प्रिशिला सिटेनेइ (तिचे केनियन भाषेतील टोपण नाव गोगो म्हणजे आज्जीबाई). ६५ बर्षे दाई (सुईण) म्हणून काम केलेली प्रिशिला ९० व्या वर्षी प्राथमिक शाळेत जायला लागली. ह्या आधी तिला ही संधीच मिळाली नव्हती. तिच्या वर्गमित्रांपैकी ७ जण तिचीच खापरपतवंडे आहेत. ती गणित, science, english हे शिकतेच आहे पण त्याबरोबरच PT, Dance हयामध्ये सुध्दा उत्साहाने भाग घेते. तिच्या अनुभवीपणामुळे अजून तिच्याकडे बायका शनिवार–रविवारी सुईणपणा विषयी सल्ला घ्यायला येतात. वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिला का वाटलं असेल हे करावंसं? कुठल्याही रेकॉर्डस् मध्ये तिला तिचं नाव नकोय. तिच्याकडे या सगळ्याची काही साधी सोप्पी कारणं आहेत.
१.ज्या केनियात आजही स्त्री-शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या केनियातल्या सगळ्या मुलींना तिला स्वतःच्या उदाहरणातून हा संदेश द्यायचाय की शाळेत जाऊन शिकलंच पाहिजे.
२.तिला सगळ्या वनौषधींची माहिती पुढच्या पिढीसाठी संकलित करून ठेवायची आहे. जे लिहिता – वाचता येत नसल्यामुळे इतक्या वर्षांत तिला करता आलं नव्हतं. आपलं ज्ञान असंच वाया जाऊ नये, यासाठी तिची ही सगळी धडपड आहे.
३.तिला स्वतःला एकदा तरी ‘बायबल’ वाचायचं आहे..!
कुठून आलीये ही असामान्य दृष्टी
आणि हे असं धाडस तिच्यामध्ये? काय प्रेरणा असेल या सगळ्यामागे? आपल्या
महाराष्ट्राशी याची तुलना करायला गेलं, तर असं वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत
कारण आपण ‘महाराष्ट्रा’सारख्या प्रागतिक राज्यात जन्माला आलो. जिथे प्रबोधनाची
परंपरा रुजली. स्त्री- शिक्षणाची चळवळ फोफावली. महात्मा फुले, सावित्रीबाई,
न्यायमूर्ती रानडे, रमाबाई, आनंदीबाई जोशी, महर्षी कर्वे यांनी आणि अशा
कित्येकांनी आपल्या कर्तृत्त्वाने आमच्यासमोर कित्येक दारं खुली करून दिली.
परंपरेच्या मुसक्या सैल केल्या. डोळ्यांना स्वप्नं पहायची सवय लावली. आज आम्हाला
‘शिक्षण घेणं’ यासाठी वेगळा विचार करावाच लागत नाही. ते आमच्यासाठी अत्यंत सहज आणि
स्वाभाविक बनलंय. ज्योत्स्ना भोळे, कमलाबाई गोखले
ह्यांच्यामुळे रंगभूमीवर काम करायला मुलींना मोकळीक मिळाली. केसरबाई केरकर हिराबाई
बडोदेकरांमुळे बायका संगीतसाधना करू शकल्या. या सगळ्यांनीच आपापलं कुल- शील जपत
कलांनासुद्धा एक साजरं, प्रतिष्ठित रूप मिळवून दिलं.
आज ताठ मानेने आम्ही आमची
करीयर्स करू शकतोय ते या साऱ्यांमुळेच. आमचे निर्णय घेऊ शकतोय ते त्यांच्या काळात
त्यांनी सोसलेल्या, अंगावर झेललेल्या अनंत अडचणींमुळेच. पण आपल्या पिढीच्या किती
जणींना हे माहिती आहे? या सगळ्यांबद्दल कृतज्ञता तर सोडाच, पण यांची नावं सुद्धा
पार पुसून टाकलीयेत आपण आपल्या आठवणींतून. प्रीशीला आजींचा संघर्ष आपल्याला आज
करावा लागत नाही, कारण या पिढ्याच्या पिढ्यांनी आपलं रक्त आटवलय त्यासाठी. आपण
मात्र हा सगळा इतिहास विसरून आपलं मनमानी स्वातंत्र्य गृहीत धरतो आहोत..आणि प्रागतिक विचारांचा आपला महाराष्ट्र
दिवसेंदिवस काळाचं चक्र उलटं उलटं फिरवू पाहतो आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या
खुनाचा शोध लागण्याआधीच, ती भीती विरण्याआधीच कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर
झालेला हल्ला हा कशाचं द्योतक म्हणायचं?
डॉ. अरुणा
ढेरेंनी आपल्या एका लेखात फार सुंदर लिहिलंय."सनातनी जीवनपद्धती ही काही
अविचाराने स्वीकारण्याची गंमत गोष्ट नाही,आणि स्वातंत्र्य हे काही खेळण्यासारखे
टाकून देण्याजोगे मूल्य नाही." आपल्या आसपास चाललेल्या सगळ्या भयावह गोष्टी
पाहताना किमान हा विचार, हे स्वातंत्र्य शहाणपणाने टिकवू शकू आपण? नुसत्या पुस्तकी
घोकंपट्टी आणि घसघशीत पॅकेजपलीकडे जाऊन प्रीशीला आजीचा तो आत्मविश्वास मिळवू शकू
आपण?
- स्पृहा जोशी
अगदी खर आहे
ReplyDeleteखरंच ,सगळं सहज शब्दाशी जोडलं गेलंय.
ReplyDeleteस्वातंत्र्य दुसऱ्याला फुलवत असतं हे ,समजण्याची परिपक्वता ज्या दिवशी समाजात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने "स्वातंत्र्य " या शब्दाचा सन्मान होईल आणि "सहज" तेची किमतही कळेल .
ReplyDeleteखरंय!!
ReplyDeletereally ossm...your mind should be always young
ReplyDeletereally ossm...your mind should be always young
ReplyDelete