Wednesday, December 29, 2010

शीला की जवानी..!!

धुमाकूळ... धुमाकूळ घातलाय या गाण्याने... ट्रेन, बस, नाका, कट्टा, कॅन्टीन, रेडिओ, जिथे पहावं तिथे हाच गजर आहे... मुलं-बिलं तर सोडाच. पण लहानात लहान चिमुरडी पासून पन्नाशीच्या प्रौढे पर्यंत 'शीला' सगळ्यांच्या तोंडात जाऊन बसली आहे.. (अर्थात, मुलं-बाळ समोर असताना "Im just sexy for you" या ओळीच्या जागी "ना ना ना ना.." होऊन आया-बायांनी स्वतंत्र व्हर्जन केलं आहे!!) तिच्या 'जवानी' चं कौतुक ओसंडून वाहतंय.. हे गाणं काय रिलीज झालं आणि साध्याभोळ्या शीला ची एकदम फटाकडी फुलबाजी झाली !!
हे गाणं लोकांना 'थोडंथोडकं' नाही तर "भयंकर" आवडलंय. आणि त्या "भयंकर" आवडणाऱ्यांमध्ये माझाही नंबर आहेच! विशाल-शेखरचं पावलं थिरकवायला लावणारं धमाल संगीत, कॅची, तोंडात बसणारे शब्द, सुनिधीचा 'कडक' आवाज, कतरीनाचा 'घायाळ' डान्स हे तर त्याचं कारण आहेच. त्याबद्दल संगीतकार, गायिका, अभिनेत्री, कोरीओग्राफर या सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स. त्यांच्या या बेफाट 'निर्मितीला', 'creation' ला मनापासून Hats off!!
पण त्याहीपलीकडे मला जाणवलेली गोष्ट म्हणजे..हे सेलिब्रेशनचं गाणं आहे..स्त्रीत्वाच्या, Womanhood च्या सेलिब्रेशनचं.. कदाचित काहीजण मला वेड्यातही काढतील. (त्यांच्या लेखी हे गाणं अश्लील असू शकतं; या गाण्यातून 'स्त्री'ची अवहेलना केली आहे, असंही त्यांना वाटू शकतं!) पण मला तरी हे सेलिब्रेशन खूप मस्त वाटलंय.किती आत्मविश्वास आहे 'शीला'कडे.स्वतःच्या सौंदर्याबद्दल, शरीराबद्दल अभिमान आहे तिला! आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याचं धाडसही. त्यासाठी तिला 'पुरुष' लागत नाही.सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःवर प्रेम करतेय..!!! किती सुंदर आहे ही कल्पना..सतत कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या, 'त्याचं' मन राखण्यासाठी आयुष्यभर स्वतःचं मन मारणाऱ्या बायकांना 'शीला'चा हा बिनधास्त मोकळेपणा नवा, तरी हवासा आहे.कदाचित म्हणूनच 'शीला' एक प्रातिनिधिक चित्र बनली आहे.स्त्रीत्वाच्या,Womanhood च्या सेलिब्रेशनचं..

Tuesday, December 28, 2010

एक दशक.. विध्वंसक!

