Sunday, August 30, 2015

भ्रमनिरास !!


अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेने कलम १९ द्वारे सर्व नागरिकांना दिलेला हा अधिकार. लोकशाही मूल्यांवर आधारलेला हा मूलभूत मानवी अधिकार. कुठल्याही व्यक्तीला स्वयंपूर्णतेकडे नेणारा...
शाळेत असताना नागरिकशास्त्राच्या धड्यांमधून बिंबवलं जातं, हे आपल्या मनावर. प्रत्येकाला ‘आपलं’ मत बाळगण्याचं स्वातंत्र्य आहे. मुळात ‘स्वातंत्र्य’ म्हणजे व्यक्त होण्याची मुभा असणं. कुठलीही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं, म्हणजे स्वातंत्र्य. अर्थात, पुस्तकांमधल्या सगळ्याच व्याख्या योग्य वाटतात, पटतात. पुढे प्रत्यक्ष आयुष्यात भ्रमनिरास होतो, जेव्हा आपल्या लक्षात येतं, की हे सगळं फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं आणि परीक्षेत लिहून मार्क्स मिळवण्यापुरतंच होतं! आपण उगाच सिरीयसली विचार करत बसलो, या सगळ्या जड जड शब्दांचा!
गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये काय झालं? ‘शार्ली एब्दो’वरचा हल्ला ठसठशीतपणे हेच तर अधोरेखित करून गेला. विनोद हे म्हणे ‘अभिव्यक्ती’चं सर्वात सुंदर माध्यम. त्या दिवशी ‘विनोद’ मेलाच की. पार जिवानिशी गेला.
दूर कशाला जा? आपल्या देशात काय चाललंय? एका लेखकाची दिवसाढवळ्या हत्या झाली, तामिळनाडूमध्ये! सुप्रसिद्ध लेखक पेरूमल मुरुगन यांनी, त्यांच्या ‘मधोरुबगन’ कादंबरीवरून जे रान पेटलं, त्याने व्यथित होऊन स्वत:च सांगितलं की, ‘लेखक’ मुरुगन आजपासून गेला. यापुढे मी काहीही लिहिणार नाही. ‘आपण’ मारलं त्यांना. ‘लेखक’ म्हणून आत्महत्या करायला भाग पाडलं. कुठल्या तरी विकृत मानसिकतेला बळी पडलेल्या आपल्या समाजाने आणखी एका लेखकाची सृजनशक्ती संपवून टाकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून पडला. झुंडशाही आणखी चेकाळली.
इतकंही दूर जायचं नाहीये? आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय दिवसाढवळ्या? मालिकांमध्ये दाखवलेल्या इतिहासाचं चित्रण कुठे खपतंय लोकांना? वेगवेगळ्या संस्था, संघटना आहेतच, वेगवेगळे झेंडे मिरवायला. मग, शिवाजी महाराज ‘मराठ्यांचे’, न्यायमूर्ती रानडे ब्राह्मणांचे, तुकाराम, खंडोबा... यादी संपतेय कुठे? मग सेट्सची तोडफोड करायला, पुतळे जाळायला, कलावंतांना मारझोड करायला, फिल्म असेल तर पोस्टर्स, बॅनर्स फाडायला तयार आहेत, आमचे मर्द सेनानी! मुळात त्या कलाकृतीत काय दाखवलंय, का दाखवलंय, याचा कोणताही विचार न करता, कसलाही अभ्यास न करता, ‘एक घाव दोन तुकडे’ विषय संपला!!
‘पी. के.’ सिनेमाच्या वेळीसुद्धा हेच झालं. एका चॅनेलवर तो सगळा तोडफोड तमाशा पाहात होते. एका पत्रकाराने भयंकर जोशातल्या एका व्यक्तीला विचारलं, ‘तुम्ही हे सगळं करताय, ते ठीक आहे; पण मुळात हा चित्रपट पाहिलायत का तुम्ही?’ त्यावर ते पदाधिकारी जाहीरपणे नॅशनल टीव्हीवर असं म्हणाले, की ‘ओ... आमाला गरज नाय, पिच्चर बिच्चर बगायची... आमची डायरेक्ट अॅक्शन असते!!!’ मी सुन्न होऊन बघत बसले. कुठून येतो हा असला अतिरेकी आत्मविश्वास? या अशा माणसांना का भय नसतं, कायद्याचं? धर्म, जात, पंथ, जाती, उपजाती, पोटजाती, देव, मूर्ती... समाजाच्या असुरक्षिततेची किती भयाण लक्तरं वाटायला लागतात हे सगळे शब्द... कुठे चाललोय आपण? मुळात, जगभर विचित्र वेगाने पसरत जाणा-या, या विषारी वावटळीत आपण कुठवर तग धरायचा? आपल्या मनाशी कुठली मूल्यं धरून चालायचं आपण?
मी ज्या वातावरणात वाढले, तिथे ‘माझं’ मत सांगायला मला कधीच मज्जाव नव्हता. अर्थात, ते मांडताना ‘मोठ्यांचा आदर राखला जायला हवा’, हे गृहीत धरूनच! पण हळूहळू ‘आपलं जसं मत आहे, तसंच समोरच्याचंही एक मत असू शकतं, आणि ते आपल्यापेक्षा ‘वेगळं’ असू शकतं, हेसुद्धा उमगत गेलं. त्या विरोधी मताचाही आदर केला गेलाच पाहिजे, हे अंगी भिनत गेलं. पण बाहेरच्या जगात सगळेच लोक हा असा विचार करत नाहीत, करणार नाहीत, हेही कळायला लागलं.
मग माझं मत मी कसं मांडायचं? आपल्या मताचा अनादर केला म्हणून दुस-याला मारण्यापर्यंत मजल जात असेल, तर मला योग्य वाटलेली मूल्यं ‘मी’ कशी जपायची?
त्या दिवशी ‘शार्ली एब्दो’वरच्या हल्ल्यानंतर लाखो माणसं तिथे एकत्र जमली... ‘वी विल नॉट वॉक इन फियर’ म्हणत... मी जाऊ शकेन त्यांच्यात? या ‘स्पिरीट’साठी? माझ्यात येईल ती शक्ती, ‘माझी’ मूल्यं राखायची? मुळात माझा समाज मदत करेल मला, माझ्यात ती शक्ती यावी म्हणून...?? शेवटी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दांत...
‘Where the mind is without fear and the head is held high.. where the mind is lead forward by thee, into ever widening thought and action.. Into that heaven of freedom, my Father, let my country awake…”

