माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच ...
सप्टेंबर महिन्यातल्या गेल्या पन्नास वर्षांतल्या सगळ्यात जास्ततापमानाच्या दिवशी बसून माझा लेख लिहिते आहे. सगळंच वातावरण तापलेलं. ३७ अंश!! समाजात एकुणातच तापलंय सगळं. अमेरिका भेटीतले मोदी, त्यांना पाहून काहींचं रक्त तापलंय, इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत ना महायुती न आघाडी, मधल्यामध्ये इंजिन तापलंय... दक्षिणेत जयललितांना अटक झाली, म्हणून काही आंधळे अनुयायी ताप ताप तापलेत. एकुणात काय, तर आसपास फक्त चटके, वाफा आणि कडकडीत उष्मा. अशी सगळी परिस्थिती आहे.
या उदास दिवसांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यात बसलेला एक चटका म्हणजे, कविवर्य शंकर वैद्य गेले. त्यांना अंतिम निरोप देताना मी तिथे नव्हते. या अशा प्रसंगी खंबीरपणे उभं राहायचं कसब नाही माझ्यापाशी. पळपुटेपणा आहे खरं तर एक प्रकारचा. चार दिवसांपूर्वी अरुण म्हात्रेंचा मेसेज आला... “सर वाट पाहत होते त्या दिवशी तुझी...” कितीतरी वेळ मी अरुण काकांचा मेसेज पाहत दगडासारखी होऊन गेले. गळ्याशी दुखायला लागलं. डोळे चुरचुरायला लागले. वैद्य सरांची एक एक आठवण उसळी मारून वर यायला लागली.
काय ऋणानुबंध असतात... रूढार्थाने मी सरांची विद्यार्थिनी नव्हते. त्यांचा माझा फार सहवास नव्हता. पण तरीसुद्धा माझे मित्र होते ते. दोस्त होते. मी अकरावीत असताना कॉलेजमधल्या एका कार्यक्रमात सरांना पहिल्यांदा भेटले. आणि मग या न त्या कारणाने भेटतच राहिले. हक्काने कधीही फोन करून मी त्यांना काहीही प्रश्न विचारायचे. त्यांच्याशी वाद घालायचे. पण शांतपणे बोलत बोलत सर त्यांचा मुद्दा पटवून द्यायचे. मृदूपणातला असा खंबीरपणा मी सरांइतका कुठेच पाहिला नाही कधीच. स्वतःच्या कविता खूप मजेशीरपणे ऐकवायचे सर. अगदी प्लेन, आवाजात काही चढउतार न आणता. ‘छत्री’ कविता सगळ्यात फेव्हरेट होती त्यांची. आणि “तुमची कविता मीच तुमच्यापेक्षा छान वाचते”, असं मी त्यांना चिडवलंयसुद्धा!
मिश्कील हसायचे फक्त! एक स्मितहास्य ठेवून टोमणे मारायचे, तेही शालजोडीतले. मराठी भाषेची तपश्चर्याच केली त्यांनी आयुष्यभर. आणि त्यातून एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व तयार झालं होतं त्यांचं. केवढा प्रचंड अभ्यास, किती प्रचंड अधिकार होता त्यांचा या बाबतीत. पण तरीही कातावलेले नव्हते, आयुष्याला कंटाळलेले नव्हते. आणि वयोमानानुसार लहान मुलं, तरुण यांच्याप्रति येणारा कडूपणाही आला नाही त्यांच्यात कधीच. अनेक प्रकांड पंडित लावतात तसला “आमच्या काळी असं होतं...” असा निराशेचा सूर मी ऐकलाच नाही त्यांच्याकडून कधी. उलट नव्या होतकरू मुलांचं कौतुक करण्यात सगळ्यात पुढे. स्वरात कधीही तिरस्कारयुक्त हेटाळणी नाही. उलट कायम हुरूप वाढवणारं प्रोत्साहन. पुढच्या अभ्यासाला नकळत, हलकेच दिशा देणारं. माझं ‘चांदणचुरा’ वाचून मला इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं त्यांनी... कुठलंही काम बघून, सीरियल बघून सर आवर्जून फोन करायचे. ‘उंच माझा झोका’ तर फारच आवडीची! फोनवरसुद्धा ‘रमाबाई!!’ अशी हाक मारायचे... आणि मग खूप तऱ्हेतऱ्हेचं बोलायचो आम्ही. अगदी त्यांच्यातला कवी ओळखून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळेतल्या मास्तरांपासून ते त्यांचं दैवत असलेल्या कुसुमाग्रजांपर्यंत. नव्या गाण्यांपासून नाटक- सिनेमापर्यंत. अगदी काहीही...
