Sunday, December 18, 2011

गर्दी

गर्दी.. खूप तिटकारा आहे मला गर्दीचा.. माणसांचा समुद्र आपल्या अंगावर फुफाटत येतोय असं वाटतं. संध्याकाळच्या वेळी रेल्वे स्टेशन वर पाऊलही टाकायची भीती वाटते.. पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण एक अनुभव आला गेल्या काही दिवसात.. आणि गर्दी सुंदर कशीदिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला.. मध्यंतरी सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचा योग आला..  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कल्पनेतून साकारलेला, संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेला हा महोत्सव. पुण्याच्या गुलाबी थंडीतली हसरी संध्याकाळ आणि सुरांच्या  चांदण्यात न्हाऊन निघणारे हजारो  रसिक... आकड्यांच्या भाषेत 'गर्दीच'..

पण विलक्षण सुंदर.."गेल्या ५९ वर्षांच्या श्रीमंत परंपरेचं हे संचित आहे. आपण काहीतरी खूप छान ऐकायला आलोय.. पवित्र असं काही इथून घेऊन जाणार आहोत", हा आनंद त्यातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला.. अतिशय सामान्य मंडळींपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत आणि मध्यमवर्गीयांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच उपस्थिती.. साठ वर्षांच्या आजी आजोबांपासून सतरा वर्षांच्या युवकांपर्यंत सगळ्यांना कोण उत्साह.. जागतिक कीर्तीचे कलावंत आपल्या अंगणात येऊन कलेचा नजराणा आपल्यासमोर ठेवतायत हा सार्थ अभिमान, त्या परंपरेच्या जनकाविषयी अपार कृतज्ञता.. आणि संगीत आणि केवळ संगीतात भिजून जाण्याची अनिवार ओढ... कुठेही थिल्लरपणा नाही, अभिजाततेला धक्का लागेल अशा 'पॉप्युलर डिमांड्स' नाहीत.. संपूर्ण तन्मयता.. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं.. मूर्तिमंत उर्जा होती..   नकळत पाणी आलं डोळ्यांत. मनावर कायमचा ठसा उमटवून गेलीये ती संध्याकाळ. ती गर्दी एकदम आपलीशी वाटायला लागली.. हा अनुभव देणाऱ्या 'गर्दी'ला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होत होतं. मनात तृप्तीचे सूर रेंगाळत असताना वपुंची वाक्य आठवली.. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते, तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला त्यांच्यावर इन्कमटॅक्सही बसला असता.. मग एक माणूस साधा हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांच देणं' चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची.." ते देणं देणारी अशी ती.. सुंदर गर्दी !!!!

Saturday, November 19, 2011

'त्यात काय एवढं'...!!!!

तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? झपाट्याने बदलत जाणाऱ्या मध्यमवर्गाचं निरीक्षण करायचं असेल तर या एक नंबर जागा आहेत.. खूप मजेशीर दृश्य.. गेल्या दशकामध्ये मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागला, आणि हळूहळू मॉल कल्चर आपल्याकडे रुजायला लागलं. अशा सुपर मार्केट्स मध्ये आता स्पष्ट दिसतो, तो आपल्या लोकांचा बदललेला स्वभाव. हसरेपणा, ऋजुता यांचा लवलेश नसणारा..चढलेली भुवई, आणि चेहऱ्यावर तुच्छतादर्शक भाव.. आणि आपण किराण मालाच्या फडतूस दुकानात नाही, तर एसी मॉल मध्ये शॉपिंग करतोय या गोष्टीतून येणारा एक विचित्र अहंभाव! हा माजोरीपणा कशातून येत असेल?

त्यादिवशी एका सुपर मार्केटमध्ये गेले होते. वर केलेल्या वर्णनासारखाच एक सूट- बूट, कॉलर, टायवाला इसम, हातात उंची आयफोन, तंद्रीत चालताना त्याची  ट्रॉली एका छोट्या मुलीचा पायावरून गेली. ती बिचारी मुलगी कळवळली. बाजूला तिची आईउभी होती. साहजिकच तिने त्या माणसाला हटकलं, अगदी सौम्य शब्दात.. तर तो तिच्यावरच गुरकावला.."हां.. मग ठीक ए ना.. त्यात काय एवढं.. होतं असं.. एवढं काय नाटक!" अरे...ही कुठली पद्धत??? अर्थात तो विषय वाढला, चार तमासगीर जमले, बाचाबाची होऊ घातली.. बोंबाबोंब, कर्णकटू, कर्कश आवाज.. सगळी शांतता हरवून गेली.. वातावरणाच विसकटलं.. आणि ती छोटी मुलगी मात्र एका बाजूला एकटीच उभी होती.. केविलवाणी! जो प्रसंग, "आय एम सॉरी" म्हणून सहज संपला  असता, त्याजागी 'त्यात काय एवढं' या बेपर्वा, मुर्दाड उत्तराने हे सगळं रामायण  घडलं.

किती विचित्र आहे हा एटीट्युड.. म्हणजे ज्या बेपर्वा वेस्टर्न अप्रोचला, त्यांच्या 'व्हॉटेव्हर' कल्चरला आपण उठसूठ नाकं मुरडतो, त्याला शब्दशः समानार्थी आहे हे 'त्यात काय एवढं'!! आमच्या वयाच्या सगळ्यांमध्येच आलीये ही वृत्ती. प्रेमात पडणं, त्यात अयशस्वी होणं, एखादी परीक्षा देणं, त्यात घसरून पडणं, पैसे उडवणं.. यादी वाढते, वाढतच जाते.. सगळ्याला उत्तर एकच..'त्यात काय एवढं'!! आणि आपली कमाल तर त्याहूनही पुढे आहे. या सगळ्याला एकदाच 'नशीब' असं शुगर कोटेड आवरण चढवलं की खल्लास! आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं..' नशीब!'; सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये..'नशीब!' बसच्या रांगेत कोणीतरी तुम्हाला धक्का देऊन घुसलं, 'नशीब!' एखाद दिवस तुम्हीच समोरच्याला धक्का देऊन विंडो सीट पटकावलीत.. तेही 'नशीब'! (यावेळेस स्वर मात्र हसरा!) कशी मस्त साखळी आहे नाही? भारतीय मानसिकतेला तसंही समोरच्याला 'सॉरी' म्हणणं अपमानास्पदच वाटत आलंय म्हणा! ' मोडेन पण वाकणार नाही' हा आपला इतिहास प्रसिद्ध बाणा नाही का! 'चांगलं' असण्यापेक्षा 'कणखर' असण्याला का इतकं महत्त्व? बरं तो कणखरपणासुद्धा आयत्या वेळेस नांगी घालतोच.. आपल्या फायद्याच्या वेळेस बरोब्बर लवचिक होतोच! मग आपल्यापेक्षा कमकुवत लोकांमध्ये हे शौर्य कशाला पाजळतो आपण? त्यामुळे अशा स्वभावांना 'सॉरी'पेक्षा 'त्यात काय एवढं' हेच जवळचं वाटणार! वादातला शेवटचा शब्द.. ब्रह्मवाक्य हे आपलंच असायला हवं! ते त्या मुळमुळीत 'सॉरी' ने थोडंच साधलं जाणार!