     २१ व्या शतकाचं पहिलं दशक बघता बघता संपलं. एखाद्या अल्बमचं पान उलटावं तसं. किती काय काय पाहिलं या दशकाने..हिंसा,विध्वंस,सूड,वेदना,विखार,अराजक...आमची अक्खी पिढी या असुरक्षित वतावरणात वाढली.भोवती आपल्यांच्या हातांचं कवच आहे अशा आभासी वातारणात...रोजच्या धबडग्यात,स्पर्धेत पळताना जगात काय चालू आहे याचा विचारच केला नव्हता.आज पहिल्यांदा शांतपणे अशांत सभोवताल उघड्या डोळ्यांनी पाहतेय..
   सुरुवातच झाली  २००१ सालच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याने.. माथेफिरू मूलतत्त्ववाद्यांनी एका महासत्तेला उघड उघड दिलेलं आव्हान. २००३  मध्ये अमेरिकेने इराकवर लादलेलं युद्ध..अगणित निरपराधी नागरिकांचं उध्वस्त झालेलं आयुष्य..भावजीवन..ही सुलतानी कमी म्हणून की काय देवाने धडलेली अस्मानी...२००४ साल आशिया मध्ये त्सुनामीचा कधीच न जाणारा ओरखडा ठेऊन गेलं..त्याच्यामागोमाग २००५ मध्ये अमेरिकेत कतरिना हरिकेन ने उत्पात केला..
      २००८ साली change has come..म्हणत बराक ओबामांनी इतिहास घडवला..तेव्हा जरा कुठे मानवी समाज  इतिहास नवं वळण घेतो आहे,असा वाटत होतं..हे वर्ष जरा शांततेत जातंय अशी वेडी आशा जागते न जागते तोच अतिरेकी हल्ल्यांनी २६ नोव्हेंबर ला मुंबई थरारली! स्तब्ध झाली... २०१० ची सुरुवातच हैती बेटावरच्या अभूतपूर्व भूकंपाने झाली.. अर्थशास्त्रीय भूकंप तर वेगळेच!!हे सगळे तर फक्त लहानसे तुकडे आहेत विध्वंसाच्या गच्च भरलेल्या पटाचे...अशा कित्येक घटना,प्रसंग..माणुसकीला रडवणारे..मनांवर कायमचे ओरखडे ठेऊन जाणारे...
    नव्या दशकाच्या पूर्वसंध्येला त्या वरच्या खेळीयाला एकच विनंती आहे...बाबा रे, आमच्या कुंडलीत तू काय लिहितो आहेस,माहित नाही;पण कमीत कमी आमचं माणूसपण टिकवून ठेवून ते सोसायची शक्ती तरी आम्हाला देच...तुझ्या ह्या खेळात निदान एवढं दान तरी आमच्या पदरात टाक !!

Monday, December 27, 2010

आनंदाचे गाव.

फूल हसते जे आज,उद्या कोमेजून जाई;
हवेसे वाटते सारे,खुणावे,विरून जाई..!

फुलाच्या कोमेजण्याचे नाही कोणा  दुःख फार,
शोध सत्वरी नव्याचा जुने ते भुईला भार!

चमकून जाई वीज,क्षणाचाच खेळ सारा;
कसानुसा हो अंधार,पाहता असा नखरा.

आयुष्याचे झाले आहे आमुच्या असे नाटक,
विकतची सुखे सारी,'खरेपणा' हे पातक.

क्षणभंगुर पावित्र्य,बाजारात मिळे प्रेम;
पैसा झाके पापे सारी,आणि मुखे हरीनाम!

गाव जुने ते आनंदीअसे कसे बिघडले,
चंदेरी या प्रकाशात पणतीला विसरले!

पणती ही विझली अन,जीव होई कासावीस;
बेगडी हसतो तरी,मन उदास,उदास!

वाट तुडवीत तरी आम्ही चालतोच आहे,
आनंदाचे गाव जुने आम्ही शोधतोच आहे.

निळ्या शांत आकाशात जिथे चांदण्यांची वृष्टी,
नव्या दिवसाला जिथे हसरी,साजरी सृष्टी.

आईच्या कुशीत जिथे नीज दुलई पांघरे,
आणि डोळ्यांत दाटती आनंदाचे आसू खरे!

तेच  आनंदाचे गाव पुन्हा कधी सापडेल,
श्वास मोकळ्या वाऱ्यात पुन्हा मन थरारेल..!!

-स्पृहा.

Friday, December 24, 2010

'अव्यक्ता'चं लेणं..!!

एक प्रवास..'त्या'च्यासोबत..
मला बळ  देणारा;
'त्या'ची मी खूप लाडकी आहे,
असं जाणवून देणारा..

माझ्या जगण्यातलं चांगलं-वाईट,
भोगताना कितीही वाईट जरी,
माझ्याच चांगल्यासाठी सारं 
आत्मा शांत शांत उरी!

