Thursday, January 28, 2016

शरीराचं 'म्हणणं'

परवा एक फार दुर्दैवी घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात काही तरुण मुलं बोट उलटून त्यात मृत्युमुखी पडली. फार दुर्दैवी. सगळ्यांसाठी एक अलार्मिंग सिग्नल म्हणावा अशी गोष्ट आहे ही. यानिमित्ताने एका चॅनेलवर झालेल्या चर्चेत मी सहभागी झाले होते. हिरीरीने माझी मतं मांडली. “कुठलीच टेक्नोलॉजी ही वाईट नसते. ‘सेल्फी’च काय, पण कुठल्याही टेक्नोलॉजीचा अतिरेक करणं हे वाईटच. प्रत्येकाने आपल्यापुरती लक्ष्मणरेषा पाळलीच पाहिजे,” हे सगळं अगदी मनापासून आणि ठासून सांगितलं मी.
आज जिममध्ये एक नवा धडा मिळाला. सायकलिंग करता करता मी गाणी ऐकत होते. तेवढ्यात तिथे आमचे परुळेकर सर आले. आणि गोड शब्दात ओरडलेच मला. मला म्हणाले, की  “आपल्या जिममध्ये टी.व्ही. आहे, उत्तम अशी महागडी म्युझिक सिस्टीम आहे. पण मी ती बंद ठेवतो. व्यायाम करताना तुम्हाला म्युझिक कशासाठी लागतं? तुम्ही नुसता केल्यासारखा व्यायाम करता खरा. पण तुम्ही तुमच्या शरीराचं म्हणणं ऐकतच नाही. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट.. अहो हेसुद्धा एक प्रकारचं मेडीटेशनच आहे. पूर्ण फोकस त्यावर करून पहा. इथे आहात तोवर ही बाहेरची गाणी-बिणी काही काही नको. शंभर टक्के इथे राहून पहा बरं! बघा तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स कुठच्या कुठे असतील.”
हा विचारच केला नव्हता मी कधीच. या अशा पद्धतीने. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. सतत आसपास ती सुरु लागतात. पण ही आवड कुठेतरी माझा शांतपणाच व्यापून टाकते आहे की काय असं पहिल्यांदाच वाटलं मला.. गाडी चालवताना, इस्त्रीचे कपडे टाकायला जाताना, भाजी चिरताना, फोडणी करताना, पुस्तक वाचताना, लेख लिहिताना .. इतकंच काय, पण अंघोळ करताना, झोपताना.. सगळीकडे सतत.. सतत.. एक आवाज सोबत लागतो. का? आज सरांनी ही गोष्ट दाखवून दिल्यानंतर मला अचानक लख्ख जाणवलं. यामध्ये कोणत्याच एका गोष्टीला पूर्ण न्याय देताच नाही आपण! ना भाजी चिरण्याला, ना पुस्तक वाचण्याला, आणि ना धड गाणं ऐकण्याला. सगळंच अर्धंमुर्ध. कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर करायला किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. मागे एकदा योगाच्या क्लासमध्ये तिथल्या बाईंनी शवासन करताना दिलेल्या ‘शिथीssssssल करा...’ या सूचना आठवल्या. शरीराचा एकेक स्नायू पुसट होत गेल्याची आठवण सरसरून जागी झाली. आणि तो अनुभव गेल्या कित्येक वर्षात आपण घ्यायचेच विसरलोयत, हेही लक्षात आलं.
आणि जाणवून गेली ती कमालीची अस्थिरता. लक्षात आलं, की हे फक्त माझ्यासोबत नाही घडते. माझ्या आसपासच्या सगळ्यांची हीच स्थिती आहे. ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता!” असंख्य विचारांची भाऊगर्दी.  सतत ‘काहीतरी’ गाठायचं असणं! आणि ते नेमकं ‘काय’ आहे, हे माहितीच नसणं. नातेसंबंध, गुंतागुंत, वाढती टेन्शन्स... आणि हरवून, निसटून चाललेली शांतता. ती नेमकी आपल्याला नको असते, कारण आपल्याला ती मूलभूत प्रश्न पाडते. चुका दाखवते. फटकारते. हे टाळायला ही गोंधळाची पळवाट बरी वाटते. आणि मग आपण ती जगण्याची पद्धत म्हणूनच आपलीशी करतो. स्वीकारून टाकतो.
पण मी मात्र आता बदलायचं ठरवलंय. त्या वेळेला ‘ते’ कामच मनापासून करायचं ठरवलंय. या गोंधळी आव्हानाचा सामना मी करणार आहे. माझी खात्री आहे. ‘लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट’ हा परुळेकर सरांचा मंत्र मला नक्की लाभेल..!