- स्पृहा जोशी

Tuesday, August 25, 2015

घालतो पाऊस अवेळी धिंगाणा...

गेले काही दिवस अचानक पाऊस पडतोय. सगळे संकेत मोडून, रूढ अर्थाने अगदीच चुकीच्या वेळी. आत्ता नकोच आहे तो यायला. पण तरीही थैमान घालतोय... आसपास.. सगळीकडे.. मनातसुद्धा... आणि अशा वेळेला कडकडून भेटते इंदिराबाई संतांची कविता. पावसासारखीच...

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली...
नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून?

....अवचित आलेला पाऊस.. करायचं तेवढं नुकसान करून जायचाच तो! काय आठवण बिठवण यायची ती यायचीच अशा वेळेस. पळून पळून पळणार तरी किती? कशासाठी? आणि कोणापासून? तसं तुझ्या-माझ्याबद्दलचं काहीच लपलेलं नाही त्याच्यापासून. पण तरी...अगदी जवळच्या मैत्रिणीपासून लपवून ठेवतोच की आपण एखादं गुपित. तसंच हे. वाटत असतं की याला काहीच कळू नये. पण पोचतं ते त्याच्यापर्यंत. आणि मनात ते दडवून ठेवायच्या ऐवजी, काळ्या काळ्या ढगात मिटून दूर घेऊन जाण्याऐवजी हे वेड मात्र आवेगाच्या भरात सगळंच मोकळं करून टाकतं. कसलं गुपित, आणि कसलं काय! आपलं आपल्यालाच काही सुधरत नसताना, हा आणखी नवा लपंडाव कुठे खेळायचा त्याच्यासोबत! त्यालाही हे पक्कं ठाऊक असतं म्हणा...

