कितीतरी दिवसांनी
हातात पेन आणि वही घेऊन लिहायला बसले आहे तेही चक्क धावत्या गाडीत.वेगळंच वाटतंय...एकदम रोमॅन्टिक !
मध्यंतरी आमच्या
नितीन आरेकर सरांनी ‘ऐवज’ नावाचा एक पुस्तकरुपी खजिना माझ्या हातात ठेवला.त्यात अरुण
साधूंनी केलेला पत्रांचा अनुवाद आहे. ती पत्रं आहेत दस्तुरखुद्द पंडित नेहरूंनी त्यांची
प्रेयसी..अहं..‘सखी’ म्हणूया...तर त्या सखीला,पद्मजा नायडू यांना लिहिलेली अत्यंत तरल,
आशयगर्भ, संवेदनशील आणि हळवी पत्रं. त्यातल्या विचारांची खोली आणि त्यांच्या नात्यांमधली
प्रगल्भता यांनी थक्क व्हायला झालं मला. दुर्दैवाने हे नातं पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही,लौकिकार्थाने
नेहुरुंच्या समाजातल्या आभाळाएवढ्या प्रतिमेपुढे त्यांच्यातल्या हळव्या प्रेमिकाला
चुकवावी लागलेली ही जबर किंमत. पण पत्रं वाचताना त्यात भरून राहिलेला उदास गोडवा एका
वेगळ्याच जगात घेऊन गेला मला. त्यातली कित्येक पत्र अशीच आहेत, धावत्या गाडीतून लिहिलेली.
कामाचा अशक्यप्राय डोंगर ,राजकारणाचे तणाव, आपल्याच प्रचंड प्रतिमेमध्ये घुसमटणारा
जीव..आणि हे सगळं मोकळं मोकळं करणारी ‘आपल्या’ माणसाकडे खेचणारी अनावर उर्मी. जिथे
कुठलाही आडपडदा नाही. कुठलंही वेगळं आवरण नाही. कोणत्याही प्रकारचा अट्टाहास नाही.
स्वतःच्या ‘खरेपणा’वर कुठलंही बंधन नाही. तिथे आहे फक्त उन्मुक्त अभिव्यक्ती. सडेतोड
आत्मपरीक्षण..वेदनांची हळुवार उकल.. आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले
आपण! फार सुंदर अनुभव होता ही पत्रं वाचणं.
आज लिहायला बसलेय,
तेव्हा लक्षात येतंय किती हद्दपार झाल्यात काही गोष्टी आपल्यातून. ‘माझ्या’ माणसाला मनातलं काही सांगताना मोबाईलचा स्क्रीन
किंवा लॅपटॉपच्या कीज खडखडत काहीतरी टाईप करायचं. त्यात नुसताच वेग साधतो. हरवलेल्या ‘आवेगा’चं काय? धावणारे विचार काबूत आणून कागदावर उतरवंताना मजेदार तारांबळ उडते, ती
सरावाने ‘प्रोग्राम्ड’ मेंदू अगदी सहज उरकून टाकतो. हरवलेला आहे प्रत्यक्ष स्पर्श. ‘पर्सनल टच’.आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कधी होईल माहिती नाही. भेट काय, महिनोन्महिने
तिचं दर्शनही अप्राप्य आहे. पण संवाद तर साधायचाच आहे 'या मनीचे त्या मनी' घातले नाही,
तर ते अपूर्णत्व आपल्यालाच रितं करणार आहे. ही सैरभैर करणारी ओढ. कधीकधी अपूर्ण गोष्टी
असतात ना, त्या वर्णनातीत सुंदर भासतात. पूर्णत्वाचं समाधान नसेलही त्यांच्यात कदाचित.
पण अर्ध्यात वेगळ्या झालेल्या त्या वाटा धुक्यासारख्या भासतात. गूढ..पण सुंदर.
माझ्यातही ती अनावर
उर्मी जागते आहे. याचाच मला आनंद आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे ‘आपलं’ जग
शोधण्याची उर्मी. गूढ, अपूर्ण, पण सुंदर..!!
~ स्पृहा जोशी