स्पृहा जोशी 

Tuesday, January 19, 2016

एकटेपणा...वगैरे

उन्हाळ्याचे दिवस. दिवस उजाडतो, तसा उन्हाचा तडाखा कडक होत चाललेला. घामाच्या धारा नाहीत तरी एक चिकटपणा भरून राहिलेला. अशा वेळेस आढ्याकडे तोंड करून झोपून राहताना किती विचारांची गर्दी मनात. पहिला स्वतःच स्वतःला प्रश्न.. “आपण असे का? बाकी सगळ्यांची आयुष्य भरधाव वेगाने जात असताना, आपल्या आयुष्यात हे असं थांबणं आलंय का? अवेळी? कशामुळे आहे ते? आत्ता याक्षणी मला हे असं थांबायचं नाहीये खरंतर. वेग हवाय.. सगळ्याला वेग हवाय. पण मग हे असं हरवून जाणं का येतंय वाट्याला? का खरंतर वेगाने वाहतायत, असं वाटणारी सगळी आयुष्य अशीच चाललीयेत; त्यांच्या त्यांच्या परीने संथ..?? ज्या मानसिक द्वंद्वातून कारण नसताना मी जातीये, तो कल्लोळ त्यांच्या वाट्याला येत असणारे का?
हो खरंच! श्या! सगळं न च्या मारी या हवेमुळे होतंय.. निरुत्साही करणारी, सगळं शोषून घेणारी हवा. उष्ण. फुत्कार टाकल्यासारखी. ए. सी. वाल्याला बोलावून घ्यायला हवं की काय? कुलिंग होतच नाही नीट. म्हणूनच पुन्हा पुन्हा विचार येत राहतात नको ते. एकटेच आहोत आपण. एकटे. आणि त्याला कोणाचाही काहीही उपाय नाहीये. सगळ्यांची त्यांची त्यांची जगणी आहेत. त्यांची त्यांची म्हणणी आहेत. आपल्याला हवं तेव्हा आपल्यासाठी नाही येऊ शकत ते. आपण जाणार आहोत का त्यांच्या साठी ते बोलावतील तेव्हा? हजर होऊ शकणार आहोत? नाहीच की. मग कशाला वेडगळ अपेक्षा ठेवायची? पण म्हणजे माणसं जोडली, जोडली असं जे वाटत होतं ते फोलच म्हणायचं की काय? उकडतंय.. आता आतून उकडायला लागलंय.. हे असंच वाढत गेलं तर आतला, डोक्यातला मेंदू वितळून जाईल की काय.. ! कोणाला विचारू? फोन करू का??
नको नको.. आपलं फोन करणं आवडलं नाही तर? बरं मग मेसेज.. नकोच पण. कोरडा वाटतो मेसेज. त्यापेक्षा ‘फोन करता येत नाही?’ असं समोरून आलं तर? आणि या सगळ्यातून आपल्याला जे प्रश्न पडलेत ते तितके महत्त्वाचे नाहीचेत, असं वाटलं तर? मग काय करायचं? आपल्या एकटेपणाला किंमत न मिळणं याची टोचणी तर फारच वाईट. उगाच भळभळून येणार, मग त्यात पुन्हा आपले दिवसच्या दिवस जाणार.. नकोच ते..! आपलं एकटेपण आपल्यापाशीच बरं.
कोकीळ ओरडतोय वाटतं खिडकीत.. रोज, अगदी रोज येतो हल्ली. इवलासा काळा पक्षी. खूप साद घालतो. अगदी कर्कश वाटावी इतकी. ये बाई त्याच्याकडे लवकर. भेट तरी एकदाची त्याला. या उन्हाळ्यात निदान कोणाचा तरी जीव थंडावतोय, एवढं कळू दे. तेवढाच विसावा.
बाकी आमच्या उन्हाळ्याला साथ द्यायला आमरस, पन्हं, कलिंगड, कोकम सरबत, ए.सी. इत्यादी आहेतच. एकटेपणा सकट !