माझ्या इच्छा आकांक्षांना 
'तो'च जन्म देत गेला.
मी विचारण्याच्या आधीच 
'तो' भरभरून देत गेला.

संपूर्ण आयुष्यात माझ्या 
आत्ता कुठे जगते आहे,
'त्या'च्या कडे आत्ता कुठे 
वेगळ्या नजरेनं पाहते आहे..

'त्या'च्या सोबत माझं नातं
किती नितळ,खरं आहे;
'अव्यक्ता'ने दिलेलं हे 
भारी नाजूक लेणं आहे..!!!

-स्पृहा.

Thursday, December 23, 2010

प्रायव्हसी..!!!

काही वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईल कॅमेरा प्रत्यक्षात आला, तेव्हा स्कॉट मेकनेल (Scott McNealy) नावाचा एक द्रष्टा म्हणाला होता, "तुमची प्रायव्हसी आता संपली..आता या विचित्र प्रॉब्लेमचा सामना कसा करणार आहात ते ठरवा!!" अर्थातच त्याला सगळ्यांनीच वेड्यात काढलं.. पण हा भस्मासुर इतका पसरत जाईल..अशी कोणाला काय कल्पना येणार! आणि ते लोण मनांना बधीर करत,संस्कृतीकडून विकृतीकडे घेऊन जाईल..हे तर जाणत्यांना सुद्धा अविश्वसनीय!
'एम.एम.एस.' हे या भयानकतेकडे घेऊन जाणारं पहिलं पाऊल होतं. त्यानंतर शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स,  बाहेरगावच्या ट्रिप्स या सगळ्याच गोष्टी अचानक असुरक्षित वाटायला लागल्या..बंधनातून जरा कुठे बाहेर पडू पाहणाऱ्या बायकांना तर हा एक विचित्र धक्का होताच... पण फक्त बाईलाच नाही.. पुरुषांसाठीसुद्धा हा एक विचित्र अनुभव होता.. जनावरांच्या पेक्षा मनुष्य वेगळा ठरतो तो इतर सगळ्या गोष्टींसोबत 'नग्नते' बद्दलच्या त्याच्या विशिष्ट संकल्पनांनी. त्यासाठी अंग झाकणारी वस्त्रं-प्रावर्ण..स्त्री-पुरुषांसाठी नीतीमत्तेचे धर्मसंस्थांनी घालून दिलेले नियम... आणि हळूहळू आकाराला आलेला सुसंस्कृत समाज.. पण आज जेव्हा भर गर्दीत सुरक्षिततेसाठी स्कॅनिंग मशीन खालून एखाद्या व्यक्तीला जावं ,तेव्हा कॅमेऱ्यातून पलीकडे दिसणारी स्वतःची अर्धंनग्न प्रतिकृती पटत असो, नसो; संकोच, भीड बाजूला सारत आपणही मान्य करायला लागलो आहोत... ही तर फक्त दोन उदाहरणं झाली.. पण आपल्या सामाजिक जीवनात प्रायव्हसी उरलीये खरंच? कॉर्पोरेट जगात घोटाळे असतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सतत चालू असते, हे आपण ऐकून होतो. त्यावरचे सिनेमेसुद्धा आपण चघळत पाहिले. पण सध्याच्या निरा राडिया (Nira Radiya) प्रकरणाने या विषयाच्या कित्येक नव्या अंधाऱ्या बाजू प्रकाशात यायला लागल्यायत. खेळ खेळावा तसे फोन टेपिंग चे प्रकार चालू आहेत... मिडिया नामक एक भयावह राक्षस यातच आपले हातपाय पसरून फोफावतोय... कळत नकळत आपणही या सिस्टीम नामक जंजाळात ओढले गेलो आहोत. त्याचा एक अपरिहार्य भाग बनलो आहोत.. कामात बिझी असताना मधूनच आपला फोन वाजतो.. "हमारी कंपनीने आपको एक स्कीम के लिये चुना है. आप ही है वह भाग्यशाली विजेता.."फोनवरची बाई किणकिणत्या आवाजात असंच काही निरर्थक बोलत राहते..कामाच्या धबडग्यात आपणही विसरून जातो. आणि अचानक कधीतरी आपण विचार करू लागतो, की यांच्याकडे आपला नंबर गेला कसा, कुठून?? मार्केटींगच्या जमान्यात मोबाईल कंपन्या नंबर्सची लिस्टच्या लिस्ट चक्क विकतात.. हे आपल्या भोळसट स्वभावाच्या लक्षातच येत नाही!
हे सारं बाजूला राहिलं.. यामध्ये आपण विशेष काही करू शकत नाही...आपण फक्त मूक प्रेक्षक असतो.पण आपण स्वतः हून देत असलेल्या स्वतःच्या माहिती बद्दल ('Voluntary Information) काय??? ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, याहू मेसेंजर, ब्लॉगिंग हे सगळं करताना आपण स्वतःची किती माहिती अशीच अक्षरशः उघड्यावर टाकत असतो... नेटसाव्ही होण्याच्या, किंवा आपण तसे आहोत असं जगाला दाखवण्याच्या डेस्परेट प्रयत्नात वाहत जातो आपण.. आपल्यापैकी किती जण नवीन लॉग इन करताना सेक्युरिटी टर्म्स वाचतात, प्रायव्हसी सेटिंग्जकडे लक्ष देतात.. आपली माहिती, आवडीनिवडी, छंद, फोटोज हे सगळं कोण वाचतंय, ही माहिती कुणापर्यंत जातेय, तिचा पुढे काय आणि कसा वापर होण्याची शक्यता आहे याकडे डोळे झाकून दुर्लक्ष करतो आपण.. सगळे धोके, निसरड्या पायवाटा माहिती असून सुद्धा.. आणि हे आपल्यावर कोणी लादलेलं नाहीये. आपण होऊन हे सगळं स्वीकारलंय..
एकीकडे साधी आपली डायरी आपल्या आई-बाबांनी वाचली तरी चालत नाही आपल्याला.. आणि दुसरीकडे सगळी माहिती अक्ख्या जगाशी शेअर करण्यासाठी का धडपडतोय आपण सगळेच?? ग्लोबलायझेशन, लिबरालयझेशन च्या आजच्या धावत्या युगात सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत आपला जंगलीपणाचा,मागे जाण्याचा प्रवास तर सुरु नाहीये न?? प्रायव्हसी ची व्याख्या बदलते आहे हे खरंच...पण मुळात ती आता उरली आहे का,खरंच!!!!??

