Thursday, July 25, 2013

विद्या ताई

प्रिय विद्याताई ,
माझ्या अभिव्यक्तीचं 'कविता' हे माध्यम तुम्ही मला शोधून दिलंत. माझ्यासाठी तुमचं 'असणं' खूप महत्त्वाचं आहे. ही  कविता तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित… 

एक सृजनाचा स्पर्श 
लाभे असा अवचित,
पेरूनिया जाई स्वप्ने 
कसा हसऱ्या डोळ्यांत.. 

काही बोलावे- सांगावे
कधी उगीच भांडावे,
गुरुशीच मैत्रीचे हे 
नाते आगळे जडावे.. 

नाही अडकली कला 
चित्रकलेच्या तासात,
उधाणल्या पाखरांच्या 
रंग भरले मनांत.. 

माणसात धुंडाळला 
नवा पोत, नव्या रेषा;
कितीकांना शिकविली 
बोलायाला नाट्यभाषा!

सारे बोलणे अबोल 
मनी आभाळाची माया ,
मन हिरवे अजुनी 
झिजे चंदनाची काया .. !!

- स्पृहा.      


Sunday, December 18, 2011

गर्दी

गर्दी.. खूप तिटकारा आहे मला गर्दीचा.. माणसांचा समुद्र आपल्या अंगावर फुफाटत येतोय असं वाटतं. संध्याकाळच्या वेळी रेल्वे स्टेशन वर पाऊलही टाकायची भीती वाटते.. पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण एक अनुभव आला गेल्या काही दिवसात.. आणि गर्दी सुंदर कशीदिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला.. मध्यंतरी सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचा योग आला..  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कल्पनेतून साकारलेला, संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेला हा महोत्सव. पुण्याच्या गुलाबी थंडीतली हसरी संध्याकाळ आणि सुरांच्या  चांदण्यात न्हाऊन निघणारे हजारो  रसिक... आकड्यांच्या भाषेत 'गर्दीच'..

पण विलक्षण सुंदर.."गेल्या ५९ वर्षांच्या श्रीमंत परंपरेचं हे संचित आहे. आपण काहीतरी खूप छान ऐकायला आलोय.. पवित्र असं काही इथून घेऊन जाणार आहोत", हा आनंद त्यातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला.. अतिशय सामान्य मंडळींपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत आणि मध्यमवर्गीयांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच उपस्थिती.. साठ वर्षांच्या आजी आजोबांपासून सतरा वर्षांच्या युवकांपर्यंत सगळ्यांना कोण उत्साह.. जागतिक कीर्तीचे कलावंत आपल्या अंगणात येऊन कलेचा नजराणा आपल्यासमोर ठेवतायत हा सार्थ अभिमान, त्या परंपरेच्या जनकाविषयी अपार कृतज्ञता.. आणि संगीत आणि केवळ संगीतात भिजून जाण्याची अनिवार ओढ... कुठेही थिल्लरपणा नाही, अभिजाततेला धक्का लागेल अशा 'पॉप्युलर डिमांड्स' नाहीत.. संपूर्ण तन्मयता.. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं.. मूर्तिमंत उर्जा होती..   



नकळत पाणी आलं डोळ्यांत. मनावर कायमचा ठसा उमटवून गेलीये ती संध्याकाळ. ती गर्दी एकदम आपलीशी वाटायला लागली.. हा अनुभव देणाऱ्या 'गर्दी'ला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होत होतं. मनात तृप्तीचे सूर रेंगाळत असताना वपुंची वाक्य आठवली.. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते, तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला त्यांच्यावर इन्कमटॅक्सही बसला असता.. मग एक माणूस साधा हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांच देणं' चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची.." ते देणं देणारी अशी ती.. सुंदर गर्दी !!!!

Saturday, November 19, 2011

'त्यात काय एवढं'...!!!!

तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? झपाट्याने बदलत जाणाऱ्या मध्यमवर्गाचं निरीक्षण करायचं असेल तर या एक नंबर जागा आहेत.. खूप मजेशीर दृश्य.. गेल्या दशकामध्ये मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागला, आणि हळूहळू मॉल कल्चर आपल्याकडे रुजायला लागलं. अशा सुपर मार्केट्स मध्ये आता स्पष्ट दिसतो, तो आपल्या लोकांचा बदललेला स्वभाव. हसरेपणा, ऋजुता यांचा लवलेश नसणारा..चढलेली भुवई, आणि चेहऱ्यावर तुच्छतादर्शक भाव.. आणि आपण किराण मालाच्या फडतूस दुकानात नाही, तर एसी मॉल मध्ये शॉपिंग करतोय या गोष्टीतून येणारा एक विचित्र अहंभाव! हा माजोरीपणा कशातून येत असेल?