स्पृहा जोशी

Monday, January 18, 2016

कलाकृतीचे ऋण

एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून. वरवर पाहता आपण आपले सगळे व्यवहार करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सरावाने आपली सगळी कामं होत राहतात. सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण त्या विचारांकडे. पण या सगळ्यातून जेव्हा स्वतःशी थांबायला वेळ मिळतो तेव्हा मात्र त्या कलाकृतीपासून पळून नाही जाऊ शकत आपण. अक्षरशः हाताला धरून आपल्याला त्यातल्या प्रश्नांना सामोरं जायला लावते ती.
सध्या एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पर्व’ने माझी ही अशी अवस्था केलीये. महाभारताचा महापट आपल्यासमोर मांडणारी ही महाकादंबरी. हा विषयच मनोव्यापारांची गुंतागुंत मांडणारा. पण सगळे धागे सुटे करून एका वेगळ्याच दृष्टीने भैरप्पा आपल्याला पाहायला लावतात, आणि आपण अडकत जातो. बुडत जातो त्या सगळ्या भीषण अशा, कधीही न बदलता येणाऱ्या कथेमध्ये. महाभारतातल्या सगळ्याच पात्रांना ते देव, चमत्कार, शाप वरदान, यांची सालं सोलून रसरशीत माणसं म्हणून रंगवतात आणि आपण हादरतो. त्यावेळची समाजशास्त्रीय परिस्थिती, भूगोल, सांस्कृतिक वातावरण, आहारविहार या चौकटी मोडून काढत काही हजार वर्षांपूर्वीची ती माणसं कधी ‘आजची’ होऊन जातात कळतच नाही. कारण ती आपल्याला भेटतात ती माणसं म्हणून नाहीत, तर कालातीत असलेल्या ‘प्रवृत्ती’ म्हणून.
मला सगळ्यात अंगावर आली ती त्यातली स्त्री-पात्रं. खरीखुरी. स्वतःशी इमान राखणारी. कुंती आणि द्रौपदी. सुभद्रा आणि गांधारी. हिडींबा आणि उत्तरा. सत्यवती आणि गंगा.. या बायकांची म्हणणी इतक्या थेटपणे ऐकताना गाढ अंधारातून अचानक जळजळीत उन्हात आल्यासारखं वाटलं. त्रास होतो उन्हाचा डोळ्याला, सहन होत नाही त्याचा जळजळीतपणा. पण प्रकाशाला दुसरा पर्याय हा ‘अंधार’ कधीच नसतो, शेवटी स्वीकारावंच लागतं आपल्याला ते दाहक वास्तव. तसच काहीसं झालं. त्या बायका कादंबरीत हाडामांसाच्या बनून येतात. कुठेच अतिरेकी उदात्तीकरण नाही, त्यांना संस्कृतीच्या दडपणाखाली ‘हिरोईन’ करणं नाही. भावनांचं नाटकी प्रदर्शन करणं नाही. काही नाही. आहे त्या त्यांच्या इच्छा, वासना, भोग, मोह, आसक्ती आणि जीवाचं अडकून राहणं. शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत. दबल्या, दडपल्या गेलेल्या या सगळ्या इच्छांचं अखेरचं स्वरूप आहे विनाश! संपूर्ण विनाश. अप्राप्य असलेलं सुख..
आपल्या आसपास आज बघताना अशा कित्येक द्रौपदी, कुंती, आपल्याला दिसतायत की. पिचलेल्या, हबकलेल्या.. सुख शोधत थकलेल्या.. आणि आसपास घास घ्यायला टपलेली व्यवस्थेची राक्षसी रूपं आहेतच. समूळ विनाशाकडे नेणारी !!
आनंद आणि कुतूहल फक्त एकाच गोष्टीचं. बाईपणाच्या या झळा एका पुरुषाने कल्पनातीत शब्दबद्ध कराव्यात.. भैरप्पांचं हे ऋण कधीही न फिटणारं असंच आहे.

