Sunday, April 17, 2011

'अनप्लग्ड' होण्याचा अधिकार..!!

२४ तासांतले अठरा तासांहून जास्त कम्प्युटरला डोळे लावून बसलेल्या माझ्यासकट माझ्या सगळ्या मित्रांनो,आपल्याला आवडो न आवडो,इंटरनेट ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनून गेली आहे.आणि जात-पात न मानणाऱ्या आपल्या पिढीने  एक नवीनच वर्गवारी तयार केली आहे. ज्यांना सहज इंटरनेट वापरता येतं असे लोक;आणि ज्यांना ते नीट वापरता येत नाही असे लोक.डिजिटल युगाचे पाईक आहोत आपण!जगाशी 'कनेक्टेड' राहण्यासाठी आपण मेंदूच्या वायरी 'पीसी'ला जोडल्या आहेत,बोटं कीबोर्ड,माऊस किंवा लाडक्या मोबाईलला चिकटवली आहेत,डोळे त्यातून काही आरपार शोधतायत..सगळी माहिती आपल्या 'सेवेशी सादर' आहे..एका 'क्लिक'चं अंतर! तुम्ही 'डिजिटली' सतत कार्यरत असणं हा तुमच्या 'असण्याचा' एकमेव पुरावा आहे! या 'मोड'मधून आपण बाहेरच येत नाही..तुम्ही काय,आणि मी काय..  विचार करून बघा हं, झोपेत असलो,तरी मनाने सोशल नेट्वर्किंग चालूच असतं, फेसबुकवरचे फोटो,ट्विटरवरचं अपडेट,उद्याच्या प्रेझेंटेशनचं डाउनलोड, हे झोपेतही थांबत नाही..भरीस भर म्हणून सकाळी उठेपर्यंत मोबाईलचा इनबॉक्स मेसेजेसनी उतू चाललेला असतो,तुम्ही कधी एकदा ते वाचताय याची वाट बघत!
अर्थात,आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये म्हणा.. इतक्या अपेक्षांचं ओझं घेऊन उरीपोटी धावताना कुबड्या शोधाव्या लागणारच! पण या कुबड्या कम्पल्सरी गळ्यात बांधल्या जातायत आपल्या..माझ्या एका मित्राचा किस्सा सांगते..त्याला नवीन नोकरी लागली..आणि कंपनीने पहिल्याच दिवशी त्याला 'ब्लॅकबेरी' फोन  दिला. त्याला ती ऍप्लिकेशन्स झेपेनात,म्हणून त्याने ठरवलं की आपण आपला सवयीचा स्मार्टफोनच वापरू..पण त्याच्या कंपनीने त्याला कंपल्शन केलं..'ब्लॅकबेरी' वापरण्याचं..ग्यानबाची मेख लक्षात येतेय का? त्याला 'ऑफिस अवर्स'नंतरही काम करावंच लागणार होतं. ही गोष्ट जेव्हा माझ्या मित्राच्या लक्षात आली,तेव्हा त्याने ठाम नकार दिला,पण त्याला ती नोकरी सोडावी लागली.. इतकी चांगली नोकरी सोडली म्हणून आम्ही त्याला शिव्या घालत होतो,पण बोलता बोलता तो एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलून गेला..म्हणाला,"अरे हे काय चाललंय?मोबाईल बंद करायचा नाही,कम्प्युटर ऑफ करायचा नाही,सतत वायरींनी जखडलोय मी.. मला अधिकार आहे की नाही थोडासा वेळ 'अनप्लग्ड' होण्याचा..!!!"  'अनप्लग्ड' होण्याचा अधिकार??? स्वातंत्र्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार, माहितीचा अधिकार,तसा काही वर्षांनी 'अनप्लग्ड' होण्याचा अधिकारही कायद्याने मागायची वेळ येणार आहे..

