अखेर... गेल्या बुधवारी मतदान पार पडलं. आपलं कर्तव्य उरकून मतदारराजा पाच वर्षांसाठी पुन्हा निद्रावस्थेत जायला मोकळा झाला. निवडणुकीच्या वातावरणात प्रचाराच्या नावावर एकमेकांवर केली जाणारी गरळफेक कमी झाली. भाषणातले मुद्दे ऐकून बुद्धिमत्तेची कीव यावी, अशी व्यासंगाची उधळण केली जात होती, रेडिओवर आचरट प्रचारगीतं न वाजता आता साधी नेहमीची गाणी वाजू लागली. गाड्या भरभरून राज्यभर चालणारी पैशांची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ थांबली. त्यानंतर सगळ्यांनाच वेध लागले ते ‘नवा मुख्यमंत्री कोण होणार’ याचे... खरं तर सर्वसामान्य माणसाला याची पक्की खात्री असते, की कोणी का होईना; यामुळे आपल्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नाहीये. तसंच लळत-लोंबकळत लोकलचा प्रवास, मुलांच्या शाळा, डोनेशन्स, भाज्यांचे-जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव, महिन्याच्या शेवटी कोलमडलेलं घरखर्चाचं अंदाजपत्रक, असुरक्षित आयुष्य, प्रत्येक पातळीवर कुरतडणारा भ्रष्टाचार, असुरक्षित आयुष्य, काही मिटून टाकलेली स्वप्नं आणि दडपून टाकलेल्या इच्छा...!! एवढ्या कलकलाटातून दिवस आला कधी, गेला कधी, कळतसुद्धा नाही. अशा एकुणातच जगण्याचीच हाय खाल्लेल्या परिस्थितीत आपण सगळे जगतो आहोत....पण अशा वातावरणातसुद्धा काही बातम्या किती छान झुळूक घेऊन येतात. गेल्या काही दिवसांतल्या भडक प्रचारकी गदारोळात आपण अंमळ दुर्लक्षच केलंय त्या बातमीकडे. भारताच्या कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.
कोण आहेत हे कैलाश सत्यार्थी? म्हणून इंटरनेटवर शोध घेतला आणि त्यांच्या कार्याबद्दल वाचून थक्क व्हायला झालं. बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी १९८० पासून हा माणूस अथक परिश्रम करतोय. हा प्रश्न सामान्य प्रश्न न राहता मानव कल्याण (human rights) अंतर्गत धसास लावला जावा, यासाठी झटतो आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून नाना उपाय योजतो आहे. इतकंच नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या विषयाची ज्योत तेवती ठेवतो आहे. वेळप्रसंगी स्वतः अंगावर हल्ले झेलून त्यांनी आतापर्यंत किती मुलांचं पुनर्वसन केलंय ठाऊक आहे?? तब्बल ७८,५०० हून अधिक! नतमस्तक व्हायचं आपण हे सगळं वाचून फक्त. आणि मलालाबद्दल तर काय बोलावं... माझ्या धाकट्या बहिणीच्या वयाची असेल ती फार फार तर. खरं तर तिच्याहूनही लहानच आहे ती. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पुरस्काराची सर्वात कमी वयाची मानकरी होण्याचा मान पटकावलाय तिने. एवढ्याशा आयुष्यात तिने जे काही करून ठेवलंय ते केवळ ‘अशक्य’, ‘दुर्दम्य’, ‘अचाट’ या विशेषणांमध्ये बांधून घालता नाही यायचं आपल्याला.
पाकिस्तानात राहून, सगळ्या जिवावरच्या आपत्तींना तोंड देऊन एक लहानगी मुलगी आपल्या आसपासच्या मुलींना आपल्या बरोबरीने शिक्षित करण्याचा चंग बांधते. स्वात खो-यात जेव्हा तालिबान्यांनी मुलींनी शाळेत जाता कामा नये, असा फतवा काढला, मुलींच्या शाळा जबरदस्तीने बंद करायला सुरुवात केली, त्या वेळेस या विकृत धर्मांध वादळात अनेक मोठाले वृक्ष कोलमडून गेले, त्यांनी शरणागती पत्करली; पण ‘मलाला’ नावाचं हे छोटंसं लव्हाळं मात्र आपल्या मुळांशी घट्ट राहून झगडत राहिलं. तालिबान्यांच्या गोळ्या झेलूनसुद्धा संघर्ष करत राहिलं. आदर आणि कौतुक यांखेरीज काय येणार मनात!! खरंच पात्रता नाही आपली आणखी काही बोलायची. मी विचार करत होते; काही जणांची आयुष्य अशी झळाळून निघतात, आणि काही जण रोजच्या अंधाराच्या गर्तेत चाचपडत राहतात, असं का? कैलाशजी आणि मलाला त्यांनी केलेल्या कामाच्या आनंदात त्यांची मनःशांती शोधत असतील कदाचित! काट्याकुट्यांचं असेल कदाचित, पण त्यांचं आयुष्य ख-या अर्थाने समाधानाचं आहे. आधुनिक युगातले संतच म्हटलं पाहिजे यांना. स्वतःवरचा आणि आपल्या कामावरचा संपूर्ण विश्वास किती सुंदर समतोल देत असतो यांना. आणि आपण? किती कोतं करून घेतो आपण आपलंच जगणं!
परवा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हीरो’ नावाचा नितांतसुंदर चित्रपट पाहताना हेच परत परत जाणवत होतं. डॉ. प्रकाश आणि साधनाताई, त्यांचं आयुष्य चहुबाजूंनी येऊन भिडतं आपल्याला. साधेपणातलं सौंदर्य आणि वास्तवाची भीषणता एकाच वेळेस अंगावर येते अक्षरशः! ‘प्रकाशवाटा’तले प्रसंग नाना आणि सोनालीताई जिवंत करतात, आणि आपले डोळे सतत एका अनामिक आनंदाने आणि अभिमानाने भरून येत राहतात...
ही डोळे भरून येण्याची संवेदनशीलता तरी आपल्यात शिल्लक आहे, हेही नसे थोडके..!! ही संवेदनशीलताच न जाणो, आपल्यालाही कधीतरी आपली जबाबदारी उचलायला शिकवेल, केवळ स्वतःकडे पाहायला शिकवणा-या मध्यमवर्गीय रडगाण्यातून बाहेर काढील, या महापुरुषांच्या महाकार्यात खारीचा वाटा उचलण्याचं बळ देईल! आणि कोण जाणे, अशा अनेक लहान लहान खारोटल्या एकत्र आल्या तर नव्या सुंदर समाजाकडे जाणारा एखादा भव्य सेतू उभा राहीलही... कोणी सांगावं!!!
- स्पृहा