स्पृहा जोशी.

Wednesday, January 6, 2016

बर्डमॅन...

मी काही चित्रपट समीक्षक नाही किंवा फार जाणकार अभ्यासू व्यक्ती नाही; पण एक प्रेक्षक म्हणून, गेल्या आठवड्यात पाहिलेल्या एका नितांतसुंदर चित्रपटाविषयी मला तुम्हाला सांगायचंय... बर्डमॅन... विलक्षण... फार विलक्षण सुंदर अनुभव. 
ही एका अभिनेत्याची कथा आहे. "सुपरहीरो‘ म्हणून कीर्तीचा कळस गाठलेला; पण आता उतारवयात प्रसिद्धीच्या झोतापासून दूर फेकला गेलेला एक अभिनेता, जो पुन्हा एकदा स्वतःचा शोध घेऊ पाहतोय, स्वतःला नव्याने सिद्ध करू पाहतोय. आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला तर ही आपलीच गोष्ट वाटेल. करियरमधले चढ-उतार प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. कित्येकदा कामाचा "चॉईस‘ आपल्या हातात राहत नाही. इच्छा असूनही तो ठेवता येत नाही. त्यावेळचे संबंध, आपल्या गरजा, चुकलेली गणितं... कित्येक घटक परिणाम करीत असतात एखादा निर्णय घेताना. मग पुढे जाऊन त्या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम... तेही ज्याचे त्याला, एकट्यालाच भोगावे लागतात. वाल्या कोळ्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणीच पुढे येत नाही. 
प्रसिद्धीची सवय झाल्यानंतर आपल्याच प्रतिमेच्या जंजाळातून बाहेर पडणं अवघड होऊन बसतं अभिनेत्यासाठी. कधी कधी त्याची इच्छा असली, तरी लोक त्याला इतर वेगळ्या रूपात स्वीकारत नाहीत. त्या इमेजमधून बाहेर पडू देत नाहीत. या बालिश लोकप्रियतेच्या माऱ्यामध्ये तो अभिनेता कोंडला जातो. घुसमटत राहतो. त्याचा आतला आवाज सतत ढुशा देत असतो त्याला. पण "त्या आतल्या‘चं ऐकण्याचं स्वातंत्र्य राहतच नाही त्याच्याकडे. काहीतरी "नवं‘ करून दाखवण्याची ऊर्मी मुदलातच मारली जाते आणि उरतात ते फक्त काही किस्से... अफाट लोकप्रियतेचे, अचाट परफॉर्मन्सचे... वर्तमानात त्या आठवणींचा अर्थाअर्थी फायदा तर होत नाहीच; उलट एका विचित्र भोवऱ्यामध्ये गरगरत खेचला गेल्यासारखा तो कलाकार दिसेनासा होतो, संपून जातो! थोरामोठ्यांच्या, देवादिकांच्या भूमिका करणाऱ्या कित्येक श्रेष्ठ कलावंतांच्या वाट्याला हे प्राक्तन येतं. चहूबाजूंनी बहरली असती, अशी कला दडपून टाकली जाते... 
या सगळ्याचं जळजळीत; पण तितकंच वास्तवदर्शी चित्रण आहे "बर्डमॅन‘मध्ये. असं म्हणतात, की यशाच्या शिखरावर एकदा पोहोचलं, की खाली उतरण्यासाठी मार्ग नसतो. असते ती फक्त खोल दरी... किंवा अथांग आकाश. झोकून दोन्हीकडे देता येतं. काही माणसांची झेप अवकाशापल्याड जाते आणि बहुतांशी माणसं मात्र पर्याय नसल्यासारखी "दरी‘ निवडतात. पण त्या एकटेपणातला आनंद एकदा आवडायला लागला, की त्यापेक्षा स्वतंत्र आणि सामर्थ्यवान करणारं दुसरं काहीही नसतं. कारण त्यावेळेला तुम्ही स्वतःलाच आवडू लागलेले असता! हा स्व-शोधाचा प्रवास अत्यंत तरल होऊन "बर्डमॅन‘ मांडतो. आणि आपणसुद्धा तरंगत तो अनुभव घेत राहतो. 
A film is - or should be - more like music than like friction. It should be a progression of moods and feelings. The theme, what‘s behind the emotion, the meaning, all that comes later. - Stanley Kubriek. हा अनुभव देता देता "बर्डमॅन‘ केवळ एका अभिनेत्याची गोष्ट राहत नाही; तर स्वतःला शोधणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची गोष्ट होते. पुंगीवाल्याच्या बासरीसारखी आपला माग काढत आपल्याला दूर दूर घेऊन जाते...!