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून
आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून..

...तशी बरीच साम्यं आहेत तुम्हा दोघांमध्ये. अंगावर येईल इतकं प्रेम करायचं, आपल्याच मस्तीत खुशाल राहायचं.. बेहोश व्हायचं, आणि करायचंही समोरच्याला. आपल्या आवेगात समोरचा चुरगळून जाईल, इतकं गुदमरून टाकायचं त्याला... आणि या सार्‍याचा परिणाम पाहायला डोकं ठिकाणावर ठेवायचंच नाही. आपल्या कलंदरीच्या कैफामध्ये निघून जायचं दूर दूर.. पार पल्याड.. या खोडी अगदी सारख्या आहेत तुम्हा दोघांच्याही...
तुम्ही निघून जाता तुमच्या तुमच्या विश्वात.. पार रमून जाता.. इथे आमच्यासारख्यांनी काय करायचं असतं अशा वेळेस? नको असलेल्या चक्रात गुरफटून घ्यायचं? आधी घडून गेलेल्या आणि पुढे घडू शकणार्‍या शक्यतांचा विचार करत?? रंग उडून गेल्यासारखं, फिकट मातीच्या रंगाचं जगणं ढकलत राहायचं? तुला माघारी आणण्यासाठी पुन्हा त्यालाच साकडं घालणं आहेच न शेवटी! त्याच्यावर चिडता येत नाही, ते म्हणून!
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना..
...कुठे तरी मनाला वाटत असतं, की माझं नाही पण त्याचं तरी ऐकशील तू.. त्याच्या हक्काच्या दटावणीपुढे तरी नमतं घेशील,
वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत,
विजेबाई, कडाडून मागे फिरव पांथस्थ..
...हे चुकून जर जमवून आणलं नं त्याने, माझ्यासाठी.. आपल्यासाठी, तर इतकी कोडकौतुकं करीन मी त्याची, की काही विचारायला म्हणून नको! मला हवायस तू माझ्या जवळ.. अगदी जवळ.. काहीशा जरबेने, नसलेल्या अधिकाराने आणि पुष्कळशा कळकळीने थोडा वेळ का होईना, पण तुझ्यातल्या वादळाला मला बांधून ठेवायचंय, माझ्यापाशी! आणि ते वादळही तोच अलगद आणू शकेल माझ्यापर्यंत...
आणि पावसा, राजसा नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन..
...अवेळी त्याला नको येऊ म्हणता म्हणता, तो तुला घेऊन येतोय म्हटल्यावर माझंच मला राहवणार नाहीये, तू दिसेपर्यंत चित्त थार्‍यावर राहणार नाहीये, तुझ्या कुशीत शिरून मन निवेपर्यंत चैन पडणार नाहीये. त्यामुळे आता त्याने लवकरात लवकर यावे, म्हणून बघ...
पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन...!!!
...तुझ्या डोळ्यातली वीज पाहायला पावसाशी या वाटाघाटी मला मंजूर आहेत! हे तुलाही माहितीये आणि त्या पावसालाही माहितीये. एवढं कळतं आपल्याला एकमेकांच्या मनातलं, म्हणून तर! लोक उगाच वेडं नाही म्हणत काही; तुला, मला.. आणि ‘त्या’लाही!!

