Saturday, September 26, 2015

हेही नसे थोडके !!

अखेर... गेल्या बुधवारी मतदान पार पडलं. आपलं कर्तव्य उरकून मतदारराजा पाच वर्षांसाठी पुन्हा निद्रावस्थेत जायला मोकळा झाला. निवडणुकीच्या वातावरणात प्रचाराच्या नावावर एकमेकांवर केली जाणारी गरळफेक कमी झाली. भाषणातले मुद्दे ऐकून बुद्धिमत्तेची कीव यावी, अशी व्यासंगाची उधळण केली जात होती, रेडिओवर आचरट प्रचारगीतं न वाजता आता साधी नेहमीची गाणी वाजू लागली. गाड्या भरभरून राज्यभर चालणारी पैशांची ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ थांबली. त्यानंतर सगळ्यांनाच वेध लागले ते ‘नवा मुख्यमंत्री कोण होणार’ याचे... खरं तर सर्वसामान्य माणसाला याची पक्की खात्री असते, की कोणी का होईना; यामुळे आपल्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नाहीये. तसंच लळत-लोंबकळत लोकलचा प्रवास, मुलांच्या शाळा, डोनेशन्स, भाज्यांचे-जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव, महिन्याच्या शेवटी कोलमडलेलं घरखर्चाचं अंदाजपत्रक, असुरक्षित आयुष्य, प्रत्येक पातळीवर कुरतडणारा भ्रष्टाचार, असुरक्षित आयुष्य, काही मिटून टाकलेली स्वप्नं आणि दडपून टाकलेल्या इच्छा...!! एवढ्या कलकलाटातून दिवस आला कधी, गेला कधी, कळतसुद्धा नाही. अशा एकुणातच जगण्याचीच हाय खाल्लेल्या परिस्थितीत आपण सगळे जगतो आहोत....पण अशा वातावरणातसुद्धा काही बातम्या किती छान झुळूक घेऊन येतात. गेल्या काही दिवसांतल्या भडक प्रचारकी गदारोळात आपण अंमळ दुर्लक्षच केलंय त्या बातमीकडे. भारताच्या कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझाई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार घोषित झाला.
कोण आहेत हे कैलाश सत्यार्थी? म्हणून इंटरनेटवर शोध घेतला आणि त्यांच्या कार्याबद्दल वाचून थक्क व्हायला झालं. बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी १९८० पासून हा माणूस अथक परिश्रम करतोय. हा प्रश्न सामान्य प्रश्न न राहता मानव कल्याण (human rights) अंतर्गत धसास लावला जावा, यासाठी झटतो आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून नाना उपाय योजतो आहे. इतकंच नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या विषयाची ज्योत तेवती ठेवतो आहे. वेळप्रसंगी स्वतः अंगावर हल्ले झेलून त्यांनी आतापर्यंत किती मुलांचं पुनर्वसन केलंय ठाऊक आहे?? तब्बल ७८,५०० हून अधिक! नतमस्तक व्हायचं आपण हे सगळं वाचून फक्त. आणि मलालाबद्दल तर काय बोलावं... माझ्या धाकट्या बहिणीच्या वयाची असेल ती फार फार तर. खरं तर तिच्याहूनही लहानच आहे ती. वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पुरस्काराची सर्वात कमी वयाची मानकरी होण्याचा मान पटकावलाय तिने. एवढ्याशा आयुष्यात तिने जे काही करून ठेवलंय ते केवळ ‘अशक्य’, ‘दुर्दम्य’, ‘अचाट’ या विशेषणांमध्ये बांधून घालता नाही यायचं आपल्याला.
पाकिस्तानात राहून, सगळ्या जिवावरच्या आपत्तींना तोंड देऊन एक लहानगी मुलगी आपल्या आसपासच्या मुलींना आपल्या बरोबरीने शिक्षित करण्याचा चंग बांधते. स्वात खो-यात जेव्हा तालिबान्यांनी मुलींनी शाळेत जाता कामा नये, असा फतवा काढला, मुलींच्या शाळा जबरदस्तीने बंद करायला सुरुवात केली, त्या वेळेस या विकृत धर्मांध वादळात अनेक मोठाले वृक्ष कोलमडून गेले, त्यांनी शरणागती पत्करली; पण ‘मलाला’ नावाचं हे छोटंसं लव्हाळं मात्र आपल्या मुळांशी घट्ट राहून झगडत राहिलं. तालिबान्यांच्या गोळ्या झेलूनसुद्धा संघर्ष करत राहिलं. आदर आणि कौतुक यांखेरीज काय येणार मनात!! खरंच पात्रता नाही आपली आणखी काही बोलायची. मी विचार करत होते; काही जणांची आयुष्य अशी झळाळून निघतात, आणि काही जण रोजच्या अंधाराच्या गर्तेत चाचपडत राहतात, असं का? कैलाशजी आणि मलाला त्यांनी केलेल्या कामाच्या आनंदात त्यांची मनःशांती शोधत असतील कदाचित! काट्याकुट्यांचं असेल कदाचित, पण त्यांचं आयुष्य ख-या अर्थाने समाधानाचं आहे. आधुनिक युगातले संतच म्हटलं पाहिजे यांना. स्वतःवरचा आणि आपल्या कामावरचा संपूर्ण विश्वास किती सुंदर समतोल देत असतो यांना. आणि आपण? किती कोतं करून घेतो आपण आपलंच जगणं! 
परवा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हीरो’ नावाचा नितांतसुंदर चित्रपट पाहताना हेच परत परत जाणवत होतं. डॉ. प्रकाश आणि साधनाताई, त्यांचं आयुष्य चहुबाजूंनी येऊन भिडतं आपल्याला. साधेपणातलं सौंदर्य आणि वास्तवाची भीषणता एकाच वेळेस अंगावर येते अक्षरशः! ‘प्रकाशवाटा’तले प्रसंग नाना आणि सोनालीताई जिवंत करतात, आणि आपले डोळे सतत एका अनामिक आनंदाने आणि अभिमानाने भरून येत राहतात...
ही डोळे भरून येण्याची संवेदनशीलता तरी आपल्यात शिल्लक आहे, हेही नसे थोडके..!! ही संवेदनशीलताच न जाणो, आपल्यालाही कधीतरी आपली जबाबदारी उचलायला शिकवेल, केवळ स्वतःकडे पाहायला शिकवणा-या मध्यमवर्गीय रडगाण्यातून बाहेर काढील, या महापुरुषांच्या महाकार्यात खारीचा वाटा उचलण्याचं बळ देईल! आणि कोण जाणे, अशा अनेक लहान लहान खारोटल्या एकत्र आल्या तर नव्या सुंदर समाजाकडे जाणारा एखादा भव्य सेतू उभा राहीलही... कोणी सांगावं!!!

