Sunday, December 18, 2011

गर्दी

गर्दी.. खूप तिटकारा आहे मला गर्दीचा.. माणसांचा समुद्र आपल्या अंगावर फुफाटत येतोय असं वाटतं. संध्याकाळच्या वेळी रेल्वे स्टेशन वर पाऊलही टाकायची भीती वाटते.. पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण एक अनुभव आला गेल्या काही दिवसात.. आणि गर्दी सुंदर कशीदिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला.. मध्यंतरी सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचा योग आला..  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कल्पनेतून साकारलेला, संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेला हा महोत्सव. पुण्याच्या गुलाबी थंडीतली हसरी संध्याकाळ आणि सुरांच्या  चांदण्यात न्हाऊन निघणारे हजारो  रसिक... आकड्यांच्या भाषेत 'गर्दीच'..

पण विलक्षण सुंदर.."गेल्या ५९ वर्षांच्या श्रीमंत परंपरेचं हे संचित आहे. आपण काहीतरी खूप छान ऐकायला आलोय.. पवित्र असं काही इथून घेऊन जाणार आहोत", हा आनंद त्यातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला.. अतिशय सामान्य मंडळींपासून ते सेलिब्रिटिंपर्यंत आणि मध्यमवर्गीयांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच उपस्थिती.. साठ वर्षांच्या आजी आजोबांपासून सतरा वर्षांच्या युवकांपर्यंत सगळ्यांना कोण उत्साह.. जागतिक कीर्तीचे कलावंत आपल्या अंगणात येऊन कलेचा नजराणा आपल्यासमोर ठेवतायत हा सार्थ अभिमान, त्या परंपरेच्या जनकाविषयी अपार कृतज्ञता.. आणि संगीत आणि केवळ संगीतात भिजून जाण्याची अनिवार ओढ... कुठेही थिल्लरपणा नाही, अभिजाततेला धक्का लागेल अशा 'पॉप्युलर डिमांड्स' नाहीत.. संपूर्ण तन्मयता.. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं.. मूर्तिमंत उर्जा होती..   नकळत पाणी आलं डोळ्यांत. मनावर कायमचा ठसा उमटवून गेलीये ती संध्याकाळ. ती गर्दी एकदम आपलीशी वाटायला लागली.. हा अनुभव देणाऱ्या 'गर्दी'ला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होत होतं. मनात तृप्तीचे सूर रेंगाळत असताना वपुंची वाक्य आठवली.. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करायचा असतो. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते, तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला त्यांच्यावर इन्कमटॅक्सही बसला असता.. मग एक माणूस साधा हसलाही नसता. आनंदाच्या उकळ्या दाबून दाबून माणसं फुटली असती. तेव्हा 'नक्षत्रांच देणं' चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची.." ते देणं देणारी अशी ती.. सुंदर गर्दी !!!!

18 comments:

 1. Madam Kahray Gardi pan jivnacha avibhajya bhag banlelya ya gardit maza sarkhe asankhya ahet je janu lahan pana pasun ya garditun apla bhavishya ghadavtayat jar he gardi nasti tar tyana titka sa vegane palava lagla nasta ...anek pailu aahet ya gardiche...............Avi Talekar

  ReplyDelete
 2. स्पृहा तुमच निरीक्षण खूप म्हणजे खूप च छान आहे कारण कि मी खूप लेख वाचतो पण तुमच्या सारखं बारीक सारीक गोष्टीच निरीक्षण mast ज्या गोष्टीचे कधी विचार हि मनात येत नाही त्या गोष्टी आपण सांगत असता.आपण काय फक्त हेच बोलतो कि बाबारे खूप गर्दी होती आणि विसरू जातो आणि तुमच्या सुधा कार्यक्रमाला या पेक्षा जास्त गर्दी होणार
  म्हणून मी आयुष्यात एकदा तरी नक्की भेटणार तुम्हाला

  ReplyDelete
 3. खरंय. अशी गर्दी दिसते तेव्हा समाजपुरुष अजूनही जागा असल्याची खात्री पटते. एरवी त्यात एकतानता क्वचितच दिसते. प्रत्येकजण आपापल्या घाईत असतो हे ठीक आहे, पण बाजूला पडलेल्या हतबल म्हातारीकडे, रडणाऱ्या तान्ह्याकडे किंवा विव्हळणार्‍या आजारी माणसाकडे नजरही न टाकता लोक समोर निघून जातात तेव्हा कळ उठते.
  असं वाटतं या समाजाचं शरीर एखाद्या बॉम्बस्फोटात सापडून छिन्नविछिन्न झालंय. प्रत्येक अवयव वेगळा तडफडतो आहे. पायाच्या वेदनेकडे पहायला डोळा जागेवरच नाही आणि त्यावर उपचार करण्यासाठी हात तयार नाहीत. आपल्या जिवंत राहण्याला जगणं बनवणाऱ्या अशा कलावंतांमुळेच हा जमाव स्वतःला समाज म्हणवून घेऊ शकतो.

