Sunday, March 20, 2011

रंगपंचमी

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे....
रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे.
इंद्रधनुष्याच्या कमानीखाली धम्माल रंग खेळायचे..
माणसाला म्हणे तेव्हा रंग म्हणजे काय,हेच माहीत नव्हतं..
त्यादिवशी रंग रंगपंचमी खेळत असताना
एक माणूस त्यांना कोरडा दिसला..हसू विसरल्यासारखा..
रंगांना खूप वाईट वाटलं.
त्यांनी ठरवलं की आपण याच्या आयुष्यात रंग भरून टाकायचे.
आयुष्य रंगीबेरंगी झालं,की तोही हसायला शिकेल,
त्यालाही भावना कळतील.
इंद्रधनुष्य होईल त्याचंही जगणं!
लाल रंग म्हणाला 'मी सळसळता उत्साह देईन'
नारिंगी म्हणाला 'मी देईन ऊर्जा,शिकवेन त्याग'
पिवळ्याने  सांगितलं,'मी देईन स्वच्छ  विचार,न अडखळणारे'
हिरवा हसून म्हणाला,'मी देईन आनंद,भरभराट'
निळा शांतपणे म्हणे,'मी यांना शांती देईन;आणि देईन ओढ असीमाची'.
पारवा दूर बघत म्हणाला.'माझ्यामुळे शिकतील हे शहाणपण आणि सुखाने विलीन होतील अनंतात..'
जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले
आणि म्हणाला,'मी देईन यांना प्रेम आणि पूर्णत्व..'
रंग आनंदले..आणि त्यांनी त्यांच्याकडचा हा ठेवा बहाल केला माणसाला..
माणसाचं आयुष्य कधी नव्हतं इतकं सुंदर बनलं !!!
पण रंगांनी माणसाला कुठे ओळखलं होतं,
२१ व्या शतकापर्यंत त्यांचा विश्वासच उडाला होता
माणूस नावाच्या प्राण्यावरून.
नेहमीसारखेच रंगपंचमीला रंग एकत्र जमले,
हसत मात्र नव्हते..
केविलवाणे झाले होते..
हताशपणे एकमेकांकडे बघत होते.
भडभडून आलं त्यांना,
शेवटी बांध फुटला रंगाचा ;
आणि पाणावल्या डोळ्यांनी म्हणाले -
डोळ्यांत आणुनी उरला सुरला जीव,
निष्पाप आठवे ज्याचा त्याचा देव!
'भगव्या'चे चाले वैर इथे 'हिरव्याशी'
का चोर सोडूनी संन्याशाला फाशी??
का निळा धावतो दलितांच्या उद्धारा,
अन देवाच्या डोळ्यास लागती धारा..
जगण्यातून हरवे का षड्जाचा सूर,
कोंडला सभोती का सरणाचा धूर;
श्वासांत वाहतो असा विषारी वारा,
का तोंड दाबुनी वर बुक्क्यांचा मारा!!
रडणार कसे डोळ्यांतील सुकले पाणी,
रंगांची बनली केवळ चलनी नाणी;
रंगांचे सरले कसे मनांशी नाते,
अन रंगांमागून रक्त आताशा जाते...!!!!  

स्पृहा.

Sunday, March 13, 2011

साहिर..!!

 काही गोष्टी आपल्याही नकळत फारच महत्त्वाच्या बनून जातात.. इतक्या,की त्यांच्याशिवायही आपलं एक वेगळं आयुष्य आहे,हेच विसरून जातो आपण.माझ्यासाठी अशा दोन गोष्टी आहेत,'संगीत' आणि 'कविता'..स्वतःला विसरून जायला भाग पाडणाऱ्या.. एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणाऱ्या.. खूप लहान असतानाच मला जुनी गाणी ऐकायला मिळाली आणि एक प्रचंड मोठा खजिना सापडल्यासारखं वाटायला लागलं.आधी मिठी घातली ती सुरांनी..लता,अशा,किशोर,रफी..आणि मग नंतर कधीतरी जाणवायला लागले ते त्यांतले शब्द..कधी हळुवार,कधी कडक! कधी स्वप्नाळू,तर कधी स्वप्नांच्या दुनियेतून गदागदा हलवून वास्तवात आणणारे.आणि मग जीव जडला तो रचनांवर.त्यातही मनात घर केलं,ते दोघांनी.गुलजार आणि साहिर. गुलजार तरी वेगवेगळ्या स्वरुपात भेटत होते,त्यांच्या चित्रपटांतून कळत होते. साहिर मात्र नेहमी गूढ वाटायचा.माझा जन्मही व्हायच्या आधी तो जगातून निघून गेला होता.तरी एक वेगळीच ओढ वाटायची त्याच्याविषयी..८ मार्च हा त्याचा जन्मदिवस.म्हणूनच त्याच्याबद्दल थोडं शेअर करावसं वाटतंय.