त्यादिवशी एका सुपर मार्केटमध्ये गेले होते. वर केलेल्या वर्णनासारखाच एक सूट- बूट, कॉलर, टायवाला इसम, हातात उंची आयफोन, तंद्रीत चालताना त्याची  ट्रॉली एका छोट्या मुलीचा पायावरून गेली. ती बिचारी मुलगी कळवळली. बाजूला तिची आईउभी होती. साहजिकच तिने त्या माणसाला हटकलं, अगदी सौम्य शब्दात.. तर तो तिच्यावरच गुरकावला.."हां.. मग ठीक ए ना.. त्यात काय एवढं.. होतं असं.. एवढं काय नाटक!" अरे...ही कुठली पद्धत??? अर्थात तो विषय वाढला, चार तमासगीर जमले, बाचाबाची होऊ घातली.. बोंबाबोंब, कर्णकटू, कर्कश आवाज.. सगळी शांतता हरवून गेली.. वातावरणाच विसकटलं.. आणि ती छोटी मुलगी मात्र एका बाजूला एकटीच उभी होती.. केविलवाणी! जो प्रसंग, "आय एम सॉरी" म्हणून सहज संपला  असता, त्याजागी 'त्यात काय एवढं' या बेपर्वा, मुर्दाड उत्तराने हे सगळं रामायण  घडलं.

किती विचित्र आहे हा एटीट्युड.. म्हणजे ज्या बेपर्वा वेस्टर्न अप्रोचला, त्यांच्या 'व्हॉटेव्हर' कल्चरला आपण उठसूठ नाकं मुरडतो, त्याला शब्दशः समानार्थी आहे हे 'त्यात काय एवढं'!! आमच्या वयाच्या सगळ्यांमध्येच आलीये ही वृत्ती. प्रेमात पडणं, त्यात अयशस्वी होणं, एखादी परीक्षा देणं, त्यात घसरून पडणं, पैसे उडवणं.. यादी वाढते, वाढतच जाते.. सगळ्याला उत्तर एकच..'त्यात काय एवढं'!! आणि आपली कमाल तर त्याहूनही पुढे आहे. या सगळ्याला एकदाच 'नशीब' असं शुगर कोटेड आवरण चढवलं की खल्लास! आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं..' नशीब!'; सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये..'नशीब!' बसच्या रांगेत कोणीतरी तुम्हाला धक्का देऊन घुसलं, 'नशीब!' एखाद दिवस तुम्हीच समोरच्याला धक्का देऊन विंडो सीट पटकावलीत.. तेही 'नशीब'! (यावेळेस स्वर मात्र हसरा!) कशी मस्त साखळी आहे नाही? भारतीय मानसिकतेला तसंही समोरच्याला 'सॉरी' म्हणणं अपमानास्पदच वाटत आलंय म्हणा! ' मोडेन पण वाकणार नाही' हा आपला इतिहास प्रसिद्ध बाणा नाही का! 'चांगलं' असण्यापेक्षा 'कणखर' असण्याला का इतकं महत्त्व? बरं तो कणखरपणासुद्धा आयत्या वेळेस नांगी घालतोच.. आपल्या फायद्याच्या वेळेस बरोब्बर लवचिक होतोच! मग आपल्यापेक्षा कमकुवत लोकांमध्ये हे शौर्य कशाला पाजळतो आपण? त्यामुळे अशा स्वभावांना 'सॉरी'पेक्षा 'त्यात काय एवढं' हेच जवळचं वाटणार! वादातला शेवटचा शब्द.. ब्रह्मवाक्य हे आपलंच असायला हवं! ते त्या मुळमुळीत 'सॉरी' ने थोडंच साधलं जाणार!

विचार करून बघा.. आपल्या नकळत असेच वागत असतो आपण. लहानपणापासून किती जणांना 'प्लीज' म्हणायची सवय असते? बालहट्ट हे नेहमीच किंकाळ्या आणि आरडाओरड्याने व्यापलेले असतात.. त्यांचं 'कित्ती गोड!!' असं कौतुक केलं जातं. आणि मग तीच सवय लागत जाते. लहान असतानाचे हे  लाडिक चाळे मोठं झाल्यावर सार्वजनिक आयुष्यात समोरच्याला भीषण वाटू शकतात, अगदी आपण नकोसे वाटू शकतो, हा विचार किती पालक करतात? त्यामुळे 'नम्रता' हे शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवलेलं, आणि इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच 'सोडून द्यायचं' एक मूल्य उरतं..

