Sunday, June 25, 2017

तरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे!!

एके काळी उत्तम दर्जाची जिमनस्टिक्स खेळाडू असलेली स्पृहा ही खऱ्या अर्थाने रमलीय ती अभिनयाच्या क्षेत्रात . अनेक नाटके, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही गुणी अभिनेत्री . पण तिचा श्वास आहेत ते शब्द! ..कविता...
रंग...आणि सूर... त्यावर टाकलेला हा प्रकाश !



सुंदर रूप , अत्त्यंत संवेदनशील , प्रगल्भ असा अभिनय आणि अत्यंत भावस्पर्शी अशा कविता म्हणजे स्पृहा... आजची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी !’डोन्ट वरी बी हॅप्पी’ सारखं नाटक असो वा‘उंच माझा झोका’मध्ये तिने साकारलेली रमाबाई रानडेंची आव्हानात्मक भूमिका असो, तिच्या अभिनयाची चमक तिच्या सगळ्याच भूमिकांतून दिसली.मात्र अभिनय हा जरी तिचा ध्यास असला आणि ज्याचा ध्यास आहे त्यातच करिअर करायला मिळत असल्याने ती प्रचंड खुश असली तरी ती मनापासून रमते ती मात्र कवितांमध्ये ..पुस्तकांमध्ये... सुरांमध्ये आणि रंगांमध्ये सुद्धा!
ती सांगत होती, ‘’मी शुटींगसाठी, नाटकांसाठी कुठेही गेले वा मालिकांच्या चित्रीकरणात व्यस्त असले तरी माझ्यासोबत कायम एक पुस्तक असतंच; आणि त्याच बरोबर माझी आवडती गाणीसुद्धा. जरा रिकामा वेळ मिळाला की एकीकडे कानात हेड फोन घालून गाणी ऐकत ऐकत पुस्तक वाचायचं हा माझा छंद आहे.मला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं..अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य संगीतापर्यंत...पणसाॅफ्ट म्युझिक आवडतं. ढॅणढॅण म्युझिक नाही आवडत. शास्त्रीय संगीतात मला किशोरीताई आवडतात, भीमसेन जोशी , मालिनी राजूरकर, उस्ताद राशीद खान आवडतात, कौशिकी चक्रवर्ती आवडते. तर सुगम / चित्रपट संगीतात अर्थातच लताबाई , किशोरदा, रफी, आशाताई, सोनू निगम , शंकर महादेवन, श्रेय घोषाल हे सगळे आवडतात.मीही गोविंद पोवळेंकडे दीड दोन वर्षं गाणं शिकलेय.बऱ्यापैकी गाऊ शकते. जे मला हसणार नाहीत याची मला खात्री असते अशांपुढे मी गातेही .....मात्र पुढे वेळेअभावी  गाणं शिकणं जमलं नाही.मात्र सूर सतत सोबत करत राहिले !’’
मात्र स्पृहाची खरी दोस्ती आहे ती शब्दांशी ...कवितांशी....तीअप्रतिम कविता करतेआणि तितक्याच उत्कटतेने ती कविता वाचतेही !
ती म्हणाली,’’ हो हे खरंय ! कविता हे माझं मध्यम आहे . माझा श्वास आहे... माझी‘प्रायव्हेट स्पेस’ असंही म्हणता येईल.अभिनय हा माझा ध्यास असला व त्याच क्षेत्रात करिअर करण्याचं भाग्य मला मिळालं असलं तरी या क्षेत्राचं क्षणभंगुरत्वकाम करताना सतत जाणवत राहतं. इथली प्रसिद्धी , इथलं कौतुक हे सारच औट घडीचं आहे याची प्रखर जाणीव होत राहते.....कधीवैफल्याचे, उद्विग्नतेचे क्षण येतात, कधी कंटाळा येतो .. कधी‘सीन’गणिक भावनांचे‘ऑन–ऑफ’करताना तर कधी कुणाचे मूड सांभाळताना ...कधीघर आणि करिअर याचा तोल साधताना तर कधी आमचं माणूसपण व आमचं अभिनेत्री असणं यात फरक न करता येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भार सोसताना सगळंच असह्य होत जातं.याचा निचरा होण्याची तीव्र गरज जाणवते .. तेव्हा माझी कविता मला साथ देते . इतरकुणी हे कोणाकडे तरीबोलून मन मोकळं करतात . मी कवितेतून व्यक्त होते..कवितेतूनच मन मोकळं करते...