- स्पृहा जोशी

'कोsहम्'चा शोध..

मनात येणारे अनेक प्रश्न. पॉझिटिव्ह..निगेटिव्ह, अनेक वाटांनी जाणारे. 'कोsहम्' चा हा शोध वयाच्या कोणत्याही पायरीवर न चुकणारा. 
आपण जगत असतो ते कोणासाठी? नेमकं काय घडतं-तुटतं आपल्या आत? स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणारा सगळ्यात जेन्युइन माणूस का खंगत जातो एका एका क्षणाला? 
'आपले' म्हणून जे कोणी असतात त्यांच्या जगण्याची त्यांची एक बाजू. त्याला त्यांची त्यांची परिमाणं. ते बघत असतात त्यांना जेवढे दिसतं 
तेवढंच. मग हे 'त्यांच्यासाठी' म्हणून जे काही लादलं जातं ते झेपणार कसं? ते निभावून पार कसं जायचं? या तगमगीत ना त्यांच्यापर्यंत पोहचता येतं ना स्वतःच्या आत पुरेपूर उतरता येतं. मग काहीतरी 'सापडायचा' अट्टाहास का करत राहतो आपण?
कोणत्या गोष्टींशी नाळ जोडलेली असते नेमकी? बालपण, सभोवताल, आई-बाबा, खाणंपिणं? पुस्तकं, गाणं, अंगाई, कविता? देवळं, प्रसाद, उत्सव, निसर्ग, शाळा? मित्र, शिक्षक, गोधडी, आजीच्या आजोबांच्या गोष्टी, पत्रं? जुन्या जागा ? हा drive असतोच मागे धरून ठेवणारा.
तरीसुद्धा कुठल्यातरी अनामिक फरफटीत आपण होऊन उडी घेतली जाते. आपोआप कुणी न सांगता. काही न ठरवता. आपण फक्त सरकल्यासारखं करतो. लोकलच्या गर्दीत शरीर नुसतं ठेवून दिल्यावर आपण आपोआप जसे कुठल्यातरी स्टेशनावर उतरतो, तसेच ढकलत जाऊन कुठे तरी जाऊन पोचतो आपण.
इथेच यायचं होतं का? माहीत नाही? मुळात कुठेही जायचं होतं का? माहीत नाही? ते मला माहीत नाही. पण समोरच्याला? त्या चौथ्याला, पलीकडे एक्यांशिव्याला, पासष्ट हजार पंचाहत्तराव्याला, लाख.. कोटी.. अगणित गर्दीला?? त्यांना माहीत्येय हे? आणि जर कुणालाच माहीत नसेल तर कसं चाललंय मग हे सगळं? वेगळ्या वेगळ्या दिशेने काहीच माहीत नसताना चालणारी ही माणसं...आपटत कशी नाहीत एकमेकांवर, कुठली गती म्हणायची ही?? माहीत नाही!!
असं म्हणतात, काही माणसं जात्याच संवेदनशील असतात. ती खूप विचार करतात, हे विचार मावत नाहीच कुठेच. आणि वेड लागतं म्हणे त्याना. हो.. लागत असणारंच. वेड लागत असणारंच. कारण या गतीत थांबायला, थबकायला स्कोपच नाहीये. ही वेडी माणसं म्हणजे तीच, आपटणारी माणसं असावीत... वेग सहन न होणारी. वेग न झेपणारी... पण मग म्हणजे 'इथेच यायचं होतं' हे त्यांना कळत असेल का त्या पॉइंटला?? माहीत नाही... हां, बहुतेक आपल्याला 'कुठेच जायचं नाही' हे कळून चुकत असावं.
तेवढं कळलं तरी वेडाचं सार्थक व्हायचं. नाहीतरी त्या निरर्थक शहाणपणानं कुणाचं भलं झालंय? माहीत नाही !!

