Thursday, September 24, 2015

म्‍हणे आम्‍ही सभ्य...

गेल्‍या काही दिवसांपासून एका विषयाने आपल्या आसपास थैमान घातलंय. AIB नॉकआउट अर्थात “ऑल इंडिया बक !!!!! सगळीकडे फक्त हीच चर्चा. काहींनी विषय टाळला. काहींनी झुरळ झटकल्यासारखा झटकून टाकला. काही संस्कृतिरक्षणाच्या ‘मोड’मध्ये गेले, तर काहींनी आपण किती ‘लिबरल’ आहोत, हे सांगत या प्रकाराचं समर्थन सुरू केलं. प्रत्येकाचे मुद्दे वेगळे, प्रत्येकाची म्हणणी वेगळी, प्रत्येकाची बाजू वेगळी.
आणि या सगळ्यापासून अनभिज्ञ असणाऱ्यांची एक वेगळी जमात आहे, ती तर आणखीनच वेगळी! या सगळ्यामध्ये घुसळून निघाले मीसुद्धा. मुळात कोण आहेत हे ‘AIB’? तर हा आहे एक यूट्यूब चॅनल. गुरसिमरन खंबा, तन्मय भट, रोहन जोशी, तन्मय शाक्य या विनोदवीरांनी मिळून काढलेला एक वाचाळ कॉमेडीचा धबधबा. आम्ही ‘टोकदार’ विनोद करतो, असं या मंडळींनी स्वतःच ठरवून टाकलेलं आहे. यांना कुठलाही विषय वर्ज्य नाही. राजकारणापासून सिनेमापर्यंत आणि महागाईपासून ते सगळ्याच गोष्टींमधलं यांना सगळ्यातलंच सगळंच कळतं. तसं कळायलाही काही हरकत नाही म्हणा...असतो काही जणांकडे हा गुण. आणि विनोदातून कोपरखळ्या मारणं हे तर किती अवघड काम... उत्तमोत्तम व्यंगचित्रकार, लेखक जेव्हा हे करतात तेव्हा बरं चालतं तुम्हाला! फारच ‘हिप्पोक्रॅट्स’ आहात बाबा तुम्ही!... तर या सगळ्यातलं सगळं कळणाऱ्या मंडळींचां हे चॅनल. त्यातल्या कर्कश विनोदांना ‘व्हायरल’ युगात ‘न भूतो..’ अशी लोकप्रियता मिळाली. अर्थकारणाने गती घेतली. लाखोंच्या घरात त्यांच्या व्हिडिओजना हिट्स मिळू लागले. च्युइंगम चघळत ‘इट्स सो कूल’ करणाऱ्या एका जमातीसाठी हा हॉट टॉपिक/ ट्रेंड झाला. उच्चभ्रूंसाठी, सेलिब्रिटीजसाठी ‘AIB’मध्ये उल्लेख होणं हा नवा मापदंड ठरला. आणि यातून जन्माला आला त्यांचा जाहीर कार्यक्रम, AIB नॉक आउट. ज्याने एक नवं वादळ उठवलं. श्लील-अश्लीलतेच्या सगळ्याच कल्पनांना मुळापासून हादरे दिले. सार्वजनिक ठिकाणी नेमकं कसं वागलं म्हणजे ते सभ्य किंवा योग्य, याची परिमाणंच बदलून टाकली.
अचकट–विचकट, बीभत्स बोलणं म्हणजे ‘इन’, ‘फॅशन’ अशी नवी परिभाषा जन्माला घातली. बरं, या शोमध्ये सहभागी होते करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर... आणि ‘शो’ला हजर असणारी मंडळी होती दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट इत्यादी अनेक... तरुणाईचे हे सगळे आयकॉन्स! आता आपले आदर्शच तिथे आहेत म्हटल्यावर तरुणांनी ते ‘फॉलो’ करावं, यात काहीच नवल नाही. किंबहुना ते अपेक्षितच आहे.