उदाहरण द्यायचं तर मी जेव्हा ‘उंच माझा झोका’ मध्ये ‘एण्ट्री’ केली तेव्हा तोपर्यंत छोट्या रमाचं पात्र लोकप्रिय झालेलं होतं. आता मला मोठी झालेली रमा नव्याने प्रस्थापित करायची होती . ते‘ट्रान्झिशन’ लोकांच्या पचनी पडेल , ते नव्या रमाला स्वीकारतील, आधीच्यारमाचा प्रभाव पुसला जाईल हे पाहण्याचं, साध्य करण्याचं आव्हान माझ्यापुढे होतं. ते आव्हान झेलताना मी व्यक्त होण्यासाठी कविता लिहिली ‘ पर्व‘ नावाची...माझी कविता अशी सतत मला साथ देत असल्याने मला कुणाकडे जाऊन मन मोकळं करायची गरज भासत नाही. तसंच अभिनय करतानाही मला त्याचा उपयोग होतो ‘’
शब्दांइतकीच स्पृहा रमते ती रंगकामात .चित्रं रंगवण्यात.....
ती हसत हसत सांगते,’’ मला अजिबात चित्रं काढता येत नाहीत.पण मला चित्रं रंगवायला खूप आवडतात . मी एकदा ‘क्रॉसवर्ड’मध्ये फिरत होते तेव्हा मला तिथे खूप ‘कलरिंग बुक्स’ दिसली . मी ती घरी घेऊन आले. रंगीत पेन्स आणली. मला जेव्हा जेव्हा रिकामा वेळ मिळतो तेव्हा ती चित्रं रंगवत बसायला मला खूप आवडतं. मी त्यात मनापासून कितीही वेळ रमते.मी त्याबाबत इंटरनेटवरही माहिती शोधली. तेव्हा माझ्या असं लक्षात आलंकीही खूप चांगली थेरपी आहे . सायकोथेरपी...यात तुम्ही खूप मोकळे होत जाता ...मलाखरंच तसंच होतं. त्यात खूप आनंद मिळतो ...मोकळं झाल्यासारखं वाटतं..’’
स्पृहाला आणखी काय आवडतं माहित आहे?
ती घरात असली, तिला जरा रिकामा वेळ असला की कपाट काढून , रिकामं करून ते पुन्हा लावायला खूप खूप आवडतं
ती म्हणाली, “ लग्नाआधीसुद्धा , आईकडे असताना माझ्या बहिणीचे व माझे कपाट मीच लावायची .मला ते मनापासून आवडतं..सगळे कपडे खाली काढायचे , नीट घड्या घालून पुन्हा जागच्या जागी ठेवायचे, सगळी ज्वेलरी काढायची , ती पुन्हा नीट लावायची हा माझा अत्यंत आवडता ‘टाईमपास’ आहे .माझा सगळा रिकामा वेळ मी त्यात सत्कारणी लावते. मात्र घर सजावटीतलं मला फारस समजत नाही. त्यामुळे घराची अंतर्गत रचना बदलणं, त्यात नवीन काही करणं हे काही मी फारसं करायला जात नाही ...पण मला स्वयंपाक आवडतो . त्यामुळे मला अगदी ५-६ तास रिकामा वेळ आहे असं जर लक्षात आलं तर मग मी स्वयंपाक घरात जाऊन माझे काही खास पदार्थ बनवते . पण केक  वगैरे सारखे किचकट, वेळखाऊ पदार्थ बनवायला मात्र मला नाही आवडत .त्यापेक्षा मला पुस्तक वाचायला आवडेल...’’
स्पृहाचा अभिनय, तिचे लिखाण तिचा चेहरा जितका पारदर्शी आहे तितकंचतिचं बोलणंही पारदर्शी आहे...नितळ...पण आशयघन !..इतक्या लहान वयात इतकी समज,प्रगल्भता अभावानेच दिसते ...

- जयश्री देसाई (Weblink - http://epaper.tarunbharat.com/c/20068060)

Sunday, October 30, 2016

आठवणीतील दिवाळी...

