Friday, August 21, 2015

माझ्या 'आतली मी'...

जुन्या उन्हाळ्याच्या सुट्यांची आठवण येतेय. पण डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला, तर सलग एक फिल्म नाही दिसत. तुकडे तुकडे दिसतायत. मोंताज!! त्याला काही टाइमलाइनही नाहीये. कुठूनही कशीही दृश्यं.
साधारण आठवी किंवा नववीचं वर्ष. शाळेबाहेर सगळे मित्रमैत्रिणी धमाल करतायत. चिंचा, कैऱ्या, बोरं, आवळे, बर्फाचा गोळा... नुकताच शेवटचा पेपर झालाय. तो विज्ञान/भूमिती असेल तर बहुतेक जण आपले वाईट चेहरे बर्फाच्या थंड गोळ्याआड दडवतायत. रिझल्टपर्यंत या विषयांची आठवणही नको... चित्रकला/ कार्यानुभव असेल तर व्वा! यंदा देवच पावला... शाळेचा शेवटचा दिस गोड झाला! मी या सगळ्यात आहे, पण थोडी बाहेरपण. मला नुकत्या नुकत्या कविता सुचायला लागल्यात. आणि त्या सुचण्याचं कारण माझ्या समोरच आहे... त्यालाही हे कळतंय. पण म्हणजे नेमकं काय, ते आम्हाला कळत नाहीये... आम्ही एकमेकांसोबत ‘असणं’ एन्जॉय करतोय. काहीतरी फुलपाखरासारखं वाटतंय. म्हणजे कसं कोण जाणे! पण कवितेत असंच असतं न!
आता मी लहान आहे. अगदी दुसरी-तिसरीत. आजोबा मला स्केटिंगला घेऊन जातात. सकाळी सकाळी सात वाजता. मी स्केट्स बांधून धडपडते. आजोबा कळवळतात. मला ते कळतं. मी रडल्यासारखं करते. पण मला धरायला ते पुढे येत नाहीत. मला तेही कळतं. मग मात्र मी एकटी उठते. कुणाचीसुद्धा मदत न घेता. तोल सावरते. हळूहळू ग्रीप घेत सराईतपणे चकरा मारायला लागते. आजोबांचे हसरे डोळे मला दिसतात. मग आम्ही कॉर्नरच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जातो. भरपूर बटर लावलेला ब्रूनमस्का आणि ऑम्लेट खातो पोटभर. माझ्या ब्रेडवर आजोबा जास्तीचं जॅम बटर लावतात. आजचं बक्षीस! मग मी त्यांना काहीही सांगते, काहीही! आणि तेसुद्धा जगातली त्या क्षणी सगळ्यात महत्त्वाची समस्या जर कुठली असेल तर ती हीच, इतक्या सिरियसली ते सगळं ऐकतात. मग आम्ही शहाळ्याचं पाणी पितो. आणि मग मारुतीच्या देवळाच्या गल्लीतून तिथल्या पिवळ्या झाडाची खाली पडलेली फुलं उचलत नाचत नाचत घरी येतो. हां... मारुतीला रोज ‘हाय’ केलंच पाहिजे. कसं छोटंसं घर आहे त्याचं. आपल्यापेक्षाही छोटं. त्याला कंटाळा येत असणार आपण हाय नाही केलं तर.. मग त्याला ‘हाय’ करूनच पुढचा रस्ता... आजोबा गेले मी पाचवीत असताना. नंतर मला ती मारुतीच्या देवळाची गल्लीही आवडली नाही, पिवळ्या फुलांची झाडंही, आणि तो मारुतीही. भीतीच वाटायला लागली त्यांची. आजही इतक्या वर्षांनंतर मी शक्यतो त्या गल्लीतून जात नाही.

दहावीच्या परीक्षेनंतरची मोठी सुट्टी. आता मी जर्मनीत आहे. स्टडी टूरसाठी. बर्लिनची वॉल बघते, नाझी छळछावण्यांच्या रेकॉर्ड‌्स बघते. नंतर पॅरिसचा आयफेल टॉवर, अॅमस्टरडॅमला अॅन फ्रँकचं घर, बेल्जियमची राजेशाही चर्चेस, सगळं मनात साठवून घेते. अल्बर्ट आणि मारिया राह्याक नावाच्या प्रेमळ जर्मन कुटुंबात त्यांच्या घरातली होऊन जाते. बर्लिनच्या रस्त्यावर ‘ढोल बाजे’वर डान्स करून चक्क टोपी फिरवून मिळालेल्या १० डॉलर्समध्ये आमचा ग्रुप जिवाची जर्मनी करतो... पण या सगळ्यात मी नाहीये. असूनही नाहीये. कारण माझं मन अडकलंय एका परीकथेतल्या शहरात. हायडलबर्गमध्ये... बाकीचे सगळे कधीच पुढची ट्रीप एन्जॉय करू लागलेसुद्धा. पण मी तिथेच आहे. तिथल्या छोट्या छोट्या घरांमध्ये. इवल्याशा वाटांमध्ये, कित्येकशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यामध्ये. सगळ्या ऐकलेल्या, वाचलेल्या परीकथा माझ्याभोवती पिंगा घालायला लागतात. आणि मी हीरॉइन असते त्या गोष्टीची. आत्ता कुठल्याही क्षणी माझा राजपुत्र येणार, पांढऱ्या घोड्यावरून दौडत दौडत...आत्ता...!! माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण ते रडू नाहीये, हे मला कळतंय. मला खूप जास्त छान वाटतंय. चित्रकलेच्या तासाला ‘निसर्गचित्र’ म्हणून काय काय काढतो आपण.