त्यामुळे हा माझा लेख वाचल्यावर समजा तुमच्या मनात आलं, 'त्यात काय एवढं' तर ती तुमची चूक अज्जिबात नाही बरं का!! आणि मीही तुमच्यातलीच असल्यामुळे, 'सॉरी' म्हणण्याच्या फंदात मीही पडणार नाहीच!!! कारण एकच...'त्यात काय एवढं'...!!!!

Saturday, November 12, 2011

प्रार्थना

प्रार्थनेला उत्तर मिळतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. अगदी कट्टर नास्तिक आणि निरीश्वरवादी सोडले, तर आपण सगळेच दिवसातून एकदा तरी प्रार्थना करतो. कधी मोठ्याने, तर कधी अगदी मनातल्या मनात. देवाला सीक्रेट सांगितल्यासारखे! कधी आपल्या जवळच्या माणसासाठी, त्याला हवं ते सगळं त्याला मिळावं म्हणून, कधी कोणाची तब्येत सुधारावी म्हणून, तर कधी आपल्याच दुःख्खाचा विसर पडावा म्हणून. पण बऱ्याचदा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येतातच असं नाही; मग आपली आणखी चिडचिड होते, आणि आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना पोहोचलीच नाही की काय! का आपल्याला हवं ते उत्तर नाही मिळालं..?? पण का कुणास ठाऊक, पुन्हा डोळे मिटतात, हात जोडले जातात. कदाचित लहानपणीच्या “शुभंकरोति” आणि “ दिव्या दिव्या दीपत्कार” चे संस्कार असतील. एखाद्या गूढ शक्तीसमोर स्वत:ला सरेंडर करणं ही किती सुंदर कल्पना आहे. देवळात जाऊन दर्शन घ्यायला आवडतं मला. म्हणजे मंगळवारी सगळी कामं सोडून रांगेत उभं राहणं आणि नवसाची लाच 'ऑफर' करणं, असं दर्शन नाही हं.. खरंतर अशा ठिकाणी काही मागण्याची इच्छासुद्धा होत नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर, कोकणात हरिहरेश्वर, परशुरामाचं मंदिर, पुण्याचा तळ्यातला गणपती, शिवाजी पार्कचं उद्यान गणेश मंदिर.. आणि अनेक ठिकाणची गावागावातली अस्पर्श, 'मार्केट'चा स्पर्श न झालेली मंदिरं... तिथला उदबत्ती, धूप, दीप,कापूर, प्रसाद, यांचा एकत्र जाणवणारा  सुगंध, अनवाणी पावलांना जाणवणारा फरशीचा गार स्पर्श, काहीतरी अनामिक भावनेने भरून आलेला  ऊर... काही न मागताच सगळं काही पावल्याचं समाधान देऊन जातात!
मला स्वतःला आपली मंदिरं, छोट्या गावातली देवळं जितकी आवडतात, तितकीच आवडतात चर्चेस. जर्मनीला गेले असताना तिथल्या भव्य चर्चेस मध्ये जायला मिळालं. नकळत्या वयात ती सुंदर चित्रं फार खोलवर कोरली गेली मनावर. तिथल्या घंटांचा नाद, गूढ शांतता, मेणबत्त्यांच्या धूसर प्रकाशात जाणवणारा शांत काळोख, आणि प्रेमळ चेहऱ्याचे शांत पाद्रीबाबा.... जसंच्या तसं आठवतंय हे चित्र. आणि अगदी जसंच्या तसं आठवतंय तिथे त्यांनी सांगितलेलं प्रार्थनेचं महत्त्व... "अगदी मनापासून प्रार्थना करूनसुद्धा आपल्यासोबत जे घडायचं ते घडतंच.. मग त्या प्रार्थनेला काय अर्थ? देवाने आपली प्रार्थनाच ऐकली नाही, की आपलं मन किती ठेचकाळलंय, हेच त्याला कळलं नाही! मग प्रार्थना तरी कशाला करायची त्याची? तो असतो, हे मानणंच सोडून द्यावं का?...असे प्रश्न मला बरेच अडले-नडलेले लोक विचारतात. पण मला असं वाटतं की जेव्हा हा विचार येतो, तेव्हाच खरंतर प्रार्थना करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आधी कधीही नव्हतं इतकं महत्त्वाचं. कदाचित देवाला वाटत असेल, आपण आत्ता त्याची आठवण काढावी. आपल्याला जे हवंय ते मागत राहणं, म्हणजे 'विश्वास' नाही; कितीही दुःख्ख आली तरी देवाच्या 'देव'पणा वर शंका न घेणं, म्हणजे 'विश्वास'...." किती सोप्या शब्दांत त्यांनी प्रार्थना, देव याबद्दल सांगून टाकलं होतं...
आणि त्यानंतर एक मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं. आपण आपल्या देवावर विश्वास ठेवला, तर तो आपल्यावरची नजर कधीच काढून घेणार नाही.. आपण जे त्याच्याकडे मागितलंय, ते तो कदाचित कधीच आपल्याला देणार नाही, पण त्याच्या मनात त्याने आपल्यासाठी त्याहूनही काहीतरी बहारदार योजून  ठेवलं असणार! अश्रू आणि दुःख्ख यांच्या पलीकडचं काहीतरी खूप सुंदर.. तेवढं गिफ्ट तर तो मला देणं लागतोच!!! कारण प्रार्थनेला उत्तर मिळतं यावर माझा ठाम विश्वास आहे..!!

