Monday, December 7, 2015

एक 'रावण' हवाय...


बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...
गेले काही दिवस ‘असुरा’ नावाचं खूप सुंदर पुस्तक वाचते आहे. आनंद नीलकांतन यांनी लिहिलेलं. इतिहास हा नेहमीच जेत्याच्याच नजरेतून लिहिला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य तर आपल्याला माहीत आहेच. या पुस्तकातून ते ठसठशीतपणे समोर येतंच; पण जरा वेगळ्या पद्धतीने. कारण हा आहे एका पिचलेल्या जमातीचा इतिहास. त्यांच्या अत्यंत कीर्तिमान आणि खर्‍याखुर्‍या ‘माणूस’ असलेल्या ‘रावण’ नावाच्या सम्राटाचा इतिहास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व युगांत, सर्व काळात पिचत पिचत आपलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून जगण्याची लढाई लढू पाहणार्‍या सामान्यातील सामान्य माणसाचा इतिहास.
हे पुस्तक वाचताना सतत माझ्या आसपासच्या जगाशी त्या घटनांचा संबंध जोडू पाहतेय; आणि गंमत म्हणजे, त्या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्यापुढे आत्ताची माणसं होऊन उभ्या राहताहेत. पण लखलखीतपणे एक गोष्ट जाणवतेय ती म्हणजे, पिढ्यान्पिढ्या लादली गेलेली, आणि कदाचित त्यामुळे सवयीची होऊन बसलेली एक भयाण मानसिकता. दगडी संकल्पना, टोकाची असहिष्णुता, स्त्रियांबद्दलची ठरीव मतं, वर्णव्यवस्था, स्वार्थाने लदबदलेल्या जातीपातीच्या उतरंडी, सत्यात जगायला घाबरायला होतं म्हणून जोंबाळलेला पलायनवादी दृष्टिकोन...
‘Dignity of Labour’ ही संकल्पना किती सहज हद्दपार केलीये आपण आपल्या सामाजिक आयुष्यातून. प्रत्येक कामाचा आपल्या पद्धतीने ठरवलेला एक दर्जा आणि ते काम करणार्‍या व्यक्तीचं पोलादी सामाजिक चौकटीतलं एक पक्कं स्थान. का? कदाचित फार स्वस्त मिळतंय आपल्याला हे सगळं म्हणून? पैसे फेकून हवं ते मिळवता येतं हा माज आहे, म्हणून? का मग ही असली कामं असल्याच लोकांनी करायची असतात, ही तीच युगानुयुगांची पक्की समजूत, म्हणून? या सगळ्यांना स्वत:चं स्थान निर्माण करायला शिडी मिळूच नाही द्यायची? एखाद्याने ते सिद्ध केलंच, तर त्याची हेटाळणी करत राहायची? आणि त्यात जर ती स्त्री असेल, तर मग प्रश्नच मिटला.
मला हे सगळं प्रकर्षाने जाणवतंय, ते गेल्या काही दिवसांतल्या चर्चा ऐकून. उबग आल्यासारखं वाटतंय. निवडणुका झाल्या. प्रचार झाले. पूर्वीच्या सत्ताधारी आणि आता विरोधी (आणि उलटसुद्धा) पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक नारेबाजी, कुरघोड्या, प्रसंगी चिखलफेक असं एकही शस्त्र वापरायचं सोडलं नाही. fair enough.. लोकशाहीच्या खेळाची अशीही एक पद्धत! पण काही मुद्द्यांची मला वैयक्तिक शिसारी वाटली. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असलेल्या स्मृती इराणी, या कोणे एके काळी MacDonald's मध्ये बर्गर सर्व्ह करायच्या. ‘ही अशी बाई कॅबिनेटमध्ये इतक्या महत्त्वाच्या जागेवर असूच कशी शकते?’ अशी हाकाटी विरोधकांकडून मारण्यात आली. म्हणजे? हा कुठला मुद्दा? एक सामान्य मुलगी आपल्या स्वत:च्या हिमतीवर जगण्याचं भान उंचावते, जीवतोड कष्ट करून, तिच्या पिढीची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही नायिका बनते, निवडणुकीत राहुल गांधींविरोधात जिंकण्याचा अपार प्रयत्न करते, ही गोष्ट जास्त वंडरफुल नाही? याने आपला ऊर भरून येत नाही? कोणे एके काळी सोनिया गांधी जेव्हा राजकारणात प्रवेश करत होत्या, तेव्हा ‘एक वेट्रेस काय देश चालवणार’ अशी हेटाळणी त्यांच्या विरोधकांनीही केली होतीच की! खुद्द पंतप्रधान मोदींनासुद्धा ‘मी लहानपणी ‘चहावाला’ होतो. आणि गरीब मागास जातीचा मुलगा आज पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहू शकतो,’ हे ‘सांगावं’ लागलं.
कोणी कोणावर सत्ता गाजवायची, ते जन्मसिद्ध हक्कानेच सिद्ध होतं; ते कष्टसाध्य असूच शकत नाही, या सरंजामशाही, बुरसट मनोवृत्तीतून कधी बाहेर पडणार आपण? हा कोतेपणा, भित्रेपणा दिवसेंदिवस इतका सवयीचा होत जातोय की, षंढत्व भिनत जातं अंगात. मग एखादी बाई कळवळून म्हणते, बदमाशांची नाही, बघत राहणार्‍या षंढांची भीती वाटते.. पण तेवढ्यापुरते दचकून आपण पुन्हा निघून जातो आपल्या सुखी कोषांत...कारण बाईच्या मताला किंमत द्यायची सवयच नाहीये आपल्याला, आपल्या समाजाला. पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे!! म्हणूनच आनंद नीलकांतन यांचं ‘रावणायन’ (असुरा) मला खूप आपलंसं वाटतंय. बरेच राम झेललेत आपण. ‘देव’ व्हायच्या खोट्या गंडापायी माणूसपण हरवलेले... आता एक ‘रावण’ हवाय. खचल्या पिचल्या आजच्या ‘असुरां’चं साम्राज्य उभं करण्यासाठी, नवा श्वास देण्यासाठी एक खराखुरा ‘माणूस’ हवाय...

स्पृहा जोशी

4 comments:

  1. छान लिहिले आहेस. नक्कीच असुरां पेक्षा हे छद्म-सुर भयावह आहेत.आणि आपण ह्या चौकटिंच्या पटात पार गुंतलोय, इतके की सत्याचा मार्ग समोर लख्ख दिसूनहि त्यावर चालन्यास धजत नाही. ह्या अर्धसत्य परिमितिनी आपला दृष्टिकोण इतका सीमित केलाय की मानासतला माणूस बघण्या आधी लोक हे बघू लागतात की ही व्यक्ति स्त्री आहे की पुरुष, काली की गोरी, जात, धर्म आणि आणखी काय काय; नकोसे झालेत असे विचार.
    वैचारिक मोकळीकिचे एक नवे द्वार तुम्ही उघडून दिलेय,बघुयात आपल्यापैकी किती ह्या खर्या स्वातंत्र्याचा प्रकाश बघू शकताय ते.

    ReplyDelete
  2. आपली मदत स्वतःलाच करावी लागेल .

    ReplyDelete