विचार करून बघा.. आपल्या नकळत असेच वागत असतो आपण. लहानपणापासून किती जणांना 'प्लीज' म्हणायची सवय असते? बालहट्ट हे नेहमीच किंकाळ्या आणि आरडाओरड्याने व्यापलेले असतात.. त्यांचं 'कित्ती गोड!!' असं कौतुक केलं जातं. आणि मग तीच सवय लागत जाते. लहान असतानाचे हे  लाडिक चाळे मोठं झाल्यावर सार्वजनिक आयुष्यात समोरच्याला भीषण वाटू शकतात, अगदी आपण नकोसे वाटू शकतो, हा विचार किती पालक करतात? त्यामुळे 'नम्रता' हे शाळेत मूल्यशिक्षणाच्या तासाला शिकवलेलं, आणि इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच 'सोडून द्यायचं' एक मूल्य उरतं..

त्यामुळे हा माझा लेख वाचल्यावर समजा तुमच्या मनात आलं, 'त्यात काय एवढं' तर ती तुमची चूक अज्जिबात नाही बरं का!! आणि मीही तुमच्यातलीच असल्यामुळे, 'सॉरी' म्हणण्याच्या फंदात मीही पडणार नाहीच!!! कारण एकच...'त्यात काय एवढं'...!!!!

Saturday, November 12, 2011

प्रार्थना

प्रार्थनेला उत्तर मिळतं, यावर माझा ठाम विश्वास आहे. अगदी कट्टर नास्तिक आणि निरीश्वरवादी सोडले, तर आपण सगळेच दिवसातून एकदा तरी प्रार्थना करतो. कधी मोठ्याने, तर कधी अगदी मनातल्या मनात. देवाला सीक्रेट सांगितल्यासारखे! कधी आपल्या जवळच्या माणसासाठी, त्याला हवं ते सगळं त्याला मिळावं म्हणून, कधी कोणाची तब्येत सुधारावी म्हणून, तर कधी आपल्याच दुःख्खाचा विसर पडावा म्हणून. पण बऱ्याचदा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येतातच असं नाही; मग आपली आणखी चिडचिड होते, आणि आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना पोहोचलीच नाही की काय! का आपल्याला हवं ते उत्तर नाही मिळालं..?? पण का कुणास ठाऊक, पुन्हा डोळे मिटतात, हात जोडले जातात. कदाचित लहानपणीच्या “शुभंकरोति” आणि “ दिव्या दिव्या दीपत्कार” चे संस्कार असतील. एखाद्या गूढ शक्तीसमोर स्वत:ला सरेंडर करणं ही किती सुंदर कल्पना आहे. देवळात जाऊन दर्शन घ्यायला आवडतं मला. म्हणजे मंगळवारी सगळी कामं सोडून रांगेत उभं राहणं आणि नवसाची लाच 'ऑफर' करणं, असं दर्शन नाही हं.. खरंतर अशा ठिकाणी काही मागण्याची इच्छासुद्धा होत नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर, कोकणात हरिहरेश्वर, परशुरामाचं मंदिर, पुण्याचा तळ्यातला गणपती, शिवाजी पार्कचं उद्यान गणेश मंदिर.. आणि अनेक ठिकाणची गावागावातली अस्पर्श, 'मार्केट'चा स्पर्श न झालेली मंदिरं... तिथला उदबत्ती, धूप, दीप,कापूर, प्रसाद, यांचा एकत्र जाणवणारा  सुगंध, अनवाणी पावलांना जाणवणारा फरशीचा गार स्पर्श, काहीतरी अनामिक भावनेने भरून आलेला  ऊर... काही न मागताच सगळं काही पावल्याचं समाधान देऊन जातात!
मला स्वतःला आपली मंदिरं, छोट्या गावातली देवळं जितकी आवडतात, तितकीच आवडतात चर्चेस. जर्मनीला गेले असताना तिथल्या भव्य चर्चेस मध्ये जायला मिळालं. नकळत्या वयात ती सुंदर चित्रं फार खोलवर कोरली गेली मनावर. तिथल्या घंटांचा नाद, गूढ शांतता, मेणबत्त्यांच्या धूसर प्रकाशात जाणवणारा शांत काळोख, आणि प्रेमळ चेहऱ्याचे शांत पाद्रीबाबा.... जसंच्या तसं आठवतंय हे चित्र. आणि अगदी जसंच्या तसं आठवतंय तिथे त्यांनी सांगितलेलं प्रार्थनेचं महत्त्व... "अगदी मनापासून प्रार्थना करूनसुद्धा आपल्यासोबत जे घडायचं ते घडतंच.. मग त्या प्रार्थनेला काय अर्थ? देवाने आपली प्रार्थनाच ऐकली नाही, की आपलं मन किती ठेचकाळलंय, हेच त्याला कळलं नाही! मग प्रार्थना तरी कशाला करायची त्याची? तो असतो, हे मानणंच सोडून द्यावं का?...असे प्रश्न मला बरेच अडले-नडलेले लोक विचारतात. पण मला असं वाटतं की जेव्हा हा विचार येतो, तेव्हाच खरंतर प्रार्थना करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आधी कधीही नव्हतं इतकं महत्त्वाचं. कदाचित देवाला वाटत असेल, आपण आत्ता त्याची आठवण काढावी. आपल्याला जे हवंय ते मागत राहणं, म्हणजे 'विश्वास' नाही; कितीही दुःख्ख आली तरी देवाच्या 'देव'पणा वर शंका न घेणं, म्हणजे 'विश्वास'...." किती सोप्या शब्दांत त्यांनी प्रार्थना, देव याबद्दल सांगून टाकलं होतं...
आणि त्यानंतर एक मात्र माझ्या डोक्यात फिट्ट बसलं. आपण आपल्या देवावर विश्वास ठेवला, तर तो आपल्यावरची नजर कधीच काढून घेणार नाही.. आपण जे त्याच्याकडे मागितलंय, ते तो कदाचित कधीच आपल्याला देणार नाही, पण त्याच्या मनात त्याने आपल्यासाठी त्याहूनही काहीतरी बहारदार योजून  ठेवलं असणार! अश्रू आणि दुःख्ख यांच्या पलीकडचं काहीतरी खूप सुंदर.. तेवढं गिफ्ट तर तो मला देणं लागतोच!!! कारण प्रार्थनेला उत्तर मिळतं यावर माझा ठाम विश्वास आहे..!!

