Sunday, January 12, 2014

खूण

एक पाकोळी भिरभिर करी 
अंधार हसे मन तळात,
घेण्या विसावा चार क्षणांचा 
रात टेकली जरा कोन्यात..

दूर रेंगाळे पहाट ओली 
Thanks to Divya.. She is unknown but loved this painting!

प्राजक्त देही जरा वाकला,
जुने तरंग शांत होताना 
डोहाने नवा डाव मांडला. 

खेळ संपला पांगले सारे 
आता एकटा जीव उरला,
सोबती आता अंधार त्याचा
मन तळाशी पुन्हा हसला.. 

असेच सारे विरून जावे 
नकोच पुन्हा कालचे ऋण,
धुक्यात निळ्या कोरून द्यावी 
काल रातीची हळवी खूण !!!

- स्पृहा.   

Wednesday, January 1, 2014

मावळतीच्या वाटेवरती..

मावळतीच्या वाटेवरती 
सोनकेशरी रंगसोहळे,
कधीकधीचे घुसमटलेले 
क्षणात होती श्वास मोकळे.

ओलांडून ये तुझा उंबरा 
पल्याड देशी तुझी सावली,
जपून आहे मीही अजुनी 
माझ्यामधली तीच बाहुली !

रास मांडशी पुन्हा नव्याने 
जुना चांदवा जुन्याच वाटा,
नवी होऊनी मीही आले,
पायी माझ्या जुनाच काटा!

सुटली वेणी अशा अवेळी
निळकर वारा खेळ मांडतो,
उरली-सुरली सरली राधा 
अवघ्या देही श्याम नांदतो !!

- स्पृहा.