Sunday, April 10, 2011

सुट्ट्यांचे दिवस.

सुट्ट्यांचे दिवस आले..!!! मार्च महिना संपून एप्रिल सुरु झाला न,की मला एकदम मस्त वाटायला लागतं. म्हणजे उन्हाची काहिली,घामाच्या धारा ह्या सगळ्यांतही माझा मूड छान राहतो.कारण शाळेच्या परीक्षा संपलेल्या असतात. आणि दोन अख्खे महिने असतात मजेचे,हुंदडण्याचे,मस्तीचे आणि नकळत खूप काही शिकण्याचे..आता तुम्ही म्हणाल,की या मुलीचं कॉलेज संपलंय तरी ही शाळेच्या सुट्ट्यांमध्ये का अडकलीये! पण खरं सांगू का,मी त्या दिवसांतून पूर्ण बाहेर येउच शकले नाहीये.आज इतक्या वर्षां नंतरसुद्धा! अजूनही नववी-दहावीच्या मुलांची परीक्षा असते न, तेव्हा मी शाळेच्या भोवताली उगीचच एक चक्कर मारून येते..घोळक्यात उभे असलेले मित्र-मैत्रिणींचे ग्रुप्स,झालेल्या पेपरवर खडाजंगी चर्चा,एखाद्या मित्राचं उत्तर चुकलंय,हे लक्षात आल्यावर तो हिरमुसू नये म्हणून त्याच्यासाठी हळूच आणलेली कॅडबरी, बटाटेवड्यांचा खमंग वास,आईने तंबी देऊनसुद्धा मिटक्या मारत खाल्लेली कैरी आणि चिंच..तिची चव सबंध वर्षात कधी इतकी खास लागत नाही!! आणि मग शेवटच्या पेपरनंतर ओ येईस्तोवर खाल्लेले बर्फाचे गोळे...किती आठवणी जशाच्या तशा अलगद येऊन कडकडून भेटतात या मुलांना पाहताना..
परीक्षा संपायच्या आधीपासूनच किती प्लान्स सुरु व्हायचे..त्यात रोज सकाळ-संध्याकाळ आमच्या 'समर्थ व्यायाम मंदिरा'त जिम्नॅस्टिक्स-रोप मल्लखांबचं शिबीर असायचं.आम्ही सगळी लहान लहान मुलं प्रशिक्षक..कधी जमलं न,तर या दिवसात शिवाजी पार्कला आमच्या या शिबिराकडे एक चक्कर माराच..१००० मुलं,आणि त्यांना सांभाळणारे युनिफॉर्म मधले छोटे शिस्तबद्ध प्रशिक्षक..कुठेही गोंधळ नाही,धावपळ नाही,गडबड नाही..प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेलं काम चोख करतोय.आपली जबाबदारी उत्कृष्ट हाताळतोय..देशपांडे सरांची या सगळ्यांवर करडी नजर..आज कित्येक वर्ष शिवाजी पार्कचं मैदान या शिबिराने फुलून येतंय. किती आत्मविश्वास कमावला आम्ही...इव्हेंट मॅनेजमेंट,क्रायसिस मॅनेजमेंट याचे धडे कोणत्याही हायफाय प्रचंड फीच्या क्लासला न जाता अगदी सहज मिळाले.आज अडचणीच्या प्रसंगात इथे झालेले संस्कार धावून येतात मदतीला.
सुट्टीतली आणखी एक आनंदाची जागा,म्हणजे आमचं 'कलांगण'चं शिबीर.वर्षा भावे म्हणजे आमची वर्षा मावशी आम्हा सगळ्या पोरा-टोरांना हाताशी धरून गेली कित्येक वर्षं असंख्य मुलांना कलांगणमध्ये आनंदाचं अंगण देतेय.आम्ही बच्चेकंपनीसाठी जो कॅम्प घेतो,त्याचं नाव ठेवलंय,"KTKK " म्हणजे,"काहीही...तरी खूप काही!!" छोट्या छोट्या मुलांना आम्ही मस्त गाणी शिकवतो,गोष्टी सांगतो,एखाद वेळी चित्र रंगवतो, कागदाच्या टोप्या करतो,मातीकाम करतो..मुलं भरपूर पसारा करतात,आरडाओरडा करतात,पण त्यांना कोणी ओरडत नाही..हेच करू नको,त्यालाच हात लावू नको,असं कोणी कोणी म्हणत नाही.. आमच्याशी गप्पा मारतात,आपली निरागस सिक्रेट्स ते विश्वासाने आम्हा ताई-दादांना सांगतात..हसऱ्या चेहऱ्याने घरी जातात... कलांगणच्या या अंगणात बागडताना, आजच्या नवीन पिढीचे कित्येक गायक,वादक,कवी,आयोजक,निवेदक,संगीत दिग्दर्शक,उत्तम वाचक,आणि रसिक श्रोते यांची फौजच्या फौज तयार झालेय. आम्ही हसतो,खिदळतो,मजा मजा करतो.पण वर्षा मावशी,कमलेश दादा,वैशाली ताई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली याच धमाल सुट्ट्यांमध्ये आम्हाला एका नवीन,सुंदर कार्यक्रमाची बीजं सापडतात.प्रत्येकजण आपापल्या परीने उच्च निर्मितीमूल्य असलेला उत्तम कार्यक्रम कसा करता येईल,याच्या विचारात गढून जातो. निखळ आनंदाचे,मोकळ्या हसण्याचे,आतून बाहेरून खरं असण्याचे हे दिवस..आता मी पुन्हा आतुरतेने वाट बघतेय.माझ्या छोट्या-मोठ्या मित्रांना कधी भेटतेय असं झालंय..
आनंद मिळवण्याचा याहून निर्मळ रस्ता कुठे सापडणार? हे संचित मी जपून ठेवते..पुढच्या पूर्ण वर्षातल्या धकाधकीमध्ये, धावपळीमध्ये,टेन्शनमध्ये, जीवघेण्या स्पर्धेमध्ये हेच क्षण मला हसरं ठेवतात. माझा खेळकरपणा टिकवून ठेवतात. मित्रांनो, माझे सुट्ट्यांचे प्लान्स तर ठरलेसुद्धा...तुम्ही काय करताय???