एक छोटं घर, बाजूला एक सावलीचं झाड, वळणाचा रस्ता, नागमोडी नदी, मागे डोंगर, आणि डोंगरामागे सूर्य; हसरा... ते चित्र समोर आहे माझ्या. आणि त्या चित्रात नकळत कोणीतरी मलाही रंगवलंय. त्या शांतपणात माझ्या जाण्याने एक छोटासा तरंग उठतो, आणि बाकी सगळं पुन्हा शांत, सौम्य, गूढ... पण अतिशय सुंदर. उन्हाळ्याच्या सुटीच्या माझ्या या तीन आठवणी. त्या रोजच्या रोज आठवतात, असं काही नाही. पण जेव्हा जेव्हा आठवतात न, तेव्हा तेव्हा माझ्या आतली जुनी ‘मी’ मला नव्याने भेटवून जातात. आणि स्वतःशीच स्वतःची अशी भेट होणं यासारखं सुखद दुसरं काहीच नाही.


- स्पृहा जोशी

Thursday, June 18, 2015

अवॉर्ड्स

काही महत्त्वाचे अवॉर्ड्स

  • २००३ साली मा. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'बालश्री' या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित.
  • कुसुमाग्रज पुरस्कार - श्री अक्षरग्रंथ प्रकाशन.
  • चित्रपदार्पण पुरस्कार २०११ ( मोरया- सर्वोत्कृष्ट सहय्यक अभिनेत्री).
  • झी मराठी अवोर्ड २०१२ ( सर्वोत्कृष्ट  व्यक्तिरेखा - रमाबाई, सर्वोत्कृष्ट जोडी - रमा - माधव).
  • ईचलकरंजी पत्रकार संघ - विशेष कलागौरव पुरस्कार २०१२.
  • आचार्य अत्रे पुरस्कार २०१३.
  • मिरची म्युझिक अवॉर्ड - बेस्ट अपकमिंग लिरिसिस्ट (बावरे प्रेम हे) 2014.
  • गोदरेज फेस ऑफ द इयर 2013.
  • झी नाटयगौरव 2014 - बेस्ट नँचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर - नाटक - समुद्र.
  • अखिल भारतीय मराठी नाटयपरिषद पुरस्कार - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 2014 - समुद्र.

Saturday, June 13, 2015

पाऊस

बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
सांडून जातो धुवांधार
आसुसलेलं, थबकलेलं
बरंच काही.
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..

स्पृहा

Thursday, June 11, 2015

A Paying Ghost Film Music Launch Photos

At the A Paying Ghost Music Launch

** Click on photo to expand it.






बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही

बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही
सावली सांज ही, ये तशी लाजुनी
गुंतला जीव माझा, थांग ना या नभाचा
साद ये कोठुनी? धुंद वेड्या मनी..!

आस ही या मनी आज का जागली
ही मिठी रेशमी धुंद वेडावली
जीव होई तुझा श्वास सारे तुझे
दूर तू का तरी भास सारे तुझे
बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही..

गुज हे लाजरे उमलली पाकळी
चांदवा माळूनी वाट झाली खुळी
स्पर्श होता तुझा हरपले भान हे
सोबतीने तुझ्या रान गंधाळले
बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही..


Movie : Baavare Prem He
Singer : Bela Shende & Hrishikesh Ranade
Music : Ajay Kishor Naik
Lyrics : Spruha Joshi

Sunday, January 12, 2014

खूण

एक पाकोळी भिरभिर करी 
अंधार हसे मन तळात,
घेण्या विसावा चार क्षणांचा 
रात टेकली जरा कोन्यात..

दूर रेंगाळे पहाट ओली 
Thanks to Divya.. She is unknown but loved this painting!

प्राजक्त देही जरा वाकला,
जुने तरंग शांत होताना 
डोहाने नवा डाव मांडला. 

खेळ संपला पांगले सारे 
आता एकटा जीव उरला,
सोबती आता अंधार त्याचा
मन तळाशी पुन्हा हसला.. 

असेच सारे विरून जावे 
नकोच पुन्हा कालचे ऋण,
धुक्यात निळ्या कोरून द्यावी 
काल रातीची हळवी खूण !!!

- स्पृहा.   

Wednesday, January 1, 2014

मावळतीच्या वाटेवरती..

मावळतीच्या वाटेवरती 
सोनकेशरी रंगसोहळे,
कधीकधीचे घुसमटलेले 
क्षणात होती श्वास मोकळे.

ओलांडून ये तुझा उंबरा 
पल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी 
माझ्यामधली तीच बाहुली !

रास मांडशी पुन्हा नव्याने 
जुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!

सुटली वेणी अशा अवेळी
निळकर वारा खेळ मांडतो,
उरली-सुरली सरली राधा 
अवघ्या देही श्याम नांदतो !!

- स्पृहा.