स्पृहा

Thursday, September 24, 2015

म्‍हणे आम्‍ही सभ्य...

गेल्‍या काही दिवसांपासून एका विषयाने आपल्या आसपास थैमान घातलंय. AIB नॉकआउट अर्थात “ऑल इंडिया बक !!!!! सगळीकडे फक्त हीच चर्चा. काहींनी विषय टाळला. काहींनी झुरळ झटकल्यासारखा झटकून टाकला. काही संस्कृतिरक्षणाच्या ‘मोड’मध्ये गेले, तर काहींनी आपण किती ‘लिबरल’ आहोत, हे सांगत या प्रकाराचं समर्थन सुरू केलं. प्रत्येकाचे मुद्दे वेगळे, प्रत्येकाची म्हणणी वेगळी, प्रत्येकाची बाजू वेगळी.
आणि या सगळ्यापासून अनभिज्ञ असणाऱ्यांची एक वेगळी जमात आहे, ती तर आणखीनच वेगळी! या सगळ्यामध्ये घुसळून निघाले मीसुद्धा. मुळात कोण आहेत हे ‘AIB’? तर हा आहे एक यूट्यूब चॅनल. गुरसिमरन खंबा, तन्मय भट, रोहन जोशी, तन्मय शाक्य या विनोदवीरांनी मिळून काढलेला एक वाचाळ कॉमेडीचा धबधबा. आम्ही ‘टोकदार’ विनोद करतो, असं या मंडळींनी स्वतःच ठरवून टाकलेलं आहे. यांना कुठलाही विषय वर्ज्य नाही. राजकारणापासून सिनेमापर्यंत आणि महागाईपासून ते सगळ्याच गोष्टींमधलं यांना सगळ्यातलंच सगळंच कळतं. तसं कळायलाही काही हरकत नाही म्हणा...असतो काही जणांकडे हा गुण. आणि विनोदातून कोपरखळ्या मारणं हे तर किती अवघड काम... उत्तमोत्तम व्यंगचित्रकार, लेखक जेव्हा हे करतात तेव्हा बरं चालतं तुम्हाला! फारच ‘हिप्पोक्रॅट्स’ आहात बाबा तुम्ही!... तर या सगळ्यातलं सगळं कळणाऱ्या मंडळींचां हे चॅनल. त्यातल्या कर्कश विनोदांना ‘व्हायरल’ युगात ‘न भूतो..’ अशी लोकप्रियता मिळाली. अर्थकारणाने गती घेतली. लाखोंच्या घरात त्यांच्या व्हिडिओजना हिट्स मिळू लागले. च्युइंगम चघळत ‘इट्स सो कूल’ करणाऱ्या एका जमातीसाठी हा हॉट टॉपिक/ ट्रेंड झाला. उच्चभ्रूंसाठी, सेलिब्रिटीजसाठी ‘AIB’मध्ये उल्लेख होणं हा नवा मापदंड ठरला. आणि यातून जन्माला आला त्यांचा जाहीर कार्यक्रम, AIB नॉक आउट. ज्याने एक नवं वादळ उठवलं. श्लील-अश्लीलतेच्या सगळ्याच कल्पनांना मुळापासून हादरे दिले. सार्वजनिक ठिकाणी नेमकं कसं वागलं म्हणजे ते सभ्य किंवा योग्य, याची परिमाणंच बदलून टाकली.
अचकट–विचकट, बीभत्स बोलणं म्हणजे ‘इन’, ‘फॅशन’ अशी नवी परिभाषा जन्माला घातली. बरं, या शोमध्ये सहभागी होते करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर... आणि ‘शो’ला हजर असणारी मंडळी होती दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट इत्यादी अनेक... तरुणाईचे हे सगळे आयकॉन्स! आता आपले आदर्शच तिथे आहेत म्हटल्यावर तरुणांनी ते ‘फॉलो’ करावं, यात काहीच नवल नाही. किंबहुना ते अपेक्षितच आहे.

