तुझ्या रूपाचे सागरदर्शन
नकळत होता जागी थिजलो,
लाटा होऊन येशी धावत
तुषारांत त्या भिजून हसलो.
खोल तुझ्या डोळ्यांत पाहता
बुडत चाललो,पाय ठरेना;
केसांच्या पाशात अडकलो
अंधारी या काठ कळेना!
मावळतीच्या सूर्याकडुनी
सोनपिसारा मागून घेशी,
अन रातीला दूधचांदणे
चंद्राला त्या उसने देशी!
ऋतुचक्राची हसरी सृष्टी
तुझ्याच साठी फिरून येते,
स्पर्श तुला ती करते आणि
स्वतःच सुंदर होऊन जाते..!!!
-स्पृहा.