२४ तासांतले अठरा तासांहून जास्त कम्प्युटरला डोळे लावून बसलेल्या माझ्यासकट माझ्या सगळ्या मित्रांनो,आपल्याला आवडो न आवडो,इंटरनेट ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनून गेली आहे.आणि जात-पात न मानणाऱ्या आपल्या पिढीने एक नवीनच वर्गवारी तयार केली आहे. ज्यांना सहज इंटरनेट वापरता येतं असे लोक;आणि ज्यांना ते नीट वापरता येत नाही असे लोक.डिजिटल युगाचे पाईक आहोत आपण!जगाशी 'कनेक्टेड' राहण्यासाठी आपण मेंदूच्या वायरी 'पीसी'ला जोडल्या आहेत,बोटं कीबोर्ड,माऊस किंवा लाडक्या मोबाईलला चिकटवली आहेत,डोळे त्यातून काही आरपार शोधतायत..सगळी माहिती आपल्या 'सेवेशी सादर' आहे..एका 'क्लिक'चं अंतर! तुम्ही 'डिजिटली' सतत कार्यरत असणं हा तुमच्या 'असण्याचा' एकमेव पुरावा आहे! या 'मोड'मधून आपण बाहेरच येत नाही..तुम्ही काय,आणि मी काय.. विचार करून बघा हं, झोपेत असलो,तरी मनाने सोशल नेट्वर्किंग चालूच असतं, फेसबुकवरचे फोटो,ट्विटरवरचं अपडेट,उद्याच्या प्रेझेंटेशनचं डाउनलोड, हे झोपेतही थांबत नाही..भरीस भर म्हणून सकाळी उठेपर्यंत मोबाईलचा इनबॉक्स मेसेजेसनी उतू चाललेला असतो,तुम्ही कधी एकदा ते वाचताय याची वाट बघत!
अर्थात,आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये म्हणा.. इतक्या अपेक्षांचं ओझं घेऊन उरीपोटी धावताना कुबड्या शोधाव्या लागणारच! पण या कुबड्या कम्पल्सरी गळ्यात बांधल्या जातायत आपल्या..माझ्या एका मित्राचा किस्सा सांगते..त्याला नवीन नोकरी लागली..आणि कंपनीने पहिल्याच दिवशी त्याला 'ब्लॅकबेरी' फोन दिला. त्याला ती ऍप्लिकेशन्स झेपेनात,म्हणून त्याने ठरवलं की आपण आपला सवयीचा स्मार्टफोनच वापरू..पण त्याच्या कंपनीने त्याला कंपल्शन केलं..'ब्लॅकबेरी'च वापरण्याचं..ग्यानबाची मेख लक्षात येतेय का? त्याला 'ऑफिस अवर्स'नंतरही काम करावंच लागणार होतं. ही गोष्ट जेव्हा माझ्या मित्राच्या लक्षात आली,तेव्हा त्याने ठाम नकार दिला,पण त्याला ती नोकरी सोडावी लागली.. इतकी चांगली नोकरी सोडली म्हणून आम्ही त्याला शिव्या घालत होतो,पण बोलता बोलता तो एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलून गेला..म्हणाला,"अरे हे काय चाललंय?मोबाईल बंद करायचा नाही,कम्प्युटर ऑफ करायचा नाही,सतत वायरींनी जखडलोय मी.. मला अधिकार आहे की नाही थोडासा वेळ 'अनप्लग्ड' होण्याचा..!!!" 'अनप्लग्ड' होण्याचा अधिकार??? स्वातंत्र्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार, माहितीचा अधिकार,तसा काही वर्षांनी 'अनप्लग्ड' होण्याचा अधिकारही कायद्याने मागायची वेळ येणार आहे..
अंगावर येतं हे सगळं माझ्या..थकायला होतं..आणि मन विचारात गुंतू नये म्हणून मी स्वतःलाच पुन्हा डिजिटली गुंतवून घेते...इतका भडीमार आहे न आपल्यावर माहितीचा,की आपल्या स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स पासून दूर जाणं सहन नाही होत आपल्याला..का कुणास ठाऊक एक असुरक्षिततेची भावना ग्रासते. का 'डिमांडिंग' झालोय आपण इतके?ऑफलाईन जायचं असेल तर आधी मला फेसबुक आणि ट्विटरवर हे स्टेटस अपडेट करावं लागतं,कारण नाहीतर माझे 'फ्रेंड्स' अस्वस्थ होतात..दोन दिवस जर मी ऑनलाईन नसेन तर माझा इनबॉक्स या चौकशीच्या मेसेजेसनी भरून गेलेला असतो.ज्यांना उत्तरं द्यायची खरंतर आतून इच्छाही होत नाही..पण तरी आपण ते टाळू शकत नाही..कदाचित हरवत चाललेली नाती शोधत असतो आपण.किंवा कदाचित त्या नात्यांपासूनच दूर पळत असतो कुठेतरी..गोंधळ असा झालाय मित्रांनो,की आपल्याला एकीकडे नात्यांमुळे जगापासून मिळणारं संरक्षण तर हवंय,आणि दुसरीकडे नात्यांमुळे येणारं आपल्या प्रायव्हसी वरचं अतिक्रमणही टाळायचंय..त्यामुळे आपण नात्यांपासूनही संरक्षण शोधतोय.. किती अवघड करून ठेवलाय नाही,आपणच आपलं आयुष्य!!!
ह्या गोष्टीचा विचार करायची वेळ आली आहे मित्रांनो..प्रत्येकाला जसा जगाशी जोडून घेण्याचा अधिकार आहे,तसा काही काळ 'अनप्लग्ड' होण्याचा,'डिसकनेक्ट' होण्याचा अधिकारसुद्धा असायला हवा.आपण सगळ्यांनीच तो समजुतीने एकमेकांना द्यायला हवा.या छोट्या होत जाणाऱ्या आणि वेळेपुढे धावणाऱ्या जगात,हे काही क्षणांचं तुटलेपणच कदाचित आपल्याला एकमेकांशी अधिक जोडून देईल..!!