अंगावर येतं हे सगळं माझ्या..थकायला होतं..आणि मन विचारात गुंतू नये म्हणून मी स्वतःलाच पुन्हा डिजिटली गुंतवून घेते...इतका भडीमार आहे आपल्यावर माहितीचा,की आपल्या स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स पासून दूर जाणं सहन नाही होत आपल्याला..का कुणास ठाऊक एक असुरक्षिततेची भावना ग्रासते. का 'डिमांडिंग' झालोय आपण इतके?ऑफलाईन जायचं असेल तर आधी मला फेसबुक आणि ट्विटरवर हे स्टेटस अपडेट करावं लागतं,कारण नाहीतर माझे 'फ्रेंड्स' अस्वस्थ होतात..दोन दिवस जर मी ऑनलाईन नसेन तर माझा इनबॉक्स या चौकशीच्या मेसेजेसनी भरून गेलेला असतो.ज्यांना उत्तरं द्यायची खरंतर आतून इच्छाही होत नाही..पण तरी आपण ते टाळू शकत नाही..कदाचित हरवत चाललेली नाती शोधत असतो आपण.किंवा कदाचित त्या नात्यांपासूनच दूर पळत असतो कुठेतरी..गोंधळ असा झालाय मित्रांनो,की आपल्याला एकीकडे नात्यांमुळे जगापासून मिळणारं संरक्षण तर हवंय,आणि दुसरीकडे नात्यांमुळे येणारं आपल्या प्रायव्हसी वरचं अतिक्रमणही टाळायचंय..त्यामुळे आपण नात्यांपासूनही संरक्षण शोधतोय.. किती अवघड करून ठेवलाय नाही,आपणच आपलं आयुष्य!!! 
ह्या गोष्टीचा विचार करायची वेळ आली आहे मित्रांनो..प्रत्येकाला जसा जगाशी जोडून घेण्याचा अधिकार आहे,तसा काही काळ 'अनप्लग्ड' होण्याचा,'डिसकनेक्ट' होण्याचा अधिकारसुद्धा असायला हवा.आपण सगळ्यांनीच तो समजुतीने एकमेकांना द्यायला हवा.या छोट्या होत जाणाऱ्या आणि वेळेपुढे धावणाऱ्या जगात,हे काही क्षणांचं तुटलेपणच कदाचित आपल्याला एकमेकांशी अधिक जोडून देईल..!!



Sunday, April 10, 2011

सुट्ट्यांचे दिवस.