दिवाळीच्या दिवसांत मी एका वेगळ्याच झोन मध्ये असते. वर्षातला हा माझा सगळ्यात आवडता सण. रंग, प्रकाश यांची झिलईदार सरमिसळ असलेला, कुठलेही अवडंबर नाही, नको त्या भावना, अस्मितांना चुचकारणं नाही, पूजा असेलच, तर ती वातावरणातल्या सौंदर्याची, सौहार्दाची.. फराळाचा तिखट गोड वास, चकलीच्या भाजणीचा, बेसन खमंग भाजल्याचा, चिरोट्याच्या पाकाचा, चिवड्याच्या फोडणीचा, सगळ्या संवेदनांना जागं करणारा हा माहौल, अभ्यंगस्नानाचं गरम पाणी, सुगंधी तेल, उटणी...

आम्हा चौघी-बहिणींना माझी आजी दर दिवाळीत 'मोती' साबण द्यायची गिफ्ट म्हणून, माझ्या आठवणीतील दिवाळी म्हटली की 'मोती साबणा'चा सुवास अजूनही गंधित होत जातो. मी कधीच फटाके उडवले नाहीत. एखादी फुलबाजी, भुईचक्र आणि डोक्यावरून पाणी म्हणजे अनार. त्यापलीकडे कधी जाताच आलं नाही. तडतडी फुलबाजी सुद्धा हातावर ठिणग्या उडतात म्हणून चार कोस लांब धरायची. केपाची बंदूक सुद्धा नाही. त्यातून उलट्या बाजूने टिकल्या फुटतील ही भीती मला अगदी सातवी आठवीपर्यंत वाटत राहिली, फटाक्यांची भीती वाढायला मला वाटतं, दोन तीन गोष्टी असाव्यात, एक तर पहिली भीती, खूप मोठ्या आवाजाची. दुसरी, माझ्या आईच्या हातावर ती दुसरी तिसरीत असताना अनार फुटला होता. ही गोष्ट कधीच डोक्यातून गेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला अनार फुटताना उडणाऱ्या कारंज्या आधी 'हा आपल्या हातावर फुटला तर काय'? ही भीती मला पोखरून काढायची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची भीती एक मराठी सिनेमा पाहताना डोक्यात बसलेली, सविता प्रभुणे आणि सतीश पुळेकर आहे त्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात त्यांची दोन मुलं फटाक्यांनी भाजून मरतात असं काहीसं दृश्य होतं त्या सिनेमात. ते मी कधीच नाही विसरू शकले. अगदी आताही..

माझा आवडता प्रकार होता रांगोळ्या. माझी आई आणि  काकू नक्षत्रासारख्या रांगोळ्या काढतात.  आजी तर नुसत्या हाताने मोर, लक्ष्मी काढायची. आम्ही बघत बसायचो.. आई आणि काकूच्या मोठाल्या ठिबक्यांच्या रांगोळ्या.. बारीक रेषा, टोकदार कोन आणि सुरेख सारखे रंग. रोज नवी रांगोळी. पुढे मग मी आणि क्षिप्रा त्यात वाटेकरी झालो. दाराच्या दोन बाजूंना आम्हाला एक एक चौकोन मिळायचा. वाण्याकडून ठिबक्यांचा कागद, रांगोळी, चमकी, रंग आणि गेरू आणायचा. अर्धा तास गेरुत हात बरबटून आपापला चौकोन सारवायचा. मग शंभरदा तो वाळेपर्यंत बोट लावून बघायचं आणि घाईने कडेचा गेरू ओला असतानाच ठिबक्यांचा कागद पसरून रांगोळी भुरभुरायची.. हसत खेळत चुकत माकत पुढचे दोन तास सजायचे रांगोळीमुळे.