- स्पृहा

Sunday, August 23, 2015

भाषा गमावून बसलेले 'शब्द'

गेले काही दिवस मला नव्याने एक गोष्ट जाणवली आहे. मला भाषा नीट वापरता येत नाही. म्हणजे मनात बरंच काही असतं. विचारही असतात अनेक. पण सुसंगतपणे त्याची मांडणी करणं हे फार अवघड होऊन बसतं. अस्ताव्यस्त जगण्याचंच प्रतीक असते, अस्ताव्यस्त भाषा. माझ्या मातृभाषेत न अडखळता, सलग पाच वाक्यं बोलणंसुद्धा कठीण जातं. मग इंग्रजी, मग हिंदी... तिथे तर आणखीनच कठीण परिस्थिती. कारण विचार केला जातो मराठीत, मग एका सेकंदात त्याचं ट्रान्सलेशन करायचं मनातल्या मनात. (अनुवाद हा शब्दही अंमळ उशिराच आठवला मला) किंवा मग आत्मविश्वासाच्या जोरावर वेळ मारून न्यायची. तेवढ्यापुरती. म्हणजे मग अडलंच घोडं... कुठलीच भाषा धड नाही. सुडौल, सुंदर, स्वच्छ नाही. कामचलाऊ शब्द, कामचलाऊ बोलणी आणि कामचलाऊ संवाद! आपलं आपल्याकडे दुरून पाहताना असं वाटतं की, कुठल्या तरी आडगावात आलो आहोत.
धूळभरले रस्ते, सुकलेली रोपटी, कडेनं कसंही वाहणारं सांडपाणी, वा-यात भरून राहिलेला विचित्र वास, मळकट कपडे घातलेली, कावलेली घामट माणसं, नेमकं काय करायचंय, हेच ठाऊक नसलेली निरुद्देश तरुण-तरुणी, शेंबूड सुकून तशीच खेळणारी पोरं, बेढभ, बेंगरूळ रूपाची माणसं!!! स्वतःचं खास असं कोणतंही रूप नसलेली, जगण्यात कुठलाही डौल नसलेली, सौंदर्यविहीन... आला दिवस ढकलणारी माणसं... संपूर्ण अस्तित्वावर पसरून राहिलेली एक उदासीन छाया... आपलं भाषा वापरणं हे ‘असं’ वाटायला लागलंय हल्ली...
हे फक्त बाह्यरूप झालं... आतलं दिसणं आणखी काळजी करायला लावणारं आहे. आपण भाषा वापरतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्याला नेमकेपणाने ‘जे’ सांगायचंय, ते सांगता येतं का? ‘जसं’ बोलायचंय तसं बोलता येतं का? तितके स्वच्छ असतो का आपण? तितके पारदर्शी? भाषेला अनेक पदर असणं हे चांगलं लक्षण आहे खरं; पण त्यातून आपल्याला ‘जे’ म्हणायचंय ते कधीच न म्हणता येणं, हे फार भीषण नाहीये का? एका वाक्यातून समोरचा त्याला हवा तसा, हवा तो कुठलाही अर्थ घेतो. पण मग त्याला वेळीच त्या वाक्यातला नेमकेपणा दाखवून देणं का साधत नाही? कशासाठी मागे ओढतो आपण आपल्याच शब्दांना? नेमक्या त्या क्षणी भाषेव्यतिरिक्त इतर कुठले घटक तिथे थैमान घालतात? विचित्र गैरसमजांचं कारण होऊन बसतात? ‘शंभर मी’मध्ये श्याम मनोहर भाषेच्या संदर्भात खूप सुंदर लिहून गेलेत... भाषा म्हणते, “जगताना हरेक क्षणी तुम्हाला दैहिक, मानसिक, बौद्धिक गोष्टी होतात.. त्या त्या हरेक क्षणी तुम्हाला मीही होत असते. हरेक क्षणी मी तुम्हाला ढुशा देत असते.” मग असं असताना कुठे हरवून बसतो आपण तिला? कर्ता, कर्म, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषनाम, विभक्तिप्रत्यय... किती लहानपणापासून शिकवलं होतं हे सगळं शाळेत. मग जेव्हा या सगळ्याचा एकत्रित मिळून वापर करायची गरज आज आलीये, तर कुठे निसटून जातात शब्द? वाक्य? मुद्दे? कल्पना? वर्णनं??


