Sunday, March 27, 2016

वर्णनातीत अपूर्णता

कितीतरी दिवसांनी हातात पेन आणि वही घेऊन लिहायला बसले आहे तेही चक्क धावत्या गाडीत.वेगळंच  वाटतंय...एकदम रोमॅन्टिक ! 
मध्यंतरी आमच्या नितीन आरेकर सरांनी ‘ऐवज’ नावाचा एक पुस्तकरुपी खजिना माझ्या हातात ठेवला.त्यात अरुण साधूंनी केलेला पत्रांचा अनुवाद आहे. ती पत्रं आहेत दस्तुरखुद्द पंडित नेहरूंनी त्यांची प्रेयसी..अहं..‘सखी’ म्हणूया...तर त्या सखीला,पद्मजा नायडू यांना लिहिलेली अत्यंत तरल, आशयगर्भ, संवेदनशील आणि हळवी पत्रं. त्यातल्या विचारांची खोली आणि त्यांच्या नात्यांमधली प्रगल्भता यांनी थक्क व्हायला झालं मला. दुर्दैवाने हे नातं पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही,लौकिकार्थाने नेहुरुंच्या समाजातल्या आभाळाएवढ्या प्रतिमेपुढे त्यांच्यातल्या हळव्या प्रेमिकाला चुकवावी लागलेली ही जबर किंमत. पण पत्रं वाचताना त्यात भरून राहिलेला उदास गोडवा एका वेगळ्याच जगात घेऊन गेला मला. त्यातली कित्येक पत्र अशीच आहेत, धावत्या गाडीतून लिहिलेली. कामाचा अशक्यप्राय डोंगर ,राजकारणाचे तणाव, आपल्याच प्रचंड प्रतिमेमध्ये घुसमटणारा जीव..आणि हे सगळं मोकळं मोकळं करणारी ‘आपल्या’ माणसाकडे खेचणारी अनावर उर्मी. जिथे कुठलाही आडपडदा नाही. कुठलंही वेगळं आवरण नाही. कोणत्याही प्रकारचा अट्टाहास नाही. स्वतःच्या ‘खरेपणा’वर कुठलंही बंधन नाही. तिथे आहे फक्त उन्मुक्त अभिव्यक्ती. सडेतोड आत्मपरीक्षण..वेदनांची हळुवार उकल.. आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण! फार सुंदर अनुभव होता ही पत्रं वाचणं.
आज लिहायला बसलेय, तेव्हा लक्षात येतंय किती हद्दपार झाल्यात काही गोष्टी आपल्यातून. ‘माझ्या’ माणसाला मनातलं काही सांगताना मोबाईलचा स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या कीज खडखडत काहीतरी टाईप करायचं. त्यात नुसताच वेग साधतो. हरवलेल्या ‘आवेगा’चं काय? धावणारे विचार काबूत आणून कागदावर उतरवंताना मजेदार तारांबळ उडते, ती सरावाने ‘प्रोग्राम्ड’ मेंदू अगदी सहज उरकून टाकतो. हरवलेला आहे प्रत्यक्ष स्पर्श. ‘पर्सनल टच’.आपल्या प्रिय व्यक्तीची भेट कधी होईल माहिती नाही. भेट काय, महिनोन्महिने तिचं दर्शनही अप्राप्य आहे. पण संवाद तर साधायचाच आहे 'या मनीचे त्या मनी' घातले नाही, तर ते अपूर्णत्व आपल्यालाच रितं करणार आहे. ही सैरभैर करणारी ओढ. कधीकधी अपूर्ण गोष्टी असतात ना, त्या वर्णनातीत सुंदर भासतात. पूर्णत्वाचं समाधान नसेलही त्यांच्यात कदाचित. पण अर्ध्यात वेगळ्या झालेल्या त्या वाटा धुक्यासारख्या भासतात. गूढ..पण सुंदर.
माझ्यातही ती अनावर उर्मी जागते आहे. याचाच मला आनंद आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे ‘आपलं’ जग शोधण्याची उर्मी. गूढ, अपूर्ण, पण सुंदर..!!

 स्पृहा जोशी

Monday, March 14, 2016

कळणं...कळून घेणं...

