Tuesday, June 28, 2011

गणोबा..!!

आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला.. A cute letter by a small kid who  hates Maths. ." dear maths, please grow up soon and try to solve your problems yourself!!!!!"  मी इतकी हसले माहितेय...मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले...!!!

गणित..कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! म्हणजे मार्क कमी मिळायचे, पेपरात भोपळे मिळायचे असं काही नाही बरं का.. पण गणित म्हटलं की कंटाळाच यायचा.. अगदी पाचवी-सहावीत असल्यापासूनच... माझे काही मित्र अगदी हिरीरीने अल्जेब्रा / भूमितीतली प्रमेय सोडवत बसलेले असायचे, आणि माझं लक्ष गणिताच्या तासाला कायम वर्गाच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावर, झाडांवर, पक्ष्यांवर असायचं!! या रुक्षपणात इतकं रंगून जाण्यासारखं काय आहे? हे कोडं मला कधीच उलगडलं नाही... एक गंमत तर अगदी हमखास करायचे मी, म्हणजे गणिताच्या पेपरात संपूर्ण गणित चोख सोडवायचे, सगळ्या स्टेप्स एकदम करेक्ट..पण उत्तर लिहिताना १२३ च्या ऐवजी १३२ किंवा xyz च्या ऐवजी yxz !!! माती सगळी!!! पायथागोरस वगैरे महनीय प्रभृतींनी तर जिणं हराम केलं होतं माझं! कारण आमचं गणिताबद्दलचं आकलन अगाध.. अरे तू तुझ्या घरात लाव न काय लावायचेत ते शोध.. आम्हाला काय त्रास!!! असा जेन्युईन त्रागा मी कित्येक वर्षं केलेला आहे.. पण राज्यशासन, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, शिक्षणतज्ज्ञ वगैरेंना माझी कधीच दया आली नाही..!! आणि वर्गमुळं, घनमुळं, परिमिती, त्रिज्या, चक्रवाढ व्याज अशा भीतीदायक शब्दांची आक्रमणं माझ्या कोमल मनाला घायाळ घायाळ करत राहिली.. कर्कटक, कंपास अशा हिंसक, हानिकारक वस्तू मुलांच्या इतक्या लहान वयात हातात देणं कित्ती चुकीचं आहे...आपल्या समाजातली हिंसक प्रवृत्ती यामुळेच वाढीला लागली असणार!!!  

चुकून एकदा कशी कोण जाणे पण गणित प्राविण्य परीक्षेच्या पुढच्या फेरीसाठी माझी निवड झाली.. (मंडळाचं मार्कांचं गणित चुकलं असणार!!) तर त्याच्या तयारीसाठी आमच्या शाळेने एक कार्यशाळा घेतली.. दोन दोन मुलांची एक जोडी.. आणि नेमकी मी होते गणिताच्या प्रचंड वेड्या आणि आमच्या शाळेतल्या सगळ्यात हुशार मुलासोबत!! भीषण!!!!! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सातवीत... मी भयचकित.. माझं मन त्याच्याविषयीच्या अत्यादराने आणि स्वतःविषयीच्या आत्यंतिक न्यूनगंडाने भरून आलं!! एक रुपयाच्या नाण्याचं वजन, का क्षेत्रफळ का असंच तत्सम काहीतरी शोधून दाखवायचं होतं.. मी बावळटासारखी बघतच राहिले.. "हातात आलेल्या एक रुपयाची शाळा सुटल्या सुटल्या कैरी चिंच घ्यायची.." आमच्या निर्बुद्ध डोक्यात हे असलेच विचार कायम! तोवर या पट्ठ्याने मात्र त्या नाण्याला दोरा गुंडाळून, काहीतरी आकडेमोड करून उत्तर शोधलं सुद्धा.. तो फॉर्म्युला मला आजपर्यंत कळला नाहीये..!