या सगळ्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण मिळेलही कदाचित; पण मुद्दा आहे, मानसिक खचलेपणाचा. प्रत्येकच बाबतीत स्वतःवरचा विश्वास तोकडा पडण्याचा. ‘ग्लोबल व्हिलेज’च्या संकल्पनेत माझ्या मातीचं फौंडेशन; माझी मुळं गमावून बसण्याचा. राक्षसी वेगाने वाढणा-या जागतिकीकरणाने, शहरीकरणाने माझ्या पिढीच्या सगळ्यांनाच दिलेली ही सार्वकालिक, सार्वभाषिक भेट आहे..!

- स्पृहा जोशी

Friday, August 21, 2015

माझ्या 'आतली मी'...

जुन्या उन्हाळ्याच्या सुट्यांची आठवण येतेय. पण डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला, तर सलग एक फिल्म नाही दिसत. तुकडे तुकडे दिसतायत. मोंताज!! त्याला काही टाइमलाइनही नाहीये. कुठूनही कशीही दृश्यं.
साधारण आठवी किंवा नववीचं वर्ष. शाळेबाहेर सगळे मित्रमैत्रिणी धमाल करतायत. चिंचा, कैऱ्या, बोरं, आवळे, बर्फाचा गोळा... नुकताच शेवटचा पेपर झालाय. तो विज्ञान/भूमिती असेल तर बहुतेक जण आपले वाईट चेहरे बर्फाच्या थंड गोळ्याआड दडवतायत. रिझल्टपर्यंत या विषयांची आठवणही नको... चित्रकला/ कार्यानुभव असेल तर व्वा! यंदा देवच पावला... शाळेचा शेवटचा दिस गोड झाला! मी या सगळ्यात आहे, पण थोडी बाहेरपण. मला नुकत्या नुकत्या कविता सुचायला लागल्यात. आणि त्या सुचण्याचं कारण माझ्या समोरच आहे... त्यालाही हे कळतंय. पण म्हणजे नेमकं काय, ते आम्हाला कळत नाहीये... आम्ही एकमेकांसोबत ‘असणं’ एन्जॉय करतोय. काहीतरी फुलपाखरासारखं वाटतंय. म्हणजे कसं कोण जाणे! पण कवितेत असंच असतं न!
आता मी लहान आहे. अगदी दुसरी-तिसरीत. आजोबा मला स्केटिंगला घेऊन जातात. सकाळी सकाळी सात वाजता. मी स्केट्स बांधून धडपडते. आजोबा कळवळतात. मला ते कळतं. मी रडल्यासारखं करते. पण मला धरायला ते पुढे येत नाहीत. मला तेही कळतं. मग मात्र मी एकटी उठते. कुणाचीसुद्धा मदत न घेता. तोल सावरते. हळूहळू ग्रीप घेत सराईतपणे चकरा मारायला लागते. आजोबांचे हसरे डोळे मला दिसतात. मग आम्ही कॉर्नरच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जातो. भरपूर बटर लावलेला ब्रूनमस्का आणि ऑम्लेट खातो पोटभर. माझ्या ब्रेडवर आजोबा जास्तीचं जॅम बटर लावतात. आजचं बक्षीस! मग मी त्यांना काहीही सांगते, काहीही! आणि तेसुद्धा जगातली त्या क्षणी सगळ्यात महत्त्वाची समस्या जर कुठली असेल तर ती हीच, इतक्या सिरियसली ते सगळं ऐकतात. मग आम्ही शहाळ्याचं पाणी पितो. आणि मग मारुतीच्या देवळाच्या गल्लीतून तिथल्या पिवळ्या झाडाची खाली पडलेली फुलं उचलत नाचत नाचत घरी येतो. हां... मारुतीला रोज ‘हाय’ केलंच पाहिजे. कसं छोटंसं घर आहे त्याचं. आपल्यापेक्षाही छोटं. त्याला कंटाळा येत असणार आपण हाय नाही केलं तर.. मग त्याला ‘हाय’ करूनच पुढचा रस्ता... आजोबा गेले मी पाचवीत असताना. नंतर मला ती मारुतीच्या देवळाची गल्लीही आवडली नाही, पिवळ्या फुलांची झाडंही, आणि तो मारुतीही. भीतीच वाटायला लागली त्यांची. आजही इतक्या वर्षांनंतर मी शक्यतो त्या गल्लीतून जात नाही.