भीषण आहे हे सगळं चित्र. आणि त्यानंतर उठलेल्या प्रतिक्रिया आणखी भयंकर आहेत. जे काही त्या कार्यक्रमात बोललं गेलं, ते चारचौघात बसून ऐकण्याच्या लायकीचं नव्हतं. अत्यंत घाण, अश्लाघ्य, विनोदाचा कुठेही लवलेश नसलेले बीभत्स चाळे होते ते सगळे. कुठल्या तोंडाने करण जोहर त्याच्या पिक्चर्समधून ‘भारतीय संस्कृती की महानता’ लादतो आपल्यावर? मध्यंतरी दीपिका पदुकोणने एका इंग्रजी दैनिकावर तिच्या बाईपणाचा अपमान केल्यावरून रान उठवलं होतं. या कार्यक्रमात समस्त बाईजमातीवरच विकृत म्हणावी अशी टिप्पणी झाली, तेव्हा नाही वाटलं तिला हे बोलावंसं? कित्येक लोकांनी या ‘शो’चं समर्थन करताना म्हटलं, की अशा गोष्टी आपण सगळे बोलतोच, नॉनव्हेज जोक्स सर्रास व्हॉट्स अॅप ग्रुप्समधून फिरतातच... ताकाला जाऊन मग कशाला भांडं लपवायचं? मला हे सगळंच शिसारी आणणारं वाटतंय. अशा कित्येक गोष्टी आहेत हो, ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सगळेच करतो. पण बंद दाराआड! त्याची माहिती प्रत्येकालाच असते, पण ते संकेत असतात, म्हणून एक शहाणा समाज म्हणून आपण वाटचाल करतोय. नाही तर रस्त्यात कुत्री, आणि जंगलात माकडं सुखेनैव विहरतातच नं! आपण ‘माणूस’ असल्याचं कुठलंच लक्षण पाळायचं नसेल, तर मग काय प्रश्नच मिटला.

खरे भयावह आहे ते यामुळे घडणारे परिणाम! या शोवर बंदी घालण्याची मागणी झाली. व्हिडियो डिलीट करण्यात आला. पण सवंग असली तरी प्रसिद्धी ही प्रसिद्धीच असते! ती पुरेपूर झाली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही काहींनी म्हटलं! दोन दिवसांपूर्वी यापुढे ‘सिनेमा-नाटकांमध्ये कोणते शब्द अश्लील म्हणून धरले जातील’ याची यादी प्रसिद्ध झाली! अर्थाअर्थी या दोन घटनांचा थेट संबंध नसेलही; पण आता खरंच माणसाचं जगणं मांडणाऱ्या संवेदनशील, तरल पण थेट भिडणाऱ्या कलाकृतींनी कोणाकडे दाद मागायची? AIBच्या शोवर बंदी घातली म्हणून गळे काढणारे ‘इंटलेक्चुअल्स’ या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने पाहतील? का पुरेसं ‘ग्लॅमर’ नाही म्हणून तिथेच सोडून देतील हा विषय? अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत अशी चुकवावी लागणार आहे यापुढच्या काळात? हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असंच झालं!

आपल्याला बाबा AIBचे विनोद पचत नाहीत, हेच खरं! पु. ल., चिं. वि. जोशी, आर. के लक्ष्मण यांच्या निर्मळ विनोदाला चटावलेले आपण! ‘व्हायरल युगात’ खरं तर तसे मागासच म्हणायला हवेत. आचार्य अत्रे असते तर बाकी हा कार्यक्रम पाहून डोळे विस्फारून नक्की म्हणाले असते, “गेल्या दहा हज्जार वर्षांत ‘असा’ कार्यक्रम झाला नाही बुवा...!!!”

- स्पृहा

करड्या रंगावरली श्रद्धा

मला ‘व्हिलन’ लोक बर्‍याचदा आवडतात. काय माहीत; पण सरधोपट ‘पांढर्‍या रंगावर’ भक्ती आणि ‘काळ्या रंगावर’ राग धरण्यापेक्षा मला ‘करड्या’ रंगाचं, किंबहुना प्रवृत्तीचं जास्त आकर्षण आहे.

सगळ्या देवांमध्ये मला कृष्ण आपलासा वाटतो, तो म्हणूनच! कारण त्याच्यामध्ये खूप जास्त ‘माणूस’ असण्याचं लक्षण आहे. हाडामांसाचा, तुमच्या-आमच्यासारखाच एक माणूस. मौखिक परंपरेतून आपल्यापर्यंत आलेल्या त्याच्या चमत्कारांवर माझी कधीच फारशी श्रद्धा नव्हती. मला भावायचा तो त्याचा शृंगार, त्याचं लाघव आणि सगळं राज्य हातात येऊनही शेवटी त्यावर सहज तुळशीपत्र ठेवायची त्याची अलिप्तता. राधा, रुक्मिणी आणि द्रौपदी या तिघींसोबत वेगळ्याच पातळीवर त्याने जुळवलेलं नातं आणि त्याचे असंख्य मोहक पदर. ते कुठेतरी विलक्षण भुरळ घालतात. पण या सगळ्यातसुद्धा ‘महाभारत’ हा इतिहास आहे, हे गृहीत धरलं तर या सगळ्यावर मात करून उरतं ते त्याचं राजकारणपटुत्व. आणि मग तो एकदम कावेबाज, चलाख, आणि काही अंशी निर्दयीसुद्धा दिसायला लागतो. ‘माणूस’ म्हणून थोडासा मनातून उतरतोसुद्धा. आणि याच क्षणी त्याची जागा घेतं, एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. तुमच्या मनाला वेढून उरतो तो दुसरा-तिसरा कोणी नाही, तर दुर्योधन...!!! मला माहितेय, अनेकांच्या भुवया हे वाचून उंचावल्या असतील, अनेकांच्या मनात प्रश्नचिन्हांनी गर्दी केली असेल. मला स्वतःलाच किती आश्चर्य वाटलं होतं..! पण दुर्योधन माझा ‘हीरो’ झालाय, काका विधाते यांचा सुंदर ग्रंथ वाचता वाचता. महाभारतातली माझ्या सर्वाधिक आवडीची व्यक्तिरेखा म्हणजे कर्ण. त्याचं मनातलं स्थान अढळ! मग अर्थात, काजळमाया करणारा कृष्ण. माझ्या लेखी ‘दुर्योधन’ ही सर्वाधिक पराभूत व्यक्तिरेखा. कधीच स्वतःच्या कोतेपणातून बाहेर न पडू शकलेली. दुर्गाबाई भागवतांनीसुद्धा ‘व्यासपर्वा’मध्ये असंच तर म्हटलंय, त्याच्याबद्दल.