आज मागे बघताना या सगळ्याची खूप गंमत वाटतेय. आमच्या वर्गात फळ्यावर रोज एक सुविचार लिहिला जायचा. त्यापैकी एक अगदी डोक्यात बसलाय. 'ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:ख्खी होऊ नये.' त्यावेळी बाकी तात्त्विक अर्थ कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता.. 'आपल्याला गणित कधीच धड कळणार नाही, ही गोष्ट कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे याच्याविषयी कधी दुःख्खी होऊ नये!!!' आणि इमाने इतबारे मी आजतागायत त्याचं पालन केलंय. शेवटी कसं आहे, त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!! ती गणितं सोडवायची शक्ती मला सतत मिळत राहो,ही पायथागोरस चरणी प्रार्थना...!!!:-)


Monday, June 20, 2011

“बहाना चाहिये..”

मध्यंतरी ती जाहिरात पहिली होती तुम्ही?? "खानेवालो को खाने का बहाना चाहिये.." फार आवडायची मला.." बहाना चाहिये..!!" सगळ्याला कारणं शोधायची सवय लागलीये.. म्हणजे शोधक वृत्तीने नाही.. खरं तर कारणं 'द्यायची' असं म्हणायला हवं! हसण्याला कारण हवं, रडण्याला हवं..सेलिब्रेशनला हवं.. एखादी गोष्ट करण्यासाठी कारण हवं.. 'न' करण्यासाठी हवं, टाळण्यासाठी तर हवंच हवं!! 'बहाणा'...हां... हा शब्द करेक्ट आहे!! अंगावर येणाऱ्या गोष्टी दूर सारण्यासाठी, जबाबदारी ढकलण्यासाठी...किती उपयोग होतो याचा!! नको त्या माणसांना टोलावण्यासाठी, हव्याशा माणसांना पटवण्यासाठी अक्षरशः मदतीला धावून येतात हे  'बहाणे'.. नकळत्या वयातच सवय लागते आपल्याला त्यांची..या बहाण्यांच्या पदराखाली दडण्याची, आपल्याला हवं तसंच, हवं तेच, आणि हवं तेव्हाच करण्याची सवय... बघता बघता आपण इतके वाहवत जातो, की आपलं जगणं हाच एक 'बहाणा' बनतो!! खरं नाही वाटत?? कुठून सुरुवात करूया 'बहाण्यांची'??!!

*अगदी लहान असताना.. 
१.शाळेत जायचं नाहीये.."आई पोटात खू$$$प दुखतंय!!" 
२.गृहपाठ केला नाहीये.."बाई, सॉरी वही घरी विसरले!!" 
३.मार्क्स कमी मिळाले..."पेपर केवढा लेन्दी होता माहितेय?? वेळच नाही पुरला!!!"
*कॉलेजमध्ये..
१. एकांकिका स्पर्धा.. " आमची एकांकिका कळलीच नाही रे!! बिनडोक होते परीक्षक!!"  २.सहकलाकाराला बक्षीस मिळालं, आपल्याला नाही.." माझ्यामुळे धरतं रे नाटक..त्याला काय **** काम करता येतंय!! मी होतो म्हणून.."
३. जी.एस. ची इलेक्शन हरलो.. "सगळं ठरवलेलं रे..प्रोफेसर्सच्या मागे आम्ही फिरलो नाही न गोंडे घोळत!!"
*प्रेमात पडताना.. "तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयरी आहे माझी..सगळं काही सोडून देईन तू म्हणशील तर!!" 
*प्रेमात न पडताना.." म्हणजे तू खू$$$प जवळचा मित्र आहेस माझा; पण मी तुझ्याकडे 'तसं' कधी पाहिलंच नाही!!
*लग्न करताना.." 'या'च्या पेक्षा 'तो'च बरा..जरा बोरिंग आहे..पण धाकटी बहिण आहे.. भावांचं झंझट नाही!!!"
*काम करायला लागल्यावर.. आसपासच्या लोकांना मिळणारं काम ,पैसा, प्रसिद्धी बघताना..
१. "काय म्हणून 'सेलिब्रिटी' म्हणून मिरवतात रे हे.. दिडकीची नाही अक्कल.. आम्ही अजून 'प्रोफेशनली' उतरलो नाहीयोत न..म्हणून!! 
२. "कामं मिळवण्याचे रस्ते वेगळे असतात रे यांचे..आम्हाला नाही हो असली 'कॉम्प्रोमायझेस' करायची!!!" 