दहावीच्या परीक्षेनंतरची मोठी सुट्टी. आता मी जर्मनीत आहे. स्टडी टूरसाठी. बर्लिनची वॉल बघते, नाझी छळछावण्यांच्या रेकॉर्ड‌्स बघते. नंतर पॅरिसचा आयफेल टॉवर, अॅमस्टरडॅमला अॅन फ्रँकचं घर, बेल्जियमची राजेशाही चर्चेस, सगळं मनात साठवून घेते. अल्बर्ट आणि मारिया राह्याक नावाच्या प्रेमळ जर्मन कुटुंबात त्यांच्या घरातली होऊन जाते. बर्लिनच्या रस्त्यावर ‘ढोल बाजे’वर डान्स करून चक्क टोपी फिरवून मिळालेल्या १० डॉलर्समध्ये आमचा ग्रुप जिवाची जर्मनी करतो... पण या सगळ्यात मी नाहीये. असूनही नाहीये. कारण माझं मन अडकलंय एका परीकथेतल्या शहरात. हायडलबर्गमध्ये... बाकीचे सगळे कधीच पुढची ट्रीप एन्जॉय करू लागलेसुद्धा. पण मी तिथेच आहे. तिथल्या छोट्या छोट्या घरांमध्ये. इवल्याशा वाटांमध्ये, कित्येकशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यामध्ये. सगळ्या ऐकलेल्या, वाचलेल्या परीकथा माझ्याभोवती पिंगा घालायला लागतात. आणि मी हीरॉइन असते त्या गोष्टीची. आत्ता कुठल्याही क्षणी माझा राजपुत्र येणार, पांढऱ्या घोड्यावरून दौडत दौडत...आत्ता...!! माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण ते रडू नाहीये, हे मला कळतंय. मला खूप जास्त छान वाटतंय. चित्रकलेच्या तासाला ‘निसर्गचित्र’ म्हणून काय काय काढतो आपण.

एक छोटं घर, बाजूला एक सावलीचं झाड, वळणाचा रस्ता, नागमोडी नदी, मागे डोंगर, आणि डोंगरामागे सूर्य; हसरा... ते चित्र समोर आहे माझ्या. आणि त्या चित्रात नकळत कोणीतरी मलाही रंगवलंय. त्या शांतपणात माझ्या जाण्याने एक छोटासा तरंग उठतो, आणि बाकी सगळं पुन्हा शांत, सौम्य, गूढ... पण अतिशय सुंदर. उन्हाळ्याच्या सुटीच्या माझ्या या तीन आठवणी. त्या रोजच्या रोज आठवतात, असं काही नाही. पण जेव्हा जेव्हा आठवतात न, तेव्हा तेव्हा माझ्या आतली जुनी ‘मी’ मला नव्याने भेटवून जातात. आणि स्वतःशीच स्वतःची अशी भेट होणं यासारखं सुखद दुसरं काहीच नाही.


- स्पृहा जोशी