पण हे पुस्तक वाचताना मात्र मला काहीतरी वेगळंच गवसत होतं. एक संपूर्ण नवी बाजू. अत्यंत न्याय्य. एक संपूर्ण नवा चेहरा. भेसूर मुखवटे मुद्दाम लादलेला. त्यावरचे मुखवटे जेव्हा टराटरा फाटले, तेव्हा मला एक वेगळाच दुर्योधन दिसला. स्वाभिमानी, देशभक्त, उमदा, न्यायशील, धर्मपरायण, कर्तृत्ववान, राजबिंडा, राजस असा ‘जाणता राजा’!!!!
एक असा राजा ज्याला इतिहासाने नेहमी काळ्या रंगात रंगवलं. ज्याने न केलेल्या चुकांचं मापही कायम त्याच्या पदरात घातलं. इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो. त्यामुळे अर्थात दुर्योधन खलनायक ठरला, यात काही नवल नाही. पण खोटे चमत्कार आणि बेगडी मूल्यं यात वाहवत जाणारे आपण सगळेच खर्‍याखुर्‍या रसरशीत माणसांना किती सहज काळ्या रंगात रंगवून हद्दपार करून टाकतो, या विचाराने सरसरून आत कुठेतरी खुपलं मला.

इतिहास म्हणूनच पाहायचं झालं, तर दुर्योधनाची एकही मागणी चुकीची नव्हती, कधीच! “मी राज्याचा औरस वारस सर्वदृष्ट्या समर्थ असताना ज्यांचा माझ्या वंशाशी काहीही संबंध नाही, अशा कौन्तेयांना (‘पांडव’सुद्धा नव्हे!!!) मी माझं राज्य देणार नाही. मी राजा असताना भूमी विभाजनाचं पातक कधीही माझ्या हातून घडू देणार नाही,” असं म्हणणारा दुर्योधन. त्यापायी ‘भारतीय युद्धाचा’ प्रणेता, घोर विनाशक अशी विशेषणं स्वतःला कायमची चिकटवून घेऊन स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याची पुरेपूर किंमत चुकवणारा दुर्योधन. लहानपणापासून अंधपुत्र म्हणून हेटाळणी सहन करत, मायेला पारखा झालेला, दरबारी कारस्थानांना बळी पडत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू पाहणारा, युद्ध-शास्त्र-विद्यानिपुण मानी युवराज दुर्योधन. तत्कालीन परंपरा, मूल्यं, समाज, शासनपद्धती यांना एक नवा आयाम देऊ पाहणारा उत्कृष्ट प्रशासक, दुर्योधन.

भानुमती आणि पौरवी या आपल्या दोन्ही राण्यांसोबत समरसून आयुष्य घालवणारा राजस पती... दुर्योधन. अशा वेगवेगळ्या प्रसंगांतल्या दुर्योधनाच्या लोभसवाण्या रूपांनी मला जिंकून घेतलं. अगदी भानुमतीला जसं जिंकून घेतलं होतं त्याने, तसंच. तो न्याय शोधत राहिला, आयुष्यभर. पण खोटं वागला नाही कधी. अपमानाने जळून जाताना फक्त एकदाच त्याचा तोल सुटला, जेव्हा द्यूतप्रसंगी पांचालीची बेअब्रू केली गेली तेव्हा. आणि त्या पश्चात्तापाच्या आगीतही त्याने स्वतःला जाळून घेतलंच. माणूस म्हणून वागला, हसला, रडला, चिडला, आणि मनापासून आपल्या माणसांवर प्रेमही केलं त्याने! अधर्मयुद्ध तो नाही लढला कधीच. धर्मपरायण पांडवांनी कृष्णाच्या साथीने, किंबहुना सल्ल्यानेच कौरवांकडच्या प्रत्येक वीराला खोटेपणाने मारलं. क्रूरपणे हत्या केली. भीष्म, द्रोण, कर्ण, आणि दुर्योधन स्वतःदेखील! पण दुर्योधनाच्या लेखी युद्ध हा असला बाजार नव्हता. त्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि राजा म्हणून त्याने घेतलेल्या जबाबदारीसाठी प्राणपणाने निभावण्याचं परमकर्तव्य होतं. लाचार जगणं मान्यच नव्हतं त्याला, म्हणून सर्वस्व उधळून देत लढला, आणि कृतार्थ वीरमरण पत्करलं त्याने...