भीषण आहे हे सगळं चित्र. आणि त्यानंतर उठलेल्या प्रतिक्रिया आणखी भयंकर आहेत. जे काही त्या कार्यक्रमात बोललं गेलं, ते चारचौघात बसून ऐकण्याच्या लायकीचं नव्हतं. अत्यंत घाण, अश्लाघ्य, विनोदाचा कुठेही लवलेश नसलेले बीभत्स चाळे होते ते सगळे. कुठल्या तोंडाने करण जोहर त्याच्या पिक्चर्समधून ‘भारतीय संस्कृती की महानता’ लादतो आपल्यावर? मध्यंतरी दीपिका पदुकोणने एका इंग्रजी दैनिकावर तिच्या बाईपणाचा अपमान केल्यावरून रान उठवलं होतं. या कार्यक्रमात समस्त बाईजमातीवरच विकृत म्हणावी अशी टिप्पणी झाली, तेव्हा नाही वाटलं तिला हे बोलावंसं? कित्येक लोकांनी या ‘शो’चं समर्थन करताना म्हटलं, की अशा गोष्टी आपण सगळे बोलतोच, नॉनव्हेज जोक्स सर्रास व्हॉट्स अॅप ग्रुप्समधून फिरतातच... ताकाला जाऊन मग कशाला भांडं लपवायचं? मला हे सगळंच शिसारी आणणारं वाटतंय. अशा कित्येक गोष्टी आहेत हो, ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळेच करतो. पण बंद दाराआड! त्याची माहिती प्रत्येकालाच असते, पण ते संकेत असतात, म्हणून एक शहाणा समाज म्हणून आपण वाटचाल करतोय. नाही तर रस्त्यात कुत्री, आणि जंगलात माकडं सुखेनैव विहरतातच नं! आपण ‘माणूस’ असल्याचं कुठलंच लक्षण पाळायचं नसेल, तर मग काय प्रश्नच मिटला.

खरे भयावह आहे ते यामुळे घडणारे परिणाम! या शोवर बंदी घालण्याची मागणी झाली. व्हिडियो डिलीट करण्यात आला. पण सवंग असली तरी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते! ती पुरेपूर झाली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही काहींनी म्हटलं! दोन दिवसांपूर्वी यापुढे ‘सिनेमा-नाटकांमध्ये कोणते शब्द अश्लील म्हणून धरले जातील’ याची यादी प्रसिद्ध झाली! अर्थाअर्थी या दोन घटनांचा थेट संबंध नसेलही; पण आता खरंच माणसाचं जगणं मांडणाऱ्या संवेदनशील, तरल पण थेट भिडणाऱ्या कलाकृतींनी कोणाकडे दाद मागायची? AIBच्या शोवर बंदी घातली म्हणून गळे काढणारे ‘इंटलेक्चुअल्स’ या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहतील? का पुरेसं ‘ग्लॅमर’ नाही म्हणून तिथेच सोडून देतील हा विषय? अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत अशी चुकवावी लागणार आहे यापुढच्या काळात? हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असंच झालं!

आपल्याला बाबा AIBचे विनोद पचत नाहीत, हेच खरं! पु. ल., चिं. वि. जोशी, आर. के लक्ष्मण यांच्या निर्मळ विनोदाला चटावलेले आपण! ‘व्हायरल युगात’ खरं तर तसे मागासच म्हणायला हवेत. आचार्य अत्रे असते तर बाकी हा कार्यक्रम पाहून डोळे विस्फारून नक्की म्हणाले असते, “गेल्या दहा हज्जार वर्षांत ‘असा’ कार्यक्रम झाला नाही बुवा...!!!”

- स्पृहा

10 comments:

  1. आपण माणूस आहोत याचा विसर पडलाय या लोकांना

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. These ppl who introduce themselves as artists are just professionals like lawyer,mine workers or mechanics,we should not give undue significance to everything they do.They would do anything for attracting attention. I feel pity for ppl who follow them as icons. Instead we should follow Abdul kalamji or swami Vivekananda, who's thoughts and deeds are modern for all times. I think ,Attention AIB got is wrongfuly horrible in every means. Even in so called west, comedians try to be sober when dealing with public figures.
    Very Well written Spruha..

    ReplyDelete
  4. नेता , सिनेमा , साहित्य,सांस्कृतिक कार्यक्रम यातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते . समाजाला जे आवडत तेच समोर आणल जात . यातूनच समाजाची मानासिकता, संस्कृती अधोरेखित होते . उथळपणाला खळखळात फार… त्याच आयुष्यही अल्प . जे अभिजात आहे तेच शाश्वत अन प्रवाही राहील.

    ReplyDelete
  5. लेख आवडला. प्रत्येक गोष्टीची एक लक्ष्मण रेखा असते. आपल्याला तिचे भान ठेवावे लागते. ती ओलांडण्याचा परिणाम विनाशाला कारणी भूत ठरतो. अभिव्यक्ती स्वतंत्रेची (इथे अश्लीलतेची) लक्ष्मण रेखा ज्याला त्याला स्वत:च ठरवायची असते. अन्यथा कदाचित उद्या स्त्रियांना पुन्हा बुरख्यात टाकल्या जाण्याची संभावना नाकारता येणार नाही.

    ReplyDelete
  6. all the above comments are relevant and true !

    ReplyDelete