स्पृहा जोशी 
(Some thoughts after reading 'सेतू' by 'आशा बगे')




Sunday, January 3, 2016

छोटासा ब्रेक

खूप जीव लावलेल्या गोष्टी जेव्हा सरतात, तेव्हा मनात इतकी कळ उठते. सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी विचित्र कळ. पूर्तीचं समाधान आणि आपण अशा अतुलनीय गोष्टीचा भाग आहोत, याचा अभिमान, असं दोन्ही मनात असतानाच ही कळ पुन्हा एकदा मनाचा ताबा घेते. परवा "नांदी‘च्या शेवटच्या प्रयोगाला असंच काहीसं झालं माझं. खरं तर माझंच नाही, आमच्यापैकी प्रत्येकाचंच! कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागे काम करणारे रंगकर्मी सगळेच विलक्षण भावूक झाले होते. पडदा पडताना "नांदी‘चे सूर घुमत असताना गच्च भरलेले प्रेक्षागृह... कधी सुन्न, स्तब्ध... कधी अपार कौतुकाने टाळ्यांचा गजर करणारं... आता "हे‘ पुन्हा कधीच नाही! हा क्षण असाच्या असा गोठून जावा, असं आमच्यापैकी प्रत्येकाला वाटत होतं त्या क्षणी. मागे वळून या दोन वर्षांच्या प्रवासाकडे बघताना काय जाणवतंय मला? 
माझ्यापेक्षा वयाने मोठी असलेली माधवी उभी करणं, हे माझ्यासमोरचं आव्हान होतं. तिचा आवाज, तिचं कम्पोजर, हावभाव... हळूहळू तिला पडणारे प्रश्न, तिने घेतलेला स्वतःचा आणि नात्याचा शोध... आणि सगळ्यात शेवटी तिला गवसलेलं तिचं स्वत्व.... माधवीचे अनेक रंग होते.. वेगवेगळे पदर होते... पैलू होते. माझ्यासाठी खूप कठीण होतं हे सगळं... 
सगळ्यात मजा आली ती "एकच प्याला‘मधल्या "गीता‘ची सोलोलोकी करताना. राम गणेश गडकऱ्यांची भाषा... त्या भाषेचं वजन, गीताचा उद्वेग, त्या काळात आश्‍चर्यकारक वाटणारी तिची ठाम भूमिका... या सगळ्या गोष्टी समजावून घेणं मला थोडं कठीण गेलं. मास्तरांनी या स्वगतातलं वाक्‍यन्‌ वाक्‍य माझ्याकडून घोटून घेतलं... प्रत्येक शब्दावरचा जोर, उतार-चढाव... अगदी बारकाईने... मला म्हणाला, "या सोलोलोकीला प्रत्येक प्रयोगाला टाळी पडते का नाही बघच तू..!!!‘ मला मिळाला तो अनुभव... सलग पाच मिनिटं ताकदीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा... स्वतःला आजमावण्याचा..."आणि दारू पितो तो कसला हो नवरा; माणसातसुद्धा जिम्मा व्हायची नाही त्याची,‘ हे गीताचं शेवटचं वाक्‍य झाल्यानंतर आज प्रत्येक प्रयोगात थिएटरभर पसरत जाणाऱ्या, कडकडून वाजणाऱ्या टाळ्या ऐकण्याचा!!! 
शरद पोंक्षे, अविनाश नारकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अश्विनी एकबोटे, सीमा देशमुख, तेजस्विनी पंडित, हृषिकेश जोशी... या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात लहान... वयाने, अनुभवाने... सगळ्याच दृष्टीने... 