आता माझ्या मनात कृष्ण आणि कर्णाहून काकणभर सरस प्रतिमा आहे, ती मरणसुद्धा स्वधर्माला शोभेलसं पत्करणार्‍या त्या मानी राजाचीच! मला इतकी वेगळी दृष्टी दिलीये या पुस्तकाने... इतिहासाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहण्याची दृष्टी. फक्त जेत्यांचा नाही तर ‘जीतां’चा आपलेपणाने विचार करण्याची दृष्टी... फक्त पांढर्‍यावर नाही, तर माणूसपणाच्या ‘करड्या’ रंगावर प्रेम करण्याची दृष्टी!!!

- स्पृहा

Wednesday, September 23, 2015

पिंजणवारा


नुसती गडबड चालली आहे, आतल्या आत. एकच कोलाहल. एका वावटळीत, धूळभरल्या रस्त्यावर एकटंच सोडून दिलंय, जणू कोणी तरी. भिरभिरत जाणा-या पाचोळ्यासोबत मीही दूरवर भिरभिरत जाते आहे... या वेगात स्वतःला सावरताच येत नाही. आसपास काही पुसटशा होत जाणा-या ओळखीच्या खुणा, काही नेहमीची ठिकाणं, एरवी बकाल वाटणा-या काही वस्त्या, मिळाला तर तोही आधार चालणार आहे, मला आत्ता थांबायला. पण ही भिरभिर भिंगरी थांबतच नाही. वेग तसाच आहे. हा पिंजणवारा खूप दूर दूर नेतोय मला...

‘पिंजणवारा’ हा शब्द तरी का आठवला असेल मला? माझा नाही तो! माझ्या आसपासचं कोणीच वापरत नाही हा शब्द. मग तो आला कुठून माझ्यापर्यंत. आह!

ज्ञानदेवांचा आहे हा ‘पिंजण’वारा. पण यांच्यासाठी तो शांतरसाचं प्रतीक. मग माझ्या मनावर याची फुंकर का लागत नाहीये? बधिरपणाला आणखी बधिर आणि पेटल्या वणव्याला आणखी फोफावणारा असला हा, ही कुठली तऱ्हा शोधलीये त्याने, छळवणुकीची! माझ्या अंगांगातून आता हा भैसाट वारा पिंगा घालतोय. कुठल्याही एका विषयावर विचार टिकूच देत नाही तो! मी हेल्पाटते, थकून जाते.

...असहायता, राग, चीड, संताप, बधिरपणा, शांतता... पुन्हा एकदा तेच... पुन्हा पुन्हा तेच! निरर्थक भासणा-या सा-या गोष्टी आपल्याला इतक्या महत्त्वाच्या का वाटतात? नदीचं मूळ कुठून सुरू झालं? आणि ऋषीचं कूळ कुठलं आहे? याच्या शोधाची जबाबदारी आपल्यावर घ्यायची गरजच काय मुळी? इतरांसारखं समोर आलेलं पाणी चुपचाप प्यायचं आणि समोर आलेल्या ऋषीच्या पायावर साष्टांग लोटांगण घालायचं; हे का नाही जमत आपल्याला? सोप्पं झालं असतं की सगळंच! काय समजतो काय आपण स्वतःला? ‘चांदोबा चांदोबा भागलास का’पर्यंत संपलंच नाही आपलं आणि चंद्राचं नातं... पोरवयातली नाती तेव्हाची, तेव्हाच संपवायची असतात न?? आपल्याला नाही जमलं, ते! आता कशाला एवढी काळजी वाटायला हवीये याची?? पिवळसर दिसला एखाद दिवस चंद्र, तर अजूनही आपण विचारतो, “आज बरं वाटत नाहीये का रे तुला? लवकर बरा हो हं!!!”...कोणी सांगितल्यात, या नस्त्या उठाठेवी? आपल्यासारख्या माणसांनी कशाला पडावं, असल्या नस्त्या फंदामध्ये? आपण बरं, आपलं काम बरं!

...पण नाही जमत, खरंच नाही जमत... भिंगरभिवरी वाढत जाते. वेग सोसेनासा होतो. क्लांत मन... आणि आतल्या आतला, फक्त आपला आपल्यापुरताच आकांत! कल्लोळ नुसता. शब्दच मितीला अशा वेळी. ‘आपलं’ असं दुसरं असतं तरी कोण?? अशा वेळी आपलीच कविता आपल्या मदतीला!

- स्पृहा

Sunday, September 6, 2015

निःशब्द वेदना !!

पेशावरमधल्या त्या निष्पाप जिवांची हत्या करण्यात अाली अाणि सभाेवतालचा सजीवत्वाची जाणीव देणारा अावाज तसाच घुमत असला तरी अातल्या अात मन मात्र मूक हाेऊन गेले. डाेळ्यांत पाणी डबडबण्याइतकेही अवसान उरले नाही. का घडावे असे ? नि:शब्द काेलाहल मांडायलासुद्धा हात थरथरताहेत...

वेगवेगळे आवाज... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...घरातल्या भांड्यांचे, हातातल्या बांगड्यांचे. दुरून जाणारी लोकल, कपड्यांची धोपटणी, सर्व्हिसिंग न केलेली रिक्षा, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, पाण्याचा पंप, विचित्र आवाजात ओरडणारी रस्त्यावरची कुत्री, खिडकीच्या बाहेर फांदीवर बसलेल्या काळ्या पक्ष्याची खोडावर चाललेली अविरत टकटक, रेडिओची खरखर, मस्त जुळलेला तंबोरा,  मोबाइलचा रिंगटोन...तो नको म्हणून बंद करावा तर व्हायब्रेशन मोडची थरथर... आणि सगळ्यात मोठी थरथर आहे, ती आतली... म्यूट न करता येणारा आवाज!!!