घरी-दारी,शेजारी-पाजारी सतत सुरु असणाऱ्या बहाण्यांचे हे काही प्रातिनिधिक नमुने!! अगदी हेच नाही..पण यांच्यासारखे असे कित्येक उद्गार आपण रोजच्या रोज ऐकत असतो..किंवा बऱ्याच वेळा आपण स्वतःच 'उद्गारवाचक' असतो!!! का होतं असं? विचार केलाय कधी? मीसुद्धा आहे या 'लीग' मध्ये...एवढी निगेटीव्हिटी, इतकी कृत्रिमता कुठून येते आपल्यात?? खुलेपणाने समोरच्याला दाद देणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या यशात, आनंदात मनापासून सहभागी होणं विसरलोय का आपण?? का समोरच्याचं अपयश मजेशीर वाटतं?? इतकी विघ्नसंतोषी वृत्ती कशामुळे झाली आपली??? स्वतः मोठं होण्याच्या नादात, आपण आसपासच्या सगळ्यांनाच तोडत निघालोय..एवढी कसली मस्ती ही?? शेवटचं दुसऱ्यांसाठी म्हणून काय केलं होतं? त्यांना बरं वाटावं म्हणून..स्वतःला विसरून?? फक्त मी, माझं, मला..बस!!

....असे नव्हतो आपण...हुश्श..स्वतःशीच निदान आज एवढं तरी कबूल केलंय कित्येक दिवसांनी..जरा हलकं वाटतंय.. इतके दिवस आपण स्वतःलाच फसवत होतो, हे मान्य करणं, म्हणजे एक नवी सुरुवात असेल का?? बदलाच्या दिशेने.. मोकळे पणाच्या दिशेने.. निरागस हास्याच्या दिशेने.. हे एवढं करायला तरी 'बहाणे' नकोत!! नाहीतर आरशासमोर उभं राहिल्यावर उद्या मनच म्हणायचं.." मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे..!! "
  
  

Friday, June 10, 2011

वेडा फकीर!

आटपाट नगर होतं..
त्या नगरात सगळेजण सुखा समाधानानेगुण्यागोविंदाने नांदत होते. 
एक दिवस फिरत फिरत एक वेडा फकीर आला त्या नगरात..
देवानेच पाठवल्यासारखा..
हातामध्ये कुंचला आणि डोळ्यांमध्ये गूढ काहीतरी शोधणारे वेगळेच रंग.. 
पाहता पाहता या नगरीच्या  प्रेमात पडला तो..
रेषांना वेगळीच लय आली..रंगांना वेगळाच पोत मिळाला..
अवकाशाला नवीन भान मिळालं..
आत्मानंदामध्ये मग्न होता फकीर.. 
सृजनाचे नवे नवे अविष्कार घडवत होता. 
कलेला एक नवीन परिमाण देऊ पाहत होता..
ठरलेल्या साच्यातून बाहेर काढू पाहत होता..
एक दिवस मात्र आक्रीत घडलं..
देव- देवतांचं  भारी प्रेम त्या नगरीला..
गीता- कुराणाचंही.
नाविन्याचा शोध घेताना
देवदेवतांची नग्न प्रतीकं..??!!
अब्रह्मण्यम!!
समजाचा आरसा असलेल्या चित्रपटात 
कुराणातील कवनं..??
या अल्ला!!!
घोर अपराध केला होता त्या फकिराने..
या असल्या संवेदनशील मनाची 
नगरीच्या लोकशाहीला गरज नव्हती..!! 
'विकृत चाळेम्हणून धिक्कारलं त्याला,
त्याच्या कलेला धर्ममार्तंडांनी, मुल्लामौलवींनी..
परागंदा व्हावं लागलं त्याला,
त्याच्या लाडक्या भूमीपासून..
तरीही चित्र रंगवत राहिला तो..एकटाच.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जपत राहिला..
त्याच्या सृजनाच्या कल्पना
इतिहासाच्या   कॅनव्हासवर कायमच्या कोरल्या गेल्या.
आज तो वेडा चित्रकार नाही आपल्यात..शरीराने..
पण त्याच्या प्रत्येक चित्रातून,रंगांतून
त्याचा आत्मा हसून बघत राहतो..स्वतंत्र!
त्याच्यासारखाच अजून कोणी
वेडा फकीर आहे का,
हे शोधत राहतो...!!!