Tuesday, October 25, 2011

यशस्वी

यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा एक 'पेस' असतो... आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक 'स्पेस' असते.. हे सगळं कळत असून 'यश' खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही कार्यक्रमानंतर 'कार्यक्रम छान झाला', यापेक्षा "आज पाकीट आपल्याला किती, आणि 'त्याला' किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता कुठे सुरुवात होते आहे करियरला... जगण्याला. पण 'जगणं' नेमकं कळायच्या आधीच ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.

हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणंसौंदर्याचं कौतुक करता येणं  म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?

हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं. माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे वागायला शिकतात त्यांना आपण 'यशस्वी' अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग त्यांच्या 'सर्कल' मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने 'यशस्वी' होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की काय हवंय हे  ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची. ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे जमलं की मग आलंच सगळं !


माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार सुरु केलाय.. 'समाधानी' होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात 'यशस्वी' होता येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!


Thursday, October 20, 2011

स्वप्न माझे..

हे उमलत्या पाकळ्यांचे स्वप्न माझे 
चिंब भिजल्या आठवांचे स्वप्न माझे..

चांदण्यांचा खेळ चाले शांत राती,
हासले पाहून त्यांना स्वप्न माझे..

आज येथे साद दे हळुवार कोणी
पाहते तो थांबलेले, स्वप्न माझे..

वाट माझी वेगळी ही शोधिली मी,
भेटले वाटेवरी अन स्वप्न माझे..

एकटी मी चालले वाटेवरी या,
आज माझ्या सोबतीला स्वप्न माझे..

-स्पृहा. 

Friday, September 30, 2011

नैतिकतेचे डांगोरे

'गॉसिपिंग'  हा आपला राष्ट्रीय आवडता छंद आहे. कोणीही उठून कोणाबद्दलही  काय वाट्टेल ते बोलू शकतो. 'भाषणस्वातंत्र्य' ही तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेली खास देणगी आहे. जिचा चोख फायदा घेत आपल्या दुधारी जिभेचे धारदार दांडपट्टे सतत चालूच असतात. बरं आपल्याला सगळ्या विषयांतलं सगळं कळतं, आणि त्यावर अजिबात लायकी नसतानाही ठाम मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असा एक विशेष समज आपल्या मनीमानसी रुजलेला आहे. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीपासून ते कतरीनाच्या बिकीनीपर्यंत, आणि अण्णा हजारेंच्या उपोषणापासून ते ओसामा बिन लादेनपर्यंत कुठल्याही गोष्टीवर सर्व लहानथोर प्रचंड अधिकारवाणीने बोलत असतात. त्यातून 'नीतिमत्ता' हे तर राखीव कुरण! तिथे जर कोणी घसरलं, की मग तर समस्त संस्कृतीरक्षक बाह्या सरसावून उभे ठाकलेच. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे, सध्या चालू असलेला (माझ्या मते) नॉनसेन्स वितंडवाद.