चार दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या शाळेत घुमले असेच आवाज... बंदुकांच्या निर्घृण फैरींचे, विकृत हास्याचे, अश्राप किंकाळ्यांचे... मग त्यावर काही आवाज... सगळं पचवलेल्या राजकारण्यांचे, मुर्दाड पत्रकारांचे, इकडल्या तिकडल्या कडवट धर्माभिमान्यांचे... कित्येक आवाज... कर्कश्श... पत्ते खेळताना ‘चॅलेंज’ नावाचा खेळ खेळायचो आम्ही. आपले खोटे पत्ते खपवायचे... ‘ऊपर एक, और एक’च्या आरोळ्या मारत आपण कसाही करून डाव जिंकायचा!!! तसलाच प्रकार! मेली ती मुलं, पत्तेच होते काही क्रूर जुगाऱ्यांनी त्यांना हवे तसे फेकलेले! हे ‘ऐकू’ आलेले आवाज... मला भीती वाटली ती न ऐकू आलेल्या आवाजांची... त्या दिवशी ज्यांची बालमनं कायमची चिरडली गेली, अनाकलनीय भीतीने ज्यांचा आवाज, ज्यांची हाक गळ्याशीच गुदमरली, त्या आतून उठणाऱ्या आकांताचं काय?? आपल्याच श्वासाचा आवाज, समुद्राची शांत गाज, षड्जाचा सूर, सकाळी उठल्यावर येणारी पाखरांची किलबिल, रात्रीच्या गार थंडाव्यातली लोरी... यापुढे यातला कुठला तरी आवाज ऐकू शकतील ते चिमणे जीव? लागेल त्यांना शांत झोप? मिळेल त्यांना थोडीशी ऊब? थोडासा विसावा?

फैझ अहमद फैझ नावाचे शायर म्हणून गेलेत, 
“थक कर यूँ ही पल भर के लिये आँख लगी थी, सोकर ही न उठें ये इरादा तो नहीं था... ये शहर उदास इतना जियादा तो नहीं था..!!!’’ 

जरासं थकून पापण्या मिटल्या होत्या हलकेच! डोळे उघडायचे होते, पुन्हा नवी स्वप्नं पाहण्यासाठी, नव्या रुजुवातीसाठी... ते कायमचे का मिटले, कोणी मिटले??? कळलंच नाही... कधीच... ...आताशा या उदासीचाही एक आवाज आहे विकल करून सोडणारा... कातरवेळी डोळ्यांतून पाणी काढणारा...

उत्क्रांतीच्या काळात म्हणे जशी माणसाची जडणघडण होत गेली, तसतसं माणसाचं हृदय आणि मेंदू दूरदूर गेले... सतत कुरघोडी करू लागले एकमेकांवर. ठरवून एकमेकांच्या विरोधी निर्णय देऊ लागले... हृदयाचं ऐकायला गेलं की मेंदू बधिर होतो, आणि मेंदूचं ऐकलं की हृदय फाटून पिळवटून निघतं... सहन करायचंच आहे हे दोन्ही... त्याला पर्याय नाहीच. हे चक्रच कधी सृजनाची शक्ती देतं, कधी विनाशातली उद‌्ध्वस्तता! आवाज चालू... हृदयाची धडधड, मेंदूची टिकटिक... वेगवेगळे आवाज आहेतच... सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत... घरातल्या भांड्यांचे, हातातल्या बांगड्यांचे. दुरून जाणारी लोकल, कपड्यांची धोपटणी, सर्व्हिसिंग न केलेली रिक्षा, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, पाण्याचा पंप, विचित्र आवाजात ओरडणारी रस्त्यावरची कुत्री, खिडकीच्या बाहेर फांदीवर बसलेल्या काळ्या पक्ष्याची अविरत चाललेली टकटक, रेडिओची खरखर, मस्त जुळलेला तंबोरा, मोबाइलचा रिंगटोन... तो नको म्हणून बंद करावा तर व्हायब्रेशन मोडची थरथर... आणि सगळ्यात मोठी थरथर आहे, ती आतली... म्यूट न करता येणारा आतला आवाज!!!

स्पृहा जोशी

Thursday, September 3, 2015

... पण बोलणार नाही !

शेअरिंग करताना समोरच्याला काय हवंय, याचा अंदाज घेऊन बोलायला लागतो आपण. यामध्ये ‘आपण’ कुठे असतो? कुठे हरवून बसतो स्वतःला? खरं गुज उकलतच नाही. बांध फुटतच नाही. आपण तरंगत राहतो, वरच्यावर. तिथल्या तिथेच चाचपडत राहतो. मग कशासाठी हा ‘व्यक्त’ व्हायचा अट्टहास?