माझ्यासाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे खूप वाचन, आई-बाबा हरत-हेची नवी नवी पुस्तकं आणून द्यायचे. अगदी श्यामची आई, गोट्या, चिंगीपासून ते मृत्युंजय, श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती पर्यंत. मी आणि आजीने तर दुसरीच्या दिवाळीच्या सुट्टीचा उद्योग म्हणून चक्क घरी माझ्या पुस्तकांची लायब्ररी उघडली होती. रीतसर सिरीयल नंबर, कॅटलॉग, मेम्बर्स लिस्ट वगैरे करून! माझ्या आठवणीतून ती 'माझी' लायब्ररी कधीच पुसली गेली नाही!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेशाला जाऊन घरातील सगळे बाबांच्या आईकडे जमायचो. आई आणि काकूचा फराळ एकत्र असायचा. त्यामुळे तो तयार होतानाच चव घेण्याच्या निमित्ताने फडशा पाडायचो. उत्सुकता असायची ती आजीच्या हातच्या दहीपोह्यांची, वर्षभरात इतरवेळेस दहीपोहे कधी मिळायचे नाहीत, असं नव्हे. पण ते 'तसे' कधीच लागायचे नाहीत हे मात्र खरं. आम्ही, मावशी, आत्या, काका सगळ्यांची कुटुंब एकत्र.. खूप माणसं.. खूप गप्पा.. पत्त्यांचे डाव आल्याचा चहा.. खूप हसू ; खूप आठवणी.. मधली सगळी वर्ष अक्षरशः भुर्रकन म्हणतो तशी उडून गेली. यंदाच्या दिवाळीला काका नाही! तोही निघून गेलाय खूप लांबच्या प्रवासाला...

अशाच एका दिवाळीच्या सुट्टीत आईबाबांनी 'आठवणीतल्या कविता' चे चार भाग दिले. त्यात 'आली दिपवाळी गड्यांनो आली दिपवाळी' ही कविता होती कवी माधवानुज यांची आणि मग कळलं की ते माझ्या सख्ख्या आजीचे पणजोबा म्हणजे माझे खापर पणजोबा! या इतक्या भांडवलावर मी शाळेत खूप 'शायनिंग' मारली. मला तरी कुठे ठाऊक होतं. त्या कवितेचं गोत्र माझ्या पुढच्या प्रवासात प्रत्येक पावलावर मला सोबत करणार आहे म्हणून.

आठवणीतील प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशीच खास बनून गेली आहे, ती म्हणून..!!
- स्पृहा जोशी

Monday, June 6, 2016

बदल...

पर्सनॅलिटी बदलावी लागते. आहार-बिहारात बदल करावा लागतो. काही अप्रिय परिस्थितींचा स्वीकार करावा लागतो. पण सध्या ही प्रयोगशीलता अंगिकारली जातेय. हा बदल चित्रसृष्टीला एका नव्या वळणावर घेऊन जाणारा आहे. एखाद्या चित्रपटाला मिळणारं यश, एखाद्या कलाकाराला मिळणारी प्रसिद्धी, त्याच्या फिटनेसचं झालेलं कौतुक हे रिले रेससारखं असतं. त्याच्या या प्रसिद्धीमुळे प्रेरणा घेऊन अनेकजण इतके कष्ट घेण्यास सिद्ध होतात. धावताना दुसऱ्याच्या हातातली बॅटन घेण्यास हात  आपोआप पुढे सरसावतात. यासारखी चांगली गोष्ट ती कुठली ?
चित्ररसिक बदल स्वीकारत आहेत. ही आणखी एक नोंद घेण्याजोगी बाब आहे. मध्यंतरी 'फुंतरु'च्या निमित्ताने आपण हा अनुभव घेतला आहे. सुजय डहाके या प्रयोगशील दिग्दर्शकाने ही सायफाय स्टोरी सदर केली तर 'पेइंग घोस्ट' या चित्रपटाने 'व्हिएफ एक्स' या तंत्रज्ञानाचा आधार घेतला. चित्रपटाचा सत्तर टक्के भाग या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रित करण्यात आला होता. मराठी चित्रसृष्टीतला असा हा पहिलाच प्रयत्न... पण ह्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटांची तंत्रज्ञानावरची पकड लक्षात येते. 'सैराट' मध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अविष्कार बघायला मिळाला नसला तरी कटू वास्तव पोहोचवण्यासाठी निवडलेला सरधोपट मार्गही अभ्यासण्याजोगा आहे. ही काही नव्याने आलेली प्रेमकथा नाही. अशा अनेक प्रेमकथा आपण पाहिल्या आहेत. मात्र ऑनर किलिंगसारख्या महत्त्वपूर्ण विषयाला तोंड फोडण्यासाठी आणि समाजातील कटू वास्तव दाखवण्यासाठी नागराजने या लोकप्रिय स्टोरीचाचं आधार घेतला. त्यामुळे त्यालाही कडू गोळी हवी तशी पोहोचवता आली. ही भारतीय समज मराठी चित्रसृष्टीला नव्या वळणावर घेऊन जाणारी आहे. 
आतापर्यंत मराठी चित्रसृष्टीने नानाविध विषय हाताळले. जुन्या काळाचा परामर्श घेता ठराविक काळामध्ये ठराविक धाटणीच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळायची हे स्पष्ट दिसतं. तमाशापट, विनोदी चित्रपट, ग्रामीण ढंगाचे चित्रपट आदींना प्रसिद्धी मिळण्याचा एक कालखंड होता. आता मात्र रसिक सर्व प्रकारची मांडणी आणि सर्व प्रकारच्या विषयांचं स्वागत करत आहेत. म्हणूनच मराठी कलाकार प्रयोगशील होत आहेत. मराठी चित्रपटांतील बदल हा काही एका रात्रीत घडलेला नाही. श्वास पासून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर सतीश राजवाडे, गजेंद्र अहिरे, संजय सूरकर, महेश मांजरेकर, निशिकांत कामत यांनी हळूहळू वेगवेगळ्या धाटणीच आणि विषयांवरचे चित्रपट स्वीकारायची प्रेक्षकांना सवय लावली. आणि त्यातूनच आजचा हा काळ आपल्याला अनुभवायला मिळतो आहे.