सुट्ट्यांचे दिवस आले..!!! मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला न,की मला एकदम मस्त वाटायला लागतं. म्हणजे उन्हाची काहिली,घामाच्या धारा ह्या सगळ्यांतही माझा मूड छान राहतो.कारण शाळेच्या परीक्षा संपलेल्या असतात. आणि दोन अख्खे महिने असतात मजेचे,हुंदडण्याचे,मस्तीचे आणि नकळत खूप काही शिकण्याचे..आता तुम्ही म्हणाल,की या मुलीचं कॉलेज संपलंय तरी ही शाळेच्या सुट्ट्यांमध्ये का अडकलीये! पण खरं सांगू का,मी त्या दिवसांतून पूर्ण बाहेर येउच शकले नाहीये.आज इतक्या वर्षां नंतरसुद्धा! अजूनही नववी-दहावीच्या मुलांची परीक्षा असते न, तेव्हा मी शाळेच्या भोवताली उगीचच एक चक्कर मारून येते..घोळक्यात उभे असलेले मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स,झालेल्या पेपरवर खडाजंगी चर्चा,एखाद्या मित्राचं उत्तर चुकलंय,हे लक्षात आल्यावर तो हिरमुसू नये म्हणून त्याच्यासाठी हळूच आणलेली कॅडबरी, बटाटेवड्यांचा खमंग वास,आईने तंबी देऊनसुद्धा मिटक्या मारत खाल्लेली कैरी आणि चिंच..तिची चव सबंध वर्षात कधी इतकी खास लागत नाही!! आणि मग शेवटच्या पेपरनंतर ओ येईस्तोवर खाल्लेले बर्फाचे गोळे...किती आठवणी जशाच्या तशा अलगद येऊन कडकडून भेटतात या मुलांना पाहताना..
परीक्षा संपायच्या आधीपासूनच किती प्लान्स सुरु व्हायचे..त्यात रोज सकाळ-संध्याकाळ आमच्या 'समर्थ व्यायाम मंदिरा'त जिम्नॅस्टिक्स-रोप मल्लखांबचं शिबीर असायचं.आम्ही सगळी लहान लहान मुलं प्रशिक्षक..कधी जमलं न,तर या दिवसात शिवाजी पार्कला आमच्या या शिबिराकडे एक चक्कर माराच..१००० मुलं,आणि त्यांना सांभाळणारे युनिफॉर्म मधले छोटे शिस्तबद्ध प्रशिक्षक..कुठेही गोंधळ नाही,धावपळ नाही,गडबड नाही..प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेलं काम चोख करतोय.आपली जबाबदारी उत्कृष्ट हाताळतोय..देशपांडे सरांची या सगळ्यांवर करडी नजर..आज कित्येक वर्ष शिवाजी पार्कचं मैदान या शिबिराने फुलून येतंय. किती आत्मविश्वास कमावला आम्ही...इव्हेंट मॅनेजमेंट,क्रायसिस मॅनेजमेंट याचे धडे कोणत्याही हायफाय प्रचंड फीच्या क्लासला न जाता अगदी सहज मिळाले.आज अडचणीच्या प्रसंगात इथे झालेले संस्कार धावून येतात मदतीला.
सुट्टीतली आणखी एक आनंदाची जागा,म्हणजे आमचं 'कलांगण'चं शिबीर.वर्षा भावे म्हणजे आमची वर्षा मावशी आम्हा सगळ्या पोरा-टोरांना हाताशी धरून गेली कित्येक वर्षं असंख्य मुलांना कलांगणमध्ये आनंदाचं अंगण देतेय.आम्ही बच्चेकंपनीसाठी जो कॅम्प घेतो,त्याचं नाव ठेवलंय,"KTKK " म्हणजे,"काहीही...तरी खूप काही!!" छोट्या छोट्या मुलांना आम्ही मस्त गाणी शिकवतो,गोष्टी सांगतो,एखाद वेळी चित्र रंगवतो, कागदाच्या टोप्या करतो,मातीकाम करतो..मुलं भरपूर पसारा करतात,आरडाओरडा करतात,पण त्यांना कोणी ओरडत नाही..हेच करू नको,त्यालाच हात लावू नको,असं कोणी कोणी म्हणत नाही.. आमच्याशी गप्पा मारतात,आपली निरागस सिक्रेट्स ते विश्वासाने आम्हा ताई-दादांना सांगतात..हसऱ्या चेहऱ्याने घरी जातात... कलांगणच्या या अंगणात बागडताना, आजच्या नवीन पिढीचे कित्येक गायक,वादक,कवी,आयोजक,निवेदक,संगीत दिग्दर्शक,उत्तम वाचक,आणि रसिक श्रोते यांची फौजच्या फौज तयार झालेय. आम्ही हसतो,खिदळतो,मजा मजा करतो.पण वर्षा मावशी,कमलेश दादा,वैशाली ताई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली याच धमाल सुट्ट्यांमध्ये आम्हाला एका नवीन,सुंदर कार्यक्रमाची बीजं सापडतात.प्रत्येकजण आपापल्या परीने उच्च निर्मितीमूल्य असलेला उत्तम कार्यक्रम कसा करता येईल,याच्या विचारात गढून जातो. निखळ आनंदाचे,मोकळ्या हसण्याचे,आतून बाहेरून खरं असण्याचे हे दिवस..आता मी पुन्हा आतुरतेने वाट बघतेय.माझ्या छोट्या-मोठ्या मित्रांना कधी भेटतेय असं झालंय..
आनंद मिळवण्याचा याहून निर्मळ रस्ता कुठे सापडणार? हे संचित मी जपून ठेवते..पुढच्या पूर्ण वर्षातल्या धकाधकीमध्ये, धावपळीमध्ये,टेन्शनमध्ये, जीवघेण्या स्पर्धेमध्ये हेच क्षण मला हसरं ठेवतात. माझा खेळकरपणा टिकवून ठेवतात. मित्रांनो, माझे सुट्ट्यांचे प्लान्स तर ठरलेसुद्धा...तुम्ही काय करताय???

Friday, April 1, 2011

'द ट्रुमन शो'!!

