Sunday, October 18, 2015

काश्‍मीरचे हास्य परतावे


काही न सुचायचाही एखादा दिवस असतो. जिथे काहीच तुमच्या मनासारखं घडत नाही. आसपास घडणारं काहीच तुम्हाला आवडत नाही. हवा लहरी वाटत राहते. दिवस आडवातिडवा कूस बदलत राहतो. श्वास आतल्या आत कोंडत राहतो. मळभ दाटून आलेलं असतं बाहेर...आणि आतही. मनाला खूप विचारांची वावटळ जितकी त्रास देते, त्यापेक्षा जास्त ही ‘काहीही विचारच नाही सोबतीला’ अशी अवस्था छळत राहते. काही फार दुःखद चालू असतं आसपास असं नव्हे; पण प्रसन्नपणाचा शिडकावाही नसतो. कशामुळे होतं असं, कोण जाणे? पण अनेकदा होतं. चढत जाणा-या उन्हासोबत थरकापत जातो जीव, तेव्हा नक्की कोणाचं आणि कशाचं भय वाटत असतं? आपल्या घरात, सावलीखाली बसलेलो असतानाही भिरभिर वावटळ आपल्याला गिळून टाकेल, असं का वाटत राहतं?

पानगळीत शोषून घ्यावा सबंध जीवनरस एखाद्या झाडाचा, तसं शुष्क आणि म्लान वाटणारं सभोवताल. कधी नाही तर संगीतसुद्धा साथ देत नाही. सूरदेखील आणखी आणखी जखमी करत राहतात.... मला आत्ता असा अनुभव आलाय. आणि खरं तर त्याचं कारणही मला माहीत आहे. रोजच्या रोज ज्या बातम्या येऊन आदळताहेत, त्यामुळे असेल कदाचित; काश्मीरमधल्या प्रलयाच्या बातम्या, तिथली हानी, आटोकाट प्रयत्न करून तिथल्या लोकांना मदत करायला झटणारे लष्कराचे जवान... हे चित्र खूप थकवणारं आहे. आपण फक्त हळहळ व्यक्त करू शकतो. जिने प्रत्यक्ष परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही, अशी वांझ सहानुभूती व्यक्त करू शकतो. या गोष्टीने स्वतःलाच नुसताच त्रास होत राहतो. गंमत अशी आहे की, यामुळे आपल्या रुटीनमध्ये काहीही फरक पडत नाही. रोजचे नित्याचे व्यवहार चालूच राहतात.

अधिक कदम नावाचा एक मित्र तिथे आहे माझा. त्याची-माझी काहीही ओळख नाहीये; पण तरीही तो मित्र आहे माझा. चमत्कारिक वाटेल हे ऐकायला कदाचित. हे त्याने वाचलं तर त्यालाही वाटेल. कारण रूढार्थाने आम्ही भेटलोच नाहीयोत कधी. मला तो भेटला दोन-तीन वर्षांपूर्वी एका अवाॅर्ड फंक्शनमध्ये. त्याच्या कार्याबद्दल त्याचा तिथे गौरव केला गेला होता. भारावून जाऊन एक चाहती म्हणून त्याला भेटले. मग त्याच्या अनेक मुलाखती मी पाहिल्या. त्याचं निःस्वार्थी बोलणं ऐकलं आणि मला तो मित्रच वाटायला लागला माझा. दहा-एक वर्षांपूर्वी पुण्यातला एक तरुण काश्मीर खो-यात जातो काय, तिथल्या परिस्थितीने हेलावून तिथेच काम करायचं ठरवतो काय... आज अधिकच्या ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ने किती मोठं काम उभारलंय तिथे. कित्येक आधार नसलेल्या मुलींना अधिकने घर मिळवून दिलंय. आज ‘भय्या’ आणि ‘बसेरा-ए-तबस्सुम’ त्या मुलींसाठी सारं काही आहे. मला आज यापूर्वी कधीही न भेटलेल्या त्या स्वप्नपंखी डोळ्यांच्या सगळ्या मुलींना भेटावंसं वाटतंय. अधिक करत असलेलं काम या प्रलयात वाहून जाणार नाही, ते दशांगुळे वर ताठ झळकत राहील, याची खात्री तर आहेच; पण पृथ्वीवरच्या स्वर्गावर सुल्तानीने कोपलेला खुदा आता अस्मानीतून त्यांना वाचवेल, त्यांच्यावर मेहेर करेल, अशी प्रार्थना मी सतत करतेय.

स्वतःला झोकून देऊन असं काही जगावेगळं काम जीवनाचं कर्तव्य म्हणून हाती घेण्याची ताकद माझ्या दुबळेपणाला सोसणारी नाही. कुठून येतो हा अदम्य उत्साह अधिकसारख्या लोकांमध्ये? कुठून मिळते त्यांना ही रसरसलेली प्रेरणा? कोणते ग्रह-तारे घडवत असतात त्यांचे मार्ग? मला खरंच माहीत नाही. पण त्या पहाडासारख्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मला झपाटून टाकलंय. आतून मला आत्ता ‘तिथे’ असावंसं वाटतंय. माझ्या मित्रांनो, या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. हे सावट निश्चितच विरून जाईल आणि काश्मीरचं ते अख्खं सोनेरी खोरं पुन्हा एकदा ‘बसेरा-ए-तबस्सुम’ (abode of smile) होऊन खदखदून हसू लागेल....इथे बसल्या बसल्या माझ्या बधिर मनातून, विचारशून्य वावटळीतून आलेली ही खरीखुरी दुआ आहे.

- स्पृहा जोशी

2 comments:

  1. tuzya blog che nav kangoshti aivaji gujgoshti adhik chan disel.

    regards.
    Bapu.

    ReplyDelete
  2. स्पृहा तू केवळ एक (अति) सुंदर अभिनेत्री नसून एक उत्कृष्ट लेखिका सुध्धा आहेस. तुझे लेख वाचतांना तुझे अनुभव आम्ही सुद्धा अनुभवतो.

    तू तुझा ब्लोग लिहिण्या साठी कोणते tool वापरतेस? एकदा http://likhona.com वापरून बघ. नक्कीच आवडेल तुला...आणि हो जर आवडले तर सगळ्यांना सांगायला विसरू नकोस हं !

    ReplyDelete