- स्पृहा जोशी 
(An excerpt from conversation with Daily Sanchar newspaper)

Friday, April 8, 2016

सोन्याचे सूर..

काल कुमार गंधर्व यांची जयंती होती. मी त्यांच्या गाण्याची प्रचंड मोठी फॅन आहे. एक अबोल हुरहूर लागून राहते त्यांच गाणं ऐकत असताना. तो मध्येच सुटणारा श्वास अपूर्ण गोष्टी किती सुंदर असू शकतात याची जाणीव करून देणारा. आणि मग एक अगम्य आश्चर्य, गाण्याची ही कमाल या माणसाने फक्त एका फुफ्फुसाच्या आधारे दाखवलीये. एका जीवघेण्या आजारातून उठल्यावर. माळव्यातल्या लोकसंगीताचा प्रचंड अभ्यास आणि त्यातून केली स्वतःची नवनिर्मिती. नवे राग, नव्या बंदिशी. नवा अनवट विचार. सृजनशीलतेचा परिपूर्ण आविष्कार.
यानिमित्ताने आमच्या एका ग्रुपवर अवंती कुलकर्णी नावाच्या मैत्रिणीने कवी वसंत बापटांनी कुमारजींवर लिहिलेली एक नितांतसुंदर कविता पाठवली.
कुमार
सकाळच्या उन्हासारखे एकदा याने काय केले,
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले,
टिंबाटिंबामध्ये जसे बिंब आपले भरून ठेवले,
वडिलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले.
एवढ्यामध्ये कोणीतरी कौतुकाची टाळी दिली,
तशी हा जो सावध झाला
आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला.
सूर्योन्मुख सूर्यफूल एकटक जसे तप करते,
धरणीवरती पाय रोवून आकाशाचा जप करते,
तसा तोही इमानदार एकाग्र, उग्र झाला
तेव्हा म्हणे कोणी याला आदराचा मुजरा केला,
तशी हा जो तडक उठला
मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला,
खजुरीच्या बनामध्ये संध्याकाळची सावली झाला.
तेव्हा याच्या देहावरून लमाणांचा तांडा गेला
मग म्हणे कोणीतरी ह्याच्यासाठी ‘हाय’ म्हणले,
तशी ह्याने काय केले?
कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले.
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला,
कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पाहिला.
एवढ्यामध्ये काय घडले
महाकाल मंदिरात सनामत डमरू झडले
कण्यामधल्या मण्यामधून मल्हाराची नागीण उठली,
चंद्राच्या तळ्यामधून ओम्-काराची तहान मिटली.
आता तसा कुशल आहे
पण स्वप्नात दचकून उठे, म्हणे
माझा सप्तवर्ण, श्यामकर्ण घोडा कुठे?
-    वसंत बापट.
वादळाला शब्दात बांधणं शक्य नाही म्हणतात. पण कविवर्य बापटांनी ते शक्य करून दाखवलंय या कवितेतून. आमच्या पिढीने कुमारांना पाहिलंही नाही. आम्हाला ते भेटले फक्त त्यांच्या सुरांतून. या सुरांनी अचंबित केलं असतानाच या कवितेचे शब्द अवतरले आणि त्या सुरांनी घातलेलं गारूड अधिकच गहिरं करत गेले. कुमारांची अज्ञाताला कवेत घेण्याची ओढ, गाण्याच्या सात स्वरांतून त्यांना त्याच्या पलीकडचं जे काही सांगायचं असेल ते सारं काही आपल्याला ही कविता सांगते. प्रस्थापित वाटेला ठोकरणारा, तसल्या फिजूल चौकटी नाकारणारा त्यांच्यातला मनस्वी कलाकार, कौतुकाच्या चार शब्दांनंतर तिथेच रमून रेंगाळता आपला पुढचा प्रवास सुरू करणारा पांथस्थ. या सगळ्या भूमिका त्यांचं विशेष स्थान अधोरेखित करणाऱ्या आहेत. आपल्या साधनेने, तपस्येने निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या आभाळाएवढ्या माणसांकडे नुसतंच थक्क होऊन पहायचं आणि आपल्या तोकड्या शब्दांत आपल्या जगण्यात त्यांनी उधळलेलं चांदणं मांडत राहायचा एक प्रयत्न करत राहायचं. हे सप्तवर्ण, श्यामकर्ण शुभलक्षणी घोडे त्यांच्या सुरांतून आपल्याला दिसले, यातच आनंद मानायचा.