परवाचा 'नॅशनल मोहाली डे'...(आपली पाकिस्तान बरोबरची मॅच हो...!!!) धोनी ब्रिगेडने सार्थकी लावला.. धमाल आली...क्षणाक्षणाला वाढणारे हृदयाचे ठोके,आरोळ्या,चित्कार..सगळं काही एकदम टिपेचं.. तशी भारत-पाकिस्तानची मॅच म्हटल्यावर वातावरण निर्मिती आपली प्रसारमाध्यमं जीव तोडून करतच असतात.. त्यात यंदा गिलानी साहेब मोहालीत अवतरले होते..सिंग साहेबांचा मान राखून..त्यामुळे बातम्या इतक्या मजेशीर वाटत होत्या ऐकायला,की काय विचारता...!! म्हणजे एकीकडे 'अब क्रिकेटही लायेगा अमन का पैगाम',तर दुसरीकडे 'कौन जितेगा घोर महायुध!!!!' तापल्या तव्यावर मीठ मोहरीची फोडणीच जशी!!! मीही भारतीय आहे..परवाची मॅच बघताना मीही तितकीच एक्सायटेड होते..कामासाठी बाहेर असताना अधीरपणे कानाला मोबाईल लावून स्कोअर ऐकत होते..त्यांच्या विकेट्स पडल्या की ओरडत होते...पण म्हणून महायुद्ध????? मला अशा सगळ्याच अतिरेकी कमेंट्सचा खूप त्रास होतो...आपली मॅच होती ना,त्याच्या दोन दिवस आधीपासूनच अशा आचरट एसेमेसेसनी वैताग आणला होता..कंटाळा आला मला ते डिलीट करूनसुद्धा...कशासाठी आपलं देशप्रेम इतक्या सवंग पद्धतीने व्यक्त करतो आपण?किती बालिश वागतो...त्यातली भावना प्रामाणिक असेलही कदाचित;पण तिचं जाहीर रूप किती हिडीस झालेलं असतं...
मला क्रिकेट अतिशय आवडतं..अगदी मनापासून.. पण गेल्या काही वर्षांपासून माझा या स्पर्धांवरून मात्र विश्वासच उडत चाललाय..इतर खूपशा छान गोष्टींवरून उडत चाललाय तसाच.. हा वर्ल्ड कपही लुटू पुटूचा वाटतो...आपण जिंकल्यावर आनंदही होतो; मग लगेच वाटतं,हे जिंकणं 'खरं'असेल? एखाद्या फिल्डरच्या हातातून कॅच सुटतो; मनात प्रश्नचिन्ह..कॅच 'सुटला',की 'सोडला'?? अनुभवी फलंदाजांनी मारलेला शॉट नेमका समोरच्या फिल्डरच्या हातात अलगद विसावतो...एक क्षणभर त्याच्या फिल्डिंगचं कौतुक वाटून जातं आणि मग लगेच शंका..विकेट 'गेली',की 'फेकली'... खूप वाईट वाटतं मग...स्वतःचाच राग येतो..आपण आपला हा आवडता खेळ,'खेळ' म्हणून पाहूच शकत नाही.या भावनेने कोंदून गेल्यासारखं होतं... वर्ल्ड कप..की एक 'इव्हेंट' फक्त.. कोट्यावधींचा.. जाहिरातीचा... प्रायोजकांचा.. .बेटिंगचा... पैसेवाल्यांचा..अर्थकारणाचा.. सत्ताकारणाचा..साध्या-भोळ्या माणसांच्या भावनांचा..एक 'खेळ' फक्त..!!!
परवा मॅचच्या दिवशी कौशल इनामदारशी गप्पा मारत होते.बोलता बोलता कौशल दादा म्हणाला, आपला ना 'ट्रुमन शो' झालाय!!!! मित्रांनो,'ट्रुमन शो' हा एक खूप सुंदर इंग्लिश पिक्चर आहे...'रियालिटी शो' ची कमाल पातळी दाखवणारा...एका सामान्य माणसाच्या जन्मापासून सगळ्या गोष्टी छुप्या कॅमेऱ्यात शूट केल्या जात असतात...त्याचं अख्खं आयुष्य सारी दुनिया बघत असते...तो मात्र एका आभासी जगात बंदिस्त...या सगळ्यापासून कोसो दूर..अनभिज्ञ...लोकांच्या डिमांडनुसार या ट्रुमनच्या आयुष्यातल्या गोष्टी घडवल्या-बिघडवल्या जातात...आणि तो बिचारा जगत राहतो..या आभासी जगालाच वास्तव मानून..मला कौशल दादाचं म्हणणं मनापासून पटलं...आपला 'ट्रुमन शो' झालाय...कठपुतळ्या आहोत आपण..नाड्या भलत्यांच्याच हातात..आणि आपण हसतोय,रडतोय,ओरडतोय,दंगली करतोय...त्यांना हवे तेव्हा..त्यांना हवे तसे...!!! ' ट्रुमन शो'!!!
सोमवारपर्यंत,वर्ल्ड कपची फायनल झाली असेल,कदाचित आपण जिंकलेले असू,इतिहासामध्ये धोनीची टीम इंडिया अजरामर झालेली असेल...कदाचित... त्यावेळी मीसुद्धा तुम्हां सगळ्यांसारखीच आनंदाने ओरडेन,नाचेन,जल्लोष करेन,वेडीपिशी होईन...पण...हा कुरतडणारा 'पण' मात्र आपली पाठ कधीच सोडणार नाही...आणि हीच या 'ट्रुमन शो'ची शोकांतिका आहे..!!