आपलं काही चुकलं तर? आपण कुठे कमी पडलो तर? हे सगळे जण आपल्याला सामावून घेतील का? पण तीन दिवसांच्या तालमीतच या सगळ्या शंका निघून गेल्या आणि त्या परत कधी फिरकल्याही नाहीत... इतका जीव सगळ्यांनीच एकमेकांना लावला... हक्काने सगळे एकमेकांना "चुकलं तर चुकलं‘ सांगतात, मनापासून एकमेकांचं कौतुक करतात... तिथे हिशेबी गणितं नाहीयेत... तिथे या सगळ्यांसोबत असताना "अरे बापरे! आता मी कशी वागू!!‘चे व्यावसायिक प्रश्न पडत नाहीत... वेगवेगळ्या स्वभावांचे, टेंपरामेंटचे आम्ही दहा जण "खरेखुरे‘, "जसे आहोत तसे‘ एकमेकांसोबत असतो. "नांदी‘चं अर्ध्याहून अधिक यश या टीममध्ये आहे... आज जवळपास दोन वर्षांत दहा प्रथितयश कलाकार नाटकात असताना प्रयोग एकही "रिप्लेसमेंट‘शिवाय होतात, यातच सगळं काही आलं! 
शुभारंभ झाला आणि पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला... "हाऊसफुल्ल‘चे बोर्ड आम्ही बहुतेक सगळ्या ठिकाणी पाहिले. सामान्य प्रेक्षकांपासून ते मान्यवरांपर्यंत सगळ्यांनीच मनापासून कौतुक केलं... माझ्या भूमिकेलाही नावाजलं. 
प्रत्येक प्रयोगागणिक नवंनवं काहीतरी सापडत गेलं. "ऑन स्टेज‘ची ही गंमत... तर बॅकस्टेजच्या असंख्य आठवणी... अजयदादाच्या गाण्याला "वन्स मोअर‘ मिळावा म्हणून सगळ्यांनी विंगेत केलेला आरडाओरडा, सगळ्या टीमचा हेडमास्तर असल्यासारखा शरदकाकाचा दरारा, दुसऱ्या अंकात काम सुरू होणार असतानाही त्याचं पहिल्या बेलपासून नाटकात "असणं‘.. त्याचा कमालीचा "नटसम्राट‘... आणि पहिल्या अंकात काम संपूनसुद्धा पडदा पडेपर्यंत मेकअप न उतरवणारा अविकाका... "अश्रूंची...‘ स्टायलाईज्ड अभिनय समर्थ पेलणारा... प्रसादचा "रुक्‍मिणी‘ ते "बुद्धिबळ...‘ हा सहज परकाया प्रवेश... सीमामावशीची साक्षात कारुण्यमूर्ती सिंधू, अश्विनी मावशीची "या वेडालाच कोणी कोणी प्रेम म्हणतात विद्यानंद‘, असं कळवळून म्हणणारी सुमित्रा... अजयदादाचं दैवी गाणं... तेजूने अभ्यासपूर्वक आत्मसात केलेली "कीचकवध‘ची कठीण भाषा आणि नयनताराचे मोहक विभ्रम... चिन्मयसोबत "चाहूल‘ प्रवेश प्रत्येक प्रयोगात वेगळावेगळा करून बघणं, त्यातली मजा... आणि साक्षात दिग्दर्शकांनी, हृषिकेश जोशी यांनी साकारलेले अद्वितीय भरतमुनी!!! पूर्ण नाटक आम्ही एकमेकांसोबत स्टेजवर असतो. तेव्हा झालेल्या गंमती... कधी विसरणं, कधी ब्लॅंक होणं, कधी सांभाळून घेणं... हा सगळा अनुभव खूप खूप संपन्न करणारा आहे. अभिनेत्री म्हणून तर आहेच... पण त्यापेक्षा कित्येक पटीने माणूस म्हणूनसुद्धा आहे. 
आज आम्ही शंभर प्रयोगांचा टप्पा गाठलाय... आणि विराम घेतलाय... "थांबतोय‘ असं नाही म्हणणार... कारण माझी खात्री आहे... अशाच काहीतरी आणखी भव्यदिव्य प्रकल्पाची "नांदी‘ आमच्या मास्तरांच्या डोक्‍यात तयार असणार आहे... त्यामुळे माधवीच्याच शब्दांत... "अकल्पित कल्पिताना‘मध्ये आता घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, ब्रेकनंतर लगेचच पुन्हा भेटू या...!!!

