Monday, March 14, 2016

कळणं...कळून घेणं...

‘पीवी’ज बिग अॅडव्हेंचर’ नावाचा सुंदर चित्रपट पाहिलायत तुम्ही? अतिशय खेळकरपणे संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. एका प्रसंगात तो त्याच्या गर्लफ्रेंडला, डॉटीला म्हणतो, “माझ्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी गोष्टी, ज्या तुला कधी कळल्याच नाहीत, आणि अशाही कितीतरी गोष्टी ज्या तू कधी कळूनच घेतल्या नाहीस.” मला फार आवडला हा संवाद. किती सहजपणे किती मोठी गोष्ट बोलून गेलाय पीवी.
आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट खरंतर. रोज भेटणाऱ्या, जवळच्या- लांबच्या माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर नातं जोडत असतो आपण. त्यावेळेस प्रत्येकासमोर मन मोकळं करायची वेळच येत नाही. तशी गरजही नसते म्हणा. पण हळूहळू वेगवेगळी आवरणं आपल्यावर चढत जातात. परिस्थिती, घटना, व्यक्ती आपल्यावर परिणाम करत राहतात. त्यांच्या सोयीने आपण स्वतःला वाकवत राहतो, बदलत राहतो. गुंतून जातो त्यांच्या विश्वात. त्या गजबजाटात आपण ‘खरे’ कसे आहोत, किंवा ‘होतो’ हे विसरायलाच होतं..
आणि अचानक मग कधीतरी निवांत वेळी ‘आपल्या’ माणसासोबत असताना आपल्या लक्षात येतं, की नको त्या कोलाहलात किती पुसट होऊन गेलंय सगळं. जसे आपण बदललो, तसाच आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा माणूसही बदलला. कळलंच नाही इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना. फार गृहीत धरलं सगळंच... आपली प्रायव्हसी, आपली स्पेस सगळं हातात आलंय, पण समोरचा माणूससुद्धा त्याच वेळेस त्याची प्रायव्हसी, त्याची स्पेस शोधत निसटून गेलाय कुठेतरी. तर कुठे कुठे नेमका याच्या उलट प्रकार. दोघंजण इतके बुडून गेलेले एकमेकांमध्ये की कोणालाच काही धड अस्तित्व नाही. वेगळ्या वाटांची आवड नाही. एकाने दुसऱ्यावर केलेली कुरघोडी संपवून टाकणारी. ‘तुझं सुख तेच माझं सुख’ याचं अतिरेकी टोक. इतकं, की निर्भेळ स्वातंत्र्याचा आनंदच नाही. आणि मग एक मुक्कामावर पोहोचून लक्षात येतो भलताच प्रकार, एकमेकांत इतके आकंठ बुडूनही माणूस कळला नाहीच की आपल्याला!!  पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”
थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी हे असं वाटून गेलेलं असतंच. भूमिका बदलतात फक्त. कधी आपण ‘पीवी’ असतो, तर कधी ‘डॉटी’. काही गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत, आणि कित्येक गोष्टी ज्या आपण कळूनच घेतल्या नाहीत. वरवर पाहत राहिलो सगळंच. चित्रपटाच्या शेवटी डॉटी पीवीला विचारते, “इतका आटापिटा केलास, आणि आता फिल्म अर्धवट सोडून चाललायस?” पीवी म्हणतो, “मला हे ‘बघायची’ गरज नाही डॉटी; मी हे जगलोय!!” आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या माणसांशी, गोष्टींशी हे ‘असं’ जोडून घेता येईल आपल्याला? वरवरचा चित्रपट बघण्यापेक्षा, त्यात शिरून तो जगता येईल..?? 

स्पृहा जोशी

10 comments:

  1. sundar..apratim lekh. Spruha..

    ReplyDelete
  2. Agadi kharay spruha..ani tya dusrya prakarat- to kunamadhe tari gurfatnyacha aanand itka vyapun takto na aayushyala, ki samjun ghyaychi na garaj vatate.. Na usant milte. Kiman tas guntlel aseparyant tari!!

    ReplyDelete
  3. "पीवी’ ला फक्त स्वत:च्या भावना "डॉटी" ने समजून घ्याव्या अस का वाटत ? . "डॉटी" च्या भावनांचं काय ? प्रत्येकाला आपल्या "मी " पणावर असलेल्या प्रेमातून हे होत असावं का ? अलीकडे "तो आणि ती " हे सुधीर गाडगीळ याचं पुस्तक वाचलं. दोघांच्या भावना त्यांच्या perspective ने समजून घेण्याची आवश्यकता कळली .

    ReplyDelete
  4. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”.....kya baat hai.....sundar lekh Spruha...

    ReplyDelete
  5. खरच अश्या बऱ्याच गोष्टी काही कळून घेण्याच्या तर काही कळवायच्या नादात राहून जातात....

    ReplyDelete