‘पीवी’ज बिग अॅडव्हेंचर’ नावाचा सुंदर चित्रपट पाहिलायत तुम्ही? अतिशय खेळकरपणे संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. एका प्रसंगात तो त्याच्या गर्लफ्रेंडला, डॉटीला म्हणतो, “माझ्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी गोष्टी, ज्या तुला कधी कळल्याच नाहीत, आणि अशाही कितीतरी गोष्टी ज्या तू कधी कळूनच घेतल्या नाहीस.” मला फार आवडला हा संवाद. किती सहजपणे किती मोठी गोष्ट बोलून गेलाय पीवी.
आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट खरंतर. रोज भेटणाऱ्या, जवळच्या- लांबच्या माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर नातं जोडत असतो आपण. त्यावेळेस प्रत्येकासमोर मन मोकळं करायची वेळच येत नाही. तशी गरजही नसते म्हणा. पण हळूहळू वेगवेगळी आवरणं आपल्यावर चढत जातात. परिस्थिती, घटना, व्यक्ती आपल्यावर परिणाम करत राहतात. त्यांच्या सोयीने आपण स्वतःला वाकवत राहतो, बदलत राहतो. गुंतून जातो त्यांच्या विश्वात. त्या गजबजाटात आपण ‘खरे’ कसे आहोत, किंवा ‘होतो’ हे विसरायलाच होतं..
आणि अचानक मग कधीतरी निवांत वेळी ‘आपल्या’ माणसासोबत असताना आपल्या लक्षात येतं, की नको त्या कोलाहलात किती पुसट होऊन गेलंय सगळं. जसे आपण बदललो, तसाच आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा माणूसही बदलला. कळलंच नाही इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना. फार गृहीत धरलं सगळंच... आपली प्रायव्हसी, आपली स्पेस सगळं हातात आलंय, पण समोरचा माणूससुद्धा त्याच वेळेस त्याची प्रायव्हसी, त्याची स्पेस शोधत निसटून गेलाय कुठेतरी. तर कुठे कुठे नेमका याच्या उलट प्रकार. दोघंजण इतके बुडून गेलेले एकमेकांमध्ये की कोणालाच काही धड अस्तित्व नाही. वेगळ्या वाटांची आवड नाही. एकाने दुसऱ्यावर केलेली कुरघोडी संपवून टाकणारी. ‘तुझं सुख तेच माझं सुख’ याचं अतिरेकी टोक. इतकं, की निर्भेळ स्वातंत्र्याचा आनंदच नाही. आणि मग एक मुक्कामावर पोहोचून लक्षात येतो भलताच प्रकार, एकमेकांत इतके आकंठ बुडूनही माणूस कळला नाहीच की आपल्याला!!  पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”
थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी हे असं वाटून गेलेलं असतंच. भूमिका बदलतात फक्त. कधी आपण ‘पीवी’ असतो, तर कधी ‘डॉटी’. काही गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत, आणि कित्येक गोष्टी ज्या आपण कळूनच घेतल्या नाहीत. वरवर पाहत राहिलो सगळंच. चित्रपटाच्या शेवटी डॉटी पीवीला विचारते, “इतका आटापिटा केलास, आणि आता फिल्म अर्धवट सोडून चाललायस?” पीवी म्हणतो, “मला हे ‘बघायची’ गरज नाही डॉटी; मी हे जगलोय!!” आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या माणसांशी, गोष्टींशी हे ‘असं’ जोडून घेता येईल आपल्याला? वरवरचा चित्रपट बघण्यापेक्षा, त्यात शिरून तो जगता येईल..?? 

