अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेने कलम १९ द्वारे सर्व नागरिकांना दिलेला हा अधिकार. लोकशाही मूल्यांवर आधारलेला हा मूलभूत मानवी अधिकार. कुठल्याही व्यक्तीला स्वयंपूर्णतेकडे नेणारा...
शाळेत असताना नागरिकशास्त्राच्या धड्यांमधून बिंबवलं जातं, हे आपल्या मनावर. प्रत्येकाला ‘आपलं’ मत बाळगण्याचं स्वातंत्र्य आहे. मुळात ‘स्वातंत्र्य’ म्हणजे व्यक्त होण्याची मुभा असणं. कुठलीही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं, म्हणजे स्वातंत्र्य. अर्थात, पुस्तकांमधल्या सगळ्याच व्याख्या योग्य वाटतात, पटतात. पुढे प्रत्यक्ष आयुष्यात भ्रमनिरास होतो, जेव्हा आपल्या लक्षात येतं, की हे सगळं फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं आणि परीक्षेत लिहून मार्क्स मिळवण्यापुरतंच होतं! आपण उगाच सिरीयसली विचार करत बसलो, या सगळ्या जड जड शब्दांचा!
गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये काय झालं? ‘शार्ली एब्दो’वरचा हल्ला ठसठशीतपणे हेच तर अधोरेखित करून गेला. विनोद हे म्हणे ‘अभिव्यक्ती’चं सर्वात सुंदर माध्यम. त्या दिवशी ‘विनोद’ मेलाच की. पार जिवानिशी गेला.
दूर कशाला जा? आपल्या देशात काय चाललंय? एका लेखकाची दिवसाढवळ्या हत्या झाली, तामिळनाडूमध्ये! सुप्रसिद्ध लेखक पेरूमल मुरुगन यांनी, त्यांच्या ‘मधोरुबगन’ कादंबरीवरून जे रान पेटलं, त्याने व्यथित होऊन स्वत:च सांगितलं की, ‘लेखक’ मुरुगन आजपासून गेला. यापुढे मी काहीही लिहिणार नाही. ‘आपण’ मारलं त्यांना. ‘लेखक’ म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं. कुठल्या तरी विकृत मानसिकतेला बळी पडलेल्या आपल्या समाजाने आणखी एका लेखकाची सृजनशक्ती संपवून टाकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून पडला. झुंडशाही आणखी चेकाळली.
इतकंही दूर जायचं नाहीये? आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय दिवसाढवळ्या? मालिकांमध्ये दाखवलेल्या इतिहासाचं चित्रण कुठे खपतंय लोकांना? वेगवेगळ्या संस्था, संघटना आहेतच, वेगवेगळे झेंडे मिरवायला. मग, शिवाजी महाराज ‘मराठ्यांचे’, न्यायमूर्ती रानडे ब्राह्मणांचे, तुकाराम, खंडोबा... यादी संपतेय कुठे? मग सेट्सची तोडफोड करायला, पुतळे जाळायला, कलावंतांना मारझोड करायला, फिल्म असेल तर पोस्टर्स, बॅनर्स फाडायला तयार आहेत, आमचे मर्द सेनानी! मुळात त्या कलाकृतीत काय दाखवलंय, का दाखवलंय, याचा कोणताही विचार न करता, कसलाही अभ्यास न करता, ‘एक घाव दोन तुकडे’ विषय संपला!!
‘पी. के.’ सिनेमाच्या वेळीसुद्धा हेच झालं. एका चॅनेलवर तो सगळा तोडफोड तमाशा पाहात होते. एका पत्रकाराने भयंकर जोशातल्या एका व्यक्तीला विचारलं, ‘तुम्ही हे सगळं करताय, ते ठीक आहे; पण मुळात हा चित्रपट पाहिलायत का तुम्ही?’ त्यावर ते पदाधिकारी जाहीरपणे नॅशनल टीव्हीवर असं म्हणाले, की ‘ओ... आमाला गरज नाय, पिच्चर बिच्चर बगायची... आमची डायरेक्ट अॅक्शन असते!!!’ मी सुन्न होऊन बघत बसले. कुठून येतो हा असला अतिरेकी आत्मविश्वास? या अशा माणसांना का भय नसतं, कायद्याचं? धर्म, जात, पंथ, जाती, उपजाती, पोटजाती, देव, मूर्ती... समाजाच्या असुरक्षिततेची किती भयाण लक्तरं वाटायला लागतात हे सगळे शब्द... कुठे चाललोय आपण? मुळात, जगभर विचित्र वेगाने पसरत जाणा-या, या विषारी वावटळीत आपण कुठवर तग धरायचा? आपल्या मनाशी कुठली मूल्यं धरून चालायचं आपण?
मी ज्या वातावरणात वाढले, तिथे ‘माझं’ मत सांगायला मला कधीच मज्जाव नव्हता. अर्थात, ते मांडताना ‘मोठ्यांचा आदर राखला जायला हवा’, हे गृहीत धरूनच! पण हळूहळू ‘आपलं जसं मत आहे, तसंच समोरच्याचंही एक मत असू शकतं, आणि ते आपल्यापेक्षा ‘वेगळं’ असू शकतं, हेसुद्धा उमगत गेलं. त्या विरोधी मताचाही आदर केला गेलाच पाहिजे, हे अंगी भिनत गेलं. पण बाहेरच्या जगात सगळेच लोक हा असा विचार करत नाहीत, करणार नाहीत, हेही कळायला लागलं.
मग माझं मत मी कसं मांडायचं? आपल्या मताचा अनादर केला म्हणून दुस-याला मारण्यापर्यंत मजल जात असेल, तर मला योग्य वाटलेली मूल्यं ‘मी’ कशी जपायची?
त्या दिवशी ‘शार्ली एब्दो’वरच्या हल्ल्यानंतर लाखो माणसं तिथे एकत्र जमली... ‘वी विल नॉट वॉक इन फियर’ म्हणत... मी जाऊ शकेन त्यांच्यात? या ‘स्पिरीट’साठी? माझ्यात येईल ती शक्ती, ‘माझी’ मूल्यं राखायची? मुळात माझा समाज मदत करेल मला, माझ्यात ती शक्ती यावी म्हणून...?? शेवटी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत...
‘Where the mind is without fear and the head is held high.. where the mind is lead forward by thee, into ever widening thought and action.. Into that heaven of freedom, my Father, let my country awake…”
- स्पृहा जोशी
महापुरुषांचा पराभव अश्या नावाचा एक धडा होता १०वी मराठी ला.. तेव्हा तो कंटाळवाणा वाटायचा पण आता तो किती apt होता ते पटतं!!
ReplyDelete"Imagine " by John Lennon यांच्या प्रसिद्ध गाण्यातील काही ओळी. नक्की ऐका madam .
ReplyDeleteImagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people living for today
Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people living life in peace, you
कदाचित अशाच काही अनुभवातून गेला असावा गायक . विनयशील असण दुर्बलतेच लक्षण झालय. उद्दामपणाला झळाळी प्राप्त झालीय . "अभिव्यक्ती" हा लोकशाहीतील एक विनोद आहे. लिहिताना शब्दांना सारख विचाराव लागत . बाबा लिहू का ?
Chinmay..Infinity tru..
ReplyDelete