नुसती गडबड चालली आहे, आतल्या आत. एकच कोलाहल. एका वावटळीत, धूळभरल्या रस्त्यावर एकटंच सोडून दिलंय, जणू कोणी तरी. भिरभिरत जाणा-या पाचोळ्यासोबत मीही दूरवर भिरभिरत जाते आहे... या वेगात स्वतःला सावरताच येत नाही. आसपास काही पुसटशा होत जाणा-या ओळखीच्या खुणा, काही नेहमीची ठिकाणं, एरवी बकाल वाटणा-या काही वस्त्या, मिळाला तर तोही आधार चालणार आहे, मला आत्ता थांबायला. पण ही भिरभिर भिंगरी थांबतच नाही. वेग तसाच आहे. हा पिंजणवारा खूप दूर दूर नेतोय मला...
‘पिंजणवारा’ हा शब्द तरी का आठवला असेल मला? माझा नाही तो! माझ्या आसपासचं कोणीच वापरत नाही हा शब्द. मग तो आला कुठून माझ्यापर्यंत. आह!
ज्ञानदेवांचा आहे हा ‘पिंजण’वारा. पण यांच्यासाठी तो शांतरसाचं प्रतीक. मग माझ्या मनावर याची फुंकर का लागत नाहीये? बधिरपणाला आणखी बधिर आणि पेटल्या वणव्याला आणखी फोफावणारा असला हा, ही कुठली तऱ्हा शोधलीये त्याने, छळवणुकीची! माझ्या अंगांगातून आता हा भैसाट वारा पिंगा घालतोय. कुठल्याही एका विषयावर विचार टिकूच देत नाही तो! मी हेल्पाटते, थकून जाते.
...असहायता, राग, चीड, संताप, बधिरपणा, शांतता... पुन्हा एकदा तेच... पुन्हा पुन्हा तेच! निरर्थक भासणा-या सा-या गोष्टी आपल्याला इतक्या महत्त्वाच्या का वाटतात? नदीचं मूळ कुठून सुरू झालं? आणि ऋषीचं कूळ कुठलं आहे? याच्या शोधाची जबाबदारी आपल्यावर घ्यायची गरजच काय मुळी? इतरांसारखं समोर आलेलं पाणी चुपचाप प्यायचं आणि समोर आलेल्या ऋषीच्या पायावर साष्टांग लोटांगण घालायचं; हे का नाही जमत आपल्याला? सोप्पं झालं असतं की सगळंच! काय समजतो काय आपण स्वतःला? ‘चांदोबा चांदोबा भागलास का’पर्यंत संपलंच नाही आपलं आणि चंद्राचं नातं... पोरवयातली नाती तेव्हाची, तेव्हाच संपवायची असतात न?? आपल्याला नाही जमलं, ते! आता कशाला एवढी काळजी वाटायला हवीये याची?? पिवळसर दिसला एखाद दिवस चंद्र, तर अजूनही आपण विचारतो, “आज बरं वाटत नाहीये का रे तुला? लवकर बरा हो हं!!!”...कोणी सांगितल्यात, या नस्त्या उठाठेवी? आपल्यासारख्या माणसांनी कशाला पडावं, असल्या नस्त्या फंदामध्ये? आपण बरं, आपलं काम बरं!
...पण नाही जमत, खरंच नाही जमत... भिंगरभिवरी वाढत जाते. वेग सोसेनासा होतो. क्लांत मन... आणि आतल्या आतला, फक्त आपला आपल्यापुरताच आकांत! कल्लोळ नुसता. शब्दच मितीला अशा वेळी. ‘आपलं’ असं दुसरं असतं तरी कोण?? अशा वेळी आपलीच कविता आपल्या मदतीला!
- स्पृहा
प्रत्येकाच्या मनातला हा कोलाहल नेहमीच्या ओघवत्या शैलीत आपण व्यक्त केला आहे. आपल्याच मनाशी वाद प्रतिवाद हे सजगतेचे लक्षण आहे . कोणताही वेग सोसण्याच बळ देणारं
ReplyDelete