 स्पृहा जोशी.

Monday, April 4, 2016

घडतं... बिघडतं !

कोणाला तरी कधी काळी दिलेली काही वचनं, आश्वासनं ..प्रॉमिसेस ... फार अंगावर येतात कधीकधी..कोणाला तरी कशाला, स्वतःच स्वतःला दिलेली प्रॉमिसेस तरी कुठे पाळली जातात नेहमी.. माझ्याकडून अनेकदा होतं असं. म्हणजे, मुद्दाम ठरवून असं नाही..पण शब्द फार सहज दिला जातो . संकल्प अगदी सहज सोडले जातातसंभाषणातल्या काही गोष्टी casually घेतल्या जातात माझ्याकडून . आणि मग एक अपेक्षाभंगाचं ओझं मानगुटीवर येउन बसतंयातून वाढत जाते असुरक्षितता ..नवी नवी कारणं शोधणं..आणि आपलं बरोबरच होतं, हे ठसवण्यासाठी, आपला आत्मविश्वासाचा कोटा शाबूत ठेवण्यासाठी इतरांच्या चुका काढत राहणं.
अर्थात आपल्यापैकी कित्येकांना आत्मविश्वासाचा बूस्टर डोस स्वतःला दिल्याशिवाय चैनच पडत नाही . माझी एक मैत्रीण आहे. कुठल्याही कार्यक्रमाला, पार्टीला कुठेही गेलो, तरी तिचं 'माझा नंबर पहिला' , हे चालूच असतं . म्हणजे प्रवेशच अशा तोऱ्यात करायचाकी आपल्या इतकं महत्त्वाचं आणि ग्रेट त्या ठिकाणी कोणी नाहीच जणू! आणि चुकून तिच्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्व दुसऱ्या कोणाला तरी मिळतंय असं चुकून जरी लक्षात आलं, की मग तर संपलंचपुढचा संपूर्ण वेळ त्यातच खर्च! असो. विषयांतर झालं.
तर, या प्रॉमिसेस पायी किती तरी गोष्टी घडतात- बिघडतात..सहज सांधली गेली असती अशी नाती तुटतात. कित्येकदा क्षुल्लकच असतं.. आपल्या अपेक्षाही आणि समोरून येणारी कारणं ही .ती क्षुल्लक राहत नाहीत आपल्या हट्टामुळे.. कुठल्या तरी इगोजमुळे. या धडपडीत किती काय गमावतो का आपण..  केवढी तरी शक्ती आणि खूप सारा आनंद.. पुढे मग या सगळ्याचाच कंटाळा यायला लागतो  'माणसं चुकीची नसतात, ती फक्त एकमेकांपेक्षा वेगळी असतात,' हे लक्षात नाही राहत आपल्या .
नाती जपण्याचा अट्टाहास करत असताना थोडंसं दूर राहून त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्नच करत नाही आपण..एखाद्या तलावामध्ये, शांत पाण्यात एखादं कमळ त्याचं त्याचंच तरंगत असतं .पाणी ओढून नाही घेत त्याला आपल्या मध्ये. त्याचं रमणं पाहत रहातं दुरुनच.. दोघांनाही ठाऊक असतंच की एकमेकांमुळेच आपलं अस्तित्त्व आणखी सुंदर होतंय..पण ते लादण्याची, सिद्ध करण्याची गरज नाही लागत त्यांना.. कदाचित तेच प्रॉमिस असेल त्यांच्यातलं..त्यांना पाळायला जमलेलं! आपण हा आपल्याला जमणारा खेळ फक्त काठावरून बघत राहायचं.. आपण केलेली प्रॉमिसेस आठवत.