Tuesday, October 25, 2011

यशस्वी

यश म्हणजे काय? याविषयावर हल्ली माझं माझ्याशीच कडाक्याचं भांडण व्हायला लागलंय. आपण ज्या वाटेवरून चाललोय, त्या वाटेवर सध्या तर कौतुकच कौतुक वाट्याला येतंय आपल्या.. मग बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या वाट्याला ते थोडं जास्त येतंय हे दिसल्यावर पोटात का दुखतं आपल्या? प्रत्येकाचा स्वतःचा असा एक 'पेस' असतो... आणि त्यात सामावणारी प्रत्येकाची एक 'स्पेस' असते.. हे सगळं कळत असून 'यश' खेचून घ्यायचा अट्टाहास का चाललाय? कुठल्याही कार्यक्रमानंतर 'कार्यक्रम छान झाला', यापेक्षा "आज पाकीट आपल्याला किती, आणि 'त्याला' किती इतका घाणेरडा विचार का येतोय डोक्यात? तरी बरं, आत्ता कुठे सुरुवात होते आहे करियरला... जगण्याला. पण 'जगणं' नेमकं कळायच्या आधीच ही तुटत जाण्याची जाणीव कशामुळे येतेय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा.

हवं तेव्हा, हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही?
मान्यवरांनी पाठीवर शाबासकीची थाप देणं म्हणजे यश नाही?
प्रामाणिक समीक्षकांकडून कौतुकाची दाद येणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्रांना आपल्याकडे कधीही मन मोकळं करता येण्याचा विश्वास वाटणं म्हणजे यश नाही?
जवळच्या मित्राने केलेला आघात विसरून त्याच्यावर तरीही प्रेम करता येणं, म्हणजे यश नाही?
एखादी सुंदर कविता, लेख, चित्रपट, शिल्प, चित्र यांचा आनंद घेता येणंसौंदर्याचं कौतुक करता येणं  म्हणजे यश नाही?
आपल्या प्रतिस्पर्ध्यामधलं चांगलं शोधता येणं म्हणजे यश नाही?
आपल्यामुळे किमान एक तरी जीव रात्री हसून झोपतो हे समाधान, म्हणजे यश नाही?

हे सगळं जमत होतं आपल्याला, अगदी आत्ताआत्तापर्यंत. मग तेव्हाच खरंतर जास्त यशस्वी होतो आपण असं म्हणायला हवं.. ही भूक, ही वखवख का? कुठून आली ती? कोणासाठी आहे आहे ती? माझ्यासाठी? पण मग मी तर खूप आनंदात असायला हवं. माझ्याचसाठी तर चाललंय सारं काही..
तसं होत मात्र नाही.. मग एक त्याचंही एक वेगळंच फ्रस्ट्रेशन. आणि पुन्हा लोकांच्या सहानुभूतीवर आपला अधिकारच आहे, अशी स्वतःचीच समजूत घालून घेणं. हे का लक्षात येत नाही की आपल्याला जे वाटतं, ते आपल्यासोबत जे घडतं त्यामुळे नाही. कारण आपण गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशा इंटरप्रिट करू पाहतो. त्यांचं प्रत्यक्षातलं रूप आपल्याला बघायचं नसतं. मग त्या आभासी विश्वात रमणं सुरु होतं. आणि तेच आवडायला लागतं हळूहळू. कारण सरळ आहे, तसं करणं सोपं असतं. तिथे खऱ्याखुऱ्या प्रश्नांचा सामना करायचा नसतो. आपल्या पळपुटेपणा झाकायचा तो उपाय होऊन जातो.. पुढे जाऊन त्याची ज्यांना त्याची सवय होते, आणि जे असे सराईत पणे वागायला शिकतात त्यांना आपण 'यशस्वी' अशी उपाधी देऊन टाकतो. आणि मग त्यांच्या 'सर्कल' मध्ये शिरायची धडपड करत राहतो. या पद्धतीने 'यशस्वी' होणं तसं फार अवघड नाहीये. दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक, तुम्हाला नक्की काय हवंय हे  ठरवायचं. आणि मग त्यासाठी जी किंमत द्यावी लागेल, ती द्यायची. ती किंमत तुमचं समाधान, संसार, तत्त्वं, मन, यापैकी काहीही असू शकते. हे जमलं की मग आलंच सगळं !


माझा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. मला यशस्वीही व्हायचंय आणि ही किंमतही द्यायची नाहीये. त्यामुळे मी सध्या उलटा विचार सुरु केलाय.. 'समाधानी' होऊ शकेन का, याचा.. बघूया, त्यात 'यशस्वी' होता येतंय का ते. कारण इतकी खात्री आहे, की हे यश कायमचं टिकणारं असेल. माझं हसू हिरावणारं नाही, तर ते आणखी खुलवणारं असेल!


Thursday, October 20, 2011

स्वप्न माझे..

हे उमलत्या पाकळ्यांचे स्वप्न माझे 
चिंब भिजल्या आठवांचे स्वप्न माझे..

चांदण्यांचा खेळ चाले शांत राती,
हासले पाहून त्यांना स्वप्न माझे..

आज येथे साद दे हळुवार कोणी
पाहते तो थांबलेले, स्वप्न माझे..

वाट माझी वेगळी ही शोधिली मी,
भेटले वाटेवरी अन स्वप्न माझे..

एकटी मी चालले वाटेवरी या,
आज माझ्या सोबतीला स्वप्न माझे..

-स्पृहा. 

