खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे....
रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे.
इंद्रधनुष्याच्या कमानीखाली धम्माल रंग खेळायचे..
माणसाला म्हणे तेव्हा रंग म्हणजे काय,हेच माहीत नव्हतं..
त्यादिवशी रंग रंगपंचमी खेळत असताना
एक माणूस त्यांना कोरडा दिसला..हसू विसरल्यासारखा..
रंगांना खूप वाईट वाटलं.
त्यांनी ठरवलं की आपण याच्या आयुष्यात रंग भरून टाकायचे.
आयुष्य रंगीबेरंगी झालं,की तोही हसायला शिकेल,
त्यालाही भावना कळतील.
इंद्रधनुष्य होईल त्याचंही जगणं!
लाल रंग म्हणाला 'मी सळसळता उत्साह देईन'
नारिंगी म्हणाला 'मी देईन ऊर्जा,शिकवेन त्याग'
पिवळ्याने सांगितलं,'मी देईन स्वच्छ विचार,न अडखळणारे'
हिरवा हसून म्हणाला,'मी देईन आनंद,भरभराट'
निळा शांतपणे म्हणे,'मी यांना शांती देईन;आणि देईन ओढ असीमाची'.
पारवा दूर बघत म्हणाला.'माझ्यामुळे शिकतील हे शहाणपण आणि सुखाने विलीन होतील अनंतात..'
जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले
आणि म्हणाला,'मी देईन यांना प्रेम आणि पूर्णत्व..'
रंग आनंदले..आणि त्यांनी त्यांच्याकडचा हा ठेवा बहाल केला माणसाला..
माणसाचं आयुष्य कधी नव्हतं इतकं सुंदर बनलं !!!
पण रंगांनी माणसाला कुठे ओळखलं होतं,
२१ व्या शतकापर्यंत त्यांचा विश्वासच उडाला होता
माणूस नावाच्या प्राण्यावरून.
नेहमीसारखेच रंगपंचमीला रंग एकत्र जमले,
हसत मात्र नव्हते..
केविलवाणे झाले होते..
हताशपणे एकमेकांकडे बघत होते.
भडभडून आलं त्यांना,
शेवटी बांध फुटला रंगाचा ;
आणि पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले -
डोळ्यांत आणुनी उरला सुरला जीव,
निष्पाप आठवे ज्याचा त्याचा देव!
'भगव्या'चे चाले वैर इथे 'हिरव्याशी'
का चोर सोडूनी संन्याशाला फाशी??
का निळा धावतो दलितांच्या उद्धारा,
अन देवाच्या डोळ्यास लागती धारा..
जगण्यातून हरवे का षड्जाचा सूर,
कोंडला सभोती का सरणाचा धूर;
श्वासांत वाहतो असा विषारी वारा,
का तोंड दाबुनी वर बुक्क्यांचा मारा!!
रडणार कसे डोळ्यांतील सुकले पाणी,
रंगांची बनली केवळ चलनी नाणी;
रंगांचे सरले कसे मनांशी नाते,
अन रंगांमागून रक्त आताशा जाते...!!!!
स्पृहा.
स्पृहा.
vaaaaaaaah really amazing
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteरंगांचे सरले कसे मनांशी नाते,
ReplyDeleteअन रंगांमागून रक्त आताशा जाते...!!!!
अप्रतिम
Zakas!!!! mala kavita far aavadli.
ReplyDeletekhupach chaan ahe.........
ReplyDeleteSUREKH!!!!!
ReplyDeleteखुप छान अगदि मनाला भावली
ReplyDelete