Wednesday, December 22, 2010

तो अणि ती...

माणसांच्या समुद्रात 
हातात हात घालून एक छोटीशी लाट फुटली.
ते दोघं...इतर कोणाही सारखे..
डोळ्यांत भविष्याची स्वप्नं,
आजूबाजूला कोरडं वास्तव.
तिचं स्वप्नरंजन,
तो सतत जमिनीवर..
तसे खूष आहेत दोघंही,
हातामध्ये एकमेकांचे हात घेऊन.
तो तिला पेपर वाचून दाखवतोय;
तिच्या स्वप्नांची वास्तवाशी
सांगड घालू पाहतोय....
तिला एक छोटंसं घरकुल दिसतंय(पेपरात!!)
निसर्गरम्य वगैरे.. 
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर.
"नवं घर ठाण्यापेक्षा खारघरला घेऊ!
नव्या एअरपोर्टमुळे आता तिथे सगळं
'हायरक्लास ' होणारे..!!"
तेवढ्यात चौकोनी कुटुंबाची
गाडीची जाहिरात पाहते ती..
गोजिरवाणी मुलं वगैरे..
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर.
"अगं 'अल्टो' पेक्षा 'NANO' घेऊ;
सध्या तीच एकदम 'इन' आहे!"
स्वतःचीच समजूत घालतोय..
हल्लीच रोजच्या खर्चाचा 
ताळेबंद मांडू लागलाय तो.
म्हणूनच  हबकलाय..जरा जास्तच..
तिचं स्वप्नरंजन..
तो सतत जमिनीवर
तशा तिच्या विशेष काही अपेक्षा
नाहीयेत त्याच्याकडून...
समुद्राच्या किनारी मऊशार वाळूत 
दोघांच्या पावलांचे ठसे बघताना
रमून जाते ती..
हळुवार वगैरे..स्वप्नरंजन!!
तिच्या आवाजाच्या लाटा 
खळखळत येत राहतात त्याच्यावर.
आता मात्र विसरतो तो 
जमिनीवर उतरणं सुद्धा..
पाझरत राहतो..आतून..
तसा खूष आहे,तोसुद्धा;
हातामध्ये तिचे हात घेऊन..!!!