Friday, September 30, 2011

नैतिकतेचे डांगोरे

'गॉसिपिंग'  हा आपला राष्ट्रीय आवडता छंद आहे. कोणीही उठून कोणाबद्दलही  काय वाट्टेल ते बोलू शकतो. 'भाषणस्वातंत्र्य' ही तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेली खास देणगी आहे. जिचा चोख फायदा घेत आपल्या दुधारी जिभेचे धारदार दांडपट्टे सतत चालूच असतात. बरं आपल्याला सगळ्या विषयांतलं सगळं कळतं, आणि त्यावर अजिबात लायकी नसतानाही ठाम मतप्रदर्शन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे असा एक विशेष समज आपल्या मनीमानसी रुजलेला आहे. त्यामुळे सचिनच्या सेंच्युरीपासून ते कतरीनाच्या बिकीनीपर्यंत, आणि अण्णा हजारेंच्या उपोषणापासून ते ओसामा बिन लादेनपर्यंत कुठल्याही गोष्टीवर सर्व लहानथोर प्रचंड अधिकारवाणीने बोलत असतात. त्यातून 'नीतिमत्ता' हे तर राखीव कुरण! तिथे जर कोणी घसरलं, की मग तर समस्त संस्कृतीरक्षक बाह्या सरसावून उभे ठाकलेच. नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण म्हणजे, सध्या चालू असलेला (माझ्या मते) नॉनसेन्स वितंडवाद.'मणिपूरची लोहकन्या' म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इरोम शर्मिला हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं, की "डेझमंड कुटीन्हो नावाच्या गोव्यात जन्मलेल्या ब्रिटीश लेखक, सामाजिक कार्यकर्त्यासोबत माझं अफेअर चालू आहे." झालं. वादाचा प्रचंड धुरळा उडाला. तिचे विरोधकच  नाही, तर समर्थक सुद्धा हडबडले. ही बातमी खरी नसून ती शर्मिलाविरुद्ध कसलीतरी भयानक 'स्टेट कॉन्स्पिरसी' आहे, असंही बोलून झालं. 'एलिट' वर्गाने नेहमीप्रमाणे "तिच्या आयुष्यात तिने काय करावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे", असं म्हणून सोयीस्करपणे विषय झटकून टाकला. म्हणजे यांच्या 'ड्रिंक पार्टीज' मध्ये चघळायला विषयही झाला, आणि सामान्य मध्यमवर्गीयांच्या नीतीमत्ताविषयक कचकड्याच्या कल्पनांना भूकंपाचे धक्केही बसायला नकोत !
माझ्या मनात थैमान चालू आहे ते वेगळ्याच विचारांनी. काय झालं, समजा शर्मिलाला बॉयफ्रेंड असला तर? काय फरक पडतो तिचं कोणाबरोबर अफेअर असलं तर? या एका कारणामुळे तिचं आजपर्यंत असलेलं सगळं कर्तृत्व लगेच डागाळलं? गेली दहा वर्ष ही एकटी बाई कोणतेही मिडिया स्टंट न करता मणिपूर मधून 'आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट (AFSPA) हा अन्यायकारक कायदा रद्द व्हावा म्हणून उपोषण करते आहे, सरकार नामक अजस्त्र राक्षसाशी एकटी हिंमतीने झुंजते आहे, अनन्वित छळाला सामोरी जाते आहे, तिच्या कार्याच्या जोरावर तिथल्या लोकांच्या गळ्यातली ती ताईत बनली आहे, ही सत्य परिस्थिती केवळ वरच्या एका घटनेमुळे आपण नाकारायची??

तिचं आयुष्यभराचं सगळं कर्तृत्व या एका घटनेने कस्पटासमान ठरवायचं?? का कोणाला तिच्या बचावासाठी हे म्हणण्याची गरज पडावी, की "अहो, हे कसं शक्य आहे, कारण शर्मिला तर कडक बंदोबस्तात पोलीस पहाऱ्यात होती. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिच्यावर इतकी कडक नजर होती, की तिचे कुटुंबीयही तिला भेटू शकत नसत. मग हे अफेअर वगैरे कसं शक्य आहे?" का वेळ यावी हे बोलायची? किंवा हे क्लॅरिफिकेशन घाईघाईने द्यायला लागावं, की "ते दोघं आता 'एंगेज्ड' आहेत, त्यामुळे अफेअर करून गमावलेलं(?) सिव्हील सोसायटी मधलं स्थान आता शर्मिलाला परत मिळालं आहे!!!" कुठल्या नैतिकतेचे डांगोरे पिटणं चालू आहे आपलं? बाकी सगळं सोडून देऊ, पण एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून शर्मिलाचा 'प्रेमात पडण्याचा अधिकार' हिरावून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?तिचं 'बाईपण' ही गोष्ट आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवतं. कारण कुठल्याही 'आदर्श स्त्री'ला आपल्याकडे 'देवी माँ' होऊनच राहावं लागतं, जगावं लागतं. तीही कालीमातेसारखी कठोर नाही, तर मध्यमवर्गीय पितृसत्ताक मानसिकतेला आवडेल, झेपेल, पचेल इतकीच साधी, सोज्वळ, पतिपरमेश्वरपरायण 'सीता' म्हणून. त्यामुळे ही मणिपूरची लोहकन्या शर्मिला; शक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा, आणि त्यागाचं प्रतीक असणारी शर्मिला, हिने प्रेमाबिमासारख्या क्षुद्र मानवी भावनांमध्ये अडकून कसं चालेल? तिने असा विचारही करणं, ठार चुकीचंच नाही का! अब्रह्मण्यम!! आपल्याकडच्या चॅनल्सनाही त्यांचा TRP वाढवायला, हे असले विषय चघळायला बराच वेळ असतो, त्यामुळे त्यांनी तर साधारण, "जिला आपण सर्व आदर्श मानतो, अशा एका कमकुवत मनाच्या स्त्रीने आपल्या भाबड्या निष्ठावंतांची केलेली घोर फसवणूक..!!" इतक्या हीन पातळीला शर्मिलाचा विषय आणून ठेवलाय. एका पेपरने तर 'शर्मिलाला तिच्या प्रियकराने अॅपलचं मॅकबुक भेट दिलं' अशीही बातमी छापली. पण दुर्दैवाने कुठल्याही पेपरने त्यावर, 'सो व्हॉट?' , 'मग काय?' असा स्टॅंड घेतलेला नाही. आपल्याकडे राज्यकर्ते आणि सेलिब्रिटीज यांची असंख्य वेळा घडणारी- तुटणारी अफेअर्स आपल्याला चालतात. त्या गोष्टीवर त्यांचं 'ग्लॅमर' आणि आपली 'क्रेझ' सहज पांघरुण घालते. मग हाच न्याय त्या मणिपूरच्या 'आयर्न लेडी' ला का नाही? तिच्यावर 'नीतीमत्ताहीन' असल्याचा शिक्का मारण्यापूर्वी हा विचार का नाही? 'प्रेमात पडण्याचा अधिकार' तिच्या नशिबी का नाही..??!!