- स्पृहा जोशी

Friday, January 1, 2016

गोष्टी


गोष्ट 1. 

गेले चार दिवस आमच्याकडे रोजचा पेपरच आला नाही. का कुणास ठाऊक; पण मला अस्वस्थ वाटायला लागलं... सकाळच्या पेपरचा एक ठराविक वास, मग त्याला लगडून येणारा वाफाळत्या चहाचा आलं घातलेला स्वाद, ऐन उन्हाळ्यातही तो गरम गरम घोट खाली उतरत जाताना नकळत, सवयीने भरून येणारा उत्साह... हे सगळं हरवल्यासारखं झालं... 
म्हणजे तसा मोबाईलवर वाचलाच ई-पेपर; पण त्यात ती गंमत नव्हती. एका हातात कप धरून दुसऱ्या हाताने पानं दुमडणार नाहीत याची कसरत करत बातम्या मुरवण्याची मजा मोबाईलवर झूम इन / झूम आऊट करताना येईचना. 
असं वाटलं, की वेगळे झालोय आपण सगळ्यांपासून. तोडून टाकल्यासारखे. आपलं एक विश्व आहे; पण ते आपल्यापुरतंच.. घराच्या या इतक्‍याशा चार भिंतींइतकंच. तितक्‍याच मर्यादित अवकाशात झेप आपली. त्यापलीकडे चालू असलेले विराट खेळ... त्यात आपली जागाच नाही काही.. किंवा आपली गरजही नाही. आपल्या असण्याने/ नसण्याने कशावरच काहीही परिणामही होणार नाहीये किंवा काही विशेष फरकही पडणार नाहीये. 

गोष्ट 2.
परवा नेपाळमध्ये भूकंप झाला. हजारो माणसं चिरनिद्रा घेत कायमची हरवली. त्याच वेळेस आणखी कुठेतरी बॉम्बस्फोट झाला, आणखी काही माणसं संपली. मदतकार्य सुरू राहिलं. चर्चा सुरू राहिल्या. आणि प्रत्येकाचं रोजचं जगणं, तेही सुरूच राहिलं. आतलं काहीही न डहुळता... आपापल्या मर्यादित अवकाशात. 
रोजच्या सवयीने हातात पेपर न येणं, याने कुठच्या कुठे फिरून आले मी. ही एक घटना आहे फक्त. अगदीच साधी. खरं तर फारसं महत्त्वही द्यायची गरज नाही तिला. पण माझ्या आत तीच गोष्ट खूप काहीतरी हलवून गेली. सैरभैर करणारे प्रश्न पाडून गेली. 
आमच्या खिडकीच्या ग्रिलमध्ये परवा कशी कोण जाणे, दोन कबुतरं शिरली. अडकून पडली. पंखांची फडफड, चोची आपटणं, कर्कश्‍श ओरडणं. सगळं करून झालं त्यांचं. मग थकून झोपून गेली दोघं. काहीच उपाय सापडत नाहीये असं बघून. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच झगडा. या वेळेस आकांत जास्त मांडला होता त्यांनी. मी स्तब्ध होऊन फक्त ती धडपड बघत राहिले होते. आणि अचानक एका क्षणी एक बारीक वाट सापडली त्यांना. जरासं खरचटलं असणार, पंखही दुखावले असणार... पण बाहेर पडले ते दोघंही. त्या चुकून अंगावर पडलेल्या पिंजऱ्यातून. शक्‍य तितके सगळे प्रयत्न करून बाहेर पडले... मी तिथेच त्यांच्याकडे बघत स्तब्ध. माझ्या तीन खोल्यांच्या घरात.. उगाचच पिंजऱ्यात. मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करत... मर्यादित अवकाशात! 

स्पृहा जोशी