-स्पृहा.
  

Tuesday, December 21, 2010

'टेस्ट' पलीकडे..

  एक छोटासा,साधासा मुलगा...आपल्या 'कोच'च्या नजरेला नजर न भिडवता,हळुवार आवाजात बोलणारा..विनोद कांबळी नावाच्या जिवलगा बरोबर ६६४ धावांची रेकॉर्ड ब्रेकिंग  पार्टनरशिप करणारा..एका वर्षातच,म्हणजे १९८९ साली त्याने 'टेस्ट' क्रिकेट मध्ये भारताच्या टीमकडून पदार्पण केलं,तेच इम्रान खान, वासिम अक्रम अशा दिग्गजांच्या 'कसोटी'ला उतरत..वर्षांमागून वर्ष सरली,भल्याभल्यांची  हौस विरली..पण तो मुलगा खेळतच राहिला..सचिन तेंडुलकर नावाचा एक सरळ साधा मुलगा,जिवंतपणी दंतकथा बनून उरला...
   आज माझ्या वयाइतकी वर्ष तो क्रिकेट खेळायला लागून झालीयेत..तीच ऊर्जा,तसाच उत्साह...कुठून येतो खरंच..!! आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे हे.. २१  वर्षानंतर आज तो ध्रुवा सारखं अढळ स्थान घेऊन बसलाय..कसोटी क्रिकेट मधल्या ५० व्या शतकानंतर त्याच्या स्कोर च्या आसपास कोणीही खेळाडू पुढली कित्येक वर्ष तरी पोहोचू शकणार नाहीत,हे सत्य आहे.. त्याला वयाचे दाखले देऊन,काळाच्या चौकटी मध्ये अडकवून रिटायर होण्याचे अनाहूत सल्ले   देणाऱ्या सर्वांनाच तो पुरून उरलाय..अगदी सर्वशक्तीमान काळालाही..!!
   भारतातल्या प्रत्येकाला सचिनची अचिव्हमेंट स्वतःची वाटते..आणि त्याचं अपयश सुद्धा.. ते त्याच्यावर आशीर्वादांची खैरातही करतात.. आऊट झाल्यावर त्याला शिव्याशापांची लाखोलीही वाहतात.. कारण तो 'त्यांचा' असतो..कृष्णाला नाही का..लंगडा,चोर काहीही म्हणतो आपण..इतकी जवळीक त्याच्यावरच्या प्रेमाने साधलेली असते..तसंच हे.. एक अब्ज लोकांना या एकाच माणसाकडे काहीतरी दैवी शक्ती आहे,असा ठाम विश्वास आहे...तो काहीही चमत्कार करू शकतो अशी श्रद्धा आहे.. रोजच्या धावपळीच्या,अनागोंदीच्या,आला दिवस निमूटपणे ढकलण्याच्या पराभूत भारतीय मानसिकतेला  त्याचं फील्ड वर असणं हेच प्रतीक आहे..'विजया'चं प्रतीक! आणि त्यामुळेच कदाचित सचिन तेंडुलकर ही व्यक्ती कुठल्याही 'टेस्ट' च्या पलीकडे आहे..!!! Long live Sachin!!!