Sunday, September 11, 2011

आनंद

सकारात्मकता... एकदम केवढा मोठ्ठा शब्द आला न सुरुवातीलाच.. हा मूल्यशिक्षणाचा ता(त्रा)स चालू आहे का, असंही मनात येऊन गेलं असेल! पण शाळेत हा शब्द कानावर पडण्याच्या, आणि त्याचा कंटाळा येण्याच्या खूप आधी मला हे शिकवलं एका साध्या  पिक्चरने...'आनंद' ने!! तेव्हा त्यातलं सगळंच कळलं होतं अशातला भाग नाही.. पण 'आपण आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी  ठेवणं' या कल्पनेतली गंमत जाणवली होती.. पुढे मंगेश पाडगावकरांची 'सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत' ही कविता वाचताना, हा 'आनंद सेहगल' च आपल्याशी बोलतोय, असा साक्षात्कार झाला. आणि एखादा जुना मित्र भेटावा तितका आनंद झाला मला..
मुळात, हल्ली जिथे तिथे ज्याच्या त्याच्या तोंडी 'मला टेन्शन आलंय, फ्रस्ट्रेशन  आलंय' हे इतकं सहज ऐकू येतं.
अरे यार, काय रडेपणा चाललाय? ज$$$रा विचार करा, तुम्ही एका गॅलरीत उभे आहात, खालून सांडपाण्याचं गटार वाहतंय, आणि आकाशात एक छानसा लुकलुकणारा तारा आहे; तर तुम्ही आनंदाने तारा बघणार,का गटार बघून तोंडं वेंगाडणार!! चॉइस तुमच्या हातात असतोय की राव !!


कदाचित याच पॉझीटीव्ह भूमिकेमुळे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जींनी 'आनंद' सारखा मास्टरपीस बनवला असेल. त्यांना साथ मिळाली ती गुलजार, योगेश, सलील चौधरी यांसारख्या प्रतिभावंतांची आणि त्याचबरोबर गुणी अभिनेत्यांची.. सतत बोलणाऱ्या, रसरसून आयुष्य जगणाऱ्या आनंदची भूमिका सुपरस्टार राजेश खन्ना अक्षरशः जगलाय. 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!' असं सांगणारा आनंद मनाला स्पर्श करून जातो, तो उगाच नाही! चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमला खरंतर आपल्याला कळतं की आनंद मरण पावला आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक दृष्यागणिक आपण त्याच्या प्रेमात पडत जातो, आणि तो जिवंतच राहणार असेल, तो मरूच नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत राहतो.. तो गेल्यानंतरचा 'बाबूमोशाय' अमिताभचा आक्रोश हा त्याच्या एकट्याचा नसतो, तर पाणावलेल्या डोळ्यांनी मूकपणे आपल्याही मनात तेच भाव दाटून आलेले असतात..
'आनंद' ची सगळी कमाल हे त्यातील पात्रं ज्या भाषेत बोलतात, त्यात आहे असं मला वाटतं. "जब तक जिंदा हूँ,तब तक मरा नहीं. जब मर गया, साला मैं ही नहीं; तो फिर डर किस बात का!" अंगावर प्रत्येक वेळी काटा येतो हे ऐकताना. आणि पिक्चरच्या सुरुवातीला आकाशात दूर हरवत जाणाऱ्या फुग्यांच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणारं येणारं "जिंदगी कैसी है पहेली" हे गाणं??? 'आनंद' चं स्पिरीट सांगणारं हे गाणं, खरंतर शाळांमधून कविता म्हणून शिकवायला हवं! मग मूल्यशिक्षणाचे ओव्हरडोस नसले तरी चालतील..

कारण कसं आहे, सकारात्मकता अशी डोस पाजून 'इंजेक्ट' नाही करता येत.. ती अंगात मुरवावी लागते, रुजवावी लागते.. 'आनंद सेहगल' सारखी! बाकी सगळं सोडून देऊ पण 'आनंद' मधून एक जरी गोष्ट आपण शिकलो न, तरी सगळं साधलं.." मरते मरते चेला गुरु को जीना सिखा गया, दुख अपने लिये रख, आनंद सबके लिये...!!!!"Tuesday, September 6, 2011

मोरया.

तूच माझी आई देवा, तूच माझा बाप
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप
चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया
 घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया..!!
दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन ही माझ्यासाठी स्पेशल गोष्ट असते.. आणि यंदा तर 'मोरया' मुळे हा गणेशोत्सव आणखीनच स्पेशल झाला माझ्यासाठी.. आज सर्व थरांतून या चित्रपटाला जे उदंड प्रेम मिळतंय, जो अमाप प्रतिसाद मिळतोय ही बाप्पाचीच कृपा नाहीतर काय..आज म्हणूनच मोरयाच्या आठवणी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतायत..
गणपती ही बुद्धीची देवता..'मोरया' च्या अगदी सुरुवातीच्या मिटींग्स मध्येच जाणवत होतं की बाप्पाचा वरदहस्त असलेल्या अतिशय क्रिएटिव्ह लोकांसोबत आपण काम करतोय.. संगीतदिग्दर्शक म्हणून लोकांची कौतुकाची पावती मिळवून आता उत्तम दिग्दर्शक अशी ख्याती कमावणारा अवधूत गुप्ते, अप्रतिम स्क्रीनप्ले आणि संवाद लिहिणारा सचिन दरेकर, उत्कृष्ट छायाचित्रण करणारा राहुल जाधव, समजून उमजून जीव ओतून काम करणारे संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर, अष्टपैलू गणेश यादव, ज्यांचं नाव घेताना आदरयुक्त प्रेम वाटतं असे, द ग्रेट दिलीप प्रभावळकर... नावं तरी किती घ्यायची... या सगळ्यांसोबत आपण काम करणार ही कल्पनाच मुळी खूप एक्सायटिंग होती. त्यामुळे शूटिंगचे सगळे दिवस हा एक आठवणींचा ठेवा बनून राहिला.
मुळात मला नेहमी पडणारे बरेच प्रश्न या चित्रपटात विचारले गेलेत..त्यामुळे आपण काहीतरी खूप आपल्या मनातलंच सांगतोय असं वाटत होतं.. स्क्रिप्टशी नातंच जुळून गेलं. गणपतीबाप्पा वर मनापासून प्रेम आहे माझं..त्यामुळे हा गणेशोत्सवाचा नाटकी झगमगाट का, कशासाठी, कोणासाठी? असं नेहमी वाटायचं. अचकट विचकट डान्स, डीजेचा ढणढणाट, पैशांची कोट्यानुकोटी उड्डाणे, केवढाले तरी सेट्स, या सगळ्यात एरवी खूप जवळचा असलेला बाप्पा हे दहा दिवसच आपल्यापासून दूर गेल्यासारखा वाटायचा.. 'मोरया' ने नेमका ह्याच भावनांना हात घातला. ''झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला,रोषणाई मध्ये देव माझा हरवून गेला..!!"
आणि त्याच्याच बरोबर हेही मोकळेपणाने मान्य करायला हवं की 'मोरया' करताना जाणवली साध्यासुध्या, भोळ्याभाबड्या गणेशभक्तांची, स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची तळमळ. कुठलीही अपेक्षा नसते त्यांची, कुठेही झळकायचं नसतं त्यांना. ना कुठलाही 'क्रेडीट' हवं असतं. मोरया मध्ये संतोष आणि चिन्मय च्या कामाला लोकांनी डोक्यावर घेतलं, यात त्यांच्या अभिनयाला दाद तर होतीच; पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या मनोज आणि समीर मध्ये त्यांनी स्वतःला पाहिलं. या दोघांमध्ये त्यांनी आपलंच प्रतिबिंब पाहिलं!
मला अतिशय आवडणारं 'मोरया' मधलं पात्र, म्हणजे कामत काका.या व्यक्तिरेखेला दिलीप काकांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. एका प्रसंगात कामत काका म्हणतात, "अमुक अमुक राजा पावतो, म्हणून त्याच्या दर्शनासाठी रांगा लावता; आणि उजव्या सोंडेच्या गणपतीला घाबरता..अरे ही काय श्रद्धा म्हण्यची!!" किती खरं आहे हे.. सध्या रोज उघड्या डोळ्यांनी पेपर वाचत असाल, बातम्या पाहत असाल तर, तुम्हालाही हे भयाण, दाहक वास्तव नक्कीच जाणवलं असेल, हो ना?
लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हाचा आणि आताचा उत्सव यात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. आपण सगळ्यांनीच हे मान्य करायला हवं. सगळं बदललं, छोटे छोटे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, फुलांची आरास, छोटीशी गोजिरवाणी मूर्ती.. आता भव्य मंडपांमध्ये राजकीय नेत्यांचे बॅनर्स आले, जुगाराचे अड्डे आले, दारूच्या बाटल्या आल्या.. मांगल्य, पावित्र्य हे नुसते शब्द म्हणून उरलेत.. एकाच गोष्ट बदलली नाही.. ती म्हणजे, मगाशी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांची तळमळ, त्याचं निखळ प्रेम आणि त्यांची निरागस भावना... आशेचा किरण म्हणूनच वाटल्यावाचून राहत नाही..
'मोरया' करताना हे सगळं परत परत जाणवत राहायचं, आणि या इतक्या छान प्रोजेक्टचा आपण लहानसा का होईना पण एक भाग आहोत, या कल्पनेनेच खूप आनंद व्हायचा.. शेवटी सगळ्याचा कर्ता-धर्ता तोच.. त्याची अशीच कृपादृष्टी राहो एवढीच त्या विघ्नहर्त्या गणेशाजवळ प्रार्थना..
"गणाधीशा, भालचंद्रा, गजवक्रागणराया
     वक्रतुंडा, धुम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया...!!!!"