बोलायची ऊर्मी कुठून येत असेल माणसात? सतत काहीतरी सांगावंसं का वाटत असेल समोरच्याला? ते ‘शेअर’ करण्यासाठी मग एक श्रोता हवा... ही ‘शेअर’ करण्याची आंतरिक निकड कुठून कुठे घेऊन आलीये, आज आपल्याला? आदिमानवाने अंधाऱ्या गुहेच्या भिंतींवर चित्रं काढली असतील, तीही याच गरजेतून; आणि आज आपण फेसबुक/ट्विटरच्या भिंतींवर आपले फोटो टाकतोय, तेही याच गरजेतून... पण आता ते केवढं अक्राळविक्राळ झालंय. आपल्याला ‘काय वाटतंय’ ते सांगायचं; ‘काय वाटत नाही’ तेही सांगायचं.
आपले वेगवेगळे मूड स्विंग्स ‘वॉल’वर काय चाललंय, त्याच्या आधारे ठरवायचे. आपल्या आवडीनिवडी तशाच वेगाने बदलत राहायच्या. त्या आधारे लोकांना आपल्याला जज करू द्यायचं! आणि आपणही तेच करायचं, लोकांबद्दल! ‘शेअरिंग इज केअरिंग’चा जाहिरातीचा डोस मुकाट्याने पिऊन टाकायचा... छोट्यातल्या छोट्या प्रसंगाचे फोटो न थकता अपलोड करायचे. ‘लाइक्स’ आणि ‘रिट्विट्स’वरून आपली लोकप्रियता मापत राहायची. हजार ग्रुप्स आहेत व्हॉट्सअॅप वर. पळत राहायचं इथून तिथे. ‘थम्सअप’, ‘टाळ्या’, आणि विविध हास-या चेह-यांच्या स्मायलीज पाठवत. आपला सगळीकडे प्रेझेन्स आहे, हे दाखवत. सगळंच ‘व्हर्च्युअल’... पण इतकं सगळं होऊनही तहान भागत नाही, ती नाहीच... आमच्या ‘समुद्र’ नाटकातली नंदिनी फार सुंदर सांगते, तिचं म्हणणं... रोजच्या जगण्यातले विषय, चित्रपट, गॉसिप्स हे सगळं झालंच. ‘पण याच्या पलीकडेही आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतंच ना? ते त्या क्षणी कोणाला तरी सांगावंसं वाटतं. मग ते काहीही असेल, कदाचित अगदी क्षुल्लकही असेल.’ हे ‘सांगावंसं’ वाटण्याची आच जितकी तीव्र, तितकेच बसणारे चटकेही दाहक!
हे शेअरिंग अनेक पातळ्यांवरचं असतं. कधी अगदी खासगी, वैयक्तिक, कधी अगदी हिशेबी, फायदा बघून. कधी घरगुती, कधी बुद्धिजीवी. कधी कोंडमारा असह्य झाल्याचं, कधी आनंदाचा अतिरेक झाल्याचं. व्यक्त व्हायचं, एवढं नक्की. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं शोधायची. कधी कधी माणसांनाच ‘माध्यम’ म्हणून वापरायचं! कोणासोबत, कधी, काय शेअर करायचं, याचेसुद्धा आडाखे बांधले जाऊ लागतात. आणि मग शेअरिंग करताना समोरच्याला काय हवंय, याचा अंदाज घेऊन बोलायला लागतो आपण. ‘त्याला’ आवडेल तसं... ‘त्याला’ आवडेल ते! यामध्ये ‘आपण’ कुठे असतो? कुठे हरवून बसतो स्वतःला? खरं गुज उकलतच नाही. बांध फुटतच नाही. आपण तरंगत राहतो, वरच्यावर. तिथल्या तिथेच चाचपडत राहतो. मग कशासाठी हा ‘व्यक्त’ व्हायचा अट्टहास?
मला ब-याचदा असं वाटतं, की ‘न बोलायची कला’ आपल्याला साध्य व्हावी. अनेक गोष्टींवरची अनेक मतं, मतांतरं, विवाद, चर्चा या सगळ्या गोष्टी टाळता याव्यात... ‘काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही’ ही सिद्धी प्राप्त व्हावी. मिटून घ्यावं आतल्या आत स्वतःला... थंड, खोल गारवा...
मग कधीतरी, खूप काळानंतर, आपलाही शोध घ्यावासा वाटेल कुणाला तरी. आपली एकेक पाकळी उलगडत समजून घ्यावं, मग कोणीतरी आपल्याला. पोहोचेलच की कोणीतरी, कधीतरी आपल्याही गाभ्यापर्यंत. तोपर्यंत वेळ तसाच जाऊ द्यावा... एक शांतता पसरावी आजूबाजूला सगळीकडे. काहीतरी सुंदर पाहिल्यावर जी अनामिक हुरहुर लागते, तिचं व्यक्त होणं कळून यावं. त्यालाही आणि मलाही. शब्दांचा भडिमार नकोच मग. डोळ्यातल्या पाण्यानेही सांगून जावं बरंच काही. त्या वाहत्या पाण्यानेही स्तब्ध व्हावं एक क्षण. हातात धरलेल्या हातानेही मुकेपणाने लावावेत अर्थ. सूर्य जरासा मावळताना धरून ठेवावा आपल्या मुठीत... एकत्र... एकाच वेळी! या संकेतांनी बहरून येईल, ते खरं व्यक्त होणं... सापडेल आपल्याला?

स्पृहा जोशी

Wednesday, September 2, 2015

गुणवत्तापूर्ण सातत्याचा सृजनाविष्कार !

आर. के. लक्ष्मण गेले. त्यांच्या ‘कॉमन मॅन’ने सगळ्यांपेक्षा ‘अनकॉमन’ बनवलं होतं, त्यांना. आठवडाभर त्यांच्याबद्दलचे उत्कृष्ट अग्रलेख वाचताना, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या बाजूंचा परिचय होत होता. या सगळ्यातून माझ्यापर्यंत पोहोचला तो पैलू म्हणजे सातत्य- कन्सिस्टन्सी. शिळेपणा न येऊ देता, सतत उच्च श्रेणीचा परफॉर्मन्स देत राहणं, कसं काय साध्य केलं असेल त्यांनी‌? की साध्य झालं असेल त्यांना आपोआप?