Friday, December 17, 2010

'सारी डे'

दिवस किती भरभर जातात..आज माझी एवढीशी चिमुरडी बहीण कॉलेजमध्ये 'सारी डे' साठी नट्टापट्टा करून निघत असताना मी तिच्याकडे बघतच राहिले..झर्रकन पाच-सहा वर्ष मागे जाऊन आले मी..माझा पहिला 'सारी डे'.आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागून आईशी वाद घालत,हि नेसू की ती नेसू करत मग ह्याच्यावर हाच 'सेट' हवा...शी आई,हे किती ऑड दिसेल असा आरडा ओरडा करत मी झोपायला गेले,तीच उद्याची वाट पाहत..त्यादिवशीची सकाळ पहिल्यांदाच आईने हलवून न उठवता उजाडली..जरा जास्तच लवकर!!!साडी नेसून तयार होऊन आरशात स्वतःला न्याहाळताना वेगळंच काहीतरी वाटत होतं..
  असं म्हणतात की जेव्हा  एखाद्या मुलीला ती सुंदर असल्याची पहिली जाणीव होते होते,त्या दिवशी ती जगातली सर्वात सुंदर तरुणी असते!!आणि मला तशी जाणीव करून देणारा हाच तो दिवस..:-) अर्थात माझ्या मनाने मी आज 'फारच सुंदर'दिसतेय असं सांगून टाकलेलं असल्यामुळे मी वेगळ्याच नादात  होते..आजूबाजूला कौतुक करणारी मित्रमंडळी, लखलखते flashes, आणि सगळ्यात  महत्त्वाचं.. अस्फुट  काहीसं जाणवू  लागत  असताना एका महत्त्वाच्या व्यक्ती  कडून  हवीहवीशी  ,अपेक्षित ,surrender झाल्याची नजर..त्यादिवशी गालावर आलेलं हसू हे नंतर माझं मलाही कध्धीच दिसलं नाही...अवखळ वयातल्या सगळ्या  गोष्टी खऱ्या होत नाहीतच..आणि कदाचित तेच चांगलं आहे..मागे वळून पाहताना त्या नजरेचा एक छोटासा कवडसा सुद्धा मनात नकळत जपला गेलेला..असा अचानक कधी गवसतो..आणि मी पुन्हा एकदा जगातली सर्वात सुंदर तरुणी झालेली असते!! 

मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.

मला 'नाही' म्हणायला शिकायचंय..
आर्जवी शब्दांना,
खेळकर मागण्यांना  ,
पसरलेल्या अगतिक हातांना,
डोळ्यातल्या पाण्याला.
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
वाऱ्याच्या वेगाला
झऱ्याच्या नादाला,
पाखरांच्या गाण्याला
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
आपल्यांच्या मनाला
मनातल्या आपल्यांना 
आतल्या आवाजाला,
मला 'नाही' म्हणायला शिकायचंय.
हल्ली हे असंच वागावं लागतं,
त्याशिवाय चालतच नाही..
मी कधीपासून खूप प्रयत्न करतेय.
खरं सांगते..जमतच नाही !!

-स्पृहा.

Thursday, December 16, 2010

'धृपद'

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सर्वात जुना समजला जाणारा प्रकार म्हणजे 'धृपद'.सम्राट अकबराचं चरित्र  लिहिणारा अबुल फझल 'ऐन-ए-अकबरी' मध्ये म्हणतो,"चार  ओळींचा धार्मिक,प्रेममय,ईश्वराशी नाते सांगणारा संगीताविष्कार, म्हणजे 'धृपद'." कलाप्रेमी मुघलांच्या दरबारात धृपद गायकीला मानाचं स्थान होतं.संगीत शिरोमणी तानसेनाचे गुरु स्वामी हरिदास 'धृपद' गायकीचे प्रमुख उद्गाता होते.
   १८ व्या शतकानंतर मात्र जशी  ख्याल गायकी बहरू लागली,तशी 'धृपद'गायकीची लोकप्रियता ओसरू लागली.सरोद आणि सतार यांसारख्या माधुर्यपूर्ण वाद्यांचा याच काळात शोध लागला.धृपदाच्या हळुवार गायकीला या वाद्यांची द्रुत साथ शोभून दिसेनाशी झाली.आणि मागे उरली ती एका श्रीमंत काळाची आठवण...आणि धृपद गायकीचा राजेशाही थाट..!!