Sunday, September 4, 2011

माझी मुलाखत.. तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करताना खूप आनंद होतोय!
'मोरया' च्या निमित्ताने जे उदंड प्रेम दिलंत, जो प्रतिसाद दिलात त्यासाठी मनापासून आभारी आहे. आपलं असंच प्रेम आणि आशिर्वाद सतत पाठीशी राहोत !!!
- स्पृहा.

Saturday, July 23, 2011

"सुख दुखतंय...!!!”

निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं. इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..
आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत... तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा... सतरा भुंगे एकत्र नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक अट्टाहास बघून...
काय बरं सांगत होते मी... पाहिलं, हे असं करतंय मन... आता इथे तर लगेच कुठे भलतीकडेच... किंवा गायबच अचानक... एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय जाऊन... ढोंगी... आगाऊ... आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव भांड्यात पडेल... काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा..
स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न?? नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं?? भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी... मळभ आलं होतं म्हणून?... हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित ‘असणंच’ चुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा उमाळा येतोय... काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..
तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं.. रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं...आणि पाऊस कोसळायला लागतो, झिम्माड... आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज गालातल्या गालात हसतो हलकेच...आणि हळुवारपणे म्हणतो..."काही नाही...तुला सुख दुखतंय...!!!

Wednesday, July 13, 2011

अधीर श्रावण

अधीर श्रावण, मनात पैंजण
उनाड वाहे वारा,
आठव येता तुझी माधवा
देह सावळा सारा..
अशांत यमुना, उदास गोकुळ
उधाणलेला पूर,
दूर तिथे तू, तरिही छळतो 
तुझा पावरी सूर.
कोमल स्वप्ने, मधुरा भक्ती
जपते राधा वेडी,
पायांमध्ये जणू घातली 
कुणी फुलांची बेडी!
हळवे तनमन, सरले 'मी'पण 
गर्दनिळीही भूल,
निळसर मोहन, राधा झाली 
निशिगंधाचे फूल..!!

-स्पृहा.   

Tuesday, July 12, 2011

वाचू आनंदे!!: Relationship

वाचू आनंदे!!: Relationship: "Relationship - Nayantara Sahgal E. N. Mangat Rai (HarperCollins Publishers, Price- Rs.395) When Relationship wa..."

Thursday, July 7, 2011

आनंदाचा कंद, विठ्ठल सावळा!

आषाढी एकादशी आली...आत्ता चंद्रभागेच्या वाळवंटात एकच आनंद भरून राहिला असेल..हरिनामाचा उद्गार आसमंत व्यापून राहिला असेल.. हजारो- लाखो साधे सुधे,भोळेभाबडे जीव विठ्ठल रंगात रंगून गेले असतील. आणि आपण?? टीव्हीवर आणि पेपरात वारी पाहणारे आपण.. त्यांच्या श्रद्धेला तुच्छ लेखत डेली सोपच्या बिनडोक एपिसोड मध्ये नाहीतर पेज थ्रीच्या चमचमीत गॉसिप मध्ये रमणारे आपण..  'कशाला इतका वेळ त्या वारी-बिरी मध्ये फुकट घालवतात हे लोक! मूर्खपणा आहे सगळा..' असं म्हणत वारीमागच्या लॉजिकलाच 'डाऊन मार्केट' करून टाकणारे आपण!! आपल्या सामान्यपणाच्या कोशालाही अहंगंडाने चिकटून राहणारे आपण..!! खूप उचंबळून येतं मला हे सगळं वाचताना, त्या वेड्या वारकऱ्यांना पाहताना. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते वेगळंच समाधान पाहताना..आपल्या 'शहाण्या' जगण्यात कधी इतकं निर्मळ हसतो आपण? कधी आवेगाने व्यक्त होतो? कधी श्वास घेतो मोकळेपणाने? 'वारी' हेच शिकवत असणार त्यांना. रोजच्या कष्टांनी गांजलेल्या, हालांनी पिचलेल्या जाण्यावर मायेची थंड फुंकर घालत असणार वारी.. हे अनुभवायचंय मला, त्यांच्यातलीच एक होऊन डोक्यावर वृंदावन घ्यायचंय, रिंगण धरायचंय ,स्वतःला विसरून जायचंय. आयुष्यात एकदा तरी, एकदा तरी वारीला जायचंय..!!!