 १९४४ मध्ये हिंदी-उर्दू रचनांचा साहिरचा 'तल्खियाँ' हा संग्रह प्रकाशित झाला आणि कॉलेजकुमार असलेल्या साहिरची गणना एकदम नामवंत कवींमध्ये होऊ लागली. स्वतःला सिद्ध करण्याची आस असलेल्या कोणत्याही महत्त्वाकांक्षी युवकासारखीच त्यालाही आस लागली होती,स्वप्ननगरी मुंबईची.इथला 'स्ट्रगल' त्यालाही चुकला नाहीच.पण त्या अनुभवांनी एक कवी म्हणून त्याला समृद्ध बनवलं.कदाचित म्हणूनच, कुठलाही कडवटपणा मनात न ठेवता तो लिहून गेला,"तद्बिरसे बिगड़ी हुई तक़दीर बनाले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले..!!!" किती सुंदर शब्द, किती सहज, किती सोपे...पण तितकेच खोल.. आतून आलेले.. या गाण्याचाही एक मजेदार किस्सा आहे.. गुरुदत्त यांचा 'बाजी'.. संगीतकार एस.डी.,रुपेरी पद्यावरचा साक्षात मदन-देव आनंद द ग्रेट प्रमुख भूमिकेत.. म्हणजे 'सगळे उच्चीचे ग्रह एकाच वेळी एकाच कुंडलीत!! खरं तर साहिरने हे गाणं रचलं होतं 'गझल'च्या अंगाने आणि बर्मनदांनी मात्र सिनेमाच्या डिमांडनुसार कॅब्रे स्टाइल,जरासं उडत्या चालीचं संगीत दिलं.साहिरला हे अजिबात पटलं नाही.त्याने कडाडून विरोध केला.अगदी 'मी पिक्चरच सोडतो..'इथपर्यंत प्रकरण गेलं.शेवटी गुरुदत्तने मध्यस्थी केली.गीता दत्तच्या 'हस्की'आवाजात ते गाणं रेकॉर्ड झालं आणि नंतर या गाण्याने इतिहास घडवला! याच जोडीने नंतर गुरुदत्तच्याच अजरामर 'प्यासा'ला अजरामर संगीत देऊन आपल्याला कायमचं ऋणी करून ठेवलंय.

मी नेहमी विचार करते, की साहिरच मला इतका जवळचा का वाटावा? मग जाणवतं की त्याच्यामध्ये एक 'तरुण' होता, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा,खोट्या नखरेलपणाविषयी चीड असणारा,माणसामधल्या 'माणसाला' ओळखणारा,त्याच्यासाठी जीव टाकणारा..आणि त्याच जोडीला साहिरमध्ये एक प्रियकर होता.. हलवा,स्वप्नाळू डोळ्यांचा,स्वतःला विसरून प्रेम करणारा.. एखादा 'ड्रीमबॉय' असावा नं,तसा वाटतो मला साहीर !

 त्याच्या करीयरच्या शेवटी 'कभी कभी' साठी त्याने लिहिलं.."मैं पल दो पल का शायर हूँ..मसरूफ जमाना मेरे लिए क्यूँ वक्त अपना बरबाद करे.."अणि खरंच तसं वागला तो..आपल्याकडे लोकांनी लक्ष देत राहावं,आपल्याला मान देत राहावं,म्हणून तो कधीच धडपडला नाही..'एकला चलो रे'म्हणत तो फक्त लिहित राहिला.आणि कदाचित म्हणूनच साहिर आजही जिवंत आहे माझ्या आणि माझ्यासारख्याच त्याच्या असंख्य चाहत्यांच्या मनात.
Belated Happy Birth Day Sahir..Miss U...!!! 

Tuesday, March 8, 2011

सूर्य

एक तप्त,उष्ण,लालसर गोळा.
सृष्टीचा पहिला हुंकार
त्याने जेव्हा ऐकला
तेव्हा तोही आनंदला होता..
पण 'काळ' दंग होता
तिच्याच कोडकौतुकात..
अनेक नवससायासांनी झालेल्या
लेकीला जपावं तसा..
तेव्हा मोठ्या उत्सुकतेने
त्याने भल्या पहाटे काळाला विचारलं,
'मी' कोण...??
पण त्याला कोणीच उत्तर दिलं नाही..
काळानेही दुर्लक्ष केलं त्याच्याकडे,
दत्तक मुलाकडे करावं तसं..

मात्र त्याने आशा सोडली नाही..
रोज पहाटे यायचा तो;
'मी' कोण..??विचारायचा..
उत्तर नाही मिळालं,की
हिरमुसून निघून जायचा...
युगानुयुगे चालू होता
त्याचा 'मी'चा शोध,
उत्तर मात्र कोणीच देत नव्हतं..
तो धुमसत होता आतल्या आत
प्रचंड आग पोटात घेऊन..
एक दिवस मात्र
ह्या अग्नीचा ज्वालामुखी झाला.
आणि तो पेटून निघाला सृष्टीला जाळत.
सृष्टीचा तो शेवटचा दिवस होता!!
त्याच्या दग्ध प्रकाशाच्या काळोखात
आंधळ्या झालेल्या काळाला
भल्या पहाटे त्याने विचारलं,
'मी' कोण?
स्तब्ध काळाकडे बघून
तो खदखदा हसला...
...उत्तर कदाचित
त्याचं त्यालाच मिळालं होतं..!!!

-स्पृहा.