काही गुण, काही कला या जन्मजात एखाद्याला साध्य असतात. अगदी दैवदत्त म्हणतो, तशा. पण कितीही झालं, तरी स्वतःला घासूनपुसून लख्ख करणं कुठे चुकलंय कुणाला? हल्लीच्या आमच्या पिढीला पूर्वीच्या कलाकारांची ‘साधने’ची ही व्याख्या तशी जरा कमीच झेपते. बदलणार्‍या काळाचा परिणाम असेल कदाचित; पण पूर्वी एका गुरूने आपल्या शिष्याला सहा महिने केवळ ‘यमन’ राग घोटायला लावला होता, या आणि अशा सगळ्या कथा (खरोखर घडलेल्या... रचलेल्या नव्हेत!) अमानवी वाटतात. ही माणसं, कलेप्रती त्यांची असलेली ही झोकून देण्याची वृत्ती हे सगळंच वेगळं वाटतं...
म्हणजे त्यांच्याबद्दल आदर असतोच; या अशा गोष्टी ऐकल्या की दुप्पटही होतो... पण, त्या मानसिकतेशी आम्ही जोडून घेऊ शकत नाही, हेही तितकंच खरं. ‘फास्ट फूड’ युगातल्या आम्हाला सगळंच खूप फास्ट मिळतंय, म्हणून असेल का हे?? यश, प्रसिद्धी, ग्लॅमर, पैसा सगळंच.

‘डेली सोप’मधून घराघरांत पोहोचल्याचा आनंद, स्पर्धेत स्वतःला सिद्ध केल्याचा आनंद... प्रत्यक्ष ‘मेहनती’पासून थोडा लांब घेऊन चाललाय आम्हाला सगळ्यांनाच, असं सतत वाटत राहतं. फार लांब कशाला जा, अगदी सहा-सात वर्षांपूर्वीपर्यंत कलाकार एकाच नाटकाचे दोन दोन हजार प्रयोग करत होते, ही गोष्ट आमच्या पचनी नाही पडत... कशी जपली असेल त्यांनी ‘कमिटमेंट’? नेमक्या काय भावनेने ते काम करत असतील? हे समजून घेणं आज अवघड जातं आम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. प्रयोगाला गेल्यावर ‘आज बुकिंग किती आहे?’ हा प्रश्न पहिला मनात येतो. मग कमी प्रेक्षक आहेत का, मग आज उरकूनच टाकू, कशाला फार ‘एनर्जी’ लावा! अशा चर्चा अगदी सहज होतात. तेव्हा बालगंधर्वांनी एकदा फक्त आठ प्रेक्षक समोर असतानाही ‘हाउसफुल’च्या एनर्जीने, त्याच तन्मयतेने प्रयोग कसा केला असेल, हा विचार मनात आला तरी झटकून टाकला जातो... अगदी नकळतपणे. आम्ही चुकतोय... खूप चुकतोय... याची जाणीव या सर्वथा मोठ्या असणार्‍या माणसांना वाचून, ऐकून होत राहते.

राधा राजाध्यक्ष यांना ‘टाइम्स’मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आर. के. लक्ष्मण म्हणाले होते, ‘मी एक गोष्ट सांगतो, मी इतकी वर्षं चित्र काढतोय, म्हणजे असं होत नाही की, मी खोलीत शिरलो आणि त्या क्षणी मला कार्टून सुचलं किंवा ती आयडिया माझ्यावर येऊन आदळली... प्रत्येक नवा दिवस हा पहिल्या दिवसासारखाच असतो. त्याच वेदना... तेच कष्ट. तुम्ही स्वतःला हे नाही सांगू शकत, की आज मी पहिल्या दर्जाचं काम केलंय. उद्या मी दमलोय, मग दुय्यम दर्जाचं केलं तरी चालून जाईल...नाही! त्याबद्दल तुम्हाला कदाचित कोणीही जाब विचारणार नसेलही; पण सातत्याने सर्वोत्कृष्ट ठरायचं असेल, तर तुमच्या स्वतःला, तुमच्या सदसद््विवेकबुद्धीला तुम्हाला उत्तर द्यावंच लागतं. ‘काळ’ नावाचा लुटारू प्राणी (predatory animal) सतत तुमच्या पाठलागावर असतो आणि ‘डेडलाइन’ नावाची टांगती तलवार सतत तुमच्या डोक्यावर लटकत असते.’

हे वाचलं आणि लक्षात आलं, मोठी माणसं उगाच ‘मोठी’ होत नाहीत. कलाकार म्हणून ती स्वत्वाशी तडजोड करत नाहीत आणि सदसद्विवेक बुद्धीला गहाण टाकत नाहीत. काय वाट्टेल ते झालं, तरी स्वतःशी खोटं बोलत नाहीत... ती ताजी राहतात, कारण कलेच्या प्रांतात स्वैर फिरताना, इतर कोणाची नाही तर स्वतःची भीती त्यांना सगळ्यात जास्त वाटत असते. आजच्या सादरीकरणानंतर आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाला मी नजर देऊ शकेन का, याची भीती वाटत असते. तिथे ‘उरकणं’ नसतंच... आपल्याच परिघाच्या, आपल्याच अवकाशाच्या बाहेर झेप घेणं असतं. हा ‘अनकॉमन’ गुण स्वतःला ‘कलाकार’ म्हणवून घेणार्‍या आम्हा सगळ्यांच्या स्वभावात मुरावा, एवढीच नटराजाचरणी प्रार्थना!!

- स्पृहा जोशी