आनंदाचा कंद    विठ्ठल सावळा
वैजयंती माळा    शोभे कंठी
जिवालागी जीव   ऐसा गा जडला
वेडापिसा झाला   तुझ्या पायी
संसाराची वाट      अनवट जरी
हात तुझा शिरी     असो द्यावा
मनातच वारी     मनात गजर
मनात पाझर      चंद्रभागा
देहाचेच आता     जाहले मंदिर
आतला अंधार     लोपलासे..

- स्पृहा.

Tuesday, June 28, 2011

गणोबा..!!

आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला.. A cute letter by a small kid who  hates Maths. ." dear maths, please grow up soon and try to solve your problems yourself!!!!!"  मी इतकी हसले माहितेय...मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले...!!!

गणित..कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! म्हणजे मार्क कमी मिळायचे, पेपरात भोपळे मिळायचे असं काही नाही बरं का.. पण गणित म्हटलं की कंटाळाच यायचा.. अगदी पाचवी-सहावीत असल्यापासूनच... माझे काही मित्र अगदी हिरीरीने अल्जेब्रा / भूमितीतली प्रमेय सोडवत बसलेले असायचे, आणि माझं लक्ष गणिताच्या तासाला कायम वर्गाच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावर, झाडांवर, पक्ष्यांवर असायचं!! या रुक्षपणात इतकं रंगून जाण्यासारखं काय आहे? हे कोडं मला कधीच उलगडलं नाही... एक गंमत तर अगदी हमखास करायचे मी, म्हणजे गणिताच्या पेपरात संपूर्ण गणित चोख सोडवायचे, सगळ्या स्टेप्स एकदम करेक्ट..पण उत्तर लिहिताना १२३ च्या ऐवजी १३२ किंवा xyz च्या ऐवजी yxz !!! माती सगळी!!! पायथागोरस वगैरे महनीय प्रभृतींनी तर जिणं हराम केलं होतं माझं! कारण आमचं गणिताबद्दलचं आकलन अगाध.. अरे तू तुझ्या घरात लाव न काय लावायचेत ते शोध.. आम्हाला काय त्रास!!! असा जेन्युईन त्रागा मी कित्येक वर्षं केलेला आहे.. पण राज्यशासन, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, शिक्षणतज्ज्ञ वगैरेंना माझी कधीच दया आली नाही..!! आणि वर्गमुळं, घनमुळं, परिमिती, त्रिज्या, चक्रवाढ व्याज अशा भीतीदायक शब्दांची आक्रमणं माझ्या कोमल मनाला घायाळ घायाळ करत राहिली.. कर्कटक, कंपास अशा हिंसक, हानिकारक वस्तू मुलांच्या इतक्या लहान वयात हातात देणं कित्ती चुकीचं आहे...आपल्या समाजातली हिंसक प्रवृत्ती यामुळेच वाढीला लागली असणार!!!  

चुकून एकदा कशी कोण जाणे पण गणित प्राविण्य परीक्षेच्या पुढच्या फेरीसाठी माझी निवड झाली.. (मंडळाचं मार्कांचं गणित चुकलं असणार!!) तर त्याच्या तयारीसाठी आमच्या शाळेने एक कार्यशाळा घेतली.. दोन दोन मुलांची एक जोडी.. आणि नेमकी मी होते गणिताच्या प्रचंड वेड्या आणि आमच्या शाळेतल्या सगळ्यात हुशार मुलासोबत!! भीषण!!!!! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सातवीत... मी भयचकित.. माझं मन त्याच्याविषयीच्या अत्यादराने आणि स्वतःविषयीच्या आत्यंतिक न्यूनगंडाने भरून आलं!! एक रुपयाच्या नाण्याचं वजन, का क्षेत्रफळ का असंच तत्सम काहीतरी शोधून दाखवायचं होतं.. मी बावळटासारखी बघतच राहिले.. "हातात आलेल्या एक रुपयाची शाळा सुटल्या सुटल्या कैरी चिंच घ्यायची.." आमच्या निर्बुद्ध डोक्यात हे असलेच विचार कायम! तोवर या पट्ठ्याने मात्र त्या नाण्याला दोरा गुंडाळून, काहीतरी आकडेमोड करून उत्तर शोधलं सुद्धा.. तो फॉर्म्युला मला आजपर्यंत कळला नाहीये..!

आज मागे बघताना या सगळ्याची खूप गंमत वाटतेय. आमच्या वर्गात फळ्यावर रोज एक सुविचार लिहिला जायचा. त्यापैकी एक अगदी डोक्यात बसलाय. 'ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:ख्खी होऊ नये.' त्यावेळी बाकी तात्त्विक अर्थ कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता.. 'आपल्याला गणित कधीच धड कळणार नाही, ही गोष्ट कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे याच्याविषयी कधी दुःख्खी होऊ नये!!!' आणि इमाने इतबारे मी आजतागायत त्याचं पालन केलंय. शेवटी कसं आहे, त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!! ती गणितं सोडवायची शक्ती मला सतत मिळत राहो,ही पायथागोरस चरणी प्रार्थना...!!!:-)


Monday, June 20, 2011

“बहाना चाहिये..”

मध्यंतरी ती जाहिरात पहिली होती तुम्ही?? "खानेवालो को खाने का बहाना चाहिये.." फार आवडायची मला.." बहाना चाहिये..!!" सगळ्याला कारणं शोधायची सवय लागलीये.. म्हणजे शोधक वृत्तीने नाही.. खरं तर कारणं 'द्यायची' असं म्हणायला हवं! हसण्याला कारण हवं, रडण्याला हवं..सेलिब्रेशनला हवं.. एखादी गोष्ट करण्यासाठी कारण हवं.. 'न' करण्यासाठी हवं, टाळण्यासाठी तर हवंच हवं!! 'बहाणा'...हां... हा शब्द करेक्ट आहे!! अंगावर येणाऱ्या गोष्टी दूर सारण्यासाठी, जबाबदारी ढकलण्यासाठी...किती उपयोग होतो याचा!! नको त्या माणसांना टोलावण्यासाठी, हव्याशा माणसांना पटवण्यासाठी अक्षरशः मदतीला धावून येतात हे  'बहाणे'.. नकळत्या वयातच सवय लागते आपल्याला त्यांची..या बहाण्यांच्या पदराखाली दडण्याची, आपल्याला हवं तसंच, हवं तेच, आणि हवं तेव्हाच करण्याची सवय... बघता बघता आपण इतके वाहवत जातो, की आपलं जगणं हाच एक 'बहाणा' बनतो!! खरं नाही वाटत?? कुठून सुरुवात करूया 'बहाण्यांची'??!!