स्पृहा जोशी

Monday, March 7, 2016

'सहज'तेची किंमत

प्रिशिला सिटेनेइ (तिचे केनियन भाषेतील टोपण नाव गोगो म्हणजे आज्जीबाई). ६५ बर्षे दाई (सुईण) म्हणून काम केलेली प्रिशिला ९० व्या वर्षी प्राथमिक शाळेत जायला लागली. ह्या आधी तिला ही संधीच मिळाली नव्हती. तिच्या वर्गमित्रांपैकी ७ जण तिचीच खापरपतवंडे आहेत. ती गणित, science, english हे शिकतेच आहे पण त्याबरोबरच PT, Dance हयामध्ये सुध्दा उत्साहाने भाग घेते. तिच्या अनुभवीपणामुळे अजून तिच्याकडे बायका शनिवाररविवारी सुईणपणा विषयी सल्ला घ्यायला येतात. वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिला का वाटलं असेल हे करावंसं? कुठल्याही रेकॉर्डस् मध्ये तिला तिचं नाव नकोय.   तिच्याकडे या सगळ्याची काही साधी सोप्पी कारणं आहेत.  
१.ज्या केनियात आजही स्त्री-शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या केनियातल्या सगळ्या मुलींना तिला स्वतःच्या उदाहरणातून हा संदेश द्यायचाय की शाळेत जाऊन शिकलंच पाहिजे. 
२.तिला सगळ्या वनौषधींची माहिती पुढच्या पिढीसाठी संकलित करून ठेवायची आहे. जे लिहिता – वाचता येत नसल्यामुळे इतक्या वर्षांत तिला करता आलं नव्हतं. आपलं ज्ञान असंच वाया जाऊ नये, यासाठी तिची ही सगळी धडपड आहे. 
३.तिला स्वतःला एकदा तरी ‘बायबल’ वाचायचं आहे..!
कुठून आलीये ही असामान्य दृष्टी आणि हे असं धाडस तिच्यामध्ये? काय प्रेरणा असेल या सगळ्यामागे? आपल्या महाराष्ट्राशी याची तुलना करायला गेलं, तर असं वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत कारण आपण ‘महाराष्ट्रा’सारख्या प्रागतिक राज्यात जन्माला आलो. जिथे प्रबोधनाची परंपरा रुजली. स्त्री- शिक्षणाची चळवळ फोफावली. महात्मा फुले, सावित्रीबाई, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई, आनंदीबाई जोशी, महर्षी कर्वे यांनी आणि अशा कित्येकांनी आपल्या कर्तृत्त्वाने आमच्यासमोर कित्येक दारं खुली करून दिली. परंपरेच्या मुसक्या सैल केल्या. डोळ्यांना स्वप्नं पहायची सवय लावली. आज आम्हाला ‘शिक्षण घेणं’ यासाठी वेगळा विचार करावाच लागत नाही. ते आमच्यासाठी अत्यंत सहज आणि स्वाभाविक बनलंय. ज्योत्स्ना भोळे, कमलाबाई गोखले ह्यांच्यामुळे रंगभूमीवर काम करायला मुलींना मोकळीक मिळाली. केसरबाई केरकर हिराबाई बडोदेकरांमुळे बायका संगीतसाधना करू शकल्या. या सगळ्यांनीच आपापलं कुल- शील जपत कलांनासुद्धा एक साजरं, प्रतिष्ठित रूप मिळवून दिलं.

आज ताठ मानेने आम्ही आमची करीयर्स करू शकतोय ते या साऱ्यांमुळेच. आमचे निर्णय घेऊ शकतोय ते त्यांच्या काळात त्यांनी सोसलेल्या, अंगावर झेललेल्या अनंत अडचणींमुळेच. पण आपल्या पिढीच्या किती जणींना हे माहिती आहे? या सगळ्यांबद्दल कृतज्ञता तर सोडाच, पण यांची नावं सुद्धा पार पुसून टाकलीयेत आपण आपल्या आठवणींतून. प्रीशीला आजींचा संघर्ष आपल्याला आज करावा लागत नाही, कारण या पिढ्याच्या पिढ्यांनी आपलं रक्त आटवलय त्यासाठी. आपण मात्र हा सगळा इतिहास विसरून आपलं मनमानी स्वातंत्र्य गृहीत धरतो आहोत..आणि प्रागतिक विचारांचा आपला महाराष्ट्र दिवसेंदिवस काळाचं चक्र उलटं उलटं फिरवू पाहतो आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा शोध लागण्याआधीच, ती भीती विरण्याआधीच कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ला हा कशाचं द्योतक म्हणायचं?

डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या एका लेखात फार सुंदर लिहिलंय."सनातनी जीवनपद्धती ही काही अविचाराने स्वीकारण्याची गंमत गोष्ट नाही,आणि स्वातंत्र्य हे काही खेळण्यासारखे टाकून देण्याजोगे मूल्य नाही." आपल्या आसपास चाललेल्या सगळ्या भयावह गोष्टी पाहताना किमान हा विचार, हे स्वातंत्र्य शहाणपणाने टिकवू शकू आपण? नुसत्या पुस्तकी घोकंपट्टी आणि घसघशीत पॅकेजपलीकडे जाऊन प्रीशीला आजीचा तो आत्मविश्वास मिळवू शकू आपण?

- स्पृहा जोशी