  ReplyDelete
 4. Very Few Words have a power in them to transport you to the place, incident where they were written... This one is one of them.. We do Not know each AT ALL but yet i could hear and feel what u were hearing and feeling in those moments.. BEATIFUL!

  ReplyDelete
 5. spruha taai...
  aaj tula kalidas la baghitla...
  chaan nivedaan challela....

  ReplyDelete
 6. रविवारी '' एक किरण सूर्याचा '' कुसुमाग्रज ह्यांच्या जन्म शताब्दी निमित्त त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली . तू पण होती सादर करणाऱ्या कलाकारांमध्ये . फेसबुक वर तुझ्या फन पेज वरून ब्लागाबद्दल माहिती मिळाली . सहज म्हणून वाचला छान आहे . जाऊ देत महत्त्वाची गोष्ट तू लिहिलेला लेख हा त्या कार्यक्रमा सुद्धा लागू आहे . स्व पण विसरून एका लहरीवर स्वार होऊन कुसुमाग्रजांना अनुभवणे हा खरच अप्रतिम अनुभव होता . पुन्हा एकदा '' नटसम्राट " वाचण्याची इच्छा झाली आणि ते वाचलेही पण अनुभव अगदी वेगळा आला , यंदा भावनांची गुंतागुंत मानसिक थकवा आणणारी आणि शेवट चीड आणणारी वाटली कदाचित लहानपणी वाचल्यामुळे तेव्हा तसे जाणवले नसेल . नटसम्राट मधील '' राजा '' चा हा डायलॉग नेहमीसाठी मनात कोरला गेलाय '' अरे पैसा काय जाळायचा ? साल्या रांडा हि मिळवतात तो . मानसं तगवली पाहिजेत . बाबा मानसं तगवली पाहिजेत .'' ( संवाद जसा च्या तसा घेतला आहे , शब्दाबद्दल आक्षेप घेऊ नका ).

  ReplyDelete
 7. Couldn't find a way to message you so I put my comment here ( which is not related to this post of yours ) : You have done some superb acting in 'Eka Lagnachi Dusri Goshta' :) Keep it up.

  ReplyDelete
 8. Nice Spruha.. Good Observation expressed in great words...
  You are a true all rounder..

  ReplyDelete
 9. शंकर महादेवन अप्रतिम अफाट गायले.. पर्वणीच होती ती.. उपस्थित सवाई रसिकांकरिता आयुष्यभर जपण्यासाठी ती मर्मबंधातली ठेवच होती.. :-)

  ReplyDelete
 10. किती मस्त लिहिलयस ग स्पृहा..शेवटचा paragraph सगळ्यात आवडला.."तेव्हा 'नक्षत्रांच देणं' चुकवता येत नाही, ह्यातच त्यांची उंची "..
  तुझं 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मधलं काम सुद्धा मस्त झालंय.. keep it up and best wishes..:)

  ReplyDelete
 11. आपला लेख वाचल्यावर शब्दांनी गर्दी केली म्हणून लगेच लिहिलेली कविता :)
  http://sahajkahimanatale.blogspot.in/2012/03/blog-post.html

  ReplyDelete
 12. There is a unique unity in a crowd... the fact that every person in the crowd shared similar feelings.... good or bad....happy or sad......unites them as one. I saw similar unity in US exactly one year ago when India won the world cup and the crowd that had gathered in our university hall. These are unifying threads that have still kept Inidans united despite the diversity.... and Gardi is a part of it :)
  Very nicely written !!!

  ReplyDelete
 13. एका अनोख्या प्रसंगातील उर्जा , आणि धुंदी तुम्ही अनुभवली.
  ती आठवण ,ते क्षण तुम्हाला आयुष्य भर साथ देईल.

  ReplyDelete
 14. apratim....savai gandharvacha pratyaksha anubhav ghetlyasarkha vatla...karan nakoshya goshtila jar itkka sundar rup yet aasel te thikan nakkich jadui aasel!!thanx...spruha tai plz lihat raha aga...kitti sundar lihites tu....

  ReplyDelete
 15. आनंद, समाधान, तृप्ती, कृतज्ञ भाव, स्नेह या भावनांना तराजू असते, तर एव्हाना हे सगळे काळ्या बाजारात गेले असते. त्यांचं स्मगलिंग झालं असतं. इतकंच कशाला त्यांच्यावर इन्कमटॅक्सही बसला असता..... hats off to you spruha superb writing

  ReplyDelete