उन्हाळ्याचे दिवस. दिवस उजाडतो, तसा
उन्हाचा तडाखा कडक होत चाललेला. घामाच्या धारा नाहीत तरी एक चिकटपणा भरून
राहिलेला. अशा वेळेस आढ्याकडे तोंड करून झोपून राहताना किती विचारांची गर्दी मनात.
पहिला स्वतःच स्वतःला प्रश्न.. “आपण असे का? बाकी सगळ्यांची आयुष्य भरधाव वेगाने
जात असताना, आपल्या आयुष्यात हे असं थांबणं आलंय का? अवेळी? कशामुळे आहे ते? आत्ता
याक्षणी मला हे असं थांबायचं नाहीये खरंतर. वेग हवाय.. सगळ्याला वेग हवाय. पण मग
हे असं हरवून जाणं का येतंय वाट्याला? का खरंतर वेगाने वाहतायत, असं वाटणारी सगळी
आयुष्य अशीच चाललीयेत; त्यांच्या त्यांच्या परीने संथ..?? ज्या मानसिक द्वंद्वातून
कारण नसताना मी जातीये, तो कल्लोळ त्यांच्या वाट्याला येत असणारे का?
हो खरंच! श्या! सगळं न च्या मारी या
हवेमुळे होतंय.. निरुत्साही करणारी, सगळं शोषून घेणारी हवा. उष्ण. फुत्कार
टाकल्यासारखी. ए. सी. वाल्याला बोलावून घ्यायला हवं की काय? कुलिंग होतच नाही नीट.
म्हणूनच पुन्हा पुन्हा विचार येत राहतात नको ते. एकटेच आहोत आपण. एकटे. आणि त्याला
कोणाचाही काहीही उपाय नाहीये. सगळ्यांची त्यांची त्यांची जगणी आहेत. त्यांची
त्यांची म्हणणी आहेत. आपल्याला हवं तेव्हा आपल्यासाठी नाही येऊ शकत ते. आपण जाणार
आहोत का त्यांच्या साठी ते बोलावतील तेव्हा? हजर होऊ शकणार आहोत? नाहीच की. मग
कशाला वेडगळ अपेक्षा ठेवायची? पण म्हणजे माणसं जोडली, जोडली असं जे वाटत होतं ते
फोलच म्हणायचं की काय? उकडतंय.. आता आतून उकडायला लागलंय.. हे असंच वाढत गेलं तर
आतला, डोक्यातला मेंदू वितळून जाईल की काय.. ! कोणाला विचारू? फोन करू का??
नको नको.. आपलं फोन करणं आवडलं नाही तर?
बरं मग मेसेज.. नकोच पण. कोरडा वाटतो मेसेज. त्यापेक्षा ‘फोन करता येत नाही?’ असं
समोरून आलं तर? आणि या सगळ्यातून आपल्याला जे प्रश्न पडलेत ते तितके महत्त्वाचे
नाहीचेत, असं वाटलं तर? मग काय करायचं? आपल्या एकटेपणाला किंमत न मिळणं याची टोचणी
तर फारच वाईट. उगाच भळभळून येणार, मग त्यात पुन्हा आपले दिवसच्या दिवस जाणार..
नकोच ते..! आपलं एकटेपण आपल्यापाशीच बरं.
कोकीळ ओरडतोय वाटतं खिडकीत.. रोज, अगदी
रोज येतो हल्ली. इवलासा काळा पक्षी. खूप साद घालतो. अगदी कर्कश वाटावी इतकी. ये
बाई त्याच्याकडे लवकर. भेट तरी एकदाची त्याला. या उन्हाळ्यात निदान कोणाचा तरी जीव
थंडावतोय, एवढं कळू दे. तेवढाच विसावा.
बाकी आमच्या उन्हाळ्याला साथ द्यायला आमरस, पन्हं, कलिंगड, कोकम सरबत, ए.सी.
इत्यादी आहेतच. एकटेपणा सकट !
- स्पृहा जोशी
वाह! असं वाहवत जाणारं लेखन खूपच आवडतं मला.
ReplyDeleteखुपच सुंदर मांडले आहेस मनाला दंद्व करु पाहणाऱ्या अगणित विचाराना...
ReplyDeleteआता आतून उकडायला लागलंय...कहर ...सुंदर लिहिलेस
ReplyDeleteKaalach kuthetari vachal.. "It might be lonelier without the loneliness".. Ani aaj ha blog.. Chhan ahe.. Manatlya manatli gadabad, gondhal ani...shantata..
ReplyDeleteloneliness, expressed very well 👌🙏
ReplyDeleteसुंदर...!! प्रत्येकाच्या मनातली गडबड !!
ReplyDeleteवा, अप्रतिम, सुंदर लेख
ReplyDeleteछान लिहिले आहे. थोड्या फार फरकाने, कधी ना कधी प्रत्येकजण हे असं experience करत असतो.
ReplyDelete