स्पृहा जोशी


Sunday, March 27, 2016

वर्णनातीत अपूर्णता

कितीतरी दिवसांनी हातात पेन आणि वही घेऊन लिहायला बसले आहे तेही चक्क धावत्या गाडीत.वेगळंच  वाटतंय...एकदम रोमॅन्टिक ! 
मध्यंतरी आमच्या नितीन आरेकर सरांनी ‘ऐवज’ नावाचा एक पुस्तकरुपी खजिना माझ्या हातात ठेवला.त्यात अरुण साधूंनी केलेला पत्रांचा अनुवाद आहे. ती पत्रं आहेत दस्तुरखुद्द पंडित नेहरूंनी त्यांची प्रेयसी..अहं..‘सखी’ म्हणूया...तर त्या सखीला,पद्मजा नायडू यांना लिहिलेली अत्यंत तरल, आशयगर्भ, संवेदनशील आणि हळवी पत्रं. त्यातल्या विचारांची खोली आणि त्यांच्या नात्यांमधली प्रगल्भता यांनी थक्क व्हायला झालं मला. दुर्दैवाने हे नातं पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही,लौकिकार्थाने नेहुरुंच्या समाजातल्या आभाळाएवढ्या प्रतिमेपुढे त्यांच्यातल्या हळव्या प्रेमिकाला चुकवावी लागलेली ही जबर किंमत. पण पत्रं वाचताना त्यात भरून राहिलेला उदास गोडवा एका वेगळ्याच जगात घेऊन गेला मला. त्यातली कित्येक पत्र अशीच आहेत, धावत्या गाडीतून लिहिलेली. कामाचा अशक्यप्राय डोंगर ,राजकारणाचे तणाव, आपल्याच प्रचंड प्रतिमेमध्ये घुसमटणारा जीव..आणि हे सगळं मोकळं मोकळं करणारी ‘आपल्या’ माणसाकडे खेचणारी अनावर उर्मी. जिथे कुठलाही आडपडदा नाही. कुठलंही वेगळं आवरण नाही. कोणत्याही प्रकारचा अट्टाहास नाही. स्वतःच्या ‘खरेपणा’वर कुठलंही बंधन नाही. तिथे आहे फक्त उन्मुक्त अभिव्यक्ती. सडेतोड आत्मपरीक्षण..वेदनांची हळुवार उकल.. आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण! फार सुंदर अनुभव होता ही पत्रं वाचणं.
आज लिहायला बसलेय, तेव्हा लक्षात येतंय किती हद्दपार झाल्यात काही गोष्टी आपल्यातून. ‘माझ्या’ माणसाला मनातलं काही सांगताना मोबाईलचा स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या कीज खडखडत काहीतरी टाईप करायचं. त्यात नुसताच वेग साधतो. हरवलेल्या ‘आवेगा’चं काय? धावणारे विचार काबूत आणून कागदावर उतरवंताना मजेदार तारांबळ उडते, ती सरावाने ‘प्रोग्राम्ड’ मेंदू अगदी सहज उरकून टाकतो. हरवलेला आहे प्रत्यक्ष स्पर्श. ‘पर्सनल टच’.आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कधी होईल माहिती नाही. भेट काय, महिनोन्महिने तिचं दर्शनही अप्राप्य आहे. पण संवाद तर साधायचाच आहे 'या मनीचे त्या मनी' घातले नाही, तर ते अपूर्णत्व आपल्यालाच रितं करणार आहे. ही सैरभैर करणारी ओढ. कधीकधी अपूर्ण गोष्टी असतात ना, त्या वर्णनातीत सुंदर भासतात. पूर्णत्वाचं समाधान नसेलही त्यांच्यात कदाचित. पण अर्ध्यात वेगळ्या झालेल्या त्या वाटा धुक्यासारख्या भासतात. गूढ..पण सुंदर.
माझ्यातही ती अनावर उर्मी जागते आहे. याचाच मला आनंद आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे ‘आपलं’ जग शोधण्याची उर्मी. गूढ, अपूर्ण, पण सुंदर..!!

