Sunday, August 23, 2015

भाषा गमावून बसलेले 'शब्द'

गेले काही दिवस मला नव्याने एक गोष्ट जाणवली आहे. मला भाषा नीट वापरता येत नाही. म्हणजे मनात बरंच काही असतं. विचारही असतात अनेक. पण सुसंगतपणे त्याची मांडणी करणं हे फार अवघड होऊन बसतं. अस्ताव्यस्त जगण्याचंच प्रतीक असते, अस्ताव्यस्त भाषा. माझ्या मातृभाषेत न अडखळता, सलग पाच वाक्यं बोलणंसुद्धा कठीण जातं. मग इंग्रजी, मग हिंदी... तिथे तर आणखीनच कठीण परिस्थिती. कारण विचार केला जातो मराठीत, मग एका सेकंदात त्याचं ट्रान्सलेशन करायचं मनातल्या मनात. (अनुवाद हा शब्दही अंमळ उशिराच आठवला मला) किंवा मग आत्मविश्वासाच्या जोरावर वेळ मारून न्यायची. तेवढ्यापुरती. म्हणजे मग अडलंच घोडं... कुठलीच भाषा धड नाही. सुडौल, सुंदर, स्वच्छ नाही. कामचलाऊ शब्द, कामचलाऊ बोलणी आणि कामचलाऊ संवाद! आपलं आपल्याकडे दुरून पाहताना असं वाटतं की, कुठल्या तरी आडगावात आलो आहोत.
धूळभरले रस्ते, सुकलेली रोपटी, कडेनं कसंही वाहणारं सांडपाणी, वा-यात भरून राहिलेला विचित्र वास, मळकट कपडे घातलेली, कावलेली घामट माणसं, नेमकं काय करायचंय, हेच ठाऊक नसलेली निरुद्देश तरुण-तरुणी, शेंबूड सुकून तशीच खेळणारी पोरं, बेढभ, बेंगरूळ रूपाची माणसं!!! स्वतःचं खास असं कोणतंही रूप नसलेली, जगण्यात कुठलाही डौल नसलेली, सौंदर्यविहीन... आला दिवस ढकलणारी माणसं... संपूर्ण अस्तित्वावर पसरून राहिलेली एक उदासीन छाया... आपलं भाषा वापरणं हे ‘असं’ वाटायला लागलंय हल्ली...
हे फक्त बाह्यरूप झालं... आतलं दिसणं आणखी काळजी करायला लावणारं आहे. आपण भाषा वापरतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्याला नेमकेपणाने ‘जे’ सांगायचंय, ते सांगता येतं का? ‘जसं’ बोलायचंय तसं बोलता येतं का? तितके स्वच्छ असतो का आपण? तितके पारदर्शी? भाषेला अनेक पदर असणं हे चांगलं लक्षण आहे खरं; पण त्यातून आपल्याला ‘जे’ म्हणायचंय ते कधीच न म्हणता येणं, हे फार भीषण नाहीये का? एका वाक्यातून समोरचा त्याला हवा तसा, हवा तो कुठलाही अर्थ घेतो. पण मग त्याला वेळीच त्या वाक्यातला नेमकेपणा दाखवून देणं का साधत नाही? कशासाठी मागे ओढतो आपण आपल्याच शब्दांना? नेमक्या त्या क्षणी भाषेव्यतिरिक्त इतर कुठले घटक तिथे थैमान घालतात? विचित्र गैरसमजांचं कारण होऊन बसतात? ‘शंभर मी’मध्ये श्याम मनोहर भाषेच्या संदर्भात खूप सुंदर लिहून गेलेत... भाषा म्हणते, “जगताना हरेक क्षणी तुम्हाला दैहिक, मानसिक, बौद्धिक गोष्टी होतात.. त्या त्या हरेक क्षणी तुम्हाला मीही होत असते. हरेक क्षणी मी तुम्हाला ढुशा देत असते.” मग असं असताना कुठे हरवून बसतो आपण तिला? कर्ता, कर्म, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषनाम, विभक्तिप्रत्यय... किती लहानपणापासून शिकवलं होतं हे सगळं शाळेत. मग जेव्हा या सगळ्याचा एकत्रित मिळून वापर करायची गरज आज आलीये, तर कुठे निसटून जातात शब्द? वाक्य? मुद्दे? कल्पना? वर्णनं??


या सगळ्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण मिळेलही कदाचित; पण मुद्दा आहे, मानसिक खचलेपणाचा. प्रत्येकच बाबतीत स्वतःवरचा विश्वास तोकडा पडण्याचा. ‘ग्लोबल व्हिलेज’च्या संकल्पनेत माझ्या मातीचं फौंडेशन; माझी मुळं गमावून बसण्याचा. राक्षसी वेगाने वाढणा-या जागतिकीकरणाने, शहरीकरणाने माझ्या पिढीच्या सगळ्यांनाच दिलेली ही सार्वकालिक, सार्वभाषिक भेट आहे..!

- स्पृहा जोशी

2 comments:

  1. भाषांचा समुद्रच झाला आहे, किती किती नद्या येऊन मिळतात. त्याच बरोबर सांडपाणी, रासायनिक आणि जैविक पदार्थ हि.पाण्याची शुद्धता राहणार तरी कशी? एका वाक्यात तीन भाषा (मराठी ती हि धेडगुजरी), हिंदी आणि गुलाम लोकांची आदरणीय भाषा, बोलताच कि आपण. मला तर कधी कधी कळतच नाही कुठल्या भाषेत विचार करतो मी???

    ReplyDelete
  2. सर्वात सुंदर भाषा लहान बाळाची . त्याचा प्रत्येक शब्द , अर्थ , भाव सुंदर असतो म्हणून . निरागसता, निष्पापपणा यापेक्षा वेगळा अर्थ त्यातून निघतच नाही . पूर्ण पारदर्शी . जे आत. तेच बाहेर . साहित्यिक आपला भाव व्यक्त करण्यासाठी शब्दभांडारातील शब्दांना अक्षरश: चिवडत असतात . तरीही लहान बाळासारख पारदर्शीपणे जे सांगायचं ते व्यक्त होतच अस नाही . माणसाच मन अनेक विचारांनी दुभंगलेले असाव कदाचित . त्याच्या सोयीचच ते घेत असाव .
    आपला लेख भाषा गमावून बसलेले "शब्द"नाहीत . सोप्या भाषेत असल्यामुळे भावार्थ उमजला . madam आपल्या लेखामुळे, सुप्त विचारांना चालना मिळाली . याबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete