Thursday, August 1, 2013

जीव

कोणी जीव उधळते,
धावे मृगजळा पाठी;
कळ विरहाची सोसे,
एक कासावीस मिठी.. !

कळ सोसवेना त्याला,
थके इवलासा जीव;
मन दगडाचे होई,
त्याचे हासणे कोरीव. 

भय आरशाचे वाटे,

आणि नजरेत सल;
काही हरवले मागे,
त्याची काटेरी चाहूल. 

जीव अंधारल्या राती,

वाट पाहतोच तरी;
स्वप्न कोमेजून गेले,
त्याची सरेल उधारी.. !!!

- स्पृहा.

Thursday, July 25, 2013

विद्या ताई

प्रिय विद्याताई ,
माझ्या अभिव्यक्तीचं 'कविता' हे माध्यम तुम्ही मला शोधून दिलंत. माझ्यासाठी तुमचं 'असणं' खूप महत्त्वाचं आहे. ही  कविता तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून समर्पित… 

एक सृजनाचा स्पर्श 
लाभे असा अवचित,
पेरूनिया जाई स्वप्ने 
कसा हसऱ्या डोळ्यांत.. 

काही बोलावे- सांगावे
कधी उगीच भांडावे,
गुरुशीच मैत्रीचे हे 
नाते आगळे जडावे.. 

नाही अडकली कला 
चित्रकलेच्या तासात,
उधाणल्या पाखरांच्या 
रंग भरले मनांत.. 

माणसात धुंडाळला 
नवा पोत, नव्या रेषा;
कितीकांना शिकविली 
बोलायाला नाट्यभाषा!

सारे बोलणे अबोल 
मनी आभाळाची माया ,
मन हिरवे अजुनी 
झिजे चंदनाची काया .. !!

- स्पृहा.