तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? झपाट्याने बदलत जाणाऱ्या मध्यमवर्गाचं निरीक्षण करायचं असेल तर या एक नंबर जागा आहेत.. खूप मजेशीर दृश्य.. गेल्या दशकामध्ये मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागला, आणि हळूहळू मॉल कल्चर आपल्याकडे रुजायला लागलं. अशा सुपर मार्केट्स मध्ये आता स्पष्ट दिसतो, तो आपल्या लोकांचा बदललेला स्वभाव. हसरेपणा, ऋजुता यांचा लवलेश नसणारा..चढलेली भुवई, आणि चेहऱ्यावर तुच्छतादर्शक भाव.. आणि आपण किराण मालाच्या फडतूस दुकानात नाही, तर एसी मॉल मध्ये शॉपिंग करतोय या गोष्टीतून येणारा एक विचित्र अहंभाव! हा माजोरीपणा कशातून येत असेल?
त्यादिवशी एका सुपर मार्केटमध्ये गेले होते. वर केलेल्या वर्णनासारखाच एक सूट- बूट, कॉलर, टायवाला इसम, हातात उंची आयफोन, तंद्रीत चालताना त्याची ट्रॉली एका छोट्या मुलीचा पायावरून गेली. ती बिचारी मुलगी कळवळली. बाजूला तिची आईउभी होती. साहजिकच तिने त्या माणसाला हटकलं, अगदी सौम्य शब्दात.. तर तो तिच्यावरच गुरकावला.."हां.. मग ठीक ए ना.. त्यात काय एवढं.. होतं असं.. एवढं काय नाटक!" अरे...ही कुठली पद्धत??? अर्थात तो विषय वाढला, चार तमासगीर जमले, बाचाबाची होऊ घातली.. बोंबाबोंब, कर्णकटू, कर्कश आवाज.. सगळी शांतता हरवून गेली.. वातावरणाच विसकटलं.. आणि ती छोटी मुलगी मात्र एका बाजूला एकटीच उभी होती.. केविलवाणी! जो प्रसंग, "आय एम सॉरी" म्हणून सहज संपला असता, त्याजागी 'त्यात काय एवढं' या बेपर्वा, मुर्दाड उत्तराने हे सगळं रामायण घडलं.
किती विचित्र आहे हा एटीट्युड.. म्हणजे ज्या बेपर्वा वेस्टर्न अप्रोचला, त्यांच्या 'व्हॉटेव्हर' कल्चरला आपण उठसूठ नाकं मुरडतो, त्याला शब्दशः समानार्थी आहे हे 'त्यात काय एवढं'!! आमच्या वयाच्या सगळ्यांमध्येच आलीये ही वृत्ती. प्रेमात पडणं, त्यात अयशस्वी होणं, एखादी परीक्षा देणं, त्यात घसरून पडणं, पैसे उडवणं.. यादी वाढते, वाढतच जाते.. सगळ्याला उत्तर एकच..'त्यात काय एवढं'!! आणि आपली कमाल तर त्याहूनही पुढे आहे. या सगळ्याला एकदाच 'नशीब' असं शुगर कोटेड आवरण चढवलं की खल्लास! आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं..' नशीब!'; सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये..'नशीब!' बसच्या रांगेत कोणीतरी तुम्हाला धक्का देऊन घुसलं, 'नशीब!' एखाद दिवस तुम्हीच समोरच्याला धक्का देऊन विंडो सीट पटकावलीत.. तेही 'नशीब'! (यावेळेस स्वर मात्र हसरा!) कशी मस्त साखळी आहे नाही? भारतीय मानसिकतेला तसंही समोरच्याला 'सॉरी' म्हणणं अपमानास्पदच वाटत आलंय म्हणा! ' मोडेन पण वाकणार नाही' हा आपला इतिहास प्रसिद्ध बाणा नाही का! 'चांगलं' असण्यापेक्षा 'कणखर' असण्याला का इतकं महत्त्व? बरं तो कणखरपणासुद्धा आयत्या वेळेस नांगी घालतोच.. आपल्या फायद्याच्या वेळेस बरोब्बर लवचिक होतोच! मग आपल्यापेक्षा कमकुवत लोकांमध्ये हे शौर्य कशाला पाजळतो आपण? त्यामुळे अशा स्वभावांना 'सॉरी'पेक्षा 'त्यात काय एवढं' हेच जवळचं वाटणार! वादातला शेवटचा शब्द.. ब्रह्मवाक्य हे आपलंच असायला हवं! ते त्या मुळमुळीत 'सॉरी' ने थोडंच साधलं जाणार!
विचार करून बघा.. आपल्या नकळत असेच वागत असतो आपण. लहानपणापासून किती जणांना 'प्लीज' म्हणायची सवय असते? बालहट्ट हे नेहमीच किंकाळ्या आणि आरडाओरड्याने व्यापलेले असतात.. त्यांचं 'कित्ती गोड!!' असं कौतुक केलं जातं. आणि मग तीच सवय लागत जाते. लहान असतानाचे हे लाडिक चाळे मोठं झाल्यावर सार्वजनिक आयुष्यात समोरच्याला भीषण वाटू शकतात, अगदी आपण नकोसे वाटू शकतो, हा विचार किती पालक करतात? त्यामुळे 'नम्रता' हे शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवलेलं, आणि इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच 'सोडून द्यायचं' एक मूल्य उरतं..
त्यामुळे हा माझा लेख वाचल्यावर समजा तुमच्या मनात आलं, 'त्यात काय एवढं' तर ती तुमची चूक अज्जिबात नाही बरं का!! आणि मीही तुमच्यातलीच असल्यामुळे, 'सॉरी' म्हणण्याच्या फंदात मीही पडणार नाहीच!!! कारण एकच...'त्यात काय एवढं'...!!!!