*अगदी लहान असताना.. 
१.शाळेत जायचं नाहीये.."आई पोटात खू$$$प दुखतंय!!" 
२.गृहपाठ केला नाहीये.."बाई, सॉरी वही घरी विसरले!!" 
३.मार्क्स कमी मिळाले..."पेपर केवढा लेन्दी होता माहितेय?? वेळच नाही पुरला!!!"
*कॉलेजमध्ये..
१. एकांकिका स्पर्धा.. " आमची एकांकिका कळलीच नाही रे!! बिनडोक होते परीक्षक!!"  २.सहकलाकाराला बक्षीस मिळालं, आपल्याला नाही.." माझ्यामुळे धरतं रे नाटक..त्याला काय **** काम करता येतंय!! मी होतो म्हणून.."
३. जी.एस. ची इलेक्शन हरलो.. "सगळं ठरवलेलं रे..प्रोफेसर्सच्या मागे आम्ही फिरलो नाही न गोंडे घोळत!!"
*प्रेमात पडताना.. "तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयरी आहे माझी..सगळं काही सोडून देईन तू म्हणशील तर!!" 
*प्रेमात न पडताना.." म्हणजे तू खू$$$प जवळचा मित्र आहेस माझा; पण मी तुझ्याकडे 'तसं' कधी पाहिलंच नाही!!
*लग्न करताना.." 'या'च्या पेक्षा 'तो'च बरा..जरा बोरिंग आहे..पण धाकटी बहिण आहे.. भावांचं झंझट नाही!!!"
*काम करायला लागल्यावर.. आसपासच्या लोकांना मिळणारं काम ,पैसा, प्रसिद्धी बघताना..
१. "काय म्हणून 'सेलिब्रिटी' म्हणून मिरवतात रे हे.. दिडकीची नाही अक्कल.. आम्ही अजून 'प्रोफेशनली' उतरलो नाहीयोत न..म्हणून!! 
२. "कामं मिळवण्याचे रस्ते वेगळे असतात रे यांचे..आम्हाला नाही हो असली 'कॉम्प्रोमायझेस' करायची!!!" 

घरी-दारी,शेजारी-पाजारी सतत सुरु असणाऱ्या बहाण्यांचे हे काही प्रातिनिधिक नमुने!! अगदी हेच नाही..पण यांच्यासारखे असे कित्येक उद्गार आपण रोजच्या रोज ऐकत असतो..किंवा बऱ्याच वेळा आपण स्वतःच 'उद्गारवाचक' असतो!!! का होतं असं? विचार केलाय कधी? मीसुद्धा आहे या 'लीग' मध्ये...एवढी निगेटीव्हिटी, इतकी कृत्रिमता कुठून येते आपल्यात?? खुलेपणाने समोरच्याला दाद देणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या यशात, आनंदात मनापासून सहभागी होणं विसरलोय का आपण?? का समोरच्याचं अपयश मजेशीर वाटतं?? इतकी विघ्नसंतोषी वृत्ती कशामुळे झाली आपली??? स्वतः मोठं होण्याच्या नादात, आपण आसपासच्या सगळ्यांनाच तोडत निघालोय..एवढी कसली मस्ती ही?? शेवटचं दुसऱ्यांसाठी म्हणून काय केलं होतं? त्यांना बरं वाटावं म्हणून..स्वतःला विसरून?? फक्त मी, माझं, मला..बस!!

....असे नव्हतो आपण...हुश्श..स्वतःशीच निदान आज एवढं तरी कबूल केलंय कित्येक दिवसांनी..जरा हलकं वाटतंय.. इतके दिवस आपण स्वतःलाच फसवत होतो, हे मान्य करणं, म्हणजे एक नवी सुरुवात असेल का?? बदलाच्या दिशेने.. मोकळे पणाच्या दिशेने.. निरागस हास्याच्या दिशेने.. हे एवढं करायला तरी 'बहाणे' नकोत!! नाहीतर आरशासमोर उभं राहिल्यावर उद्या मनच म्हणायचं.." मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..!! "
  
  

Friday, June 10, 2011

वेडा फकीर!

आटपाट नगर होतं..
त्या नगरात सगळेजण सुखा समाधानानेगुण्यागोविंदाने नांदत होते. 
एक दिवस फिरत फिरत एक वेडा फकीर आला त्या नगरात..
देवानेच पाठवल्यासारखा..
हातामध्ये कुंचला आणि डोळ्यांमध्ये गूढ काहीतरी शोधणारे वेगळेच रंग.. 
पाहता पाहता या नगरीच्या  प्रेमात पडला तो..
रेषांना वेगळीच लय आली..रंगांना वेगळाच पोत मिळाला..
अवकाशाला नवीन भान मिळालं..
आत्मानंदामध्ये मग्न होता फकीर.. 
सृजनाचे नवे नवे अविष्कार घडवत होता. 
कलेला एक नवीन परिमाण देऊ पाहत होता..
ठरलेल्या साच्यातून बाहेर काढू पाहत होता..
एक दिवस मात्र आक्रीत घडलं..
देव- देवतांचं  भारी प्रेम त्या नगरीला..
गीता- कुराणाचंही.
नाविन्याचा शोध घेताना
देवदेवतांची नग्न प्रतीकं..??!!
अब्रह्मण्यम!!
समजाचा आरसा असलेल्या चित्रपटात 
कुराणातील कवनं..??
या अल्ला!!!
घोर अपराध केला होता त्या फकिराने..
या असल्या संवेदनशील मनाची 
नगरीच्या लोकशाहीला गरज नव्हती..!! 
'विकृत चाळेम्हणून धिक्कारलं त्याला,
त्याच्या कलेला धर्ममार्तंडांनी, मुल्लामौलवींनी..
परागंदा व्हावं लागलं त्याला,
त्याच्या लाडक्या भूमीपासून..
तरीही चित्र रंगवत राहिला तो..एकटाच.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जपत राहिला..
त्याच्या सृजनाच्या कल्पना
इतिहासाच्या   कॅनव्हासवर कायमच्या कोरल्या गेल्या.
आज तो वेडा चित्रकार नाही आपल्यात..शरीराने..
पण त्याच्या प्रत्येक चित्रातून,रंगांतून
त्याचा आत्मा हसून बघत राहतो..स्वतंत्र!
त्याच्यासारखाच अजून कोणी
वेडा फकीर आहे का,
हे शोधत राहतो...!!!

- स्पृहा.