरभुरायची.. हसत खेळत चुकत माकत पुढचे दोन तास सजायचे रांगोळीमुळे.

माझ्यासाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे खूप वाचन, आई-बाबा हरत-हेची नवी नवी पुस्तकं आणून द्यायचे. अगदी श्यामची आई, गोट्या, चिंगीपासून ते मृत्युंजय, श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती पर्यंत. मी आणि आजीने तर दुसरीच्या दिवाळीच्या सुट्टीचा उद्योग म्हणून चक्क घरी माझ्या पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. रीतसर सिरीयल नंबर, कॅटलॉग, मेम्बर्स लिस्ट वगैरे करून! माझ्या आठवणीतून ती 'माझी' लायब्ररी कधीच पुसली गेली नाही!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेशाला जाऊन घरातील सगळे बाबांच्या आईकडे जमायचो. आई आणि काकूचा फराळ एकत्र असायचा. त्यामुळे तो तयार होतानाच चव घेण्याच्या निमित्ताने फडशा पाडायचो. उत्सुकता असायची ती आजीच्या हातच्या दहीपोह्यांची, वर्षभरात इतरवेळेस दहीपोहे कधी मिळायचे नाहीत, असं नव्हे. पण ते 'तसे' कधीच लागायचे नाहीत हे मात्र खरं. आम्ही, मावशी, आत्या, काका सगळ्यांची कुटुंब एकत्र.. खूप माणसं.. खूप गप्पा.. पत्त्यांचे डाव आल्याचा चहा.. खूप हसू ; खूप आठवणी.. मधली सगळी वर्ष अक्षरशः भुर्रकन म्हणतो तशी उडून गेली. यंदाच्या दिवाळीला काका नाही! तोही निघून गेलाय खूप लांबच्या प्रवासाला...

अशाच एका दिवाळीच्या सुट्टीत आईबाबांनी 'आठवणीतल्या कविता' चे चार भाग दिले. त्यात 'आली दिपवाळी गड्यांनो आली दिपवाळी' ही कविता होती कवी माधवानुज यांची आणि मग कळलं की ते माझ्या सख्ख्या आजीचे पणजोबा म्हणजे माझे खापर पणजोबा! या इतक्या भांडवलावर मी शाळेत खूप 'शायनिंग' मारली. मला तरी कुठे ठाऊक होतं. त्या कवितेचं गोत्र माझ्या पुढच्या प्रवासात प्रत्येक पावलावर मला सोबत करणार आहे म्हणून.

आठवणीतील प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशीच खास बनून गेली आहे, ती म्हणून..!!
- स्पृहा जोशी

12 comments:

  1. superb memories..
    have a look at my Diwali memories..2 years old blog post though

    http://www.mithileshbhoir.in/2014/10/blog-post.html

    ReplyDelete
  2. आज पाहिला तुझा ब्लोॅग स्प्रूहा ....
    आजवर तुझ्या कविता वाचायला मिळायच्या फ़ेसबूकवर, आता इथे तुझ्या ब्लोॅगचा पण आस्वाद घेता येईल.

    मस्तच लेख आहे नेहमीसारखा!!!

    ReplyDelete
  3. Thanks! Your post made me dwell into my school days and Diwali holidays!
    Happy Diwali!! :)

    ReplyDelete
  4. खुप छान लिहिलय स्पृहाताई! लहानपनीच्या दिवाळीच्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
    Replies
    1. दिवाळी आठवणी एकदम छान वाटल्या .
      आज " पुलंचा " जन्म दिवस .असामान्य प्रतिभावंता बद्दल काही तरी मनाला भावेल ते लिही. विनायक जोशी
      electronchikatha.blogspot.com

      Delete
  5. Tabbal 4.5-5 mahinuan nantar lihitiyes. Chhan lihilay. Please blog takanyachi frequency wadhav .....Thank you.

    ReplyDelete
  6. wow very nice..happy new year2017
    www.shayariimages2017.com

    ReplyDelete
  7. Savita prabune's movie was epic...I still remember. प्रत्येक दिवाळीच्या आसपास हि मूव्ही लागायची.😊

    ReplyDelete
  8. तुझं वाचून, थोडं लिहायचा प्रयत्न केलाय...
    वेळ मिळाला की वाच प्लिज
    http://swagatpatankar.blogspot.com/

    ReplyDelete
  9. Hi madam last few days saw a marathi movie Mala Kasich problem nahi your very sensitive and serious character play your role try to heart touch both of family sambhaji

    ReplyDelete
  10. खूप सुंदर शब्दांकन !👌🏻

    ReplyDelete