- स्पृहा.

Tuesday, June 7, 2011

"आणि दु:ख्खानंतर सुख."

लहानपणापासून शिकवलं गेलंय,
"सुखानंतर दु:ख्ख येतं, आणि  दु:ख्खानंतर सुख."
आपण सतत सुखाच्याच शोधात.
त्यामुळे झालंय असं,
दु:ख्खापासून दूर पळताना
नकळत सुखापासूनच
लांब पळत राहतो आपण.
चक्र विसरतो.
नियम मोडू पाहतो.
आरंभ बिंदूपासून सुरुवात करून
एक सरळ रेषा तयार करू पाहतो,
वर्तुळ मोडून!
आणि मग हे असं निरर्थक धावताना 
इतके भेकड बनत जातो,
की येणाऱ्या सुखाचीच 
भीती वाटायला लागते.
सुखाच्या शोधात असताना 
ते सुखच नकोसं वाटायला लागतं.
कारण आपल्या भित्र्या डोक्यात एकच.. 
"सुखानंतर दु:ख्ख येतं"
वाक्याचा उरलेला अर्धा भाग..??
"आणि  दु:ख्खानंतर सुख."
विसरूनच जातो आपण सोयीस्करपणे.
काळोखातल्या पाकोळीसारखी, अविरत
फडफड चालूच राहते.
अखेर दमलेल्या मनाला  दु:ख्ख तर सोडाच,
सुखही सोसवत नाही..
सगळंच केविलवाणं..!!

- स्पृहा.

Sunday, June 5, 2011

पहिला पाऊस

निसर्गाचेही 'मूड्स' असतात..!!??
दुपारपर्यंत सारखं मळभ येत होतं,जात होतं..
अगदी कोमेजून गेला होता तो..
त्याचा घसा दाटून येत होता,
वाटायचं, आत्ता कोणत्याही क्षणी
रडूच फुटेल त्याला..
आता मात्र लहान बाळासारखा
हसतोय..नाटकी!!
मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता,
आज पहिला पाऊस येणारे!!!
....माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला.
मोगरा कोमेजला होता इतके दिवस..
आज खदखदून हसला!
कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती,
सोनेरी संधीप्रकाशात भिजलेली वाटत होती.
वळचणीची पांढरी कबुतरं एरवी नको करतात अगदी.
आज त्यांच्या भिजल्या पंखाची थरथर
 पाहतच बसले मी,एकटक.
झाडं मोहरली,वेली बावरल्या,
थंड हवेची झुळूक, मातीचं महागडं अत्तर
खुळ्यासारखं जगभर उधळून गेली!
 थोडासा गारवा, हलकी शिरशिरी..
कात टाकली आसमंताने अलगद...
आकाशात अचानक वेगळेच रंग आले.
पाण्याला रंग नसतो खरंतर;
पण पावसाला मात्र असतो
काय गंमत आहे नाही??
हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग..
तो वेड लावतो, आणि आपणही वेडे होतो..
 रिमझिमत्या सरी आठवणी होऊन
वाहायला लागतात..
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते,
लगेच कविताच सुचायला लागतात..!!!

- स्पृहा.