'मणिपूरची लोहकन्या' म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं, की "डेझमंड कुटीन्हो नावाच्या गोव्यात जन्मलेल्या ब्रिटीश लेखक, सामाजिक कार्यकर्त्यासोबत माझं अफेअर चालू आहे." झालं. वादाचा प्रचंड धुरळा उडाला. तिचे विरोधकच  नाही, तर समर्थक सुद्धा हडबडले. ही बातमी खरी नसून ती शर्मिलाविरुद्ध कसलीतरी भयानक 'स्टेट कॉन्स्पिरसी' आहे, असंही बोलून झालं. 'एलिट' वर्गाने नेहमीप्रमाणे "तिच्या आयुष्यात तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे", असं म्हणून सोयीस्करपणे विषय झटकून टाकला. म्हणजे यांच्या 'ड्रिंक पार्टीज' मध्ये चघळायला विषयही झाला, आणि सामान्य मध्यमवर्गीयांच्या नीतीमत्ताविषयक कचकड्याच्या कल्पनांना भूकंपाचे धक्केही बसायला नकोत !
माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? गेली दहा वर्ष ही एकटी बाई कोणतेही मिडिया स्टंट न करता मणिपूर मधून 'आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट (AFSPA) हा अन्यायकारक कायदा रद्द व्हावा म्हणून उपोषण करते आहे, सरकार नामक अजस्त्र राक्षसाशी एकटी हिंमतीने झुंजते आहे, अनन्वित छळाला सामोरी जाते आहे, तिच्या कार्याच्या जोरावर तिथल्या लोकांच्या गळ्यातली ती ताईत बनली आहे, ही सत्य परिस्थिती केवळ वरच्या एका घटनेमुळे आपण नाकारायची??

तिचं आयुष्यभराचं सगळं कर्तृत्व या एका घटनेने कस्पटासमान ठरवायचं?? का कोणाला तिच्या बचावासाठी हे म्हणण्याची गरज पडावी, की "अहो, हे कसं शक्य आहे, कारण शर्मिला तर कडक बंदोबस्तात पोलीस पहाऱ्यात होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यावर इतकी कडक नजर होती, की तिचे कुटुंबीयही तिला भेटू शकत नसत. मग हे अफेअर वगैरे कसं शक्य आहे?" का वेळ यावी हे बोलायची? किंवा हे क्लॅरिफिकेशन घाईघाईने द्यायला लागावं, की "ते दोघं आता 'एंगेज्ड' आहेत, त्यामुळे अफेअर करून गमावलेलं(?) सिव्हील सोसायटी मधलं स्थान आता शर्मिलाला परत मिळालं आहे!!!" कुठल्या नैतिकतेचे डांगोरे पिटणं चालू आहे आपलं? बाकी सगळं सोडून देऊ, पण एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून शर्मिलाचा 'प्रेमात पडण्याचा अधिकार' हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?



तिचं 'बाईपण' ही गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवतं. कारण कुठल्याही 'आदर्श स्त्री'ला आपल्याकडे 'देवी माँ' होऊनच राहावं लागतं, जगावं लागतं. तीही कालीमातेसारखी कठोर नाही, तर मध्यमवर्गीय पितृसत्ताक मानसिकतेला आवडेल, झेपेल, पचेल इतकीच साधी, सोज्वळ, पतिपरमेश्वरपरायण 'सीता' म्हणून. त्यामुळे ही मणिपूरची लोहकन्या शर्मिला; शक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा, आणि त्यागाचं प्रतीक असणारी शर्मिला, हिने प्रेमाबिमासारख्या क्षुद्र मानवी भावनांमध्ये अडकून कसं चालेल? तिने असा विचारही करणं, ठार चुकीचंच नाही का! अब्रह्मण्यम!! आपल्याकडच्या चॅनल्सनाही त्यांचा TRP वाढवायला, हे असले विषय चघळायला बराच वेळ असतो, त्यामुळे त्यांनी तर साधारण, "जिला आपण सर्व आदर्श मानतो, अशा एका कमकुवत मनाच्या स्त्रीने आपल्या भाबड्या निष्ठावंतांची केलेली घोर फसवणूक..!!" इतक्या हीन पातळीला शर्मिलाचा विषय आणून ठेवलाय. एका पेपरने तर 'शर्मिलाला तिच्या प्रियकराने अॅपलचं मॅकबुक भेट दिलं' अशीही बातमी छापली. पण दुर्दैवाने कुठल्याही पेपरने त्यावर, 'सो व्हॉट?' , 'मग काय?' असा स्टॅंड घेतलेला नाही. आपल्याकडे राज्यकर्ते आणि सेलिब्रिटीज यांची असंख्य वेळा घडणारी- तुटणारी अफेअर्स आपल्याला चालतात. त्या गोष्टीवर त्यांचं 'ग्लॅमर' आणि आपली 'क्रेझ' सहज पांघरुण घालते. मग हाच न्याय त्या मणिपूरच्या 'आयर्न लेडी' ला का नाही? तिच्यावर 'नीतीमत्ताहीन' असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी हा विचार का नाही? 'प्रेमात पडण्याचा अधिकार' तिच्या नशिबी का नाही..??!!