 स्पृहा जोशी

Monday, March 14, 2016

कळणं...कळून घेणं...

‘पीवी’ज बिग अॅडव्हेंचर’ नावाचा सुंदर चित्रपट पाहिलायत तुम्ही? अतिशय खेळकरपणे संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. एका प्रसंगात तो त्याच्या गर्लफ्रेंडला, डॉटीला म्हणतो, “माझ्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी गोष्टी, ज्या तुला कधी कळल्याच नाहीत, आणि अशाही कितीतरी गोष्टी ज्या तू कधी कळूनच घेतल्या नाहीस.” मला फार आवडला हा संवाद. किती सहजपणे किती मोठी गोष्ट बोलून गेलाय पीवी.
आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट खरंतर. रोज भेटणाऱ्या, जवळच्या- लांबच्या माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर नातं जोडत असतो आपण. त्यावेळेस प्रत्येकासमोर मन मोकळं करायची वेळच येत नाही. तशी गरजही नसते म्हणा. पण हळूहळू वेगवेगळी आवरणं आपल्यावर चढत जातात. परिस्थिती, घटना, व्यक्ती आपल्यावर परिणाम करत राहतात. त्यांच्या सोयीने आपण स्वतःला वाकवत राहतो, बदलत राहतो. गुंतून जातो त्यांच्या विश्वात. त्या गजबजाटात आपण ‘खरे’ कसे आहोत, किंवा ‘होतो’ हे विसरायलाच होतं..
आणि अचानक मग कधीतरी निवांत वेळी ‘आपल्या’ माणसासोबत असताना आपल्या लक्षात येतं, की नको त्या कोलाहलात किती पुसट होऊन गेलंय सगळं. जसे आपण बदललो, तसाच आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा माणूसही बदलला. कळलंच नाही इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना. फार गृहीत धरलं सगळंच... आपली प्रायव्हसी, आपली स्पेस सगळं हातात आलंय, पण समोरचा माणूससुद्धा त्याच वेळेस त्याची प्रायव्हसी, त्याची स्पेस शोधत निसटून गेलाय कुठेतरी. तर कुठे कुठे नेमका याच्या उलट प्रकार. दोघंजण इतके बुडून गेलेले एकमेकांमध्ये की कोणालाच काही धड अस्तित्व नाही. वेगळ्या वाटांची आवड नाही. एकाने दुसऱ्यावर केलेली कुरघोडी संपवून टाकणारी. ‘तुझं सुख तेच माझं सुख’ याचं अतिरेकी टोक. इतकं, की निर्भेळ स्वातंत्र्याचा आनंदच नाही. आणि मग एक मुक्कामावर पोहोचून लक्षात येतो भलताच प्रकार, एकमेकांत इतके आकंठ बुडूनही माणूस कळला नाहीच की आपल्याला!!  पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”
थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी हे असं वाटून गेलेलं असतंच. भूमिका बदलतात फक्त. कधी आपण ‘पीवी’ असतो, तर कधी ‘डॉटी’. काही गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत, आणि कित्येक गोष्टी ज्या आपण कळूनच घेतल्या नाहीत. वरवर पाहत राहिलो सगळंच. चित्रपटाच्या शेवटी डॉटी पीवीला विचारते, “इतका आटापिटा केलास, आणि आता फिल्म अर्धवट सोडून चाललायस?” पीवी म्हणतो, “मला हे ‘बघायची’ गरज नाही डॉटी; मी हे जगलोय!!” आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या माणसांशी, गोष्टींशी हे ‘असं’ जोडून घेता येईल आपल्याला? वरवरचा चित्रपट बघण्यापेक्षा, त्यात शिरून तो जगता येईल..?? 

स्पृहा जोशी