पेशावरमधल्या त्या निष्पाप जिवांची हत्या करण्यात अाली अाणि सभाेवतालचा सजीवत्वाची जाणीव देणारा अावाज तसाच घुमत असला तरी अातल्या अात मन मात्र मूक हाेऊन गेले. डाेळ्यांत पाणी डबडबण्याइतकेही अवसान उरले नाही. का घडावे असे ? नि:शब्द काेलाहल मांडायलासुद्धा हात थरथरताहेत...
वेगवेगळे आवाज... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...घरातल्या भांड्यांचे, हातातल्या बांगड्यांचे. दुरून जाणारी लोकल, कपड्यांची धोपटणी, सर्व्हिसिंग न केलेली रिक्षा, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, पाण्याचा पंप, विचित्र आवाजात ओरडणारी रस्त्यावरची कुत्री, खिडकीच्या बाहेर फांदीवर बसलेल्या काळ्या पक्ष्याची खोडावर चाललेली अविरत टकटक, रेडिओची खरखर, मस्त जुळलेला तंबोरा, मोबाइलचा रिंगटोन...तो नको म्हणून बंद करावा तर व्हायब्रेशन मोडची थरथर... आणि सगळ्यात मोठी थरथर आहे, ती आतली... म्यूट न करता येणारा आवाज!!!
चार दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या शाळेत घुमले असेच आवाज... बंदुकांच्या निर्घृण फैरींचे, विकृत हास्याचे, अश्राप किंकाळ्यांचे... मग त्यावर काही आवाज... सगळं पचवलेल्या राजकारण्यांचे, मुर्दाड पत्रकारांचे, इकडल्या तिकडल्या कडवट धर्माभिमान्यांचे... कित्येक आवाज... कर्कश्श... पत्ते खेळताना ‘चॅलेंज’ नावाचा खेळ खेळायचो आम्ही. आपले खोटे पत्ते खपवायचे... ‘ऊपर एक, और एक’च्या आरोळ्या मारत आपण कसाही करून डाव जिंकायचा!!! तसलाच प्रकार! मेली ती मुलं, पत्तेच होते काही क्रूर जुगाऱ्यांनी त्यांना हवे तसे फेकलेले! हे ‘ऐकू’ आलेले आवाज... मला भीती वाटली ती न ऐकू आलेल्या आवाजांची... त्या दिवशी ज्यांची बालमनं कायमची चिरडली गेली, अनाकलनीय भीतीने ज्यांचा आवाज, ज्यांची हाक गळ्याशीच गुदमरली, त्या आतून उठणाऱ्या आकांताचं काय?? आपल्याच श्वासाचा आवाज, समुद्राची शांत गाज, षड्जाचा सूर, सकाळी उठल्यावर येणारी पाखरांची किलबिल, रात्रीच्या गार थंडाव्यातली लोरी... यापुढे यातला कुठला तरी आवाज ऐकू शकतील ते चिमणे जीव? लागेल त्यांना शांत झोप? मिळेल त्यांना थोडीशी ऊब? थोडासा विसावा?
फैझ अहमद फैझ नावाचे शायर म्हणून गेलेत,
“थक कर यूँ ही पल भर के लिये आँख लगी थी, सोकर ही न उठें ये इरादा तो नहीं था... ये शहर उदास इतना जियादा तो नहीं था..!!!’’
जरासं थकून पापण्या मिटल्या होत्या हलकेच! डोळे उघडायचे होते, पुन्हा नवी स्वप्नं पाहण्यासाठी, नव्या रुजुवातीसाठी... ते कायमचे का मिटले, कोणी मिटले??? कळलंच नाही... कधीच... ...आताशा या उदासीचाही एक आवाज आहे विकल करून सोडणारा... कातरवेळी डोळ्यांतून पाणी काढणारा...
उत्क्रांतीच्या काळात म्हणे जशी माणसाची जडणघडण होत गेली, तसतसं माणसाचं हृदय आणि मेंदू दूरदूर गेले... सतत कुरघोडी करू लागले एकमेकांवर. ठरवून एकमेकांच्या विरोधी निर्णय देऊ लागले... हृदयाचं ऐकायला गेलं की मेंदू बधिर होतो, आणि मेंदूचं ऐकलं की हृदय फाटून पिळवटून निघतं... सहन करायचंच आहे हे दोन्ही... त्याला पर्याय नाहीच. हे चक्रच कधी सृजनाची शक्ती देतं, कधी विनाशातली उद्ध्वस्तता! आवाज चालू... हृदयाची धडधड, मेंदूची टिकटिक... वेगवेगळे आवाज आहेतच... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत... घरातल्या भांड्यांचे, हातातल्या बांगड्यांचे. दुरून जाणारी लोकल, कपड्यांची धोपटणी, सर्व्हिसिंग न केलेली रिक्षा, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, पाण्याचा पंप, विचित्र आवाजात ओरडणारी रस्त्यावरची कुत्री, खिडकीच्या बाहेर फांदीवर बसलेल्या काळ्या पक्ष्याची अविरत चाललेली टकटक, रेडिओची खरखर, मस्त जुळलेला तंबोरा, मोबाइलचा रिंगटोन... तो नको म्हणून बंद करावा तर व्हायब्रेशन मोडची थरथर... आणि सगळ्यात मोठी थरथर आहे, ती आतली... म्यूट न करता येणारा आतला आवाज!!!
- स्पृहा जोशी
स्पृहा,ही त्यानीच पेरलेल्या विषाची फळे आहेत.तुला दुक्ख होणे स्वाभाविक आहे..कोणत्याही संवेदनशील माणसाला वेदना होतील .मुळात ह्या समाजात चांगले नेते नाहीत.फार रानटी आणि बुरसटलेल्या विचाराचे हे लोक आहेत.जे लोक शिक्षणानी प्रगल्भ झालेत ते दुसर्या देशाचे नागरीकत्व घेउन पाकिस्तान सोडून जातात.
ReplyDeleteस्पृहा,ही त्यानीच पेरलेल्या विषाची फळे आहेत.तुला दुक्ख होणे स्वाभाविक आहे..कोणत्याही संवेदनशील माणसाला वेदना होतील .मुळात ह्या समाजात चांगले नेते नाहीत.फार रानटी आणि बुरसटलेल्या विचाराचे हे लोक आहेत.जे लोक शिक्षणानी प्रगल्भ झालेत ते दुसर्या देशाचे नागरीकत्व घेउन पाकिस्तान सोडून जातात.
ReplyDelete