8 comments:

 1. छान झालीये पोस्ट ..
  भूतकाळात रमण्याची मजा काही औरच :)

  ReplyDelete
 2. Mast !!!!! Me kadhi hi kuthchya Shibira madhe gelo nahi .. tar mala jasti exp nahi aahe .. pan kahi hi aso .. he sutti che divas nehmich majeche astat .. me tar dar suttit Koknat jaycho aani aamhi masta sagli bhavanda khoop dhamaal karaycho .. He post vachun sagla athavla ... Dhanyawaad :)

  ReplyDelete
 3. पोस्ट खूप आवडली स्पृहा!

  ReplyDelete
 4. Bandya(!!!!),Anupam,Vinayak ani Reshma..Thank You!!:-)

  ReplyDelete
 5. Awesome... seriously, shaletli dhamal ani suttyatli maja aathavli...

  ReplyDelete
 6. Thanx so much Shashank..!!:-)

  ReplyDelete
 7. अग मस्त सुट्टी डोळ्यासमोर उभी केलिस….
  पण माझी सुट्टी (खेड्यातली सुट्टी) जरा वेगळीच. एक तर आपल्याच गावात राहायचं नाहीतर मामाच्या, आत्याच्या गावाला जायचं आणि ते गावही खेडच. खरी धमाल म्हणजे या सुट्टीत रोजचे (आपल्या शाळेतले) मित्र कमी आसतत. सगळे सुट्टीसाठी आलेले प्रत्येक वर्षी फक्त सुट्टीत भेटणारे मित्र. मग आपापल्या मित्रांच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या आणि पूर्ण वर्षाची देवाण-घेवाण करयचि.

  आमच्या सुट्टीत तर शाळेच्या तसा सारखे वेगवेगळे तास नित्यनेमाने व्यायाचेच. उदा. सकाळी दबक्या विहिरीत पोहायचा तास मग लगेच सकाळच जेवण (तसा नास्ता पण पोहल्याने भूक लागायची म्हणून दणकून जेवायचे सगळे ) उरकून लगेच क्रिकेट अन उन झाल कि सावली शोधत गोट्यानचे विविध डाव रंगायचे थेट पुढच्या जेवणा पर्यंत. जेवण उरकून सगळे वापस येणार म्हणजे येणारच कारण आधीच्या डावात झालेल्या हार-जीत चा बदला जो घ्यायचा असायच. जो लवकर हरेल त्याने आपल तिथेच घुटमळत राहायचं नाहीतर दुसरा एखादा खेळ सुरु करायचा आत्या-पाट्या सारखा बाकीच्याना घेउन.

  असेच वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या मुलांबरोबर खेळून संध्याकाळ झाली कि नित्यनेमाने कधी न चुकणार्या परिपाठाच्या तासा सारखा खरडपट्टीचा तास व्हायचा, कारण ते जेवनाव्यतिरिक्त दिवसभर घरी तोंड न दाखवल्यामुळे. मग त्या तासातुन सुटका व्हायची ती आजीच्या 'जेवायला चला रे ' या घंटेनेच. मग भरल्या ताटावर ताव मारला कि आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकता-ऐकता कधी आक्काबाई डोळ्यावर यायची ते कळायचं देखील नाहि. मग पुन्हा दिवसाची सुरुवात व्हायची ती कोंबड्याच्या आवाजानेच आणि मग पुन्हा नित्य नियम 'उन्हाळ्यातली शाळा'…… Just missing everything. Thanks Spruha for this post.

  ReplyDelete