गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ.
भीती वाटते त्याची कधी कधी.
सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने.
पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून?
त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच?
फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने?
विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये
आगीत लपेटून टाकेल आपल्याला..!!
जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं..
आपल्या हातात एवढंच..
सटवाई सुद्धा त्यालाच फितूर!
त्याच्याच अंगणात आश्रिता सारखी..
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवायची काय,
मान वर करून पाहण्याची सुध्धा हिंमत नाही..
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर..
तिची इच्छा असते,आपला संवाद घडावा आभाळाशी..
पण तीही मुक्याने हे कडू सत्य पचवत राहते..
आतले कढ आताच दाबत राहते..
हळूहळू अंतर वाढतं,वाढतच जातं..
क्रांती करायला लागतं मन
आभाळाचं अस्तित्त्वच झुगारून द्यायला लागतं..
धाडस करतं त्याच्या नजरेला नजर देण्याचं,
ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं..
आता हळूहळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं.
वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं..
अशीच कधीतरी नजर जेव्हा आभाळावर जाते,
काळेभोर क्रुद्ध ढग निघून गेलेले असतात.
आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव असतात.
शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं,
काहीतरी आपल्या मनात उगा दाटून येतं.
हात पसरून,वय विसरून आपण मोठे होतो,
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो..
आभाळाच्या डोळ्यांत तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात;
सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात..!!!
- स्पृहा.
- स्पृहा.