आम्ही शेवटचे भेटलो, ८ ऑगस्टला. ‘लोपामुद्रा’च्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी. त्यांना भेटायला गेले, आणि चरकले मी. त्यांची तब्येत इतकी बिघडल्याची कल्पनाच नव्हती मला. कौतुकाने मला आइस्क्रीम खाऊ घातलं. माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती अश्विनी, तिला आमचा फोटो काढायला लावला. भरभरून आशीर्वाद दिला. पुस्तकाची पहिली प्रत मी त्यांच्या हातात ठेवली आणि मलाच भरून आलं. हे पुस्तक त्यांना अर्पण केलंय... अर्पणपत्रिका वाचून कोण खुश झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना मला सगळं मिळून गेलं... “आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त. “गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. तेआपोआप तुझ्यापाशी येतील...” सरांचं हे शेवटचं सांगणं. माझ्या मनावर कायमची कोरली का काय म्हणतात न, तशी माझ्यासोबत आहेत. अगदी ठसठशीत. मी त्यांना खूप मिस करतेय. माझे दोन्ही आजोबा गेले, तेव्हा मी अगदी लहान होते. त्यांचं ‘जाणं’ मला आता तितकंसं जाणवत नाही. फारसं आठवतही नाही. पण लौकिकार्थाने माझ्या नात्यातल्या नसलेल्या पण माझ्या खूप जवळच्या असलेल्या या आजोबांचं जाणं मात्र सैरभैर करून गेलं.
वैद्य सरांनी मला कवितेतलं ‘टेक्स्चर’ शोधायला शिकवलं. त्या कवितेचा पोत ओळखायला लावला. स्पर्श, गंध, दृश्य प्रतिमांनी एखादी कविता आपल्याला कशी कवेत घेते, हे पाहायला शिकवलं. आज या रखरखीत उकाड्यात, खिन्न करून टाकणाऱ्या कोलाहलात त्यांची एक कविताच मला त्यातून बाहेर पडायला मदत करतेय. मला शांततेचा आवाज ऐकायला सांगतेय. दृश्य, नाद, रंग, स्पर्श, प्रतिमांच्या संवेदनांची माझ्यावर पखरण करतेय... गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून माझं निवांत एकटेपण जपायला लावतेय..!!!!
शांतता - शंकर वैद्य
घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरे
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे उंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्याभोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्ष्याची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन...गगन
शांततेत उभे माझे निवांत एकटेपण !
“आता परत कधी?” निघता निघता मी म्हटलं. सरांनी उत्तर दिलंच नाही. नेहमीचं मिश्कील हसत “सुखी राहा” इतकंच म्हणाले फक्त.
“गुणगुणत राहायला पाहिजे. मनात सतत गाणं चालू पाहिजे. शब्द शोधत त्यांच्यामागे धावू नकोस. ते आपोआप तुझ्यापाशी येतील..” सरांचं हे शेवटचं सांगणं.
- स्पृहा
वाळवंटांतून भीषण या शंकर वैद्य यांच्या कवितेतील (song) काही ओळी
ReplyDeleteगेले रे गेले रे संगती-सोबती
पुसट पाऊले ठेवून मागुती
कितीक जायाचे असेच अजून
कलला कलला दिवस कलला
उंटांच्या पायांनी काळ हा चालला
लांबल्या सावल्या चालल्या सोडून
अप्रतिम…
ReplyDelete